Monday 27 July 2009

इस 'सच'से मुझे बचाओ...!!

सध्या दोन रिऍलिटी शो गाजतायत... एक म्हणजे 'इस जंगल से मुझे बचोओ...' आणि दुसरा 'सच का सामना...' एक थोडासा फियर फॅक्टरच्या जवळ जाणारा आहे आणि 'सच का सामना' ही भारतात तरी संपू्र्ण नवी कंसेप्ट आहे. या दोन्हीबद्दल लोकांमध्ये बरी-वाईट मतं आहेत.
***************
इस जंगल से मुझे बचाओ....
काही जण जंगला गेलेत... त्या जंगलात असलेले एक महिला आणि एक पुरूष असे दोन अँकर जंगलात गेलेल्या या लोकांना अजब-गजब गोष्टी करायला लावतात... म्हणजे साप-विंचू-कोळी यांनी भरलेल्या भांड्यात डोकं घालणं... चिखलात चिंब-चिंब होऊन जाणं... इत्यादी. या गोष्टी केल्यानंतर त्यांना काही स्टार्स मिळतात आणि या स्टार्सच्या संख्येवर म्हणे त्यांना रात्री काय आणि किती खायला मिळणार, ते ठरतं.... हे म्हणजे अतीच झालं... चांगल्या खात्यापित्या घरातून ऊठून जंगलात जायचं आणि तिथं जाऊन साप-विंचवांना अंगाखांद्यावर खेळवायचं... का तर दोन वेळच्या जेवणासाठी... याला 'भिकेचे डोहाळे' असं म्हणतात मराठीत....
बरं, त्या तिथं जंगलात गेलेल्या लोकांचं ठीक आहे. पण टीव्हीवर हा तमाशा पाहणारेही अजबच म्हणायला हवेत... जे पाहिल्यावर फक्त भिती वाटू शकते किंवा किळस येऊ शकते अशा गोष्टी आपल्या घरात बसून स्वतःची वीज जाळून आणि चांगलं काही बघायचं सोडून पहात बसणारा 'विम्झिकल'च म्हणायला हवा... साप-विंचवांवर असलेले डिस्कव्हरी-ऍनिमल प्लॅनेटचे कार्यक्रम बघणं वेगळं आणि सापांनी भरलेल्या भांड्यात तोंड बुडवून बसलेला माणूस-माणसी पाहणं वेगळं... जे हा कार्यक्रम गोडीगुलाबीनं पाहतात, त्यांनी लवकरात लवकर एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाची भेट घ्यावी, असा एक प्रेमाचा सल्ला द्यावासा वाटतो...
(एक प्रेमाची सूचना... या कार्यक्रमात साप-विंचू यांच्याबरोबर जंगलात गेलेल्या ललनांनी धबधब्यात केलेली आंघोळही दाखवतात... इच्छुकांसाठी एकवार आवश्य भेट द्यावी आणि खात्री करून घ्यावी - पण स्वतःच्या जबाबदारीवर!!!!!)
***************
सच का सामना...
तुमच्या घरात खूप सुख-समाधान असेल... तुमच्या बायको/नव-यासोबत अजिबात भांडण होत नसेल... तुमचे आई-वडील तुमच्याबद्दल अभिमान बाळगून असतील किंवा तुमच्यावर त्यांचा खूप जीव असेल... आणि हे सगळं तुम्हाला नकोसं झालं असेल तर 'सच का सामना' या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तातडीनं एसएमएस करा...
या कार्यक्रमात इतके पर्सनल प्रश्न विचारतात की आपण एकटे असतानाही त्याबद्दल स्वतःच स्वतःला विचारायला घाबरू... म्हणजे सुरूवातीला एखादा एपिसोड पाहिला आणि 'प्रथमग्रासे मक्षिकापातः' असं झालं... काहीही विचारतात... 'दुस-या एखाद्या बाईबरोबर शारिरीक संबंध ठेवावेत असं वाटतं का?' किंवा 'तुमच्या पत्नीनं तुमच्यापेक्षा तुमच्या पैशांकडे बघून लग्न केलंय, असं वाटतं का?' यासारखे अतीअतीअतीअतीअती खासगी प्रश्न विचारतात... (आमच्या सचीन-विनोदची शाळेपासूनची मैत्री तोडली या कार्यक्रमानं...!!!) त्यामुळे संसारात सुखी असाल आणि ते सुख बोचत असेल, तर त्वरित या कार्यक्रमात सहभागी व्हा...
आता पुन्हा हा कार्यक्रम बघणारेही वरच्यासारखे 'विम्झिकल' असावेत... इंटेसिटी थोडी कमी, इतकंच... कारण दुस-याच्या इतक्या खासगी गोष्टींमध्ये डोकावून बघायला आवडणं आणि त्याचा आस्वाद घेणं, हे ही थोडंसं मानसशास्त्रीय आजार या कॅटेगरीतच मोडतं...
आपल्या आजूबाजूलाही असे अनेक जण असतात... म्हणजे कोणाकडे काय भांडणं चालल्येत... कोणाचं कोणाशी लफडं आहे... कोणाचं कोणाशी अजिबात पटत नाही... कोण कोणासोबत रहात नाही... अशा नाना चौकश्या करणारे असंख्य जण आसापास फिरत असतात. अशा लोकांनी हा कार्यक्रम आवर्जून बघावा, असा प्रेमाचा सल्ला द्यावासा वाटतोय... म्हणजे या लोकांचं आसपास लुडबूड करणं थांबेल आणि बाकीचे सुटतील... अन्यथा हा 'सो कॉल्ड रिऍलिटी शो'देखील 'न बघणे' याच कॅटेगरीतला आहे.
***************
तळटीप : सलग दोन पोस्ट 'टीव्ही' याच विषयावर येणं हा योगायोग आहे. हा ब्लॉग बातमीदार किंवा भंकसच्या वाटेवर न्यायचा आजिबात हेतू नाही, याची इच्छुकांनी ('सच का सामना'वाल्या...) जरूर नोंद घ्यावी, ही विनंती...

1 comment:

ashishchandorkar said...

वास्तविक पाहता असे कार्यक्रम पाहणारी मंडळी एक तर मूर्ख असतात किंवा त्यांना टीव्हीवर काहीही पहायला आवडतं, असं म्हणायला हरकत नाही. भारतीयांना कॉप्या करणं खूप आवडतं पण ते देखील आपण नीट पद्धतीनं करु शकत नाही.