Tuesday 5 April 2011

नाही विसरू शकत हा दिवस...

२५ जून ८३ : आमच्या कल्याणच्या दोन खोल्यांच्या चाळीतील बाहेरची खोली (त्याला तेव्हा हॉलच म्हणायचो, पण तीच गेस्ट रूम, तीच बेडरूम होती.) चाळीत २-३ टीव्ही होते. त्यातला एक चक्क आमच्याकडे. ब्लॅक अॅण्ड व्हाईट. माझं वय तेव्हा फक्त ८-९ वर्षं... क्रिकेट समजणं तर दूरच पण क्रिकेट म्हणताही यायचं नाही धड, इतकं कमी. पण आमच्या घरात चाळीतले बरेच जण आणि ठरवून मॅच बघण्यासाठी आलेले माझ्या बाबांचे मित्र अशी तोबा गर्दी अजून आठवते आहे... शेवटी एका राक्षसासारख्या दिसणा-या माणसाला कोणीतरी आऊट (?) केलं आणि आमच्या घरात एकच गोंधळ माजला, तो आठवतोय... चाळीतल्या जिन्यात वात सोलून फोडलेली लालमहाल डामरी आठवतेय... या आठवणी धूसर आहेत, पण त्या शेवटपर्यंत कायम राहणार आहेत...
--------------

२ एप्रिल २०११ : वानखेडे स्टेडियम... या ठिकाणी एक इतिहास रचला गेला. माझ्या, आपल्या सर्वांच्या लाडक्या सचिनसाठी, पूर्ण न झालेलं त्याचं एकमेव स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळ्या भारतीय संघानं प्राण पणाला लावले आणि भारत पुन्हा एकदा विश्वविजेता झाला... या इतिहासाचा जवळून साक्षीदार होण्याची संधी मला मिळाली... जवळून म्हणजे... थेट वानखेडे स्टेडियममधून... आणि गमतीची गोष्ट म्हणजे मी स्टेडियममध्ये बसून पहिल्यांदाच मॅच बघत होतो...  


