Tuesday 29 November 2011

R2020... क्रांती!

चेतन भगत हा माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक... किंबहुना भारतीय इंग्रजी लेखकांमध्ये सर्वात आवडता. काल दुपारी चेतनचं रिव्हॉल्यूशन २०२० हे नवं पुस्तक पोष्टानं हाती पडलं आणि आजची दुपार येईस्तोवर त्याचा फडशा पाडला. चेतनच्या पुस्तकांचा हा मोठा प्रॉब्लेम आहे. त्याचा प्रोलॉग वाचल्यावर एपिलॉग वाचेस्तोवर ते खाली ठेवावंसंच वाटत नाही. २४ तासांत पुस्तक संपवलं खरं, पण डोक्यात त्याचं कथानक रेंगाळतचं आहे. पण बाकीची कामंही आहेत, त्यामुळे विचारांना वाट मोकळी करून देणं खूपच आवश्यक आहे. म्हणून तातडीनं ब्लॉग लिहायला घेतला. त्या निमित्तानं गेल्या अनेक महिन्यांचा ब्लॉगसन्यास संपला, तर सोने पे सुहागा...

*****************************************************

रिव्हॉल्यूशन २०२०... खरंतर ही एक त्रिकोणी प्रेमकथा आहे. पण त्याला अनेक सामाजिक-आर्थिक-मानसशास्त्रीय  पैलू आहेत. चेतनच्या आधीच्या चारही कादंब-यांमध्ये ते थोडेफार आहेतच, पण आर२०२० (आरतीनं केलेला शॉर्टफॉर्म) या पुस्तकाइतकं कधीच नाहीत.
गोपाळ हा चेनतच्या अन्य हिरोंसारखाच 'लूजर..' त्याचा शाळेपासूनचा मित्र, राघव हुश्शार आणि मैत्रीण  आरती दिसायला सुंदर... स्टोरी तशी टिपिकल. गोपाळचं आरतीवर जीवापाड प्रेम... आरती त्याला आपला सगळ्यात जवळचा मित्र मानते (ते शाळेत असतानापासून सोबत असतात.) पण इंजिनियरिंग एन्टरन्समध्ये नापास झाल्यानंतर गोपाळ दुस-या गावी पुन्हा परीक्षेची तयारी करण्यासाठी जातो आणि नेमके त्याच वेळी राघव आणि आरती जवळ येतात. ती तसं गोपाळला सांगतेही... गोपाळ परत आल्यानंतर त्याच्या मनात सुरू झालेलं द्वंद्व... तो आणि आरती पुन्हा आणि जास्त जवळ येणं.... राघवपासून वाढत असलेलं अंतर आणि असं बरंच काही...
पण या सगळ्या गोष्टीचा कणा आहे, राघवला हवी असलेली क्रांती... क्रांतीसाठी झपाटलेला राघव. त्याचा राजकारण्यांशी संघर्ष... त्याच वेळी त्याच राजकारण्यांच्या मदतीनं मोठा होत असलेला गोपाळ... त्यामुळे त्या दोघांमध्ये असलेला संघर्ष... अर्थात रावघच्या दृष्टीनं हा संघर्ष व्यावसायिक असला, तरी गोपाळसाठी तो आरतीचा प्रश्न असतो. त्याला कोणत्याही स्थितीत आरती हवी असते. तशी ती त्याच्याजवळ येतेदेखील... पण!
कादंबरीच्या शेवटची प्रकरणं चेतननं जबरदस्त घेतली आहेत. एका लहानशा प्रसंगामुळे सगळंच चित्र बदलतं आणि आपल्याला लूजर-पैशांच्या मागे लागलेला-लाचखोरी करणारा गोपाळ आपलंसं करून घेतो... अर्थात इथं शेवट सांगून कादंबरी वाचण्यातली मजा हिरावून घ्यायची नाही, त्यामुळे हे वर्णन इथंच थांबवतो.

*****************************************************

कादंबरीला चेतन भगतनं दिलेला सामाजिक आशय मात्र जबरदस्त आहे. त्याची थ्री मिस्टेक्स वगळता अन्य कादंब-यांमध्ये तसा तो तितका दिसत नाही. शिक्षणाचं बाजारीकरण, भ्रष्टाचार, हे प्रकार संपवण्याची गरज, त्यासाठी झपाटलेला राघव हे सामाजिक तसंच राघव आणि गोपाळच्या द्वंद्वात अडकलेली आरती, आपल्या झपाटलेपणामुळे तिच्यापासून दूर गेलेला राघव, वाराणसीच्या आमदाराची मनस्थिती आणि मुख्य म्हणजे गोपाळ... अशा अनेक मानसिक बाबी या कादंबरीत अतिशय योग्य पद्धतीनं हाताळल्या आहेत. एकूण काय, तर ही कादंबरी (नेहमीप्रमाणे) अतिशय वाचनीय आणि चिंतनीयही झाली आहे. इंग्रजी पुस्तक वाचण्याची आवड असलेल्यांनी ती वाचली पाहिजेच.. पण तशी सवय नसलेल्यांनीही वाचायला हरकत नाही. (अन्य भारतीय लेखकांप्रमाणे) कोणतीही क्लिष्ट भाषा न वापरताही कादंबरी रंजक होऊ शकते, हे वाचल्यावर लक्षात येईलच... So... Read R2020 for sure... Happy Reading....

Saturday 20 August 2011

अण्णा एके अण्णा...

