Sunday 15 May 2011

सेंट पर्सेंट बालगंधर्व...

सर्वप्रथम नितीन देसाई आणि त्यांच्या टीमचे आभार... बालगंधर्व केवळ पुण्यातल्या रंगमंदिरातील चित्रात पाहिलेल्यांना त्यांचं दर्शन घडवून आणल्याबद्दल...

आज बालगंधर्व हा चित्रपट पाहिला आणि पाहिला नसता तर आपण काय गमावलं असतं, याची सर्वप्रथम जाणीव झाली. एकतर बालगंधर्वांसारख्या ज्येष्ठतम रंगकर्मीच्या आयुष्याची ही कथा. त्यामुळे त्यात 'नाट्य' असणार, यात नवल ते काय? पण हे नाट्य ज्या खुबीनं पडद्यावर आलंय, त्याला तोड नाही. स्वतः चित्रपटांचे क्षेत्र न पटलेल्या बालगंधर्वांना यापेक्षा वेगळी श्रद्धांजली असूच शकत नाही. दैवाने (सु की दुर् हे पाहणा-याच्या दृष्टीकोनावर आहे... माझ्या दृष्टीने सु) मी टीव्ही माध्यमात काम केलं असल्यामुळे कोणत्याही हालत्या चित्रांकडे पाहण्याचा अँगल आपोआप वेगळा झाला आहे. कॅमेरा, एडिटिंग, लाईट यासारख्या गोष्टींकडे अन्यथा लक्ष जाण्याचं फारसं कारण नाही. त्यामुळेच अनेक चित्रपट त्यांच्यातल्या तांत्रिक दोशांमुळे आवडत नाहीत. बालगंधर्व मात्र याला सन्मान्य अपवाद ठरला याचा खूप आनंद वाटला...
०००००००००००००००००००००
मला भावलेला बालगंधर्व माझ्या ब्लॉग वाचकांसाठी थोडक्यात... अर्थात सर्वाधिक भावलेल्या पैलूंच्या चढत्या क्रमाने...
१. कथा - कथा आवडणारच होती, कारण ती बालगंधर्वांची होती.
२. पटकथा - बालगंधर्वांच्या आयुष्यातले चढ-उतार आणि त्यातलं नाट्य अत्यंत प्रभावीपणे मांडलं गेलं आहे. कोणताही संवाद किंवा एखादा शॉट हा ऊगीचच आहे, हा सीन नसता तर चाललं असतं, असं एकदाही वाटलं नाही. त्यामुळेच कथेपेक्षा जास्त पटकथा भावली.
३.छायाचित्रण (सिनेमॅटोग्राफी) - मराठी चित्रपटांमध्ये आभावानं आढळणारा हा गुण बालगंधर्वमध्ये दिसतो. अगदी पहिल्या शॉटपासून ते शेवटी मावळत्या सूर्याला सामोरे जाणा-या बालगंधर्वांपर्यंत... प्रत्येक ठिकाणी कॅमे-याचा अँगल, त्याचं फ्रेमिंग अतिशय अचुक झालं आहे. मराठी चित्रपटातही हे होऊ शकतं, याचं उदाहरण बालगंधर्वनं घालून दिलं आहे. ५. संकलन (एडिटिंग) - चांगल्या कॅमेरावर्कला चांगल्या एडिटिंगची साथ मिळाली, तर काय होऊ शकतं याचा पाठ बालगंधर्वमध्ये दिसतो. इफेक्ट्सचा भडीमार न करता केलेलं एडिटिंगही चांगलंच असतं, हे या चित्रपटानं दाखवून दिलं आहे. मध्यंतर होतानाचा शॉट हा एडिटिंगचा परमोच्च बिंदू ठरावा. बालगंधर्व पावसात भिजत जात आहेत... रस्त्यावर साचलेल्या पाण्यात पडलेल्या चंद्राचं प्रतिबिंब त्यांच्या पायानं मोडतं... पाणी परत स्थिरावत असताना मध्यंतर ही अक्षरं येतात आणि त्यातील ध्य वर असलेला अनुस्वार हा सूर्याचं प्रतिबिंब असतं... क्लासिक. जस्ट क्लासिक. (शब्दांत वर्णन करता येणं अशक्य आहे... बघायलाच हवा असा हा शॉट आहे.)
५. संगीत - कौशल इनामदार यांनी केलेला शास्त्रीय संगीताचा वापर हे एक कारण आहेच... शिवाय चित्रपटात जागोजागी पेरलेली बालगंधर्वांच्या नाटकातली पदंही गोड वाटतात. आर्या आंबेकरच्या पहिल्या बंदिशीसह सगळीच पदं-गाणी मस्त जमली आहेत. ऐकायला जाम मजा आली. राहुल देशपांडे केशवराव भोळेंच्या भूमिकेत भाव खाऊन गेले आहेत...