खरं तर फायनलचं तिकिट मिळवण्यासाठी अनेक जण (अगदी आमदार, मंत्र्यांपासून अनेक जण) जीवाचा आटापिटा करत असताना माझ्या झोळीत मात्र या तिकीटाचं दान आपसूक येऊन पडलं. त्याचं झालं असं, की मला मोहालीच्या इंडो-पाक सेमिफायनलला सुटी हवी होती. आमचे बॉस चंद्रशेखर (चंदू) कुलकर्णी ऊर्फ सीके यांनाही हवी होती... ते क्रिकेटचे माझ्याइतकेच, किंबहुना माझ्यापेक्षा जास्त, चाहते. त्यांनी मला माझी सुटी रद्द करण्याची ‘विनंती’ (हो विनंतीच... असा बॉस सगळ्यांना मिळावा, ही ईश्वराचरणी प्रार्थना) केली आणि त्याची भरपाई म्हणून मला चक्क फायनलचा एक पास मिळवून दिला... मोहालीत पाकिस्तानला हरवून भारत फायनलला आल्यावर तर या पासचं महत्त्व किती पटींनी वाढलं, ते सांगायला नको...
माझ्या बाजूची सीट जय सावंत या सीकेंच्या मित्राची असल्याचं समजल्यावर त्यांना फोन केला आणि सीएसटीला भेटायचं ठरलं... २ तारखेला ११ वाजता सीएसटीला पोहोचलो... पाचच मिनिटांत जय सावंतही तिथं आले. त्यानंतर चालतच वानखेडे स्टेडियम गाठलं. सुदैवानं आमच्या ५ क्रमांकाच्या गेटवर गर्दी नव्हती. त्यामुळे ५ मिनिटांत रांगेतून पुढे सरकत पहिल्या सिक्युरिटी चेकपाशी आलो. त्यानंतर पाच-सहा ठिकाणी संपूर्ण तपासणी केली गेली. (त्यात काहीही वावगं वाटलं नाही... सुरक्षेच्या दृष्टीनं जे योग्य आहे, तेच केलं गेलं, अशी भावना होती... त्यामुळे दर वेळी सगळे खिसे रिकामे करून दाखवताना, मोबाईल अनलॉक करून दाखवताना, पाकिट उघडून दाखवताना अजिबात त्रास वाटला नाही...) अखेरीस शेवटचा सिक्युरिटी पोस्ट पार केल्यानंतर स्टेडियमवर पोहोचलो. तिथंच या मॅचचं स्मृतीचिन्हं म्हणून एका ऑफिशियल शॉपमधून तब्बल ४०० रुपयांची निळी कॅप खरेदी केली. (खेळाडू वापरतात ती ऑफीशियल कॅप... यापुढे ही कॅप डोक्याला लावायची हिम्मत होणे नाही... या मॅचची आठवण म्हणून ती कायम जवळ असेल...) सीट शोधून जागेवर पोहोचलो, तेव्हा फक्त साडेअकरा झाले होते. टॉस व्हायला अडीच तास आणि मॅच सुरू व्हायला तीन तास होते... मधल्या काळात फोनवर गप्पा, थोडंफार चॅटिंग (नेटवर्क जाम होतं... त्यामुळे खरंतर थोडंच चॅटिंग, फार नव्हे!) असं करत वेळ काढला. आम्ही गेलो तेव्हा जवळजवळ रिकामं असलेलं स्टेडियम अवघ्या दीड तासात संपूर्ण पॅक... डोळ्यासमोर चित्र बदललं. सगळीकडे निळे टीशर्ट, अनेकांच्या हातात किंवा खांद्यावर पांघरलेला तिरंगा, चित्रविचित्र टोप्या यामुळे माहोल तयार होत होता... साधारण दीडच्या सुमारास दोन्ही संघ वॉर्मअपसाठी मैदानात आले आणि एकच गोंधळ सुरू झाला... त्यात मग एखादा कॉमेंटटेटर किंवा जुना खेळाडू मैदानात आला तर हा गोंधळ वाढायचा... फिल्डिंगची प्रॅक्टिस करताना सेहवाग किंवा रैना बाऊंड्री लाईनजवळ आले, की तिथं बसलेल्या प्रेक्षकांमधून जोरदार जल्लोष व्हायचा...
अखेरीस कधी कंटाळवाणी-कधी धमाल करणारी ही प्रतिक्षा संपली आणि टॉससाठी धोनी आणि संगकारा मैदानात आले. स्टेडियम अचानक शांत झालं... पण टॉस होत असल्याची घोषणा होताच इतका जल्लोष सुरू झाला की धोनीनं नाणं हवेत फेकल्यानंतर संगकारा हेड्स म्हणाला की टेल्स हे कोणालाच ऐकू गेलं नाही. अखेरीस टॉस पुन्हा करावा लागला. यावेळी संगकारा गर्दीच्या वर आवाज चढवून ओरडला आणि टॉस जिंकला... त्यानं बॅटिंग घेतल्यावर स्टेडियममध्ये थोडं नैराश्य पसरलं... कारण आपल्या लाडक्या सचिनची बॅटिंग बघण्यासाठी आता मुंबईकरांना ५० षटकांची किंवा ४ तासांची प्रतीक्षा करावी लागणार