आज घरी पुजा होती. त्यानिमित्त गावातले आणि जवळचे नातलग घरी आले होते. सध्या घरी-दारी एकाच विषयाची चर्चा आहे.. अण्णा हजारे. देशभरात अण्णा-लाट पसरलेली असताना आमचं घरही त्याला अपवाद कसं असणार? माझा वैयक्तिकरित्या आताच्या अण्णांच्या उपोषणाला विरोध आहे. त्यामुळे सहाजिकच मी अल्पमतातला... माझी मावसबहीण मधुरा एकदम अण्णामय झालीय. त्यामुळे अर्थातच मोठा वाद रंगला. त्यावेळी तिनं अनेक दावे केले. वादविवादात ते खोडून काढले असले, तरी मुळात मी पत्रकार असल्यामुळे बोलण्यापेक्षा लिहायची सवय अधिक. त्यामुळे ब-याच दिवसांनी ब्लॉग लिहायला मुहूर्त सापडला. त्या निमित्तानं आपले विचार शब्दांत मांडायची संधीही साधता येतेय, याचंदेखील समाधान....
--------------
पहिला मुद्दा म्हणजे अर्थातच देशभरात बोकाळलेला भ्रष्टाचार. भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासाठी अण्णांचं उपोषण आहे, असा एक सार्वत्रिक गैरसमज आहे. दुसरा गैरसमज म्हणजे अण्णांचं उपोषण लोकपाल विधेयकासाठी आहे. ही दोन्ही गृहितकं चुकीची आहेत. अण्णांचं सध्याचं उपोषण हे त्यांनी देऊ केलेलं लोकपाल विधेयकच संमत झालं पाहिजे, यासाठी आहे. लोकपाल विधेयकासाठी उपोषण करण्याची गरज नाही. कारण ते संसदेत मांडलं गेलंय आणि स्थायी समितीकडेही पाठवण्यात आलंय. ही प्रशासकीय यंत्रणा आहे. इथं कोणतेही चमत्कार होत नसतात. त्या प्रक्रियेला जितका वेळ दिला गेला पाहिजे, तितका दिला गेलाच पाहिजे... प्रक्रिया सुरू झाली असती आणि मग बासनात बांधली गेली असती, तर मी अण्णांना संपूर्ण पाठिंबा दिला असता... आता पहिला गैरसमज... या उपोषणामुळे देशातला भ्रष्टाचार खरोखर संपणार आहे का? दिल्लीत आणि देशभरात झेंडे घेऊन घोषणाबाजी करणारे किती लोक प्रामाणिक आहेत? लायसन्स नसेल, तर किती जण दंड भरतात? पास नसताना पावती फाडण्याची तोषिश किती जण सहन करतात? ते सगळं जाऊदे... यातल्या किती लोकांनी आजवर सिक-लिव्हसाठी डॉक्टरचं खोटं प्रमाणपत्र दिलेलं नाही? आपण सगळेच भ्रष्ट झालेलो असताना एका उपोषणानं आणि नारेबाजी करून हा प्रश्न सुटणार नाही, हे समजण्याइतकं आपण सूज्ञ असायलाच हवं. चॅरिटी बिगिन्स ऍट होम, या धर्तीवर नॉन-करप्शन बिगिन्स ऍट होम, असं म्हणायला हवं. (आपण आपल्या मुलांनाही सांगतो, पहिला आलास तर सायकल घेईन. हे काय आहे?) याबाबत जनजागृती करण्यासाठी अण्णा आणि त्यांच्या टीमनं देशभरात दौरा केला असता, तर अधिक बरं झालं असतं...
भ्रष्टाचार कसा सुरू होतो, हे आपल्याला माहितीच आहे... त्याचं उदाहरण बघा...

--------------
अण्णांचा आग्रह पंतप्रधानपद लोकपालाच्या कक्षेत आणण्याला आहे. याची खरंच काय गरज आहे, हे समजण्या पलिकडचं आहे. पंतप्रधान हा लोकांनी निवडून दिलेल्या संसदेला उत्तरदायी असतो आणि आपल्या लोकशाहीत संसद ही सर्वश्रेष्ठ आहे. पंतप्रधानाला हटविण्याचा अधिकार संसदेला आहे... आणि जर योग्य प्रतिनिधी निवडून गेले, तर त्या संसदेची पंतप्रधानालाही जरब वाटेल. मग माझ्या मनात प्रश्न येतो की, योग्य लोकं निवडून का जात नाहीत? याचं उत्तर शोधताना पुन्हा दुर्दैवानं स्वतःकडेच बोट जातं. अण्णांना पाठिंबा देणारे किती जण नियमित मतदान करतात? लागून सुट्ट्या आल्या, की पिकनिकचे प्लॅन आखले जातात. अगदी गावात असलोच, तर टाकून येऊ मत... तेवढंच लोकशाही जपल्याचं पुण्य! पण मतदान हे आपल्या प्रायोरिटी लिस्टमध्ये सर्वात तळाला असतं. मग चांगले लोकं संसदेत जाणार कसे आणि पंतप्रधानाला त्यांची भीती वाटणार कशी? मनमोहन सिंगांसारखा दुबळा पंतप्रधान असणं, हेदेखील आपल्याच मतदान नाकर्तेपणाचं फलित आहे, असं वाटत नाही का? कलमाडींना कोणी निवडून दिलं? राजांना कोणी निवडून दिलं? त्यांना मतं दिलेल्यांनी त्यांना निवडलं आहे, असं आपल्याला वाटत असेल, तर तो मोठ्ठा गैरसमज आहे. मतदान न केलेल्यांनी त्यांना लोकसभेवर पाठवलंय. केलेल्यांनी नव्हे!!!
--------------
आणखी एक प्रश्न... अण्णांना ज्यांचा पाठिंबा आहे, त्यांच्यापैकी, ती जणांनी जन लोकपाल विधेयकाचा मसुदा आणि लोकपाल विधेयकाचा मसुदा यांचा अभ्यास केला आहे? अभ्यास जाऊ दे, ती फार लांबची गोष्ट आहे. किती जणांनी या मसुद्यांचं फ्रंट कव्हर प्रत्यक्ष हातात घेऊन पाहिलंय? घरी राहून पाठिंबा देणारेही राहू द्या... रस्त्यावर उतरलेल्यांपैकी किती जणांनी ते पाहिलंय?
इथं एक स्पष्टिकरण केलं पाहिजे. मी कोणताही मसुदा पाहिलेला नाही. त्याचा अभ्यास ही तर डोक्यावरून जाणारी गोष्ट झाली... पण मला तशी गरज वाटत नाही. कारण मी अण्णांचं अंधानुकरण करत नाहीये. पण जे अण्णा-अनुयायी आहेत, त्यांनी तरी ते पाहिलेलं असावं, अशी अपेक्षा आहे... मला खात्री आहे, की यातल्या फार थोड्या लोकांनी हे पाहिलं असणार... पण मग रस्त्यांवर इतकी गर्दी का? रामलीला मैदान पॅक का झालंय?
माझ्या मते, देशभरातल्या रस्त्या-रस्त्यांवर व्यक्त होतोय, तो बोकाळलेल्या भ्रष्टाचाराविषयीचा संताप... या संतापाचं प्रकटीकरण आपण अण्णांना असलेला पाठिंबा मानतो आहोत... पण अण्णांच्या निमित्तानं का होईना, देशात एक मंथन होतंय, ही चांगली बाब आहे. अण्णांच्या  (आरटीआय वगळता) भूतकाळातील आंदोलनांसारखी याची गत होऊ नये, ही प्रामाणिक इच्छा आहे. या निमित्तानं अर्धा भारत जरी जागृत झाला, तरी आपल्याला महासत्ता होण्यापासून कोणी अडवूच शकणार नाही... या आंदोलनाची परिणती काही का असेना, ते कोणत्याही भल्या-बु-या कारणानं अर्धवट राहू नये, ही माझ्यासह सर्वांना शुभेच्छा...

--------------

Sunday 15 May 2011

सेंट पर्सेंट बालगंधर्व...

सर्वप्रथम नितीन देसाई आणि त्यांच्या टीमचे आभार... बालगंधर्व केवळ पुण्यातल्या रंगमंदिरातील चित्रात पाहिलेल्यांना त्यांचं दर्शन घडवून आणल्याबद्दल...

