Wednesday, 27 April 2011

एक नल्ला प्रेस कॉन्फरन्स...

पत्रकार परिषद म्हणजे जिथं पत्रकारांचा एखाद्या मोठ्या व्यक्तीशी किंवा महत्त्वाच्या घटनेबाबत कोणाशीतरी सार्वजनिक संवाद होतो तो कार्यक्रम अशी माझी आजवरची समजूत होती. मात्र आज ही समजूत खोटी असल्याचं माझ्या लक्षात आलंय...
मी आज एका 'पत्रकार परिषदे'ला गेलो होतो. रीबॉक या जोडे बनवणा-या कंपनीनं आपले ब्रॅण्ड ऍम्बेसिडर असलेल्या क्रिकेटपटूंचा सत्कार आयोजित केला होता. त्या निमित्त ही तथाकथित पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. खेळाडूही कोणी छोटे नव्हते. कर्णधार धोनी, युवराज, भज्जी, युसूफभाई आणि पियुष चावला या विश्वविजेत्या संघातल्या खेळाडूंचा हा सत्कार होता... पण म्हणजे इव्हेंट तसा मोठाच होता... त्यात वाद नाही. पण त्याला पत्रकार परिषद म्हणून आयोजकांचं जरा चुक्याच... ही निमंत्रणपत्रिका बघा... त्यात चक्क लिहिलंय प्रेस कॉन्फरन्स आहे असं...



आता त्या 'प्रेस कॉन्फरन्स'चं थोडक्यात वर्णन -
साडेचारची पी.सी. आहे, असं निमंत्रणपत्रिकेत आहे ना... तर भारतीय प्रमाणवेळेनुसार बरोब्बर ४.५० वाजता कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रमाचा अँकर स्टेजवर आला (हो... पत्रकार परिषदेसाठी सजवलेलं स्टेज होतं...) आणि त्यानं कार्यक्रमाचा उद्देश-बिद्देश सांगणारं प्रास्ताविक केलं. त्यानंतर एकेक करून पियुष चावलापासून ते धोनीपर्यंत सगळ्यांना बोलावलं. रीबॉकच्या भारतातल्या एमडीला पण बोलावलं (हा एमडी सगळ्यात उंच बार चेअरवर बसला होता... धोनी आणि युवी त्याच्या बाजुला. मधला स्टंप तेवढा उंच होता.) त्यानंतर या अँकरनं त्या एमडीला दोन-तीन प्रश्न विचारले. त्यानंतर धोनीला, मग युवीला, मग भज्जीला, मग युसूफ पठाणला (कार्यक्रमातला एकमेव हिंदी संवाद) आणि शेवटी पियुषला.... यातला दुसरा प्रश्न कायम होता... 'संघाच्या फिटनेसमुळे हा विजय मिळवणं शक्य झालं आहे... या फिटनेसचा राज (हिंदीतला) काय?' त्याला या पाचही जणांनी उत्तर दिलं 'रीबॉकच्या नव्या अमक्या-अमक्या ब्रॅण्डमुळे आमचा फिटनेस टिकून राहिला....'
होय.... दचकू नका... खरंच त्यांनी सांगितलं 'रीबॉकच्या नव्या अमक्या-अमक्या ब्रॅण्डमुळे आमचा फिटनेस टिकून राहिला....'
आता मला सांगा बुटाचा आणि फिटनेसचा काही संबंध आहे का? रीबॉकचे ब्रॅण्ड ऍम्बेसिडर झालात म्हणजे काय वाट्टेल ते सांगाल काय... पण असो. मी म्हटलं असे ना का... आपलं काय जातंय... त्यांना पैसे मिळतात हे बोलायचे, म्हणून बोलले असतील.
ही लुटूपुटूची प्रश्नोत्तरं झाल्यावर मग त्या एमडी साहेबांनी सगळ्यांना सोन्याचा मुलामा दिलेल्या बॅट वाटल्या... हे चालू असताना फोटोग्राफर आणि कॅमेरामेनची नैमित्तिक धक्काबुक्की झालीच. त्यात विशेष काही नाही... मग एक अनंत काळ चालणारं फोटोसेशन झालं या पाच जणांचं सोनेरी बॅटी हातात पकडून... एकदाचं ते फोटो सेशन संपल्यावर तो अँकर म्हणाला आल्याबद्दल धन्यवाद आता नाश्ता करा आणि घरी जा.... ते सहा जण (म्हणजे पाच क्रिकेटर आणि सहावा एमडी) मागल्या बाजूनं कुठेतरी अदृष्य झाले.... झाली प्रेस कॉन्फरन्स....

आता शब्दशः विचार करायचा म्हटला तर त्यांनी बॅटी दिलेल्या विटनेस करण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स आहे, असं निमंत्रण पत्रिकेत म्हटलंय. त्यामुळे शाब्दिक च्छल करायचा तर हे तांत्रिकदृष्ट्या अगदी बरोबर आहे. पण मग मुंबईभरच्या स्पोर्ट्स रिपोर्टर्सना तिथं जायची काय गरज होती? (मी स्पोर्ट्स रिपोर्टर नसलो तरी क्रिकेटमध्ये आवड असलेला पत्रकार असल्यानं वैयक्तिक खाज म्हणून तिथं गेलो होतो.) माझ्या मनात काही प्रश्न होते. ते विचारायचे होते. तिथं अनेक पेपर आणि चॅनल्सचे क्रीडा प्रतिनिधी आले होते. ते हा सोहळा पाहण्यासाठी निश्चित आले नसणार. त्यांच्या मनातही माझ्यासारखेच अनेक प्रश्न असणार. वर्ल्डकप जिंकल्यानंतर धोनीची पत्रकार परिषद झाली होती की नाही ठाऊक नाही... पण त्यानंतर आणि आयपीएल सुरू असताना मिळालेली ही चांगली संधी होती. पण आयोजनातील त्रुटीमुळे ती संधी मिळूच शकली नाही... आता ही नल्ला पत्रकार परिषद आयोजित करणा-या परफेक्ट रिलेशन्सचं पाच स्टार्सच्या वेळीची बचत करून रीबॉकशी रिलेशन परफेक्ट झालं असलं, तरी माझ्यासारख्याच्या मनात मात्र हे रिलेशन गढूळ झालं आहे. असा पीआर काय कामाचा? पण कदाचित हाच सध्याचा ट्रेण्ड असावा... माझी अवस्था मात्र कानाखाली 'बुट' मारल्यासारखी झाली, हे सांगायला नको...


ता.क. : मुंबईतल्या पत्रकारांना रीबॉक आणि परफेक्ट रिलेशन्सवाल्यांनी बॅटी देताना टाळ्या वाजवण्यासाठी बोलावलं असेल, तर ती सगळ्यात मोठी चूक म्हणावी लागेल... कारण पत्रकारांइतकं टाळ्या वाजवण्यात कंजुषी करणारं दुसरं कोणीही माझ्या पाहण्यात नाही...


Tuesday, 5 April 2011

नाही विसरू शकत हा दिवस...