होती. पुढला अर्धा तास कधी गेला समजलंच नाही... त्यानंतर श्रीलंकेच्या संथ फलंदाजीनं बोअर केलं... विकेट गेल्यावर तेवढ्यापुरता जल्लोष व्हायचा, पुन्हा शांतता... असं सुरू होतं. शेवटच्या सात ओव्हर्समध्ये लंकन फलंदाजांनी केलेली फटकवा-फटकवी तेवढी नयनरम्य होती. मुंबईच्या क्रिकेटवेड्या गर्दीचं क्रिकेट-ज्ञान आणि त्याची जाणही तितकीच चांगली आहे, याचा प्रत्यय यावेळी आला. जयवर्धनेच्या शतकानंतर सगळ्या स्टेडियमनं उभं राहून टाळ्या वाजवल्या... त्याच्या प्रत्येक चांगल्या फटक्याचं यथोचित कौतुक केलं... अखेरीस आधी कंटाळवाणी आणि नंतर धुंवांधार झालेली लंकेची ५० षटकं संपली...
नंतरचे ४ तास खरी धम्माल येणार होती... पण त्याबाबत लिहिण्याआधी थोडं मनातलं... क्रिकेटला भारतात धर्म का म्हणतात, ते यावेळी समजलं... तसा मी ही मॅच बघायला एकटाच गेलो होतो. जय सावंत सोबत होते, पण आमची ओळखच मुळी ३ तासांची... आम्हाला एका बंधनात बांधणारी गोष्ट म्हणजे क्रिकेट आणि सचिन... माझ्या डावीकडच्या सीटवर एक जोडपं होतं... बहुदा पारशी असावं... मला त्यांचं आणि त्यांना माझं नावही ठाऊन नाही... तशी गरजही नव्हती. त्यांचं क्रिकेटवर प्रेम होतं... माझंही... बस्स. आम्हाला हे पुरेसं होतं. ‘त्या’ दोघांमधल्या ‘तो’ला क्रिकेट नीट समजत होतं. ‘ती’ला मात्र नाही... पण अडत काहीच नव्हतं... समोर जे घडत होतं, घडणार होतं ते विलक्षणच होतं. तिला एखादी गोष्ट समजली नाही, तर तो सांगत होता... क्रिकेटची भाषा समजावून देत होता. दोघंही मस्त एन्जॉय करत होते. नुकतीच ओळख झालेले जय सावंत, ‘तो’ आणि ‘ती’ आणि सगळ्या स्टेडियममधले ३१ हजार क्रिकेटवेडे... आमची शरीरं वेगवेगळी असली, तरी मनं मात्र एकच होती... आपल्या शरीरातले जसे सगळे अवयव समन्वयानं काम करतात, तसंच हेदेखील होतं... म्हणूनच एखाद्या ठिकाणी ‘मॅक्सिकन वेव्ह’ सुरू झाली की ती लाट आपोआप पसरायची... दोन हात, दोन पाय, दोन डोळे यांनी एकत्रितपणे काम करावं तशी... यापूर्वी क्रिकेट किंवा फुटबॉलची मॅच बघताना प्रश्न पडायचा की ही मॅक्सिकन वेव्ह इतकी अचूक कशी होते... लोकांना समजतं कसं की आपण कधी उभं रहायचंय आणि ओरडायचंय ते... त्या दिवशी समजलं की हे फार कठीण नाही. दोन्ही हातांनी मिळून टाईपिंग करावं, इतकं ते सोपं आहे... असो... आता अविस्मरणीयात अविस्मरणीय शेवटच्या चार तासांविषयी...
सचिन-विरू मैदानावर आले तेव्हा प्रचंड टाळ्यांमध्ये त्यांचं स्वागत केलं. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. मलिंगाच्या दुस-याच चेंडूवर सेहवाग पायचित झाला आणि त्यानं (गरज नसताना) रिव्ह्यू मागितला. स्टेडियमवर लावलेल्या लाऊडस्पिकरमधून ‘धड... धड... धड... धड...’ असा ठोका सुरू झाला होताच... पण हा आवाज दबवून टाकेल, असे ठोके आतमध्ये पडत होते... शेवटी होऊ नये तेच झालं. सेहवाग आऊट झाला. त्यानंतरही सचिननं धावांचा ओघ कायम ठेवला. त्याचा प्रत्येक चौकार आणि त्यानं घेतलेली प्रत्येक एकेरी धावही विजयाच्या उन्मादानं साजरी होत होती... पण थोड्या वेळातच स्टेडियमनं ‘पिन ड्रॉप सायलेन्स’ अनुभवला... या खेळपट्टीवर दुर्मिळ असलेला स्विंग मलिंगाच्या चेंडूला मिळाला आणि सचिनच्या बॅटची कड घेऊन चेंडू संगकाराच्या ग्लोव्जमध्ये विसावला... प्रेक्षकांमध्ये स्मशानशांतता... ३-४ ठिकाणी श्रीलंकन फॅन्सची काही पॉकेट्स होती... तिथूनच काय आवाज येत असेल तो!