आज बालगंधर्व हा चित्रपट पाहिला आणि पाहिला नसता तर आपण काय गमावलं असतं, याची सर्वप्रथम जाणीव झाली. एकतर बालगंधर्वांसारख्या ज्येष्ठतम रंगकर्मीच्या आयुष्याची ही कथा. त्यामुळे त्यात 'नाट्य' असणार, यात नवल ते काय? पण हे नाट्य ज्या खुबीनं पडद्यावर आलंय, त्याला तोड नाही. स्वतः चित्रपटांचे क्षेत्र न पटलेल्या बालगंधर्वांना यापेक्षा वेगळी श्रद्धांजली असूच शकत नाही. दैवाने (सु की दुर् हे पाहणा-याच्या दृष्टीकोनावर आहे... माझ्या दृष्टीने सु) मी टीव्ही माध्यमात काम केलं असल्यामुळे कोणत्याही हालत्या चित्रांकडे पाहण्याचा अँगल आपोआप वेगळा झाला आहे. कॅमेरा, एडिटिंग, लाईट यासारख्या गोष्टींकडे अन्यथा लक्ष जाण्याचं फारसं कारण नाही. त्यामुळेच अनेक चित्रपट त्यांच्यातल्या तांत्रिक दोशांमुळे आवडत नाहीत. बालगंधर्व मात्र याला सन्मान्य अपवाद ठरला याचा खूप आनंद वाटला...
०००००००००००००००००००००
मला भावलेला बालगंधर्व माझ्या ब्लॉग वाचकांसाठी थोडक्यात... अर्थात सर्वाधिक भावलेल्या पैलूंच्या चढत्या क्रमाने...
१. कथा - कथा आवडणारच होती, कारण ती बालगंधर्वांची होती.
२. पटकथा - बालगंधर्वांच्या आयुष्यातले चढ-उतार आणि त्यातलं नाट्य अत्यंत प्रभावीपणे मांडलं गेलं आहे. कोणताही संवाद किंवा एखादा शॉट हा ऊगीचच आहे, हा सीन नसता तर चाललं असतं, असं एकदाही वाटलं नाही. त्यामुळेच कथेपेक्षा जास्त पटकथा भावली.
३.छायाचित्रण (सिनेमॅटोग्राफी) - मराठी चित्रपटांमध्ये आभावानं आढळणारा हा गुण बालगंधर्वमध्ये दिसतो. अगदी पहिल्या शॉटपासून ते शेवटी मावळत्या सूर्याला सामोरे जाणा-या बालगंधर्वांपर्यंत... प्रत्येक ठिकाणी कॅमे-याचा अँगल, त्याचं फ्रेमिंग अतिशय अचुक झालं आहे. मराठी चित्रपटातही हे होऊ शकतं, याचं उदाहरण बालगंधर्वनं घालून दिलं आहे. ५. संकलन (एडिटिंग) - चांगल्या कॅमेरावर्कला चांगल्या एडिटिंगची साथ मिळाली, तर काय होऊ शकतं याचा पाठ बालगंधर्वमध्ये दिसतो. इफेक्ट्सचा भडीमार न करता केलेलं एडिटिंगही चांगलंच असतं, हे या चित्रपटानं दाखवून दिलं आहे. मध्यंतर होतानाचा शॉट हा एडिटिंगचा परमोच्च बिंदू ठरावा. बालगंधर्व पावसात भिजत जात आहेत... रस्त्यावर साचलेल्या पाण्यात पडलेल्या चंद्राचं प्रतिबिंब त्यांच्या पायानं मोडतं... पाणी परत स्थिरावत असताना मध्यंतर ही अक्षरं येतात आणि त्यातील ध्य वर असलेला अनुस्वार हा सूर्याचं प्रतिबिंब असतं... क्लासिक. जस्ट क्लासिक. (शब्दांत वर्णन करता येणं अशक्य आहे... बघायलाच हवा असा हा शॉट आहे.)
५. संगीत - कौशल इनामदार यांनी केलेला शास्त्रीय संगीताचा वापर हे एक कारण आहेच... शिवाय चित्रपटात जागोजागी पेरलेली बालगंधर्वांच्या नाटकातली पदंही गोड वाटतात. आर्या आंबेकरच्या पहिल्या बंदिशीसह सगळीच पदं-गाणी मस्त जमली आहेत. ऐकायला जाम मजा आली. राहुल देशपांडे केशवराव भोळेंच्या भूमिकेत भाव खाऊन गेले आहेत...
६. कलाकार - विभावरी देशपांडे यांनी लक्ष्मीबाई मस्त केली आहे. डाऊन टू अर्थ, सोशिक आणि तरीही कणखर...  लहानशा भूमिकांमध्येही आपल्याला प्राण ओतलेला दिसतो. अथर्व कर्वेच्या बाल नारायणापासून निर्माते नितीन देसाई यांच्या लोकमान्य टिळकांपर्यंत... प्रत्येकाचं काम मस्त आहे. सर्वांनी आपापला 'रोल' सॉलिड ताकदीनं केला आहे. कलाकारांच्या सहज अभिनयामुळे वरच्या सर्व गोष्टींना महत्त्व आहे.... मुळात ऐतिहासिक कथानक असल्यामुळे पाहुण्या कलाकारांचा प्रचंड राबता असतानाही प्रत्येक भूमिकेवर बारीक काम आणि प्रचंड मेहनत घेतल्याचे दिसतं. म्हणूनच चित्रपटाच्या श्रेय्यनामांची चढती भाजणी लावताना दुस-या क्रमांकाचा मान हा चित्रपटातल्या कलाकारांकडे जातो.
आणि
७. सुबोध भावे - काय दिसतो सुबोध या सिनेमात... भन्नाट! चित्रपटातला सुबोधनं साकारलेला बालगंधर्व बघत असताना मला पुलंच्या हंड्रेड पर्टेंट पेस्तनकाकांची आठवण आली... 'विष्णुपंत पागनीस म्हणजे सेंट पर्सेंट तुकाराम... खरा तुकाराम बी असा नाय....' हे पेस्तनकाकांचं वाक्य 'सुबोध भावे म्हणजे सेंट पर्सेंट बांलगंधर्व... खरा बालगंधर्व बी असा नाय...' असं नावं बदलून टाकलं, तरी चालेल. कारण पेस्तनकाकांनी खरा तुकाराम आणि आम्ही खरा बालगंधर्व पाहिलेलाच नाही! त्यामुळे यापुढे बालगंधर्वांबाबत काही वाचण्या-ऐकण्यात आलं, तर डोळ्यासमोर सुबोध दिसणार! सेंट पर्सेंट बालगंधर्व...
सुबोधनं अतिशय साध्या पद्धतीनं बालगंधर्वांचं बेअरिंग घेतलं आहे. धोतर-सदरा घातलेला सुबोध आणि भरजारी शालू नेसलेला सुबोध, या दोन स्वतंत्र व्यक्ती आहेत... त्याच्या अभिनयात कुठेही भडकपणा नाही. (तसा मला तो धोबीपछाड वगळता अन्यत्र कुठेही दिसलेला नाही म्हणा.) लुगडं नेसल्यानंतर थेट बालगंधर्वांच्या शैलीत खांदा किंचित खाली पाडून उभं राहणा-या सुबोधच्या अभिनयातले बारकावे मनाला भावले. सुबोध... चित्रपटाच्या यशाचे मानकरी ठरवताना पहिल्या क्रमांकाचा मान तुलाच द्यायला हवा... तो तुझाच अधिकार आहे...
००००००००००००००००००
हरिश्चंद्राची फॅक्टरी, नटरंग आणि आता बालगंधर्व... मनोरंजनाच्या तीन भिन्न क्षेत्रांशी जुळलेले हे तीन छान चित्रपट. नंदू माधव यांचा फाळके, अतुल कुलकर्णीचा गुणा आणि सुबोधचा बालगंधर्व... तुलना होऊच शकत नाही. तीन्ही भूमिका वेगळ्या धाटणीच्या आणि तितक्यात ताकदीने पेललेल्या. आता आपल्या मालकीचा ब्लॉग असल्यामुळे जाता-जाता एक इच्छा व्यक्त करायला हरकत नाही. ही बायोग्राफीची मालिका खंडित होऊ नये, असं वाटतंय... आणि पुढला नंबर दादा कोंडकेंचा लागला, तर फारच मजा येईल. एकाद्या निर्मात्या-दिग्दर्शकाच्या मनातही माझ्यासारखीच ही कल्पना घोळत असेल का? असावी, असं मनापासून वाटतंय....