२५ जून ८३ : आमच्या कल्याणच्या दोन खोल्यांच्या चाळीतील बाहेरची खोली (त्याला तेव्हा हॉलच म्हणायचो, पण तीच गेस्ट रूम, तीच बेडरूम होती.) चाळीत २-३ टीव्ही होते. त्यातला एक चक्क आमच्याकडे. ब्लॅक अॅण्ड व्हाईट. माझं वय तेव्हा फक्त ८-९ वर्षं... क्रिकेट समजणं तर दूरच पण क्रिकेट म्हणताही यायचं नाही धड, इतकं कमी. पण आमच्या घरात चाळीतले बरेच जण आणि ठरवून मॅच बघण्यासाठी आलेले माझ्या बाबांचे मित्र अशी तोबा गर्दी अजून आठवते आहे... शेवटी एका राक्षसासारख्या दिसणा-या माणसाला कोणीतरी आऊट (?) केलं आणि आमच्या घरात एकच गोंधळ माजला, तो आठवतोय... चाळीतल्या जिन्यात वात सोलून फोडलेली लालमहाल डामरी आठवतेय... या आठवणी धूसर आहेत, पण त्या शेवटपर्यंत कायम राहणार आहेत...
--------------

२ एप्रिल २०११ : वानखेडे स्टेडियम... या ठिकाणी एक इतिहास रचला गेला. माझ्या, आपल्या सर्वांच्या लाडक्या सचिनसाठी, पूर्ण न झालेलं त्याचं एकमेव स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळ्या भारतीय संघानं प्राण पणाला लावले आणि भारत पुन्हा एकदा विश्वविजेता झाला... या इतिहासाचा जवळून साक्षीदार होण्याची संधी मला मिळाली... जवळून म्हणजे... थेट वानखेडे स्टेडियममधून... आणि गमतीची गोष्ट म्हणजे मी स्टेडियममध्ये बसून पहिल्यांदाच मॅच बघत होतो...  


