Saturday 20 March 2010

माया मेमसाब...!

मायावतींचं एक बरं आहे... स्वतःचे मोठ्ठेच्या मोठ्ठे पुतळे स्वतःच उभारायचे... स्वतःला नोटांचे हार घालून घ्यायचे... आणि त्यावर कोण बोललं की 'दलित की बेटी' मोठी झालेली यांना चालत नाही, असं म्हणत गळा काढायचा...

हे म्हणजे मुंबईत राहणा-या झोपडपट्टीतल्या लोकांसारखंच आहे. रहायचं झोपडीत. आत टीव्ही, डिश टीव्ही, डीव्हीडी प्लेअर, फ्रीज, एअर कुलर असं सगळं असतं. मग ती झोपडी पाडायला कोणी गेलं की 'बेघर केलं' असं म्हणत बोंब ठोकायची...
मायावती यापेक्षाही एक पाऊल पुढे गेल्यात. फक्त बेघर केलं असं म्हणून त्यांचं भागत नाही. बाबासाहेबांचं नाव घेत दलितला बेघर केलं, असं म्हणून सहानुभूती मिळवायची, असला हा त्यांचा उद्योग... त्या दलित घरातल्या आहेत, अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून आल्या असू शकतात वैगरे... सगळं मान्य.... पण जर तसं असेल तर त्यांनी दलित समाजाच्या उन्नतीसाठी काय केलं, ते जगासमोर यायला नको का? दलित घरातून येऊन देशातल्या सगळ्यात मोठ्ठ्या राज्याचा मुख्यमंत्री झालेली ही बाई... तिनं स्वतःचे पुतळे उभे करण्यापेक्षा उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात खेडोपाडी शाळा काढल्या असत्या तर त्या गावातल्या दलित जनतेनेच त्यांचे पुतळे उभारले असते. त्यासाठी राज्य सरकारच्या किंवा गेलाबाजार पक्षाच्या तिजोरीत हात घालायची गरजच पडली नसती. पण काशिराम (सॉरी... मा. कांशिराम) यांच्या पुतळ्याजवळ स्वतःचा फूल साईज पुतळे त्यांनी स्वखर्चाने (?) उभारले.... यात जनतेचं त्यांनी काय आणि कसं भलं केलं, हे त्याही सांगू शकणार नाहीत.
पुतळ्यांचा प्रश्व अजून मिटलेला नाही. केंद्र सरकारने त्याच्या खर्चाचा तपशील शोधण्याचे आदे दिलेत. न्यायसंस्थेनंही या उधळपट्टीवर कडक शब्दांत ताशेरे ओढलेत. हे संपत नाही तोच मायावतींनी बसपाच्या मेळाव्यात १००० रुपयांच्या नोटांचा हार स्वतःच्या गळ्यात घालून घेतला. कहर म्हणजे त्यावर चहूबाजूनी झोड उठल्यावरही दुस-या दिवशी आणखी एक हार घालून घेतला. आणि या कहराचा कहर म्हणजे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी जाहीरच करून टाकलं, 'बहेनजी जिथे जिथे जेव्हा केव्हा जातील, तिथे त्यांना नोटांचाच हार घालू...!' आता झोपडीत राहणा-या (म्हणजे खरोखरच्या... टीव्ही-फ्रीजवाल्या झोपडीत नव्हे) रंजल्या-गांजलेल्या दलिताचं मायावतींनी नोटांचे हारच हार घालून कसं भलं होणार? येता जाता बाबासाहेब-महात्मा फुल्यांचं नाव घ्यायचं आणि त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावरून जाण्याऐवजी विमानातून शॉर्टकट मारायचा... हे कसलं नेतृत्व.... हे कुठले नेते... यांना कोण निवडून देतं... का निवडून देतं... निवडून दिल्यानंतर 'तुम्ही असं का केलंत' हे विचारण्याचा अधिकार जनतेला नाही का... की तिने मुकाटपणे पुढली पाच वर्षं असली थेरं बघत बसायची...
मायावतींचं हार प्रकरण म्हणजे आपल्या देशाचं राजकारण किती हीन दर्जाला जाऊन पोहोचलंय, त्याचं जातिवंत आणि ताजं उदाहरण आहे.
मायावतींच्या पक्षाचे नेते सांगतात की हारासाठी लागलेला पैसा जनतेकडून गोळा केलाय... उत्तर प्रदेशातल्या जनतेकडे जर इतका पैसा असेल तर मग महागाईच्या नावाने गळा काढायचा अधिकार कोणाला उरतो... ना जनतेला, ना नेत्यांना...
यापेक्षा १० पट मोठी पोस्ट लिहिली तरी कमीच पडेल आणि इतकं लिहून मनातला संताप कमी होईल याची शक्यता नाहीच... किती लिहिणार आणि का लिहायचं, असा विचार करून इथेच थांबावं, हे बरं...

No comments: