Tuesday 1 December 2009

बादशहाचं 'कॉस्ट कटिंग...'

बेगमला कितीतरी दिवसांपासून बिरबलाच्या जागी आपल्या भावाला घुसवायचं होतं... पण दर वेळी बिरबल आपल्या चातुर्यानं बेगमचा 'प्लॅन' हाणून पाडायचा... एकदा आपल्या महालात पेपर वाचत बसली असताना बेगमनं 'कॉस्ट कटिंग'ची बातमी वाचली... ती वाचल्यावर बेगमच्या डोक्यात एक मस्त शक्कल आली... तिचा 'मक्सद' होता अर्थातच बिरबलाला बादशहाच्या मर्जीतून उतरवण्याचा... मग तिनं आपल्या भावाला बोलावणं पाठवलं आणि त्याच्यासोबत चर्चा करून सगळा प्लॅन फायनल केला...
**************
शनिवारी रात्री जेवणाच्या वेळी बादशहा कोंबडीची तंगडी तोडत असतानाच बेगम म्हणाली, 'काय महागाई वाढले सगळीकडे... सगळ्या जगात सगळे राजे-महाराजे पैसे वाचवण्याच्या उद्योगात आहेत... आपल्या राज्यात मात्र उधळपट्टी ऐन भरात आलीय...'
झालं... एकतर चविष्ट कोंबडी रस्सा आणि बेगमचं लाडिक बोलणं... बादशहा पाघळला नाही, तरच नवल... पण बिरबलाशी बोलल्याशिवाय आणि त्याचं मत घेतल्याशिवाय बादशहा काही करणं अशक्यच... त्यानं दुसऱ्याच दिवशी सकाळी बिरबलाकडे दूत पाठवला... सुट्टीच्या दिवशी बादशहानं बोलावलंय, म्हणजे एकतर काही महत्त्वाचं काम असणार किंवा महाराजांच्या डोक्यात कुठलंतरी खुळ आलं असणार... हे बिरबलानं लगेच ताडलं... बिरबल हजर झाल्यावर बादशहानं रात्री जेवताना बेगमकडून ऐकलेलं वाक्य जसंच्या तसं बिरबलाच्या तोंडावर फेकलं... ते ऐकून बिरबल अवाकच झाला... चर्चा नेमकी कुठल्या दिशेनं जात्ये, त्याच्या लक्षात येईना...
इतक्यात बेगम म्हणाली, 'त्यामुळेच आता आपल्या राज्यात कॉस्ट-कटिंग करायचा निर्णय महाराजांनी घेतलाय... त्याची अमलबजावणी करण्यासाठी वजीर या नात्यानं त्यांनी तुम्हाला बोलावलंय... आपल्याकडच्या सगळ्या खात्यांमधली कोण-कोण माणसं काढून टाकता येतील, याची यादी संध्याकाळपर्यंत माझ्या भावाकडे गेली पाहिजे... महाराजांनी कॉस्ट-कटिंग खात्याचा मंत्री म्हणून त्याला नेमलंय...'
बेगमचं हे भाषण ऐकल्यावर बिरबलानं लगेच ओळखलं यामागे कोण आहे... आणि कशासाठी आहे... बेगम आणि तिच्या भावाच्या असल्या क्लुप्त्या बिरबलाला माहित होत्या... पण हे या थराला जाईल, याची त्याला अजिबात खात्री नव्हती...
बिरबलानं आपल्या परीनं बादशहाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला... पण या सगळ्या गोष्टी बेगमनं रात्रभरात बादशहाच्या डोक्यात इतक्या भरल्या होत्या... की बादशहाला बिरबलाचा मुद्दा ऐकूच येईना... राज्याच्या तिजोरीतल्या लाख्खो मोहरा वाचणार, याचीच बादशहाला भुरळ पडलेली... अखेरीस 'जशी आज्ञा खाविंद...' असं म्हणून बिरबल निघून गेला...
**************
बादशहाच्या (खरंतर बेगमच्या!) आज्ञेप्रमाणे बिरबलानं आपल्या इच्छेविरुद्ध राज्यातल्या सगळ्या खात्यातल्या कामगारांची यादी बेगमच्या भावाकडे 'पेश' केली... बेगमच्या भावानं बिरबलाला दुसऱ्या दिवशी येऊन भेटायला सांगितलं...