खरं तर फायनलचं तिकिट मिळवण्यासाठी अनेक जण (अगदी आमदार, मंत्र्यांपासून अनेक जण) जीवाचा आटापिटा करत असताना माझ्या झोळीत मात्र या तिकीटाचं दान आपसूक येऊन पडलं. त्याचं झालं असं, की मला मोहालीच्या इंडो-पाक सेमिफायनलला सुटी हवी होती. आमचे बॉस चंद्रशेखर (चंदू) कुलकर्णी ऊर्फ सीके यांनाही हवी होती... ते क्रिकेटचे माझ्याइतकेच, किंबहुना माझ्यापेक्षा जास्त, चाहते. त्यांनी मला माझी सुटी रद्द करण्याची ‘विनंती’ (हो विनंतीच... असा बॉस सगळ्यांना मिळावा, ही ईश्वराचरणी प्रार्थना) केली आणि त्याची भरपाई म्हणून मला चक्क फायनलचा एक पास मिळवून दिला... मोहालीत पाकिस्तानला हरवून भारत फायनलला आल्यावर तर या पासचं महत्त्व किती पटींनी वाढलं, ते सांगायला नको...
माझ्या बाजूची सीट जय सावंत या सीकेंच्या मित्राची असल्याचं समजल्यावर त्यांना फोन केला आणि सीएसटीला भेटायचं ठरलं... २ तारखेला ११ वाजता सीएसटीला पोहोचलो... पाचच मिनिटांत जय सावंतही तिथं आले. त्यानंतर चालतच वानखेडे स्टेडियम गाठलं. सुदैवानं आमच्या ५ क्रमांकाच्या गेटवर गर्दी नव्हती. त्यामुळे ५ मिनिटांत रांगेतून पुढे सरकत पहिल्या सिक्युरिटी चेकपाशी आलो. त्यानंतर पाच-सहा ठिकाणी संपूर्ण तपासणी केली गेली. (त्यात काहीही वावगं वाटलं नाही... सुरक्षेच्या दृष्टीनं जे योग्य आहे, तेच केलं गेलं, अशी भावना होती... त्यामुळे दर वेळी सगळे खिसे रिकामे करून दाखवताना, मोबाईल अनलॉक करून दाखवताना, पाकिट उघडून दाखवताना अजिबात त्रास वाटला नाही...) अखेरीस शेवटचा सिक्युरिटी पोस्ट पार केल्यानंतर स्टेडियमवर पोहोचलो. तिथंच या मॅचचं स्मृतीचिन्हं म्हणून एका ऑफिशियल शॉपमधून तब्बल ४०० रुपयांची निळी कॅप खरेदी केली. (खेळाडू वापरतात ती ऑफीशियल कॅप... यापुढे ही कॅप डोक्याला लावायची हिम्मत होणे नाही... या मॅचची आठवण म्हणून ती कायम जवळ असेल...) सीट शोधून जागेवर पोहोचलो, तेव्हा फक्त साडेअकरा झाले होते. टॉस व्हायला अडीच तास आणि मॅच सुरू व्हायला तीन तास होते... मधल्या काळात फोनवर गप्पा, थोडंफार चॅटिंग (नेटवर्क जाम होतं... त्यामुळे खरंतर थोडंच चॅटिंग, फार नव्हे!) असं करत वेळ काढला. आम्ही गेलो तेव्हा जवळजवळ रिकामं असलेलं स्टेडियम अवघ्या दीड तासात संपूर्ण पॅक... डोळ्यासमोर चित्र बदललं. सगळीकडे निळे टीशर्ट, अनेकांच्या हातात किंवा खांद्यावर पांघरलेला तिरंगा, चित्रविचित्र टोप्या यामुळे माहोल तयार होत होता... साधारण दीडच्या सुमारास दोन्ही संघ वॉर्मअपसाठी मैदानात आले आणि एकच गोंधळ सुरू झाला... त्यात मग एखादा कॉमेंटटेटर किंवा जुना खेळाडू मैदानात आला तर हा गोंधळ वाढायचा... फिल्डिंगची प्रॅक्टिस करताना सेहवाग किंवा रैना बाऊंड्री लाईनजवळ आले, की तिथं बसलेल्या प्रेक्षकांमधून जोरदार जल्लोष व्हायचा...
अखेरीस कधी कंटाळवाणी-कधी धमाल करणारी ही प्रतिक्षा संपली आणि टॉससाठी धोनी आणि संगकारा मैदानात आले. स्टेडियम अचानक शांत झालं... पण टॉस होत असल्याची घोषणा होताच इतका जल्लोष सुरू झाला की धोनीनं नाणं हवेत फेकल्यानंतर संगकारा हेड्स म्हणाला की टेल्स हे कोणालाच ऐकू गेलं नाही. अखेरीस टॉस पुन्हा करावा लागला. यावेळी संगकारा गर्दीच्या वर आवाज चढवून ओरडला आणि टॉस जिंकला... त्यानं बॅटिंग घेतल्यावर स्टेडियममध्ये थोडं नैराश्य पसरलं... कारण आपल्या लाडक्या सचिनची बॅटिंग बघण्यासाठी आता मुंबईकरांना ५० षटकांची किंवा ४ तासांची प्रतीक्षा करावी लागणार होती. पुढला अर्धा तास कधी गेला समजलंच नाही... त्यानंतर श्रीलंकेच्या संथ फलंदाजीनं बोअर केलं... विकेट गेल्यावर तेवढ्यापुरता जल्लोष व्हायचा, पुन्हा शांतता... असं सुरू होतं. शेवटच्या सात ओव्हर्समध्ये लंकन फलंदाजांनी केलेली फटकवा-फटकवी तेवढी नयनरम्य होती. मुंबईच्या क्रिकेटवेड्या गर्दीचं क्रिकेट-ज्ञान आणि त्याची जाणही तितकीच चांगली आहे, याचा प्रत्यय यावेळी आला. जयवर्धनेच्या शतकानंतर सगळ्या स्टेडियमनं उभं राहून टाळ्या वाजवल्या... त्याच्या प्रत्येक चांगल्या फटक्याचं यथोचित कौतुक केलं... अखेरीस आधी कंटाळवाणी आणि नंतर धुंवांधार झालेली लंकेची ५० षटकं संपली...
नंतरचे ४ तास खरी धम्माल येणार होती... पण त्याबाबत लिहिण्याआधी थोडं मनातलं... क्रिकेटला भारतात धर्म का म्हणतात, ते यावेळी समजलं... तसा मी ही मॅच बघायला एकटाच गेलो होतो. जय सावंत सोबत होते, पण आमची ओळखच मुळी ३ तासांची... आम्हाला एका बंधनात बांधणारी गोष्ट म्हणजे क्रिकेट आणि सचिन... माझ्या डावीकडच्या सीटवर एक जोडपं होतं... बहुदा पारशी असावं... मला त्यांचं आणि त्यांना माझं नावही ठाऊन नाही... तशी गरजही नव्हती. त्यांचं क्रिकेटवर प्रेम होतं... माझंही... बस्स. आम्हाला हे पुरेसं होतं. ‘त्या’ दोघांमधल्या ‘तो’ला क्रिकेट नीट समजत होतं. ‘ती’ला मात्र नाही... पण अडत काहीच नव्हतं... समोर जे घडत होतं, घडणार होतं ते विलक्षणच होतं. तिला एखादी गोष्ट समजली नाही, तर तो सांगत होता... क्रिकेटची भाषा समजावून देत होता. दोघंही मस्त एन्जॉय करत होते. नुकतीच ओळख झालेले जय सावंत, ‘तो’ आणि ‘ती’ आणि सगळ्या स्टेडियममधले ३१ हजार क्रिकेटवेडे... आमची शरीरं वेगवेगळी असली, तरी मनं मात्र एकच होती... आपल्या शरीरातले जसे सगळे अवयव समन्वयानं काम करतात, तसंच हेदेखील होतं... म्हणूनच एखाद्या ठिकाणी ‘मॅक्सिकन वेव्ह’ सुरू झाली की ती लाट आपोआप पसरायची... दोन हात, दोन पाय, दोन डोळे यांनी एकत्रितपणे काम करावं तशी... यापूर्वी क्रिकेट किंवा फुटबॉलची मॅच बघताना प्रश्न पडायचा की ही मॅक्सिकन वेव्ह इतकी अचूक कशी होते... लोकांना समजतं कसं की आपण कधी उभं रहायचंय आणि ओरडायचंय ते... त्या दिवशी समजलं की हे फार कठीण नाही. दोन्ही हातांनी मिळून टाईपिंग करावं, इतकं ते सोपं आहे... असो... आता अविस्मरणीयात अविस्मरणीय शेवटच्या चार तासांविषयी...
सचिन-विरू मैदानावर आले तेव्हा प्रचंड टाळ्यांमध्ये त्यांचं स्वागत केलं. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. मलिंगाच्या दुस-याच चेंडूवर सेहवाग पायचित झाला आणि त्यानं (गरज नसताना) रिव्ह्यू मागितला. स्टेडियमवर लावलेल्या लाऊडस्पिकरमधून ‘धड... धड... धड... धड...’ असा ठोका सुरू झाला होताच... पण हा आवाज दबवून टाकेल, असे ठोके आतमध्ये पडत होते... शेवटी होऊ नये तेच झालं. सेहवाग आऊट झाला. त्यानंतरही सचिननं धावांचा ओघ कायम ठेवला. त्याचा प्रत्येक चौकार आणि त्यानं घेतलेली प्रत्येक एकेरी धावही विजयाच्या उन्मादानं साजरी होत होती... पण थोड्या वेळातच स्टेडियमनं ‘पिन ड्रॉप सायलेन्स’ अनुभवला... या खेळपट्टीवर दुर्मिळ असलेला स्विंग मलिंगाच्या चेंडूला मिळाला आणि सचिनच्या बॅटची कड घेऊन चेंडू संगकाराच्या ग्लोव्जमध्ये विसावला... प्रेक्षकांमध्ये स्मशानशांतता... ३-४ ठिकाणी श्रीलंकन फॅन्सची काही पॉकेट्स होती... तिथूनच काय आवाज येत असेल तो!
हा आणि यानंतरचा सर्व घटनाक्रम इतिहासाच्या पुस्तकात बंदिस्त झाला आहे... भारतीय फलंदाजांनी काढलेली प्रत्येक धाव आम्ही सेलिब्रेट करत होतो... अगदी लंकेच्या गोलंदाजांनी टाकलेले वाईड बॉलही... प्रत्येक धावेचं स्वागत जोरदारा टाळ्या, शिट्या, पिपाण्या फुंकून केलं जात होतं... धोनी-गंभीरची चांगली भागिदारी झाल्यानंतर सामना आपल्या हातात आला आहे, असं सगळ्या स्टेडियमला वाटू लागलं होतंच... त्यात ३० बॉलमध्ये ३० धावा हव्या असताना या ‘वाटण्याचं’ खात्रीत रुपांतर झालं आणि स्टेडियममध्ये विजयाचा जल्लोषच सुरू झाला. प्रत्येक धावेगणिक हा जल्लोष कितीतरी पटींनी वाढत होता... सहा धावा हव्या असताना मैदानात ‘वुई वॉंट सिक्सर’चा नाद सुरू झाला... ३१ हजार लोक एकमुखानं ही मागणी करत होते. पण तेव्हा तसं काही झालं नाही... दोन धावा निघाल्या गेल्या... पण मागणी सुरू होतीच... वुई वॉंट सिक्सर... वुई वॉंट सिक्सर... शेवटी ‘प्रेक्षकांसाठी खेळू नका... संघासाठी खेळा...’ असा उचित सल्ला आपल्या संघाला देणा-या माहीला ही मागणी फेटाळणं जड गेलं असावं... ४ धावांची आवश्यकता असताना त्यानं पुढे येऊन एक उत्तुंग फटका मारला... स्टेडियम क्षणाचा १००० भाग स्तब्ध झालं... माही पुढे आलाय... त्याच्या बॅटचा इम्पॅक्ट व्यवस्थित झालाय... ‘टॉक’ असा आवाज स्टेडियमभर घुमलाय... पण चेंडू जातोय कुठे... तिथं फिल्डर तर दिसत नाही... चेंडू फार उंच उडाला असेल, तर.... फिल्डर तिथपर्यंत पोहोचला तर... इतके सगळे विचार ३१ हजार मनांमध्ये सेकंदाच्या १०००व्या भागात येऊन गेले... त्या काळात पसरलेली भयाण शांतता ही वादळापूर्वीची होती... माहीनं मारलेला फटका अचूक आहे, हे या काही क्षणांत लक्षात आलं आणि मग जो जल्लोष झाला तो आयुष्यात विसरता येणं शक्य नाही... विसरूच शकत नाही... विसरायची इच्छाही नाही...
सचिननं बघितलेलं स्वप्न साकार झालं होतं... धोनी-युवराजनं त्याला आणि देशाला दिलेला शब्द पाळला होता... अशा वेळी डोळ्यांवर बांध घालणं अशक्यच... घरी असताना कदाचित डोळे किंचित ओलावले असते पण वाहिले मात्र नसते... प्रत्यक्ष समोर हा सोहळा बघताना आनंदाश्रू थांबवावेत कसे? अशक्यच... मैदानावर असलेल्या स्क्रीनवर ‘वर्ल्ड चॅम्पियन - इंडिया’ हे शब्द उमटले... त्यातला तिरंगा दिसला आणि हा बांध फुटला... यात तिथं हजर असलेल्या कोणालाच काही वावगं वाटायची शक्यता नव्हती... सगळ्यांची अवस्था तीच होती... मैदानात फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली... पण या आतषबाजीला लाजवतील असे फटाके मनात फुटत होते... अजूनही फुटतायत... आयुष्यभर या फटाक्यांचा प्रतिध्वनी मनात रुंजी घालत राहणार आहे...
ती टीम इंडियाची कॅप आणि ते तिकिट आयुष्यभर जपून ठेवायचंय... आपण या इतिहासाचे साक्षीदार होतो, याचा पुरावा म्हणून नव्हे... ही आठवण कायम ताजी रहावी म्हणूनही नव्हे... हे १२ तास मनावर कायमचे कोरले गेलेच आहेत... या गोष्टी कायम जपून ठेवण्याचं एकच कारण आहे... कदाचित कोणत्याही क्षणी आपल्याला जाग येईल... आपण वानखेडे स्टेडियमच्या नॉर्थ स्टॅण्डमध्ये बसून धोनीचा विजयी षटकार बघत आहोत, हे रम्य स्वप्न संपेल... त्यावेळी कपाटातून तिकिट बाहेर काढायचं... कॅप डोक्यावर चढवायची... आरशात स्वतःला बघायचं... हे स्वप्न नाही... सत्य आहे, याची खात्री पटली की पुन्हा या (माझ्यासाठी) अनमोल वस्तू जागच्या जागी ठेवायच्या... आणि पुन्हा नव्यानं हेच स्वप्न पाहण्यासाठी निद्रादेवीची आराधना सुरू करायची...