Wednesday 4 May 2011

कोणी बनवेल का हा कीबोर्ड?

बराक ओबामा यांच्या आदेशावरून अमेरिकन सैनिकांनी पाकिस्तानात घुसून ओसामा बिन लादेनचा खात्मा केला. याची ब्रेकिंग न्यूज देण्याच्या भानगडीत अनेक चॅनल्स आणि खूप देण्याच्या भानगडीत वर्तमानपत्रांचा थोडा गोंधळच झाला. ओबामा आणि ओसामा यांच्या नावातील साधर्म्यामुळे काहींनी ओबामांचाच 'एन्काऊंटर' केला. एव्हाना फेसबुकवर त्याच्या अनेक क्लिप्स आणि फोटो पडले आहेत... त्यामुळे हा गोंधळ टाळण्यासाठी खास पत्रकारांकरता एखाद्या कंपनीनं कीबोर्ड तयार करावा, असं वाटतंय. डिझाईनिंगमध्ये कंपनीचा वेळ जाऊ नये, यासाठी मी फोटोशॉपवर डिझाईन तयार केलंय...  इच्छुक कंपन्यांनी कॉपिराईट मिळवण्यासाठी संपर्क साधावा...

Wednesday 27 April 2011

एक नल्ला प्रेस कॉन्फरन्स...

पत्रकार परिषद म्हणजे जिथं पत्रकारांचा एखाद्या मोठ्या व्यक्तीशी किंवा महत्त्वाच्या घटनेबाबत कोणाशीतरी सार्वजनिक संवाद होतो तो कार्यक्रम अशी माझी आजवरची समजूत होती. मात्र आज ही समजूत खोटी असल्याचं माझ्या लक्षात आलंय...
मी आज एका 'पत्रकार परिषदे'ला गेलो होतो. रीबॉक या जोडे बनवणा-या कंपनीनं आपले ब्रॅण्ड ऍम्बेसिडर असलेल्या क्रिकेटपटूंचा सत्कार आयोजित केला होता. त्या निमित्त ही तथाकथित पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. खेळाडूही कोणी छोटे नव्हते. कर्णधार धोनी, युवराज, भज्जी, युसूफभाई आणि पियुष चावला या विश्वविजेत्या संघातल्या खेळाडूंचा हा सत्कार होता... पण म्हणजे इव्हेंट तसा मोठाच होता... त्यात वाद नाही. पण त्याला पत्रकार परिषद म्हणून आयोजकांचं जरा चुक्याच... ही निमंत्रणपत्रिका बघा... त्यात चक्क लिहिलंय प्रेस कॉन्फरन्स आहे असं...



आता त्या 'प्रेस कॉन्फरन्स'चं थोडक्यात वर्णन -
साडेचारची पी.सी. आहे, असं निमंत्रणपत्रिकेत आहे ना... तर भारतीय प्रमाणवेळेनुसार बरोब्बर ४.५० वाजता कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रमाचा अँकर स्टेजवर आला (हो... पत्रकार परिषदेसाठी सजवलेलं स्टेज होतं...) आणि त्यानं कार्यक्रमाचा उद्देश-बिद्देश सांगणारं प्रास्ताविक केलं. त्यानंतर एकेक करून पियुष चावलापासून ते धोनीपर्यंत सगळ्यांना बोलावलं. रीबॉकच्या भारतातल्या एमडीला पण बोलावलं (हा एमडी सगळ्यात उंच बार चेअरवर बसला होता... धोनी आणि युवी त्याच्या बाजुला. मधला स्टंप तेवढा उंच होता.) त्यानंतर या अँकरनं त्या एमडीला दोन-तीन प्रश्न विचारले. त्यानंतर धोनीला, मग युवीला, मग भज्जीला, मग युसूफ पठाणला (कार्यक्रमातला एकमेव हिंदी संवाद) आणि शेवटी पियुषला.... यातला दुसरा प्रश्न कायम होता... 'संघाच्या फिटनेसमुळे हा विजय मिळवणं शक्य झालं आहे... या फिटनेसचा राज (हिंदीतला) काय?' त्याला या पाचही जणांनी उत्तर दिलं 'रीबॉकच्या नव्या अमक्या-अमक्या ब्रॅण्डमुळे आमचा फिटनेस टिकून राहिला....'
होय.... दचकू नका... खरंच त्यांनी सांगितलं 'रीबॉकच्या नव्या अमक्या-अमक्या ब्रॅण्डमुळे आमचा फिटनेस टिकून राहिला....'
आता मला सांगा बुटाचा आणि फिटनेसचा काही संबंध आहे का? रीबॉकचे ब्रॅण्ड ऍम्बेसिडर झालात म्हणजे काय वाट्टेल ते सांगाल काय... पण असो. मी म्हटलं असे ना का... आपलं काय जातंय... त्यांना पैसे मिळतात हे बोलायचे, म्हणून बोलले असतील.
ही लुटूपुटूची प्रश्नोत्तरं झाल्यावर मग त्या एमडी साहेबांनी सगळ्यांना सोन्याचा मुलामा दिलेल्या बॅट वाटल्या... हे चालू असताना फोटोग्राफर आणि कॅमेरामेनची नैमित्तिक धक्काबुक्की झालीच. त्यात विशेष काही नाही... मग एक अनंत काळ चालणारं फोटोसेशन झालं या पाच जणांचं सोनेरी बॅटी हातात पकडून... एकदाचं ते फोटो सेशन संपल्यावर तो अँकर म्हणाला आल्याबद्दल धन्यवाद आता नाश्ता करा आणि घरी जा.... ते सहा जण (म्हणजे पाच क्रिकेटर आणि सहावा एमडी) मागल्या बाजूनं कुठेतरी अदृष्य झाले.... झाली प्रेस कॉन्फरन्स....

