Friday 7 May 2010

प्राणप्रिय मोटरमन...

मी तुला कधीच पाहिलेले नाही. आपली थेट ओळखही नाही. एखादवेळी रागा-लोभाच्या क्षणी आपण भेटलो असू-नसू... पण त्यानं काहीच फरक पडत नाही. ज्याप्रमाणे हवा दिसत नाही पण तिचे अस्तित्व सतत जाणवते. गदिमांच्या भाषेत ‘कधी भक्त का पाहतो ईश्वराला... नदी न्याहळी का कधी सागराला...!’ तसा माझ्यासाठी तू... आपल्या भारती संस्कृतीत ‘ग्राहको देवो भवः’ असं म्हणतात... पण इथं मी ग्राहक असले तरी माझा देव मात्र तूच आहेस. गेल्या दोन दिवसांत ‘देव कोपल्या’वर काय होतं, त्याचा प्रत्यय मला पुरेपुर आला. अखेरीस तुझा कोप दूर झाला व तू पुन्हा आमची ‘सेवा’ घ्यायला सुरूवात केलीस, हे समजल्यावर मी सुटकेचा निश्वास टाकला...
‘नाक दाबलं की तोंड उघडतं...’ अशी एक म्हण आहे. ही म्हणदेखील तू अपुरी ठरविलीस. ‘एकाचं नाक दाबलं की दुस-याचं तोंड उघडतं...’ अशी नवी म्हण तू जन्माला घातली आहेस. प्राण गुदमरेपर्यंत माझं नाक दाबल्यानंतर अखेर सरकारच्या तिजोरीचं तोंड थोडं का होईना, किलकिलं झालं आहे. त्यामुळे तुझं अभिनंदन केलं पाहिजे... आता मी हे खवचटपणाने बोलतेय, असं वाटत असेल तुला... पण मी खरंच मनापासून म्हणतेय.
तू ज्या मागण्यांसाठी माझं नाक दाबलंस, त्या योग्य की अयोग्य हे ठरविण्याची माझी लायकी नाही. ‘कोणीही यावे टपली मारून जावे...’ या आपल्या सांघिक खेळात कायम माझ्यावरच राज्य असतं आणि तूझ्यासारखे अनेक जण टपली मारून जात असतात. एखादी टपली थोडी जोरात बसते (कालच्यासारखी). पण माझी सहन करायची ताकद अमर्याद आहे. अशा पदोपदी टपल्या खाणारीने तू आणि तुझ्या मालकांमध्ये बोलू नये, हे समजतं मला... पण या मागण्यांसाठी तू पत्करलेल्या मार्गाचं कौतुक केल्यावाचून रहावत नाहीये.
खरंतर सकाळी ६ वाजल्यापासून तू उपोषण करून गांधीगिरी सुरू केली होतीस. हेच जर तू मध्यरात्रीपासून केलं असतंस, तर कदाचित सकाळपासून गाड्यांचा गोंधळ झाला असता आणि मी मुंबईत (ऑफिसला) गेले नसते. घरीच राहिले असते. पण तू सकाळी ६पासून उपास सुरू केलास. त्यामुळे एक मन नको म्हणत असताना गाडी राईट-टाईम असल्याने मी मुंबईत गेलेच. दिवसभर काम करून आणि अनेकांच्या ‘टपल्या’ खाऊन थकल्यावर घरी यायला निघाले आणि अचानक तुला चक्कर आली, हॉस्पि़टलात न्यावं लागलं... ही तुझी आयडिया चांगली होती. तुझा घाव अतिशय योग्य जागी लागला. माझ्या नाकावर तू दाबलेला चिमटा अधिक घट्ट झाला. माझा जीव गुदमरला... पण त्या क्षणी तुला आणि तुझ्या मालकांना माझी चिंता नव्हतीच... (ती तशी कधीच नसते म्हणा!) मी घरी कशी पोचले, कधी पोचले का कुठल्यातरी स्टेशनच्या कोप-यातल्या बाकावर एकटीच बसून रात्र काढली... याच्याशी तुला काही घेणंदेणं असायचं कारण नाही. घरी माझी पिल्लं वाट बघत असतील, माझे म्हातारे आई-बाबा, सासू-सासरे एकटे असतील, याच्याशी तुला काय घेणंदेणं असणार? उलट माझे जितके जास्त हाल होतील, तितकं तुला बरं होतं... नाही! तू मुद्दाम मला त्रास द्यायला हे केलंस, असं मला म्हणायचं नाहिये. किंबहूना आपले संबंध फार जिव्हाळ्याचे आहेत, असंच मला वाटतंय. पण मला होणारा त्रास तुझ्याच फायद्याचा आहे, हे नाकारण्यातही अर्थ नाही...
माझे कसे हाल झाले किंवा तू कसा चुकलास हे सांगण्याची माझी इच्छा नाही आणि त्यानं काही फरक पडेल, असंही नाही. त्यासाठी हे पत्र नाही. तुझ्या मागण्या मान्य होणार आहेत म्हणे. त्याकरिता तुझं अभिनंदन करण्यासाठी हा पत्रप्रपंच... आणि समजा मालकांनी आश्वासन दिलं असलं तरी त्या नाहीच झाल्या मान्य, तरी चिंता करू नकोस... माझं नाक शाबूत आहे. तुला वाटेल तेव्हा त्याला चिमटा लाव... ते कापून टाक... काय हवं ते कर... पण मागण्या सोडू नकोस. त्या तुझ्या आणि तुझ्यामुळे माझ्या अस्तित्वासाठी फार गरजेच्या आहेत. माझी चिंता करू नकोस... माझी सहनशक्ती भक्कम होती, आहे आणि राहील...