 
 


Monday, 21 February 2011

भीऊ नका...

स्थळ : मलबार हिल. उपमुख्यमंत्र्यांचे निवासस्थान.
पात्रे : उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि अन्य मंत्री.
वेळ : अर्थात रात्रीची. निवांत.

उपमुख्यमंत्री (उमं) - काय भिता राव... १५-२० हजार रुपयांची भीक महिन्याच्या महिन्याला घेणारी पोरं ती... त्यांना काय घाबरायचं!
बांधकाम मंत्री (बांमं) - मी कुठं घाबरलोय?
उमं - मग... काल काय म्हणालात... मला तुमची भीती वाटते म्हणून...
बांमं - ते असंच हो... मला कॉमेडी करायची सवय आहे ना... त्याचाच परिणाम.
उमं - यांना खरंतर फटके मारले पाहिजेत. मी मागे म्हणालेलो ते उगीच नाही. पण त्यावरून पण गोंधळ घातला. आता तुम्ही भीती वाटते म्हणाल्यावर तुमच्या मागे लागतील बघा हे लोक...
बांमं - होय की... ते लक्षात नाही आलं माझ्या... फार गोंधळ झाला तर सांगून टाकीन की मी असं बोललोच नव्हतो...
उमं - टीव्हीवर दिसलात तुम्ही तसं बोलताना... आता कसं म्हणणार?
बांमं - बस का धाकटे साहेब... तुम्ही नाही का तेच केलंत. आधी फटके मारा म्हणालात... आपल्या कार्यकर्त्यांनी मारलेदेखील... मग म्हणालात मी असं बोललोच नाही... माफी पण नाही मागितलीत. शेवटी थोरल्या साहेबांना सॉरी म्हणावं लागलं त्या भिकारड्यांना... तुमचा संपलाय... ग्लास भरू का?
उमं - हो.. मी भरतो... आपण आजपर्यंत कोणाची माफी मागितली नाही.. आणि या दिडदमडीच्या लोकांना सॉरी म्हणू काय मी... काकाच म्हणाले, तू गप्प बस मी काय ते बघतो. त्यांनी मस्त गप्प केलं पण त्यांना. सगळे लाईनीवर आले...
बांमं - आता पुन्हा माझ्यामुळे गोंधळ झाला तर बघतील का साहेब?
उमं - माहिती नाही बुवा... विचारावं लागेल. बघुयात काय होतंय ते...
बांमं - तुम्ही पण कमाल केलीत हां साहेब... सरळ सांगून टाकलंत की आपण टगे आहोत म्हणून...
उमं - आहोत तर आहोत...
बांमं - पण निवडणुकीत मतं मागायला जाताना आपण हात जोडून जातो. टग्या कधी हात जोडतो का?
उमं - अरे ते नाटक असतं हो... तुम्हालाही हे माहित्ये... तुमच्या जुन्या पक्षात सगळे टगेच तर होते...
बांमं - हो... पण मतदारांनी सांगितलं की आम्हाला टग्या नको... चांगला नेता पाहिजे. तर?
उमं - कोण भिकार** म्हणतोय असं... फटके मारा रे त्याला.... टग्यांना मतं देत नाही म्हणजे काय? मतदार असला तर घरचा... दंडुक्यानं मारलं पाहिजे *डव्यांना... आण रे दंडूका... एकेकाच्या गां*वर हाणतो... मत देत नाही म्हणजे काय... दिलंच पाहिजे...
बांमं -  (स्वगत) साहेबांना जास्त झाली वाटतं... (प्रकट)  ए... जेवण आण रे... जाऊ दे साहेब... निवडणुकीच्या वेळी बघुयात... तोपर्यंत हे मीडियावाले दंडुका, भीती, टग्या हे सगळं विसरून जातील... त्यांना खोडच आहे ती... नवी बातमी हाती येईपर्यंत पहिलीचा पिच्छा पुरवतात... नवं काही मिळालं की पुढलं पाठ मागचं सपाट... आणि लोकांचं काय... ते तर विसरले पण असतील एव्हाना...
दंडुकेशाही जिंदाबाद.... टगेगिरी जिंदाबाद....

(अशा प्रकारची कुठलीही घटना घडलेली नाही. हा संवाद संपूर्णतः काल्पनिक असू शकतो...)

Friday, 18 February 2011

ALL THE BEST....

उद्यापासून वर्ल्डकप सुरू होतोय... काय होणार याची उत्कंठा आणि धाकधुक आपल्या मनात आहे. काय होईल ते होवो... पुढला दीड महिना धम्माल असणार, हे नक्की...

BEST OF LUCK TEAM INDIA...

असंच सहज इंटरनेटवर मिळालेलं एक कार्टून आपल्या मनातल्या भावना मांडणारं...

Thursday, 17 February 2011

दोन बातमीदार... टीम एकच की वेगवेगळी?

लेट अस भंकस, डोक्याची मंडई, बातमीदार-सहयोगी बातमीदार हे वृत्तपत्रसृष्टीची काही गुपिते जगजाहीर करणारे जाम प्रसिद्ध झालेले ब्लॉग बंद पडले. पडले की कोणी बंद पाडले, या प्रश्नाची चर्चा पत्रकारांच्या वर्तुळात होतच राहील. यातला डोक्याची मंडई तर कोणी आणि का बंद पाडला, हे जगजाहीर आहे. लेट्स भंकस आणि बातमीदारबाबत मात्र ठोस वृत्त नसलं, तरी काहीतरी मालफंक्शन असल्याचं बोललं जातंय. त्याच वेळी आणखी दोन असेच नवे ब्लॉग पुन्हा एकदा सुरू झालेत.
ब्रेकिंग न्यूज  आणि बातमीदार The Reporter हे दोन ब्लॉग पुन्हा एकदा वृत्तसृष्टीतील गमतीजमती घेऊन सादर झाले आहेत.
यातला दुसरा ब्लॉग हा अधिक काळजीपूर्वक तयार करण्यात आल्याचं दिसतंय. आशिष चांदोरकर या माझ्या मित्रानं या ब्लॉगची सखोल माहिती दिल्यामुळे ते पुन्हा देण्याचं टाळतोय. इच्छुकांनी इथं क्लिक करावं, म्हणजे त्याची माहितीपूर्ण पोस्ट वाचता येईल.
ब्रेकिंग न्यूज हा ब्लॉग मात्र मुंबईतल्याच कोणीतरी, मुंबईतच सुरू केल्याचं त्याच्या रुपावरून दिसतंय. प्रामुख्यानं वाहिन्यांमधील ब्रेकिंगन्यूज इथं असल्यामुळे एखाद्या मराठी वाहिनीत काम करणा-या कोणीतरी हा ब्लॉग सुरू केला असावा, अशीही शक्यता आहे.
माझ्या डोक्यात आलेली आणखी एक शक्यता म्हणजे हे दोन्ही ब्लॉग एकाच व्यक्तीनं (किंवा एकाच गटानं म्हणूयात हवं तर) सुरू केलेले असण्याची शक्यता आहे. एखाद्याबद्दल फारच अवमानकारक लिहायचं असेल आणि कायदेशीर कारवाईचा धोका असेल, तर बातमीदारवर बिनधास्त लिहायचं आणि एखादा हलकाफुलका प्रसंग लिहायचा असेल, तर ब्रेकिंग न्यूजवर जायचं. दोन ब्लॉग एकाच वेळी सुरू असतील, तर बॅकअपही कायम राहातो. काही कारणानं एखादा बंद पडलाच, तर दुसरा आधीपासून अस्तित्वात असलेला आणि वाचला जाणारा ब्लॉग हाती असणं केव्हाही चांगलंय... दोन्ही ब्लॉग बारकाईने पाहिल्यास त्यात काही ठिकाणी साम्य दिसतं तर काही ठिकाणी मुद्दाम घडवून आणलेलं वेगळेपण... मनात शंका येण्याचं हे प्रमुख कारण. आणि दुसरं म्हणजे आजवर एकाच वेळी दोन ब्लॉग्ज सुरू आहेत, असं कधीही घडलेलं नाही. दोन्ही ब्लॉग शैलीदार आणि कोणाचाही मुलाहिजा न ठेवता लिहिले जात आहेत. अशी अनेक कारणं आहेत मनात ही शंका यायला...
ब्लॉग दोन असले तरी टीम एकच आहे की वेगवेगळी?
ते काही असो... दोन्ही ब्लॉग चांगले आहेत आणि बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणा-यांच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या दोन्ही ब्लॉग्जनी पुढे सुरू ठेवलं आहे. त्यामुळे त्यांचं स्वागतच करायला हवं...

