ए... छगन... अजित... तूम्ही कशाला भांडताय आत्तापासून... आपलं काय ठरलं होतं? थरात ज्या मंडळाचे गोविंदा जास्त असतील, त्यांचाच गोविंदा हंडी फोडायला जाणार... मग... भांडण कशाला करताय आत्तापासूनच?जास्त शाणपणा नको करू अशोक, समजलं ना... यावेळी आमच्याच मंडळाचे गोविंदा जास्त असणार... म्हणून आम्ही ठरवतोय आमच्यापैकी कोण हंडी फोडायला जाणार ते... भांडत नाय काय...!
ह्यॅं... ठरवायचंय काय त्यात... त्या अजितचे काकाच आहेत ना मंडळाचे अध्यक्ष. ते त्यालाच वर पाठवतील हंडी फोडायला...
असं काय नाय... हे तुला कोणी सांगितलं साल्या... तुमच्यासारखं नाई आमचं. तुमच्यात त्या राहूलची आई सांगेल, तसंच करायला लागतं... मागच्या वेळी नाई हंडी फोडायला निघालेल्या विलासला काकूंनी परत बोलावलं आणि तुला सांगितलं की हंडी फोड म्हणून... असं नाय आमच्यात...
हो पण आता विलासला मोठी हंडी फोडायला पाठवलंय ना काकूंनी... म!!
आहाहाहाहा.. म्हणे हंडी फोडायला...!! खालच्या थरावर उभं केलंय विलासला... आणि पाहशीलच तू... शेवटी हंडी फोडायला राहूल जाईल विलास, सुशील यांच्या खांद्यांवर पाय ठेवत...
अजितच्या काकांचं काय झालं रे आबा... त्यांना म्हणे मोठी हंडी फोडायला जायचं होतं... तुम्ही सगळे लै गोंगाट करत होतात ते हंडी फोडणार यंदा म्हणून... हॉ... हॉ... हॉ...
दात काय दाखवतो... आमचं मंडळ छोटं म्हणून... नायतर त्यांनी कधीच हंडी फोडलीपण असती...
मंडळ छोटं असणारच... आमच्याच मंडळातून फुटून गेलात ना तुम्ही...
आयला... हा नारायण जोकच करतो... याचं कुठलं मंडळ... हा दुस-याच मंडळातून तुमच्यात आला आणि आता म्हणे आमचं मंडळ... दे टाळी...
अशोक, तू काय त्याला टाळी देतो... आता आपण एका मंडळातले ना? असं नाई करायचं... आणि आता विलासचं आणि माझं भांडण पण मिटलंय ना... हो की नाई रे कृपा...
अरे नारायण... तू पण कमालच करते... तुमचा आणि विलासचा भांडण मिटला, ते मायतेय अशोकला... म्हणूनच तर त्याला फिकर लागलीय की तू तेच्याशी तंटा करेल आता अशी... विलासला खाली उतरवला ते वक्ताला नाय का तुजा आणि अशोकचा भांडण झालेला हंडी फोडायला कोण जायचा त्यावरून... विसरला काय एवड्यात?
तो कसा विसरेल... राहूलच्या आईनं तर पत्ता कापला त्याचा... किती वेळा गेलेला त्यांच्या घरी मस्का मारायला... पण शेवटी अशोकलाच दिला ना चान्स हंडी फोडायचा...
काय रे पोरान्नो... कसली वादावादी करताय... माझ्याबद्दल काय चाललेलं...
काई नाई हो काकू... हे अजित आणि छगन आहेत ना, ते यंदा मुंबईची हंडी फोडायला कोण जाणार सगळ्यात वर त्यावरून भांडतायत... मी त्यांना सांगितलं आमचं काय ठरलंय ते... पण ऐकतच नाहीत...