आता शब्दशः विचार करायचा म्हटला तर त्यांनी बॅटी दिलेल्या विटनेस करण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स आहे, असं निमंत्रण पत्रिकेत म्हटलंय. त्यामुळे शाब्दिक च्छल करायचा तर हे तांत्रिकदृष्ट्या अगदी बरोबर आहे. पण मग मुंबईभरच्या स्पोर्ट्स रिपोर्टर्सना तिथं जायची काय गरज होती? (मी स्पोर्ट्स रिपोर्टर नसलो तरी क्रिकेटमध्ये आवड असलेला पत्रकार असल्यानं वैयक्तिक खाज म्हणून तिथं गेलो होतो.) माझ्या मनात काही प्रश्न होते. ते विचारायचे होते. तिथं अनेक पेपर आणि चॅनल्सचे क्रीडा प्रतिनिधी आले होते. ते हा सोहळा पाहण्यासाठी निश्चित आले नसणार. त्यांच्या मनातही माझ्यासारखेच अनेक प्रश्न असणार. वर्ल्डकप जिंकल्यानंतर धोनीची पत्रकार परिषद झाली होती की नाही ठाऊक नाही... पण त्यानंतर आणि आयपीएल सुरू असताना मिळालेली ही चांगली संधी होती. पण आयोजनातील त्रुटीमुळे ती संधी मिळूच शकली नाही... आता ही नल्ला पत्रकार परिषद आयोजित करणा-या परफेक्ट रिलेशन्सचं पाच स्टार्सच्या वेळीची बचत करून रीबॉकशी रिलेशन परफेक्ट झालं असलं, तरी माझ्यासारख्याच्या मनात मात्र हे रिलेशन गढूळ झालं आहे. असा पीआर काय कामाचा? पण कदाचित हाच सध्याचा ट्रेण्ड असावा... माझी अवस्था मात्र कानाखाली 'बुट' मारल्यासारखी झाली, हे सांगायला नको...


ता.क. : मुंबईतल्या पत्रकारांना रीबॉक आणि परफेक्ट रिलेशन्सवाल्यांनी बॅटी देताना टाळ्या वाजवण्यासाठी बोलावलं असेल, तर ती सगळ्यात मोठी चूक म्हणावी लागेल... कारण पत्रकारांइतकं टाळ्या वाजवण्यात कंजुषी करणारं दुसरं कोणीही माझ्या पाहण्यात नाही...


Tuesday 5 April 2011

नाही विसरू शकत हा दिवस...

२५ जून ८३ : आमच्या कल्याणच्या दोन खोल्यांच्या चाळीतील बाहेरची खोली (त्याला तेव्हा हॉलच म्हणायचो, पण तीच गेस्ट रूम, तीच बेडरूम होती.) चाळीत २-३ टीव्ही होते. त्यातला एक चक्क आमच्याकडे. ब्लॅक अॅण्ड व्हाईट. माझं वय तेव्हा फक्त ८-९ वर्षं... क्रिकेट समजणं तर दूरच पण क्रिकेट म्हणताही यायचं नाही धड, इतकं कमी. पण आमच्या घरात चाळीतले बरेच जण आणि ठरवून मॅच बघण्यासाठी आलेले माझ्या बाबांचे मित्र अशी तोबा गर्दी अजून आठवते आहे... शेवटी एका राक्षसासारख्या दिसणा-या माणसाला कोणीतरी आऊट (?) केलं आणि आमच्या घरात एकच गोंधळ माजला, तो आठवतोय... चाळीतल्या जिन्यात वात सोलून फोडलेली लालमहाल डामरी आठवतेय... या आठवणी धूसर आहेत, पण त्या शेवटपर्यंत कायम राहणार आहेत...
--------------

२ एप्रिल २०११ : वानखेडे स्टेडियम... या ठिकाणी एक इतिहास रचला गेला. माझ्या, आपल्या सर्वांच्या लाडक्या सचिनसाठी, पूर्ण न झालेलं त्याचं एकमेव स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळ्या भारतीय संघानं प्राण पणाला लावले आणि भारत पुन्हा एकदा विश्वविजेता झाला... या इतिहासाचा जवळून साक्षीदार होण्याची संधी मला मिळाली... जवळून म्हणजे... थेट वानखेडे स्टेडियममधून... आणि गमतीची गोष्ट म्हणजे मी स्टेडियममध्ये बसून पहिल्यांदाच मॅच बघत होतो...  