Saturday, 25 September 2010

चक दे...

कॉमनवेल्थ गेम्सवरून देशाची पुरती आब्रु गेल्यानंतर एकदाचं घोडं गंगेत न्हालं आहे. स्पर्धा होणार की नाही होणार हा घोळ संपला आहे आणि ३ तारखेला एकेकाळच्या सूर्य न मावळणा-या राष्ट्राचे विभागलेले कुळ आपली मशाल दिल्लीत पेटवणारच, हे निश्चित झालं आहे.
सुरूवातीला मणिशंकर अय्यर यांनी या स्पर्धांच्या आयोजनावर आक्षेप घेतल्यानंतर त्यांना देशद्रोही म्हणण्यापर्यंत काहींची मजल गेली होती. मात्र त्यानंतर बाहेर आलेल्या एकेक प्रकरणांमुळे या लोकांचेच दात घशात गेल्याचं चित्र निर्माण झालं आहे. टॉयलेट पेपरपासून ते क्वीन्स बॅटन रिलेच्या लंडनमधील कार्यक्रमापर्यंत प्रत्येक गोष्टीत आपल्या राष्ट्रीय धर्माला जागून पैसे खाल्ल्याचे आरोप केले जात आहे. इतकंच नाही, तर या स्पर्धेचे यजमानपद मिळविण्यासाठीही म्हणे सर्व ७१ देशांना लाच देऊ केली गेली आहे. देशाचं नाक कापलं गेल्यानंतर आता किमान स्पर्धेच्या काळात तरी चांगल्या सोयी ठेवून किमान देशाची मान खाली घातली जाणार नाही, याची काळजी घेतली जाईल अशी अपेक्षा आहे.
आजच कॉमनवेल्थ फेरडेशनचे अध्यक्ष मायकेल फेनेल यांनी आयोजनातील ढिसाळपणाला सगळेच जबाबदार असल्याचं म्हंटलं आहे. या 'सगळे'मध्ये त्यांची समिती आणि ते स्वतःदेखील त्यांना अभिप्रेत आहेत. दोन दिवसांपूर्वीचा त्यांचा सूर अचानक बदलण्यास काही कारणं असू शकतात. एकतर त्यांनी कॅबिनेट सचिव चंद्रशेखर यांना लिहिलेल्या पत्रानंतर खरंच सरकार दणकून कामाला लागलं आणि खरोखरच ४८ तासांत अशक्य ते शक्य करून दाखवलं आणि आता क्रीडाग्राम अत्यंत देखणं, स्वच्छ आणि नीटनेटकं झालेलं आहे... असं मानायला जागा आहे. पण त्यासाठी हॅरी पॉटरच प्रत्यक्षात यायला हवा...
यापेक्षा स्पर्धा सुरू होण्याच्या तोंडावर कटुता नको, असा विचार करून फेनेल यांनी हे वक्तव्य करणं पटण्यासारखं आहे. कारण अवघ्या आठवड्यावर स्पर्धा आल्यामुळे आता ऑलिम्पिक समिती, राष्ट्रकुल समिती, आयोजन समिती हे सगळेच 'पॉइंट ऑफ नो रिटर्न'वर आले आहेत. आता स्पर्धा रद्द होऊ शकत नाहीत, ही काळ्या दगडावरची रेष आहे. त्यामुळे स्पर्धेच्या काळात कोणाच्या मनात किल्मिष राहायला नको आणि सर्वांना ही स्पर्धा एन्जॉय करता यावी, या उद्देशाने फेनेल बॅकफूटवर आलेले असू शकतात. (आरोप होतो आहे, त्याप्रमाणे जर खरंच आंतरराष्ट्रीय लाचखोरी करून यजमानपद मिळवलं असेल, तर या ७१ देशांना हे कथित पैसे परत करावे लागणार नाहीत ना, ही भीतीदेखील फेनल यांच्या मनात असावी का?)  कारण काहीही असलं, तरी आता राष्ट्रकुलावरचं मळभ दूर झालं आहे आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसह सर्व संघ दिल्लीत डेरेदाखल होत असल्याचं आश्वासन फेनेल यांनी देऊ केलंय.
तात्पर्य, स्पर्धांचे गेट.... सेट...(?) झाले आहे आणि फक्त बंदुकीचा बार उडण्याची वाट सगळे बघतायत (रेफरीच्या बंदुकीचा बार... अतिरेक्यांच्या नव्हे!!!) त्यामुळे आता पुढले २-३ आठवडे कलमाडी-शीला दीक्षित यांना विसरूयात... सायना, तेजस्वीनी, विजयेंद्र यांच्यासह तिरंगा खांद्यावर लावून खेळणा-या प्रत्येकाला शुभेच्छा देण्यासाठी १०० कोटी कंठांमधून एकच आवाज देऊयात....

चक दे इंडिया...!!!

Friday, 24 September 2010

तारीख पुढे... टेन्शन वाढणार की घटणार?

सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या निकालाच्या सुनावणीला स्थगिती दिली. २४ तारखेला निकाल लागेल असं गृहित धरून आधीची पोस्ट लिहिली होती... तारीख पुढे ढकलली तरी निकाल अटळ आहे.
६० वर्षं भिजत पडलेलं हो घोंगडं 'वॉशिंगमशिन'च्या बाहेर सुकवायचा हा शेवटचाच प्रयत्न ठरावा...  पण इतक्या वर्षांत जे घडलं नाही, ते चार दिवसांत घडायची शक्यता कमीच आहे. किंबहुना लखनौ उच्च न्यायालयाच्या अलाहाबाद खंडपीठात दोन्ही बाजूंनी तसं स्पष्ट केल्यानंतरच निकालाची तारीख जाहीर करण्यात आली होती. यामुळे आजचं मरण उद्यावर गेलंय, इतकंच म्हणता येईल...
मात्र आता तारीख आणखी पुढे ढकलली गेल्याने एक वेगळीच समस्या उभी राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रकुल स्पर्धा ३ तारखेला आहेत. आता हा निकाल या स्पर्धांच्या तोंडावर लागण्याची शक्यता आहे. तसं झालं आणि आपल्या सर्वाच्या दुर्दैवाने आपण या 'वार्षिक परीक्षे'त नापास झालोच, तर आधीच अनेक अपघातांनी जर्जर झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांसाठी तो शेवटचा आघात ठरावा... अर्थात तारीख जाहीर करताना मायबाप सुप्रिम कोर्ट या सगळ्याचा विचार नक्की करेल, अशी आशा आहे.
आता स्पर्धा संपल्यानंतरची तारीख मुक्रर झाली, तर मात्र काही काळ स्पर्धांच्या निमित्ताने आसेतूहिमाचल पसरलेला कृत्रिम तणाव नाहीसा होण्यास मदत होणार आहे...
असो... परीक्षा पुढे ढकलली की हुशार विद्यार्थी ती इष्टापत्ती मानतात आणि नियोजित वेळेत वाचायचे राहून गेलेल्या विषयांची उजळणी करतात... पण एखादा ढ कार्टा असेल, तर परीक्षा पुढे गेल्याच्या आनंदात एकतर सिनेमाला जाऊन बसतो किंवा नाक्यावर टंगळ-मंगळ तरी करतो... आपली कॅटेगरी कोणती ते काळच ठरवेल!!!