तुझी कायम कृपाभिलाषी,
एक अतिसामान्य लोकल प्रवासी
ताजा कलम – पुन्हा आबांना भेटलास की हा खालचा भाग फाडून त्यांना दे प्लीज...

------------------------------------------------------------

प्रिय आबा,
तुम्ही मोटरमन आणि त्यांचे मालक यांच्यात शिष्टाई करून अखेरीस हे प्रकरण मिटविल्याचे समजले. हे तुम्ही माझ्यासाठीच केलेत, असे मानले तरी त्याला ३० तास का लागले, हा प्रश्न मला छळतो आहे. आता मी घरी पोचले आहे. जर गाड्या आणखी चार दिवस धावल्या नाहीत तर मी घरीच राहणार... ऑफीसला जाणार नाही... त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान होणार... हा विचार करून तर तुम्ही घाई केली नाहीत ना?
असो. नसेल तसं... उगीच विचार आला डोक्यात इतकंच... राग मानू नका!

तुमची,
ए.अ.लो.प्र.

4 comments:

हेरंब said...

अमोल, अतिशय सुंदर लिहिलं आहेत तुम्ही. अगदी सगळ्यांच्या मनातलं.
टपल्या खाण्याच्या य खेळत राज्य हे कायम आपल्यावरच असतं हे तर अगदी अगदी आवडलं !!

अमोल केळकर said...

अगदी मुंबईकरांच्या मनातलं लेहिले आहे. आता तरी सरकारचे डोके ठिकाणावर येईल अशी आशा आहे

अमोल केळकर

Vinay said...

एकदम सुरेख आणि मनातलं लिहिलं आहे. सरकारी यंत्रणेनं केव्हाही संपावर जावं आणि नागरिकांचे हाल कुत्र्यानेही खाऊ नयेत अशी परिस्थिती आहे. ममता बॅनर्जी ने एका शब्दाने सुद्धा हा संप मिटविण्या संबंधी उद्गार काढले नाहीत. त्यांना कोलकत्यातल्या सत्तेचे डोहाळे लागले होते. शेवटी संसदेत शिव सेना आणि भाजप खासदारांना सरकारला विचारावे लागले, तेव्हा कुठे रेल्वे राज्य मंत्र्यांनी काही तरी करण्याचा प्रयत्न केला. आणि आबांनी ESMAची धमकी दिल्यावर मोटरमन रुळावर आले.

Nima said...

sahi re. avadle. traga na karta tras vyakt karnyachi hi paddhat bharich aahe.