खरं तर फायनलचं तिकिट मिळवण्यासाठी अनेक जण (अगदी आमदार, मंत्र्यांपासून अनेक जण) जीवाचा आटापिटा करत असताना माझ्या झोळीत मात्र या तिकीटाचं दान आपसूक येऊन पडलं. त्याचं झालं असं, की मला मोहालीच्या इंडो-पाक सेमिफायनलला सुटी हवी होती. आमचे बॉस चंद्रशेखर (चंदू) कुलकर्णी ऊर्फ सीके यांनाही हवी होती... ते क्रिकेटचे माझ्याइतकेच, किंबहुना माझ्यापेक्षा जास्त, चाहते. त्यांनी मला माझी सुटी रद्द करण्याची ‘विनंती’ (हो विनंतीच... असा बॉस सगळ्यांना मिळावा, ही ईश्वराचरणी प्रार्थना) केली आणि त्याची भरपाई म्हणून मला चक्क फायनलचा एक पास मिळवून दिला... मोहालीत पाकिस्तानला हरवून भारत फायनलला आल्यावर तर या पासचं महत्त्व किती पटींनी वाढलं, ते सांगायला नको...
माझ्या बाजूची सीट जय सावंत या सीकेंच्या मित्राची असल्याचं समजल्यावर त्यांना फोन केला आणि सीएसटीला भेटायचं ठरलं... २ तारखेला ११ वाजता सीएसटीला पोहोचलो... पाचच मिनिटांत जय सावंतही तिथं आले. त्यानंतर चालतच वानखेडे स्टेडियम गाठलं. सुदैवानं आमच्या ५ क्रमांकाच्या गेटवर गर्दी नव्हती. त्यामुळे ५ मिनिटांत रांगेतून पुढे सरकत पहिल्या सिक्युरिटी चेकपाशी आलो. त्यानंतर पाच-सहा ठिकाणी संपूर्ण तपासणी केली गेली. (त्यात काहीही वावगं वाटलं नाही... सुरक्षेच्या दृष्टीनं जे योग्य आहे, तेच केलं गेलं, अशी भावना होती... त्यामुळे दर वेळी सगळे खिसे रिकामे करून दाखवताना, मोबाईल अनलॉक करून दाखवताना, पाकिट उघडून दाखवताना अजिबात त्रास वाटला नाही...) अखेरीस शेवटचा सिक्युरिटी पोस्ट पार केल्यानंतर स्टेडियमवर पोहोचलो. तिथंच या मॅचचं स्मृतीचिन्हं म्हणून एका ऑफिशियल शॉपमधून तब्बल ४०० रुपयांची निळी कॅप खरेदी केली. (खेळाडू वापरतात ती ऑफीशियल कॅप... यापुढे ही कॅप डोक्याला लावायची हिम्मत होणे नाही... या मॅचची आठवण म्हणून ती कायम जवळ असेल...) सीट शोधून जागेवर पोहोचलो, तेव्हा फक्त साडेअकरा झाले होते. टॉस व्हायला अडीच तास आणि मॅच सुरू व्हायला तीन तास होते... मधल्या काळात फोनवर गप्पा, थोडंफार चॅटिंग (नेटवर्क जाम होतं... त्यामुळे खरंतर थोडंच चॅटिंग, फार नव्हे!) असं करत वेळ काढला. आम्ही गेलो तेव्हा जवळजवळ रिकामं असलेलं स्टेडियम अवघ्या दीड तासात संपूर्ण पॅक... डोळ्यासमोर चित्र बदललं. सगळीकडे निळे टीशर्ट, अनेकांच्या हातात किंवा खांद्यावर पांघरलेला तिरंगा, चित्रविचित्र टोप्या यामुळे माहोल तयार होत होता... साधारण दीडच्या सुमारास दोन्ही संघ वॉर्मअपसाठी मैदानात आले आणि एकच गोंधळ सुरू झाला... त्यात मग एखादा कॉमेंटटेटर किंवा जुना खेळाडू मैदानात आला तर हा गोंधळ वाढायचा... फिल्डिंगची प्रॅक्टिस करताना सेहवाग किंवा रैना बाऊंड्री लाईनजवळ आले, की तिथं बसलेल्या प्रेक्षकांमधून जोरदार जल्लोष व्हायचा...
अखेरीस कधी कंटाळवाणी-कधी धमाल करणारी ही प्रतिक्षा संपली आणि टॉससाठी धोनी आणि संगकारा मैदानात आले. स्टेडियम अचानक शांत झालं... पण टॉस होत असल्याची घोषणा होताच इतका जल्लोष सुरू झाला की धोनीनं नाणं हवेत फेकल्यानंतर संगकारा हेड्स म्हणाला की टेल्स हे कोणालाच ऐकू गेलं नाही. अखेरीस टॉस पुन्हा करावा लागला. यावेळी संगकारा गर्दीच्या वर आवाज चढवून ओरडला आणि टॉस जिंकला... त्यानं बॅटिंग घेतल्यावर स्टेडियममध्ये थोडं नैराश्य पसरलं... कारण आपल्या लाडक्या सचिनची बॅटिंग बघण्यासाठी आता मुंबईकरांना ५० षटकांची किंवा ४ तासांची प्रतीक्षा करावी लागणार होती. पुढला अर्धा तास कधी गेला समजलंच नाही... त्यानंतर श्रीलंकेच्या संथ फलंदाजीनं बोअर केलं... विकेट गेल्यावर तेवढ्यापुरता जल्लोष व्हायचा, पुन्हा शांतता... असं सुरू होतं. शेवटच्या सात ओव्हर्समध्ये लंकन फलंदाजांनी केलेली फटकवा-फटकवी तेवढी नयनरम्य होती. मुंबईच्या क्रिकेटवेड्या गर्दीचं क्रिकेट-ज्ञान आणि त्याची जाणही तितकीच चांगली आहे, याचा प्रत्यय यावेळी आला. जयवर्धनेच्या शतकानंतर सगळ्या स्टेडियमनं उभं राहून टाळ्या वाजवल्या... त्याच्या प्रत्येक चांगल्या फटक्याचं यथोचित कौतुक केलं... अखेरीस आधी कंटाळवाणी आणि नंतर धुंवांधार झालेली लंकेची ५० षटकं संपली...
नंतरचे ४ तास खरी धम्माल येणार होती... पण त्याबाबत लिहिण्याआधी थोडं मनातलं... क्रिकेटला भारतात धर्म का म्हणतात, ते यावेळी समजलं... तसा मी ही मॅच बघायला एकटाच गेलो होतो. जय सावंत सोबत होते, पण आमची ओळखच मुळी ३ तासांची... आम्हाला एका बंधनात बांधणारी गोष्ट म्हणजे क्रिकेट आणि सचिन... माझ्या डावीकडच्या सीटवर एक जोडपं होतं... बहुदा पारशी असावं... मला त्यांचं आणि त्यांना माझं नावही ठाऊन नाही... तशी गरजही नव्हती. त्यांचं क्रिकेटवर प्रेम होतं... माझंही... बस्स. आम्हाला हे पुरेसं होतं. ‘त्या’ दोघांमधल्या ‘तो’ला क्रिकेट नीट समजत होतं. ‘ती’ला मात्र नाही... पण अडत काहीच नव्हतं... समोर जे घडत होतं, घडणार होतं ते विलक्षणच होतं. तिला एखादी गोष्ट समजली नाही, तर तो सांगत होता... क्रिकेटची भाषा समजावून देत होता. दोघंही मस्त एन्जॉय करत होते. नुकतीच ओळख झालेले जय सावंत, ‘तो’ आणि ‘ती’ आणि सगळ्या स्टेडियममधले ३१ हजार क्रिकेटवेडे... आमची शरीरं वेगवेगळी असली, तरी मनं मात्र एकच होती... आपल्या शरीरातले जसे सगळे अवयव समन्वयानं काम करतात, तसंच हेदेखील होतं... म्हणूनच एखाद्या ठिकाणी ‘मॅक्सिकन वेव्ह’ सुरू झाली की ती लाट आपोआप पसरायची... दोन हात, दोन पाय, दोन डोळे यांनी एकत्रितपणे काम करावं तशी... यापूर्वी क्रिकेट किंवा फुटबॉलची मॅच बघताना प्रश्न पडायचा की ही मॅक्सिकन वेव्ह इतकी अचूक कशी होते... लोकांना समजतं कसं की आपण कधी उभं रहायचंय आणि ओरडायचंय ते... त्या दिवशी समजलं की हे फार कठीण नाही. दोन्ही हातांनी मिळून टाईपिंग करावं, इतकं ते सोपं आहे... असो... आता अविस्मरणीयात अविस्मरणीय शेवटच्या चार तासांविषयी...