हा आणि यानंतरचा सर्व घटनाक्रम इतिहासाच्या पुस्तकात बंदिस्त झाला आहे... भारतीय फलंदाजांनी काढलेली प्रत्येक धाव आम्ही सेलिब्रेट करत होतो... अगदी लंकेच्या गोलंदाजांनी टाकलेले वाईड बॉलही... प्रत्येक धावेचं स्वागत जोरदारा टाळ्या, शिट्या, पिपाण्या फुंकून केलं जात होतं... धोनी-गंभीरची चांगली भागिदारी झाल्यानंतर सामना आपल्या हातात आला आहे, असं सगळ्या स्टेडियमला वाटू लागलं होतंच... त्यात ३० बॉलमध्ये ३० धावा हव्या असताना या ‘वाटण्याचं’ खात्रीत रुपांतर झालं आणि स्टेडियममध्ये विजयाचा जल्लोषच सुरू झाला. प्रत्येक धावेगणिक हा जल्लोष कितीतरी पटींनी वाढत होता... सहा धावा हव्या असताना मैदानात ‘वुई वॉंट सिक्सर’चा नाद सुरू झाला... ३१ हजार लोक एकमुखानं ही मागणी करत होते. पण तेव्हा तसं काही झालं नाही... दोन धावा निघाल्या गेल्या... पण मागणी सुरू होतीच... वुई वॉंट सिक्सर... वुई वॉंट सिक्सर... शेवटी ‘प्रेक्षकांसाठी खेळू नका... संघासाठी खेळा...’ असा उचित सल्ला आपल्या संघाला देणा-या माहीला ही मागणी फेटाळणं जड गेलं असावं... ४ धावांची आवश्यकता असताना त्यानं पुढे येऊन एक उत्तुंग फटका मारला... स्टेडियम क्षणाचा १००० भाग स्तब्ध झालं... माही पुढे आलाय... त्याच्या बॅटचा इम्पॅक्ट व्यवस्थित झालाय... ‘टॉक’ असा आवाज स्टेडियमभर घुमलाय... पण चेंडू जातोय कुठे... तिथं फिल्डर तर दिसत नाही... चेंडू फार उंच उडाला असेल, तर.... फिल्डर तिथपर्यंत पोहोचला तर... इतके सगळे विचार ३१ हजार मनांमध्ये सेकंदाच्या १०००व्या भागात येऊन गेले... त्या काळात पसरलेली भयाण शांतता ही वादळापूर्वीची होती... माहीनं मारलेला फटका अचूक आहे, हे या काही क्षणांत लक्षात आलं आणि मग जो जल्लोष झाला तो आयुष्यात विसरता येणं शक्य नाही... विसरूच शकत नाही... विसरायची इच्छाही नाही...
सचिननं बघितलेलं स्वप्न साकार झालं होतं... धोनी-युवराजनं त्याला आणि देशाला दिलेला शब्द पाळला होता... अशा वेळी डोळ्यांवर बांध घालणं अशक्यच... घरी असताना कदाचित डोळे किंचित ओलावले असते पण वाहिले मात्र नसते... प्रत्यक्ष समोर हा सोहळा बघताना आनंदाश्रू थांबवावेत कसे? अशक्यच... मैदानावर असलेल्या स्क्रीनवर ‘वर्ल्ड चॅम्पियन - इंडिया’ हे शब्द उमटले... त्यातला तिरंगा दिसला आणि हा बांध फुटला... यात तिथं हजर असलेल्या कोणालाच काही वावगं वाटायची शक्यता नव्हती... सगळ्यांची अवस्था तीच होती... मैदानात फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली... पण या आतषबाजीला लाजवतील असे फटाके मनात फुटत होते... अजूनही फुटतायत... आयुष्यभर या फटाक्यांचा प्रतिध्वनी मनात रुंजी घालत राहणार आहे...
ती टीम इंडियाची कॅप आणि ते तिकिट आयुष्यभर जपून ठेवायचंय... आपण या इतिहासाचे साक्षीदार होतो, याचा पुरावा म्हणून नव्हे... ही आठवण कायम ताजी रहावी म्हणूनही नव्हे... हे १२ तास मनावर कायमचे कोरले गेलेच आहेत... या गोष्टी कायम जपून ठेवण्याचं एकच कारण आहे... कदाचित कोणत्याही क्षणी आपल्याला जाग येईल... आपण वानखेडे स्टेडियमच्या नॉर्थ स्टॅण्डमध्ये बसून धोनीचा विजयी षटकार बघत आहोत, हे रम्य स्वप्न संपेल... त्यावेळी कपाटातून तिकिट बाहेर काढायचं... कॅप डोक्यावर चढवायची... आरशात स्वतःला बघायचं... हे स्वप्न नाही... सत्य आहे, याची खात्री पटली की पुन्हा या (माझ्यासाठी) अनमोल वस्तू जागच्या जागी ठेवायच्या... आणि पुन्हा नव्यानं हेच स्वप्न पाहण्यासाठी निद्रादेवीची आराधना सुरू करायची...