Wednesday, 22 September 2010

मॅच्युरिटीची लिटमस टेस्ट...

परवा, २४ तारखेला दुपारी साडेतीन नंतर आपल्या देशाची वार्षिक परिक्षा आहे. अयोध्येतील वादग्रस्त वास्तूबाबत गेली ६० वर्षे सुरू असलेल्या खटल्याचे निकालवाचन सुरू होण्याची ही वेळ असेल. यावेळी आपला देश आणि अर्थातच राजकारण्यांच्या परिपक्वतेची लिटमस चाचणी होणार आहे.
- गेल्या ६० वर्षांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. खटला दाखल झाल्यानंतर बाबरी वादावरून अनेक दंगलीही झाल्या. याचा कळस गाठला १९९२ सालाने... कारसेवेच्या नावाखाली बाबरी मशिद (किंवा ढाचा!) उध्वस्त केली गेल्यानंतर देशभरात दंगली झाल्या... त्यात हजारो हिंदू आणि मुस्लिमांचे शिरकाण केले गेले. लोकांना शांत करण्याऐवजी डोकी भडकविण्याची कामं दोन्ही धर्मांच्या धुरिणांनी (आणि काही राजकीय नेत्यांनीही) केली. या दंगलींना 'उत्तर' म्हणून मुंबईत १२ मार्च रोजी दाऊद इब्राहिम पुरस्कृत स्फोटमालिका घडल्याचे मानले जाते. पहिल्या चाचणी परिक्षेत आपण नापास झालो होतो...
- २००२ साली अशीच एक कारसेवा अयोध्येत केली गेली. त्यासाठी देशभरातून विहिंपचे शेकडो कार्यकर्ते गेले होते. गुजरातमधील कारसेवकांचा डबा गोध्रा स्थानकात पेटवून देण्यात आला. यात सुमारे ६० जण (यातील बहुतांश विहिंपचे कार्यकर्ते होते) मारले गेले. त्यानंतर जातीय दंगलींमध्ये गुजरात भाजून निघाला... १ ते २ हजार लोकांचा बळी या दंगलींनी घेतला. गुजरातच्या मोदी सरकारच्या आशिर्वादानेच या दंगली घडविल्याचा आरोप आजही केला जात असून या प्रकरणातले अनेक खटले प्रलंबित आहेत... ही सहामाही परिक्षा मानली तर त्यातही आपण सपशेल आपटी खाल्ली होती... एकही विषय असा नव्हता की ज्यात आपल्याला ३५ टक्के देता यावेत...
- २००५ साली अयोध्येतील वादग्रस्त स्थळी अतिरेकी हल्ला झाला. यावेळी सुरक्षा दलांनी पाच इस्लामी दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं... यावेळी देशात कोणतीही भडक प्रतिक्रीया उमटली नाही... दुसरी चाचणी (नऊमही) परिक्षेचा गड यावेळी आपण सर केला. हिंसा भडकविण्यासाठी हा हल्ला केल्याचं मानलं जात असलं तरी अशी कोणतीही प्रतिक्रीया उमटली नाही.
- २६/११ला झालेल्या प्रिलिम परिक्षेत मात्र आपण उत्तम गुण मिळविले आहेत. मुंबईवर झालेला भयानक हल्ला... यावेळी सगळा देश एकजूट असल्याचे चित्र हायला मिळाले. हा हल्ला म्हणजे पाकिस्तानने आपल्यावर लादलेले युद्ध आहे, अशी भावना हिंदूंबरोबरच मुस्लिम धर्मियांचीही होती. कसाब वगळता मारल्या गेलेल्या ९ अतिरेक्यांवर अंत्यसंस्कार करण्यास किंवा त्यांना भारताच्या मातीत चिरनिद्रा देण्यास मुस्लिम समुदायाने कडवा विरोध केला. या घटनांमुळे आपण पूर्वीपेक्षा अधिक मॅच्युअर झाल्याची झलक बघायला मिळाली.
- २४ सप्टेंबर रोजी आपली वार्षिक परिक्षा आहे. आत्तापर्यंत आपण दाखविलेली प्रगती आपण कायम ठेवणार की पुन्हा आपली गुणांची पाटी कोरी होणार, हे या दिवशी ठरेल. वातावरणात तणाव आहे... किंबहुना हा कृत्रिम तणाव उत्पन्न केला गेला आहे. उत्तर प्रदेशात निमलष्करी दले मागविणे, विविध पक्षांच्या नेत्यांनी दोन्ही धर्मांच्या धर्मगुरूंच्या भेटी घेणे, सतत शांतता राखण्याचे आवाहन करणे या गोष्टींमुळे वातावरणनिर्मिती झाली आहे.
निकाल काहीही लागला तरी कोणीतरी आनंदी होणार आणि कोणीतरी संतापणार हे निश्चित आहे. दोन्ही बाजूंना मान्य होईल, असा निकाल येण्याची शक्यता फारच अंधुक आहे. एकवेळ दोन्ही पक्ष नाराज होतील, अशी स्थिती येऊ शकते. पण win-win situation असणं जवळजवळ अशक्यच... हा निकाल हायकोर्टाचा असल्यामुळे नाराज झालेल्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग निश्चित खुला आहे. दोन्ही बाजूंकडून तसं बोलूनही दाखवलं गेलंय... सर्वांनीच लोकांना शांत राहण्याचं आवाहन केलंय आणि केंद्र व सर्व राज्य सरकारांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी उपाययोजना केल्याचं स्पष्ट केलंय...
मात्र त्या दिवशी प्रत्यक्षात काय घडतं, यावर आपल्या परिपक्वतेची पातळी मापली जाणार आहे. ही अंतिम परिक्षा आपण पास होऊ ही अपेक्षा आहे. या महत्त्वाच्या परिक्षेसाठी देशाला आणि हिंदू-मुस्लिम धार्मिक नेत्यांना आणि सर्व राजकीय पक्ष आणि सरकारांना हार्दिक शुभेच्छा...

Friday, 7 May 2010

प्राणप्रिय मोटरमन...

