Tuesday, 22 December 2009

तूलना करायचीच झाली तर...

गेल्या आठवड्यात उटीला गेलेलो... सहज. फिरायला. आता उटीला जाऊन आलं की त्याबद्दल किमान ब्लॉगवर लिहिलंच पाहिजे... नाहीतर मी पत्रकार कसला! नाही का? पण मला उटीतला निसर्ग... तिथले चहाचे मळे... खालपर्यंत येणारे ढग... (खरंतर ढग तिथेच असतात, आपण वर गेलेलो असतो!!!) तिथे मिळणारी ती 'होम मेड चॉकलेट्स...' इत्यादी इत्यादी असं बरंच लिहिलं जाऊ शकतं... पण मला सांगायचंय ते तिथल्या गावांबद्दल... स्वतःला प्रगत म्हणवणाऱ्या महाराष्ट्राची तामिळनाडूमधल्या निलगिरी जिल्ह्याशी तूलना करण्याचा मोह आवरत नाहीये...
*****************
कोयंबतूर स्टेशनवर पहाटे(?) ६च्या सुमारास उतरल्यावर आधीच इथून ठरवलेली टॅक्सी तयार होती... टॅक्सीत बसल्यावर ड्रायव्हर अंकलनं आपल्या मोडक्या-तोडक्या इंग्रजीत (अंकलचं नाव जोसेफ) माहिती द्यायला सुरूवात केली... उटी इथून ९० किलोमीटर आहे... नेहमीचा रस्ता गेल्यावर्षी पुरात वाहून गेल्यामुळे लांबून जायला लागतं... इत्यादी. नंतर अंकल म्हणाले की, 'रस्ता खराब असल्यामुळे जायला वेळ लागतो...!!'
एकदा घाट सुरू झाल्यावर खड्ड्या-खुड्ड्यातून जायची मनाची तयारी करू लागलो... शप्पथ सांगतो! थेट हॉटेलच्या दारात उतरेपर्यंत रस्त्यावर एकही खड्डा लागला नाही... पॅचेस अगदी तुरळक... लालूंच्या भाषेत सांगायचं तर 'हेमा मालिनीच्या गालासारखा गुळगुळीत रस्ता...' हा रस्ता जोसेफ अंकलच्या म्हणण्याप्रमाणे 'खराब?' त्यांना एकदा बेलापूर ते बदलापूर असा प्रवास घडवावा (बाजूच्या सीटवर बसवून नेलं तरी चालेल...) अशी तीव्र इच्छा होत होती... म्हणजे प्रगत(?) महाराष्ट्रातून आलेल्या कोणाला 'कोयंबतूर-उटी रस्ता खराब आहे...' असं सांगण्याची अंकलची हिम्मतच झाली नसती...
*******************
दुसऱ्या दिवशी एका टुरिस्ट बसबरोबर 'साईट सिइंग' करायला गेलो... त्यावेळी आमचा ड्रायव्हर अण्णा कम गाईड अण्णा उर्फ रमेश अण्णा (पुन्हा मोडक्या हिंदीत) माहिती देत होता. या उटीच्या व्हॅलीत (तिथूनच आमची बस जात होती) ३६ (चु.भू.द्या.घ्या.) आदिवासी गावं आहेत. एकूण ७ जमातींचे आदिवासी तिथं राहतात...
आता आदिवासी गाव म्हंटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? झोपड्या... किंवा केवळ विटांची बांधलेली घरं... घरापुढे अंगण... एखादं ढोर... अंगणात नागडी-शेंबडी पोरं... इत्यादी... उटीमधल्या व्हॅलीच्या आदिवासी घरांमध्ये चारचाकी गाड्या होत्या... ज्याला 'बंगला' म्हणू शकतो, अशी बरीचशी घरं या 'आदिवासी पाड्यां'मध्ये होती. तिथं असलेल्या अफाट चहाच्या मळ्यांमुळे तिथले आदिवासी सधन असणं शक्य आहे. पण सरकारच्या 'पॉझिटीव्ह एनर्जी'ची जोड त्यांना तिथं मिळाली असणार... अन्यथा आपल्या राज्यातल्या हिल स्टेशन्सची अवस्था आठवते... माथेरानचा मार्ग असलेलं नेरळ... महाबळेश्वरच्या आसपासची गावं... जव्हार... या ठिकाणी असलेल्या आदिवासींना या नैसर्गिक संपत्तीचा वापरच करू दिला जात नाही... तामिळनाडू सरकार प्रत्येक आदिवासी कुटुंबाला प्रत्येकी ५ एकर जमीन कसायला देतं... (आपल्याकडे आदिवासींच्या ताब्यात असलेल्या जमिनी कशा बळकावता येतील, याची चिंता वाहिली जाते...) तिथल्या सरकारच्या धोरणांमुळे निसर्गानं दोन्ही हातांनी उधळलेली संपत्ती तिथल्या शेवटच्या माणसापर्यंत पोचते, असंच दिसतंय... तामिळनाडूच्या अन्य भागांमध्ये स्थिती कशी आहे, माहित नाही... तिथं फिरायची संधी मिळाली की पाहता येईल. पण जो भाग पाहिला, त्यात मात्र निसर्ग आणि सरकार या दोघांमुळे तिथल्या आदिवासींच्या दारात विकासाची गंगा पोहोचलीय... अर्थात उटीतल्या आंतरराष्ट्रीय पर्यटनाचाही याला हातभार लागला असण्याची शक्यताही आहे. पण काहीही झालं तरी राजकीय इच्छाशक्ती असल्याशिवाय हे होणं नाही...
तिथे जाऊन परतल्यानंतर पुन्हा एकदा जव्हारला जाऊन यावं, असं वाटायला लागलंय... सगळ्यांनी एकत्र येऊन आपलं झोपलेलं सरकार.... आदिवासी खात्याचे स्वतः वनवासी असलेले मंत्री... या सगळ्यांना 'उटी उटी गोपाळा...'चा गजर करून जागं करण्याची गरज आहे...

3 comments:

Gouri said...

yogayog bagha ... maagachyac aathavadyaat mee hee ooty la gele hote :) OOty chi vegalich baju samor thevalit tumhi.

Anonymous said...

अहो पत्रकार साहेब, मराठी शुद्ध लिहायला शिका. पत्रकारांना तरी हे सांगायचे गरज पडू नये. "तूलना" नव्हे "तुलना".

mala-watala-te said...

मिस्टर ऍनॉनिमस...
खरंतर तुम्ही कुठल्यातरी मोठ्ठ्या वर्तमानपत्राचे संपादक व्हायला हवं... जे काही लिहीलंय त्यावर कॉमेंट टाकली असतीत तर बरं वाटलं असतं... पण नाही! त्यातल्या ऱ्हस्वदिर्घाच्या चुका काढण्यात तुम्ही धन्यता मानताय... काय म्हणावं बरं तुम्हाला... तुम्ही संपादक व्हाच कुठल्यातरी दैनिकाचे... त्यात तुम्ही तुमचं नाव पण लिहिलेलं नाही... संपादक नाही, तरी किमान प्रुफरीडरच्या जागेवर कुठे व्हेकन्सी असती तर कळवलं असतं तुम्हाला... काय हे???