दुसऱ्या दिवशी बादशहासोबत झालेल्या एका मिटिंगमध्ये बेगमच्या भावानं यादी अपूर्ण असल्याचं सांगून बिरबलावर पहिला हल्ला केला... बिरबलाला असं काहीतरी होणार याची कल्पना होतीच... त्यामुळे त्यानं आपला बचाव तयार ठेवला होता... मात्र तो काही बोलण्यापूर्वी बाहशहानं बेगमच्या भावाला याचा अर्थ विचारला...
त्यावर बेगमचा भाऊ म्हणाला, 'सगळ्या खात्यांची यादी बिरबलानं दिलीय... मात्र संरक्षण खातं, अर्थात सैन्यातल्या ले-ऑफची यादी यात नाही... एकदा कॉस्ट-कटिंग करायचं म्हंटल्यावर सगळ्या खात्यांमध्ये व्हायला पाहिजे...'
हे ऐकल्यावर मात्र बिरबल थक्क झाला... बेगम आणि तिचा भाऊ वजिराच्या खुर्चीसाठी या थराला जातील, याची त्याला कल्पनाच नव्हती...
अखेरीस तो बादशहाला म्हणाला, 'सैन्यातल्या कपातीची यादी करणं आपल्याला शक्य नाही... तो आपला स्वतःचा अधिकार आहे, असं मला वाटतं...'
बिरबलानी असं म्हंटल्यावर बादशहा थोडा सावध झाला... बिरबलाला तो पुरता ओळखून होताच... शेवटी बादशहानं ही जबाबदारी बेगमच्या भावावरच सोपवली आणि मिटिंग संपली....
**************
बेगमच्या भावानं सगळ्यात आधी बिरबलाच्या 'सेनापती'ची रवानगी राजधानीत नव्यानं बांधण्यात आलेल्या मुदपाकखान्याचा सुरक्षा-रक्षक या जागी केली... त्यानंतर ५० टक्के सैनिक कमी करताना त्यानं आणि बेगमनं अक्षरशः चिठ्ठ्या टाकल्या... अर्थात हे बादशहाला माहित नव्हतं... बिरबलाला माहित असून उपयोग नव्हता... कारण बादशहाला सांगून समजणार नाही, हे त्याला स्वानुभवानं माहित होतं...
सगळ्या सैनिकांना खलिते गेले, की उद्यापासून कामावर येऊ नका... इतकं सगळं होऊनही बेगमच्या भावानं उरलेल्या सैनिकांना देण्यात येणारी रसद बंद केली... 'युद्ध सुरू नसल्यानं सैनिकांनी घरून डबे आणावेत आणि चहापण घरूनच थर्मासमध्ये भरून आणावा', असा फतवा बेगमच्या भावानं काढला... या प्रकारामुळे सैन्यामध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली... बिरबलालाही हे सगळं असह्य झालं होतं...
**************
एकदा रात्री बादशहा घोरत पडला असताना १च्या सुमारास एक सैनिक धावत-धावत महालात आला... त्यानं तातडीनं महाराजांना उठवण्यास त्यांच्या सेवकांना सांगितलं... बादशहा डोळे चोळत-चोळतच जरा गुश्श्यातच उठला आणि सैनिकाला काय झालंय ते सांगण्याची आज्ञा केली... त्यावर सैनिक म्हणाला, 'शेजारच्या राजानं आपल्यावर हल्ला केलाय... त्याचं सैन्य आपल्या सीमेवर येऊन टेकलंय...'
हे ऐकल्यावर बादशहाची झोपच उडाली... त्यानं तातडीनं बिरबलाला बोलावणं पाठवलं... पण दिड-दोन तासांनी बिरबल डोळे चोळत-चोळत आला.... हे पाहिल्यावर बादशहा आणखीनच भडकला... त्यानं बिरबलाला थेट फैलावर घेतलं आणि हल्ला कसा झाला आणि आत्ता काय स्थिती आहे, ते विचारलं...
बिरबल म्हणाला, 'आपल्या कॉस्ट-कटिंगची बातमी शेजारच्या राजाला त्याच्या गुप्तहेरांनी दिली असणार... आपण सैन्य ५० टक्के कमी केल्यामुळे आपली ताकद कमी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं असणार आणि.....'