सचिन-विरू मैदानावर आले तेव्हा प्रचंड टाळ्यांमध्ये त्यांचं स्वागत केलं. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. मलिंगाच्या दुस-याच चेंडूवर सेहवाग पायचित झाला आणि त्यानं (गरज नसताना) रिव्ह्यू मागितला. स्टेडियमवर लावलेल्या लाऊडस्पिकरमधून ‘धड... धड... धड... धड...’ असा ठोका सुरू झाला होताच... पण हा आवाज दबवून टाकेल, असे ठोके आतमध्ये पडत होते... शेवटी होऊ नये तेच झालं. सेहवाग आऊट झाला. त्यानंतरही सचिननं धावांचा ओघ कायम ठेवला. त्याचा प्रत्येक चौकार आणि त्यानं घेतलेली प्रत्येक एकेरी धावही विजयाच्या उन्मादानं साजरी होत होती... पण थोड्या वेळातच स्टेडियमनं ‘पिन ड्रॉप सायलेन्स’ अनुभवला... या खेळपट्टीवर दुर्मिळ असलेला स्विंग मलिंगाच्या चेंडूला मिळाला आणि सचिनच्या बॅटची कड घेऊन चेंडू संगकाराच्या ग्लोव्जमध्ये विसावला... प्रेक्षकांमध्ये स्मशानशांतता... ३-४ ठिकाणी श्रीलंकन फॅन्सची काही पॉकेट्स होती... तिथूनच काय आवाज येत असेल तो!
हा आणि यानंतरचा सर्व घटनाक्रम इतिहासाच्या पुस्तकात बंदिस्त झाला आहे... भारतीय फलंदाजांनी काढलेली प्रत्येक धाव आम्ही सेलिब्रेट करत होतो... अगदी लंकेच्या गोलंदाजांनी टाकलेले वाईड बॉलही... प्रत्येक धावेचं स्वागत जोरदारा टाळ्या, शिट्या, पिपाण्या फुंकून केलं जात होतं... धोनी-गंभीरची चांगली भागिदारी झाल्यानंतर सामना आपल्या हातात आला आहे, असं सगळ्या स्टेडियमला वाटू लागलं होतंच... त्यात ३० बॉलमध्ये ३० धावा हव्या असताना या ‘वाटण्याचं’ खात्रीत रुपांतर झालं आणि स्टेडियममध्ये विजयाचा जल्लोषच सुरू झाला. प्रत्येक धावेगणिक हा जल्लोष कितीतरी पटींनी वाढत होता... सहा धावा हव्या असताना मैदानात ‘वुई वॉंट सिक्सर’चा नाद सुरू झाला... ३१ हजार लोक एकमुखानं ही मागणी करत होते. पण तेव्हा तसं काही झालं नाही... दोन धावा निघाल्या गेल्या... पण मागणी सुरू होतीच... वुई वॉंट सिक्सर... वुई वॉंट सिक्सर... शेवटी ‘प्रेक्षकांसाठी खेळू नका... संघासाठी खेळा...’ असा उचित सल्ला आपल्या संघाला देणा-या माहीला ही मागणी फेटाळणं जड गेलं असावं... ४ धावांची आवश्यकता असताना त्यानं पुढे येऊन एक उत्तुंग फटका मारला... स्टेडियम क्षणाचा १००० भाग स्तब्ध झालं... माही पुढे आलाय... त्याच्या बॅटचा इम्पॅक्ट व्यवस्थित झालाय... ‘टॉक’ असा आवाज स्टेडियमभर घुमलाय... पण चेंडू जातोय कुठे... तिथं फिल्डर तर दिसत नाही... चेंडू फार उंच उडाला असेल, तर.... फिल्डर तिथपर्यंत पोहोचला तर... इतके सगळे विचार ३१ हजार मनांमध्ये सेकंदाच्या १०००व्या भागात येऊन गेले... त्या काळात पसरलेली भयाण शांतता ही वादळापूर्वीची होती... माहीनं मारलेला फटका अचूक आहे, हे या काही क्षणांत लक्षात आलं आणि मग जो जल्लोष झाला तो आयुष्यात विसरता येणं शक्य नाही... विसरूच शकत नाही... विसरायची इच्छाही नाही...
सचिननं बघितलेलं स्वप्न साकार झालं होतं... धोनी-युवराजनं त्याला आणि देशाला दिलेला शब्द पाळला होता... अशा वेळी डोळ्यांवर बांध घालणं अशक्यच... घरी असताना कदाचित डोळे किंचित ओलावले असते पण वाहिले मात्र नसते... प्रत्यक्ष समोर हा सोहळा बघताना आनंदाश्रू थांबवावेत कसे? अशक्यच... मैदानावर असलेल्या स्क्रीनवर ‘वर्ल्ड चॅम्पियन - इंडिया’ हे शब्द उमटले... त्यातला तिरंगा दिसला आणि हा बांध फुटला... यात तिथं हजर असलेल्या कोणालाच काही वावगं वाटायची शक्यता नव्हती... सगळ्यांची अवस्था तीच होती... मैदानात फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली... पण या आतषबाजीला लाजवतील असे फटाके मनात फुटत होते... अजूनही फुटतायत... आयुष्यभर या फटाक्यांचा प्रतिध्वनी मनात रुंजी घालत राहणार आहे...
ती टीम इंडियाची कॅप आणि ते तिकिट आयुष्यभर जपून ठेवायचंय... आपण या इतिहासाचे साक्षीदार होतो, याचा पुरावा म्हणून नव्हे... ही आठवण कायम ताजी रहावी म्हणूनही नव्हे... हे १२ तास मनावर कायमचे कोरले गेलेच आहेत... या गोष्टी कायम जपून ठेवण्याचं एकच कारण आहे... कदाचित कोणत्याही क्षणी आपल्याला जाग येईल... आपण वानखेडे स्टेडियमच्या नॉर्थ स्टॅण्डमध्ये बसून धोनीचा विजयी षटकार बघत आहोत, हे रम्य स्वप्न संपेल... त्यावेळी कपाटातून तिकिट बाहेर काढायचं... कॅप डोक्यावर चढवायची... आरशात स्वतःला बघायचं... हे स्वप्न नाही... सत्य आहे, याची खात्री पटली की पुन्हा या (माझ्यासाठी) अनमोल वस्तू जागच्या जागी ठेवायच्या... आणि पुन्हा नव्यानं हेच स्वप्न पाहण्यासाठी निद्रादेवीची आराधना सुरू करायची...