भांडू दे रे अशोक त्यांना... शेवटी अजितचे काका आणि मीच ठरवणार ना तुम्हा पोरांपैकी कोणाला खालच्या थरात ठेवायचं... कोणाला मधे आणि हंडी फोडायला कोणाला पाठवायचं ते... तू कशाला लक्ष देतो त्यांच्याकडे... लांब उभा राहून गम्मत बघ ना!! ते बघ... अजितचे काका आलेच इकडे... ते बघून घेतील आता.
काय राहूलच्या आई काय झालं...
अं... काही नाही... अशोक सांगतोय की अजित आणि छगन भांडतायत म्हणून, हंडी फोडायला यावेळी कोण जाणार त्यावरून... म्हणून त्याला सांगत होते, की तुम्ही आलाच आहात, तर बघून घ्याल असं...!
हा.... या कारट्यांना सवयच आहे भांडायची... त्यांना हजारदा सांगितलंय की दुस-याकडे आल्यावर भांडत जाऊ नका आपापसात. पण ऐकत नाहीत... चला रे मुलांनो... दहा-दहा झालेत आता... चला आता आपापल्या घरी... अजून खूप वेळ आहे दहीकाला यायला... नंतर ठरवता येईल की ते... चल बाळा अजित... घरी जाऊ! सुप्रियाताई वाट बघत असेल आपली...











अखिल भारतीय विद्यार्थी परिषद... कॉलेजमध्ये असताना भारून टाकलेलं एक नाव. खरंतर मी परिषदेच्या संपर्कात आलो शाळेत असल्यापासून. बदलापूरात माझ्या आजीच्या घरासमोरच परिषदेचं कार्यालय. मी पाचवीपासून आजीकडेच शिकायला असल्यानं तेव्हापासूनच कार्यालयात जाणं-येणं... कॉलेजमध्ये गेल्यावर प्रत्यक्षात परिषदेच्या "कामा"त कधी आलो, मलाही समजलं नाही. पण सहली, शिबिरं हे म्हणजेच विद्यार्थी परिषदेचं काम असं वाटायचं. त्यानंतर परिषदेच्या कामाचे एक-एक पैलू हळूहळू समजत गेले. कॉलेजात असताना गोव्याचे कुमार वझे बदलापूर भागात पूर्णवेळ आले होते. ही संकल्पना तेव्हाच समजली आणि पहिलंच 'कडक' उदाहरण डोळ्यासमोर दिसलं ते कुमार वासूदेव वझे, नागेशी, बांदिवडे, फोंडा, गोवा... त्यानंतर घरातून शिव्या पडत असतानाही वेळोवेळी वेगवेगळे कार्यक्रम-आंदोलनं-मोर्चे इत्यादी सुरू झालं. दहावीनंतर सायन्सला गेल्यानं आभ्यास करण्याचा घरचा आणि स्वतःचा मानसिक दबाव होताच. पण परिषदेनं "भारलं" होतं ना? मग काय... १२वीत असतानाही 'फी वाढ विरोधी' निदर्शनं करण्यासाठी मंत्रालयावर गेलो होतो. (घरी माहित नव्हतं अर्थातच... आल्यावर कळलं मी कुठे होतो ते. त्या वेळी २ तास पोलिस स्टेशनला बसवलं होतं, हे अजून सांगितलेलं नाही... आत्ता कळेल कदाचित!) थर्ड इयरला असताना बदलापूर शाखेची जबाबदारी होती. (खरंतर कागदोपत्री नव्हती, कारण पुन्हा थर्ड इयर... पण सक्रीय होतोच...) त्यानंतर जर्मालिझमच्या डिप्लोमाला गेलो, ते परिषदेला वेळ मिळावा म्हणून. (थॅक्स टू एबीव्हीपी... नाहीतर आत्ता कुठेतरी कारकुनी करत असतो... नाहीतर परिक्षानळ्या फिरवत बसलो असतो... नाहीतर औषधं विकत असतो....) त्या वेळी बदलापूर भागाची जबाबदारी होती. (बदलापूर ते कर्जत) त्याच्या पुढलं वर्ष माझ्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं होतं.