 
 


9 comments:

Anonymous said...

Amazing...Just amazing!!

Unknown said...

very nice.. what a experience wow...

Anjali Dhobale said...

wow gr8...................

संदीप दि.साखरे said...

मस्त रे.. छान लिहिलायेस.. मनातून आलेला.. विजयाचा खरा निरपेक्ष आनंद.. जबरदस्त

pandharinath pawar said...

फार नशीबवान आहात... वर्ल्ड कप स्टेडियममध्ये बसून बघायचे भाग्य तुमच्या नशिबी आले. अनुभव अगदी छान लिहिला आहे. सी के. नक्कीच चांगले बॉस आहेत आणि तुम्हाला ते मिळाले आहेत. आम्हाला ते भाग्य फार कमी मिळाले.

Ashish Sawant said...

great amol,
नशीबवान आहेस... तिकीट सांभाळून ठेव. स्कॅन करून ब्लॉग वर टाकून ठेव.....अनमोल ठेवा आहे तुझ्याकडे.

अमित भिडे said...

अमोल ग्रेट..तुफान अनुभव आलाय तुला.. एका भयंकर इतिहासाचा साक्षीदार आहेस तू.. घरात बसून नाचणं वेगळं.. त्यावेळी स्टेडियमवर आलेल्या तुझ्या घामालाही सचिनने प्यायलेल्या शँपेनचा वास आला असेल नक्की.. कारण तो आनंद त्याच्या मनात आणि तुझ्या मनात एकच होता. मस्त रे.. मी खुप मीस करत होतो वर्ल्डकप फायनल. पण तू त्याचा अनुभव कूरन दिलास थँक यू..

‘वर्ल्ड चॅम्पियन - इंडिया’ हे शब्द उमटले... त्यातला तिरंगा हे शब्द अमोल कोणाही सच्चा भारतीयाला रडवतील असेच आहेत. जयहो

Anonymous said...

Masta Kadak Anubhav ahe...

Ashish

Ganesh Pavale said...

फार नशीबवान आहात...जबरदस्त....छान लिहिलय..