मी तुला कधीच पाहिलेले नाही. आपली थेट ओळखही नाही. एखादवेळी रागा-लोभाच्या क्षणी आपण भेटलो असू-नसू... पण त्यानं काहीच फरक पडत नाही. ज्याप्रमाणे हवा दिसत नाही पण तिचे अस्तित्व सतत जाणवते. गदिमांच्या भाषेत ‘कधी भक्त का पाहतो ईश्वराला... नदी न्याहळी का कधी सागराला...!’ तसा माझ्यासाठी तू... आपल्या भारती संस्कृतीत ‘ग्राहको देवो भवः’ असं म्हणतात... पण इथं मी ग्राहक असले तरी माझा देव मात्र तूच आहेस. गेल्या दोन दिवसांत ‘देव कोपल्या’वर काय होतं, त्याचा प्रत्यय मला पुरेपुर आला. अखेरीस तुझा कोप दूर झाला व तू पुन्हा आमची ‘सेवा’ घ्यायला सुरूवात केलीस, हे समजल्यावर मी सुटकेचा निश्वास टाकला...
‘नाक दाबलं की तोंड उघडतं...’ अशी एक म्हण आहे. ही म्हणदेखील तू अपुरी ठरविलीस. ‘एकाचं नाक दाबलं की दुस-याचं तोंड उघडतं...’ अशी नवी म्हण तू जन्माला घातली आहेस. प्राण गुदमरेपर्यंत माझं नाक दाबल्यानंतर अखेर सरकारच्या तिजोरीचं तोंड थोडं का होईना, किलकिलं झालं आहे. त्यामुळे तुझं अभिनंदन केलं पाहिजे... आता मी हे खवचटपणाने बोलतेय, असं वाटत असेल तुला... पण मी खरंच मनापासून म्हणतेय.
तू ज्या मागण्यांसाठी माझं नाक दाबलंस, त्या योग्य की अयोग्य हे ठरविण्याची माझी लायकी नाही. ‘कोणीही यावे टपली मारून जावे...’ या आपल्या सांघिक खेळात कायम माझ्यावरच राज्य असतं आणि तूझ्यासारखे अनेक जण टपली मारून जात असतात. एखादी टपली थोडी जोरात बसते (कालच्यासारखी). पण माझी सहन करायची ताकद अमर्याद आहे. अशा पदोपदी टपल्या खाणारीने तू आणि तुझ्या मालकांमध्ये बोलू नये, हे समजतं मला... पण या मागण्यांसाठी तू पत्करलेल्या मार्गाचं कौतुक केल्यावाचून रहावत नाहीये.
खरंतर सकाळी ६ वाजल्यापासून तू उपोषण करून गांधीगिरी सुरू केली होतीस. हेच जर तू मध्यरात्रीपासून केलं असतंस, तर कदाचित सकाळपासून गाड्यांचा गोंधळ झाला असता आणि मी मुंबईत (ऑफिसला) गेले नसते. घरीच राहिले असते. पण तू सकाळी ६पासून उपास सुरू केलास. त्यामुळे एक मन नको म्हणत असताना गाडी राईट-टाईम असल्याने मी मुंबईत गेलेच. दिवसभर काम करून आणि अनेकांच्या ‘टपल्या’ खाऊन थकल्यावर घरी यायला निघाले आणि अचानक तुला चक्कर आली, हॉस्पि़टलात न्यावं लागलं... ही तुझी आयडिया चांगली होती. तुझा घाव अतिशय योग्य जागी लागला. माझ्या नाकावर तू दाबलेला चिमटा अधिक घट्ट झाला. माझा जीव गुदमरला... पण त्या क्षणी तुला आणि तुझ्या मालकांना माझी चिंता नव्हतीच... (ती तशी कधीच नसते म्हणा!) मी घरी कशी पोचले, कधी पोचले का कुठल्यातरी स्टेशनच्या कोप-यातल्या बाकावर एकटीच बसून रात्र काढली... याच्याशी तुला काही घेणंदेणं असायचं कारण नाही. घरी माझी पिल्लं वाट बघत असतील, माझे म्हातारे आई-बाबा, सासू-सासरे एकटे असतील, याच्याशी तुला काय घेणंदेणं असणार? उलट माझे जितके जास्त हाल होतील, तितकं तुला बरं होतं... नाही! तू मुद्दाम मला त्रास द्यायला हे केलंस, असं मला म्हणायचं नाहिये. किंबहूना आपले संबंध फार जिव्हाळ्याचे आहेत, असंच मला वाटतंय. पण मला होणारा त्रास तुझ्याच फायद्याचा आहे, हे नाकारण्यातही अर्थ नाही...
माझे कसे हाल झाले किंवा तू कसा चुकलास हे सांगण्याची माझी इच्छा नाही आणि त्यानं काही फरक पडेल, असंही नाही. त्यासाठी हे पत्र नाही. तुझ्या मागण्या मान्य होणार आहेत म्हणे. त्याकरिता तुझं अभिनंदन करण्यासाठी हा पत्रप्रपंच... आणि समजा मालकांनी आश्वासन दिलं असलं तरी त्या नाहीच झाल्या मान्य, तरी चिंता करू नकोस... माझं नाक शाबूत आहे. तुला वाटेल तेव्हा त्याला चिमटा लाव... ते कापून टाक... काय हवं ते कर... पण मागण्या सोडू नकोस. त्या तुझ्या आणि तुझ्यामुळे माझ्या अस्तित्वासाठी फार गरजेच्या आहेत. माझी चिंता करू नकोस... माझी सहनशक्ती भक्कम होती, आहे आणि राहील...

तुझी कायम कृपाभिलाषी,
एक अतिसामान्य लोकल प्रवासी
ताजा कलम – पुन्हा आबांना भेटलास की हा खालचा भाग फाडून त्यांना दे प्लीज...

------------------------------------------------------------

प्रिय आबा,
तुम्ही मोटरमन आणि त्यांचे मालक यांच्यात शिष्टाई करून अखेरीस हे प्रकरण मिटविल्याचे समजले. हे तुम्ही माझ्यासाठीच केलेत, असे मानले तरी त्याला ३० तास का लागले, हा प्रश्न मला छळतो आहे. आता मी घरी पोचले आहे. जर गाड्या आणखी चार दिवस धावल्या नाहीत तर मी घरीच राहणार... ऑफीसला जाणार नाही... त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान होणार... हा विचार करून तर तुम्ही घाई केली नाहीत ना?
असो. नसेल तसं... उगीच विचार आला डोक्यात इतकंच... राग मानू नका!

तुमची,
ए.अ.लो.प्र.

Wednesday, 14 April 2010

एक शोध ‘देवा’चाही...!

(दै. लोकमतच्या रविवार दि. ५ एप्रिलच्या 'मंथन' पुरवणीत प्रसिद्ध झालेला हा माझा लेख ब्लॉगवाचकांसाठी पुन्हा...)