बिरबलाचं वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच आणखी एक सैनिक धावत आत शिरला आणि त्यानं नवीच माहिती बादशहाला दिली... तो म्हणाला, 'आपण कमी केलेले सगळे सैनिक शेजारच्या राजाकडे गेल्येत... त्यानं तितक्याच पगारात सगळ्यांना घेतलं आणि आता हेच सैनिक आपल्यावर चाल करून येतायत...'
हे ऐकल्यावर तर बादशहा हादरलाच... त्यानं बिरबलाकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं... बिरबलानं खांदे उडवले आणि म्हणाला, 'आता काय करायचं याचं उत्तर बेगमच्या भावानं दिलं पाहिजे...' हे ऐकल्यावर बेगमला घामच फुटला... ही परिस्थिती हाताळायला आपला भाऊ लायक नाही, किंबहुना बिरबलाइतका कोणीच लायक नाही, हे तिला पक्क ठाऊक होतं...
शेवटी बिरबल म्हणाला, 'मी यावर मार्ग काढायला तयार आहे... आपण ही परिस्थिती हाताळू शकतो... फक्त त्याचा तिजोरीवर थोडा ताण येईल... हे मान्य असेल तर अजूनही हल्ला वाचवणं शक्य आहे...'
बादशहा णि बेगमनं मागे-पुढे न पाहता बिरबलासाठी तिजोरी मोकळी करण्याची तयारी दाखवली... त्यावर बिरबल म्हणाला, 'आपल्यावर चालून येत असलेल्या आपल्याच सैनिकांना दुप्पट पगारावर परत घेतलं जात असल्याची घोषणा तातडीनं करा... म्हणजे सगळं नीट होईल...' बादशहाला ही आयडिया एका क्षणात आवडली... त्यानं तातडीनं खलिता घेतला आणि आदेश काढला... तो घेऊन निरोप घेऊन आलेले दोन्ही सैनिक निघून गेले.... राज्यावरचं संकट टळल्यामुळे बादशहा आणि बेगमनं सुटकेचा निश्वास टाकला....
**************
सैनिक निघून गेल्यावर बादशहाला बिरबल म्हणाला, 'खाविंद... माफ करा... पण मी तुमच्याशी खोटं बोललो... राज्यावर कुठलाही हल्ला झालेला नाही... पण आपण कॉस्ट-कटिंगच्या नावाखाली आपली शक्तीस्थळं कमकुवत करत गेलो, तर काय होऊ शकतं... याची छोटी झलक तुम्हाला दाखवली...' थोडा पॉज घेऊन बिरबल म्हणाला, 'हल्ला खोटा असला तरी तुम्ही दिलेले आदेश खरे आहेत... त्या सैनिकांना आपण दुप्पट नाही, तरी पुर्वीच्या पगारात पुन्हा घेतलंच पाहिजे...'
**************
बादशहाला बिरबलाचं म्हणणं पटलं आणि आपल्या या वजिराचा आणि त्याच्या चातुर्याचा अभिमान त्याच्या मनात दाटून आला... याच आनंदात त्यानं 'कॉस्ट कटिंग'ला फाटा देत दरबारात बिरबलाला शाही मेजवानी दिली...

4 comments:

भातु संवाद विषयी... said...

गोष्ट छान आहे. आता यातली बेगम कोण, बादशाह कोण, बेगचा भाऊ कोण,सैन्य कोण,हे सगळे कळाले हो...मात्र बिरबलाची भूमिका आता कोण पार पाडणार हे कळायला मार्ग नाही.

Madhuri Kulkarni said...

khup chhan gosht aahe. chhan rangawali ahe aani shewat pan jamalay. asech lihit raha.

गिरीश निकम said...

story bhawali. chan mandalis. kathanak sadhyachya vastavar nemkya shabdat bot thevata. newspaperla pathav mhanje sangalyparyant message jail.

- girish nikam

MILIND said...

गोष्ट मार्मिक आहे. अगदी तंतोतंत आहे. समजली. छान वाटली आणि भावली. मनापासून लिहिलेली आहे. छान...आणि लिखाणाला शुभेच्छा....