 
 


Monday 21 February 2011

भीऊ नका...

स्थळ : मलबार हिल. उपमुख्यमंत्र्यांचे निवासस्थान.
पात्रे : उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि अन्य मंत्री.
वेळ : अर्थात रात्रीची. निवांत.

उपमुख्यमंत्री (उमं) - काय भिता राव... १५-२० हजार रुपयांची भीक महिन्याच्या महिन्याला घेणारी पोरं ती... त्यांना काय घाबरायचं!
बांधकाम मंत्री (बांमं) - मी कुठं घाबरलोय?
उमं - मग... काल काय म्हणालात... मला तुमची भीती वाटते म्हणून...
बांमं - ते असंच हो... मला कॉमेडी करायची सवय आहे ना... त्याचाच परिणाम.
उमं - यांना खरंतर फटके मारले पाहिजेत. मी मागे म्हणालेलो ते उगीच नाही. पण त्यावरून पण गोंधळ घातला. आता तुम्ही भीती वाटते म्हणाल्यावर तुमच्या मागे लागतील बघा हे लोक...
बांमं - होय की... ते लक्षात नाही आलं माझ्या... फार गोंधळ झाला तर सांगून टाकीन की मी असं बोललोच नव्हतो...
उमं - टीव्हीवर दिसलात तुम्ही तसं बोलताना... आता कसं म्हणणार?
बांमं - बस का धाकटे साहेब... तुम्ही नाही का तेच केलंत. आधी फटके मारा म्हणालात... आपल्या कार्यकर्त्यांनी मारलेदेखील... मग म्हणालात मी असं बोललोच नाही... माफी पण नाही मागितलीत. शेवटी थोरल्या साहेबांना सॉरी म्हणावं लागलं त्या भिकारड्यांना... तुमचा संपलाय... ग्लास भरू का?
उमं - हो.. मी भरतो... आपण आजपर्यंत कोणाची माफी मागितली नाही.. आणि या दिडदमडीच्या लोकांना सॉरी म्हणू काय मी... काकाच म्हणाले, तू गप्प बस मी काय ते बघतो. त्यांनी मस्त गप्प केलं पण त्यांना. सगळे लाईनीवर आले...
बांमं - आता पुन्हा माझ्यामुळे गोंधळ झाला तर बघतील का साहेब?
उमं - माहिती नाही बुवा... विचारावं लागेल. बघुयात काय होतंय ते...
बांमं - तुम्ही पण कमाल केलीत हां साहेब... सरळ सांगून टाकलंत की आपण टगे आहोत म्हणून...
उमं - आहोत तर आहोत...
बांमं - पण निवडणुकीत मतं मागायला जाताना आपण हात जोडून जातो. टग्या कधी हात जोडतो का?
उमं - अरे ते नाटक असतं हो... तुम्हालाही हे माहित्ये... तुमच्या जुन्या पक्षात सगळे टगेच तर होते...
बांमं - हो... पण मतदारांनी सांगितलं की आम्हाला टग्या नको... चांगला नेता पाहिजे. तर?
उमं - कोण भिकार** म्हणतोय असं... फटके मारा रे त्याला.... टग्यांना मतं देत नाही म्हणजे काय? मतदार असला तर घरचा... दंडुक्यानं मारलं पाहिजे *डव्यांना... आण रे दंडूका... एकेकाच्या गां*वर हाणतो... मत देत नाही म्हणजे काय... दिलंच पाहिजे...
बांमं -  (स्वगत) साहेबांना जास्त झाली वाटतं... (प्रकट)  ए... जेवण आण रे... जाऊ दे साहेब... निवडणुकीच्या वेळी बघुयात... तोपर्यंत हे मीडियावाले दंडुका, भीती, टग्या हे सगळं विसरून जातील... त्यांना खोडच आहे ती... नवी बातमी हाती येईपर्यंत पहिलीचा पिच्छा पुरवतात... नवं काही मिळालं की पुढलं पाठ मागचं सपाट... आणि लोकांचं काय... ते तर विसरले पण असतील एव्हाना...
दंडुकेशाही जिंदाबाद.... टगेगिरी जिंदाबाद....

(अशा प्रकारची कुठलीही घटना घडलेली नाही. हा संवाद संपूर्णतः काल्पनिक असू शकतो...)

Friday 18 February 2011

ALL THE BEST....

उद्यापासून वर्ल्डकप सुरू होतोय... काय होणार याची उत्कंठा आणि धाकधुक आपल्या मनात आहे. काय होईल ते होवो... पुढला दीड महिना धम्माल असणार, हे नक्की...

BEST OF LUCK TEAM INDIA...

असंच सहज इंटरनेटवर मिळालेलं एक कार्टून आपल्या मनातल्या भावना मांडणारं...

Thursday 17 February 2011

दोन बातमीदार... टीम एकच की वेगवेगळी?

लेट अस भंकस, डोक्याची मंडई, बातमीदार-सहयोगी बातमीदार हे वृत्तपत्रसृष्टीची काही गुपिते जगजाहीर करणारे जाम प्रसिद्ध झालेले ब्लॉग बंद पडले. पडले की कोणी बंद पाडले, या प्रश्नाची चर्चा पत्रकारांच्या वर्तुळात होतच राहील. यातला डोक्याची मंडई तर कोणी आणि का बंद पाडला, हे जगजाहीर आहे. लेट्स भंकस आणि बातमीदारबाबत मात्र ठोस वृत्त नसलं, तरी काहीतरी मालफंक्शन असल्याचं बोललं जातंय. त्याच वेळी आणखी दोन असेच नवे ब्लॉग पुन्हा एकदा सुरू झालेत.
ब्रेकिंग न्यूज  आणि बातमीदार The Reporter हे दोन ब्लॉग पुन्हा एकदा वृत्तसृष्टीतील गमतीजमती घेऊन सादर झाले आहेत.
यातला दुसरा ब्लॉग हा अधिक काळजीपूर्वक तयार करण्यात आल्याचं दिसतंय. आशिष चांदोरकर या माझ्या मित्रानं या ब्लॉगची सखोल माहिती दिल्यामुळे ते पुन्हा देण्याचं टाळतोय. इच्छुकांनी इथं क्लिक करावं, म्हणजे त्याची माहितीपूर्ण पोस्ट वाचता येईल.
ब्रेकिंग न्यूज हा ब्लॉग मात्र मुंबईतल्याच कोणीतरी, मुंबईतच सुरू केल्याचं त्याच्या रुपावरून दिसतंय. प्रामुख्यानं वाहिन्यांमधील ब्रेकिंगन्यूज इथं असल्यामुळे एखाद्या मराठी वाहिनीत काम करणा-या कोणीतरी हा ब्लॉग सुरू केला असावा, अशीही शक्यता आहे.
माझ्या डोक्यात आलेली आणखी एक शक्यता म्हणजे हे दोन्ही ब्लॉग एकाच व्यक्तीनं (किंवा एकाच गटानं म्हणूयात हवं तर) सुरू केलेले असण्याची शक्यता आहे. एखाद्याबद्दल फारच अवमानकारक लिहायचं असेल आणि कायदेशीर कारवाईचा धोका असेल, तर बातमीदारवर बिनधास्त लिहायचं आणि एखादा हलकाफुलका प्रसंग लिहायचा असेल, तर ब्रेकिंग न्यूजवर जायचं. दोन ब्लॉग एकाच वेळी सुरू असतील, तर बॅकअपही कायम राहातो. काही कारणानं एखादा बंद पडलाच, तर दुसरा आधीपासून अस्तित्वात असलेला आणि वाचला जाणारा ब्लॉग हाती असणं केव्हाही चांगलंय... दोन्ही ब्लॉग बारकाईने पाहिल्यास त्यात काही ठिकाणी साम्य दिसतं तर काही ठिकाणी मुद्दाम घडवून आणलेलं वेगळेपण... मनात शंका येण्याचं हे प्रमुख कारण. आणि दुसरं म्हणजे आजवर एकाच वेळी दोन ब्लॉग्ज सुरू आहेत, असं कधीही घडलेलं नाही. दोन्ही ब्लॉग शैलीदार आणि कोणाचाही मुलाहिजा न ठेवता लिहिले जात आहेत. अशी अनेक कारणं आहेत मनात ही शंका यायला...
ब्लॉग दोन असले तरी टीम एकच आहे की वेगवेगळी?
ते काही असो... दोन्ही ब्लॉग चांगले आहेत आणि बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणा-यांच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या दोन्ही ब्लॉग्जनी पुढे सुरू ठेवलं आहे. त्यामुळे त्यांचं स्वागतच करायला हवं...