विश्वाची निर्मिती कशी झाली.... अनादी काळापासून किंवा असे म्हणुयात की मानवाला ‘समज’ आल्यापासून छळणारा हा प्रश्न... विज्ञान सिद्धांतांच्या आधारे तर धर्ममार्तंड ग्रंथांच्या आधारे त्याची उत्तरे देत असतात. ‘सर्न’मध्ये झालेल्या महाप्रयोगामुळे हे ब्रह्मांड घडविणा-या ‘देवा’चा शोध शास्त्रज्ञांना लागेल का? प्रयोगाच्या इतक्या प्राथमिक अवस्थेत या प्रश्नाचे उत्तर मिळणे सोपे नाही... पण कल्पनेला थोडा ताण दिला आणि आपली ‘देवा’ची व्याख्या व्यापक केली, तर हे उत्तर मिळूही शकते...
-------------------------------
‘सर्न’मधील प्रयोगात विश्वाच्या या उत्पत्तीचे रहस्य शास्त्रज्ञांना उलगलेड काय? या आदीम प्रश्नाचे उत्तर या प्रयोगातून मिळू शकेल, असे अनेकांना वाटते आहे. ते सिद्ध करण्याचे दोन प्रकार असू शकतात... एक म्हणजे थिअरॉटिकल आणि दुसरा प्रॅक्टिकल... थिअरॉटिकली बिग बँग सिद्ध करण्यासाठी गणिताचा आधार घेतला जाईल आणि तो विषय फारच क्लिष्ट असेल. दुसरा मार्ग असेल तो प्रॅक्टिकल... या प्रयोगातून हाती आलेल्या गोष्टी तपासून... पण आजवर कोणीच “विश्व’ निर्माण केलेले नसल्यामुळे हाती आलेल्या गोष्टी बरोबर आहेत, हे तपासणार तरी कसे...
प्रयोगातून काय साध्य होऊ शकते?
अध्यात्मिक किंवा गणिती प्रश्नही बाजुला ठेऊन भौतिक जगाचा विचार केला खरेतर या प्रयोगातून शास्त्रज्ञांच्या हातात मोठा खजिना लागू शकतो. विश्वाची निर्मिती कशी झाली... यापेक्षा एका बिंदुतून निर्माण झालेल्या या विश्वातील सूर्य नावाच्या ता-याचा तिसरा ग्रह वाचविता येईल का, याचे उत्तर मिळू शकते... सध्याचा सर्वात ज्वलंत प्रश्न म्हणजे अर्थातच ‘ग्लोबल वॉर्मिंग...’ या ग्लोबल वॉर्मिंगवर कायमचा इलाज शास्त्रज्ञांना मिळू शकतो... अणुपेक्षाही हजारो पट अधिक उर्जा देणारी... कोणताही कचरा मागे न सोडणारी... कुठल्याही प्रकारचे प्रदुषण न करणारी... अर्थात हे इतक्यात साध्य होणार नाही. त्यासाठी अनेक वर्षेही जावी लागतील कदाचित. पण खरोखर ही वस्तू पुढेमागे तयार करता आली आणि मुख्य म्हणजे ती साठवून ठेवणे शक्य झाले तर संबंध पृथ्वीचा उर्जेचा प्रश्न चुटकीसरशी निकालात निघू शकेल... ती वस्तू म्हणजे अँटीमॅटर...
अँटीमॅटर काय आहे?
आपण पाहतो ते विश्व पदार्थाचे किंवा मॅटरचे बनलेले आहे. पदार्थाच्या अणूंमध्ये मध्यभागी असलेला प्रोटॉन हा धन विद्युतभारीत (possitive) असतो तर त्याभोवती ऋण विद्युतभार असलेले इलेक्टॉन्स फिरत असतात... मात्र हेच जर उलट असेल, म्हणजे ऋण विद्युतभार केंद्रस्थानी आणि त्याभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन्स (शास्त्रीय भाषेत पॉझिट्रॉन्स) धन विद्युतभारीत असतील तर त्याला वैज्ञानिक भाषेत प्रतिपदार्थ किंवा अँटीमॅटर म्हणतात... गणिताचा आधार घेऊन शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केले की मॅटर आणि अँटीमॅटर संपर्कात येताच एकमेकांचा नाश करतील... याला ‘एनिहिलेशन' म्हणतात. हा निव्वळ उर्जेचा उत्तम स्त्रोत... एकवेळ अँटीमॅटर तयार झाला तरी तो साठवून ठेवणे अशक्यच आहे... कारण या पृथ्वीवरची प्रत्येक गोष्ट, अगदी हवादेखील मॅटरची बनलेली आहे. त्यामुळे हा अँटीमॅटर ठेवणार कुठे आणि कशात? या प्रश्वाचे उत्तर संशोधकांवर सोपवणेच योग्य होईल... राहता राहिला प्रश्न ‘सर्न’मधील प्रयोगातून देवाचा शोध लागू शकेल का...? या मुळ प्रश्नाला बगल देऊन अँटीमॅटरचं पुराण लावायचं कारण इतकंच की जरी साठवून ठेवता आला नाही, तरी अँटीमॅटर असतो... तो असू शकतो... ही गोष्टच देवाच्या अस्तित्वाला सप्रमाण सिद्ध करणारी ठरेल... हे विधान बहुदा खुळचटपणाचं किंवा नास्तिकतेचं वाटेल... या विधानाचा तर्कसंगत विचार करायचा तर आधी विश्वाच्या निर्मितीबद्दल धर्म काय सांगतो, ते बघायला हवे...
ब्रह्मांडाची निर्मिती... धर्मग्रंथ काय सांगतात?
वैज्ञानिक मानतात की, विश्वाची निर्मिती एका महास्फोटातून झाली. हिच ती ‘बिग बँग थिअरी.’ एक बिंदू होता... या बिंदूला ‘हिग्ज बोसन’ किंवा ‘देवाचा कण (God’s Particle)’ असे नाव दिले गेले आहे. त्याचा महास्फोट झाला आणि त्यातून हे ब्रह्मांड घडले, असे विज्ञान मानते... महदाश्चर्याची गोष्ट म्हणजे ही थिअरी सर्वप्रथम मांडली बेल्जियममधील एका ख्रिश्चन धर्मगुरूने... फादर जॉर्जेस लेमिटर यांनी... त्यानंतर प्रसिद्ध शास्त्रज्ञ एडविन हबल याने गणिताच्या आधारे या बिग बँग थिअरीला बळकटी दिली. ख्रिश्चनांचा धर्मग्रंथ बायबलमधील विश्वाच्या निर्मितीचे वर्णन आहे... देव म्हणाला प्रकाश होऊ दे... आणि प्रकाश झाला... हिंदू वेद-पुराणे सांगतात की एका बिंदूतुन ब्रह्माने हे विश्व जन्माला घातले... हीदेखील एक प्रकारे ‘बिग बँग थिअरी’च... जगातील सर्व धर्म सांगतात की देवाने जग निर्माण करताना नेहमी ‘समानता’ (symmetry) साधली आहे. प्रकाश आणि अंधार... भरती आणि ओहोटी... चांगल्या शक्ती आणि वाईट शक्ती... देवदूत आणि सैतान... सज्जन आणि दुर्जन... विश्वाच्या निर्मितीतमधील ही सिमेट्री विज्ञानालाही मान्य आहे... प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली हा या सिमेट्री-थिअरीचा सर्वात मोठा भोक्ता होता, यात सर्वकाही आलेच... आता या दृष्टीकोनातून पुन्हा एकदा आपल्या अँटीमॅटरकडे पाहिले तर काय दिसते?
अँटीमॅटर आणि सिमेट्री...?
जर शास्त्रज्ञांना जिनिव्हातील या महाप्रयोगातून अँटीमॅटर तयार झाल्याचे दिसले, तर विश्वाच्या निर्मितीतील ही सिमेट्री आपोआप सिद्ध होणार आहे. अँटीमॅटरचा उर्जेसाठी वापर, ग्लोबल वॉर्मिंग कमी करायला त्याची होऊ शकणारी मदत... इत्यादी भौतिक गोष्टी बाजुला ठेऊनही विश्वाची निर्मिती करताना निसर्गाने सिमेट्री बिघडविलेली नाही... हे सप्रमाण सिद्ध होऊ शकेल... जसा प्रकाश आणि अंधार... भरती आणि ओहोटी... तसाच हा मॅटर आणि अँटीमॅटर... हे सिमेट्री-बिमेट्री ठिक आहे... पण ‘देवाचा शोध’ कसा लागेल... हाच प्रश्न पडला असेल ना?
जिनिव्हाच्या ‘हायड्रॉन कोलायडर’मधील ‘देव...?’
देव म्हणजे दगडाची मूर्ती... देव म्हणजे पंचमहाभूते... देव म्हणजे निसर्ग... देव म्हणजे आपले मन... या सगळ्या रुढ कल्पना बाजूला ठेवल्या आणि देव म्हणजे एक शक्ती आहे, असे मानले तर... विज्ञानाची मोठी झेप घेणा-या माणसाची नजर ‘ब्रह्मांड संपते’ तिथपर्यंत अजूनही पोहोचू शकलेली नाही... ‘असे हे ब्रह्मांड निर्माण करणारी शक्ती म्हणजे देव...’ अशी जर देवाची व्यापक व्याख्या केली, तर ‘सर्न’ या केवळ विज्ञान आणि विज्ञानालाच वाहिलेल्या... देवाचे नाव जिथे घेतले जात नाही अशा अत्याधुनिक प्रयोगशाळेतील एका २७ किलोमीटर लांब नळीतून शास्त्रज्ञांना या देवाचा ‘साक्षात्कार’ होणे अवघड नाही...!