६. कलाकार - विभावरी देशपांडे यांनी लक्ष्मीबाई मस्त केली आहे. डाऊन टू अर्थ, सोशिक आणि तरीही कणखर...  लहानशा भूमिकांमध्येही आपल्याला प्राण ओतलेला दिसतो. अथर्व कर्वेच्या बाल नारायणापासून निर्माते नितीन देसाई यांच्या लोकमान्य टिळकांपर्यंत... प्रत्येकाचं काम मस्त आहे. सर्वांनी आपापला 'रोल' सॉलिड ताकदीनं केला आहे. कलाकारांच्या सहज अभिनयामुळे वरच्या सर्व गोष्टींना महत्त्व आहे.... मुळात ऐतिहासिक कथानक असल्यामुळे पाहुण्या कलाकारांचा प्रचंड राबता असतानाही प्रत्येक भूमिकेवर बारीक काम आणि प्रचंड मेहनत घेतल्याचे दिसतं. म्हणूनच चित्रपटाच्या श्रेय्यनामांची चढती भाजणी लावताना दुस-या क्रमांकाचा मान हा चित्रपटातल्या कलाकारांकडे जातो.
आणि
७. सुबोध भावे - काय दिसतो सुबोध या सिनेमात... भन्नाट! चित्रपटातला सुबोधनं साकारलेला बालगंधर्व बघत असताना मला पुलंच्या हंड्रेड पर्टेंट पेस्तनकाकांची आठवण आली... 'विष्णुपंत पागनीस म्हणजे सेंट पर्सेंट तुकाराम... खरा तुकाराम बी असा नाय....' हे पेस्तनकाकांचं वाक्य 'सुबोध भावे म्हणजे सेंट पर्सेंट बांलगंधर्व... खरा बालगंधर्व बी असा नाय...' असं नावं बदलून टाकलं, तरी चालेल. कारण पेस्तनकाकांनी खरा तुकाराम आणि आम्ही खरा बालगंधर्व पाहिलेलाच नाही! त्यामुळे यापुढे बालगंधर्वांबाबत काही वाचण्या-ऐकण्यात आलं, तर डोळ्यासमोर सुबोध दिसणार! सेंट पर्सेंट बालगंधर्व...
सुबोधनं अतिशय साध्या पद्धतीनं बालगंधर्वांचं बेअरिंग घेतलं आहे. धोतर-सदरा घातलेला सुबोध आणि भरजारी शालू नेसलेला सुबोध, या दोन स्वतंत्र व्यक्ती आहेत... त्याच्या अभिनयात कुठेही भडकपणा नाही. (तसा मला तो धोबीपछाड वगळता अन्यत्र कुठेही दिसलेला नाही म्हणा.) लुगडं नेसल्यानंतर थेट बालगंधर्वांच्या शैलीत खांदा किंचित खाली पाडून उभं राहणा-या सुबोधच्या अभिनयातले बारकावे मनाला भावले. सुबोध... चित्रपटाच्या यशाचे मानकरी ठरवताना पहिल्या क्रमांकाचा मान तुलाच द्यायला हवा... तो तुझाच अधिकार आहे...
००००००००००००००००००
हरिश्चंद्राची फॅक्टरी, नटरंग आणि आता बालगंधर्व... मनोरंजनाच्या तीन भिन्न क्षेत्रांशी जुळलेले हे तीन छान चित्रपट. नंदू माधव यांचा फाळके, अतुल कुलकर्णीचा गुणा आणि सुबोधचा बालगंधर्व... तुलना होऊच शकत नाही. तीन्ही भूमिका वेगळ्या धाटणीच्या आणि तितक्यात ताकदीने पेललेल्या. आता आपल्या मालकीचा ब्लॉग असल्यामुळे जाता-जाता एक इच्छा व्यक्त करायला हरकत नाही. ही बायोग्राफीची मालिका खंडित होऊ नये, असं वाटतंय... आणि पुढला नंबर दादा कोंडकेंचा लागला, तर फारच मजा येईल. एकाद्या निर्मात्या-दिग्दर्शकाच्या मनातही माझ्यासारखीच ही कल्पना घोळत असेल का? असावी, असं मनापासून वाटतंय....

Wednesday 4 May 2011

कोणी बनवेल का हा कीबोर्ड?

बराक ओबामा यांच्या आदेशावरून अमेरिकन सैनिकांनी पाकिस्तानात घुसून ओसामा बिन लादेनचा खात्मा केला. याची ब्रेकिंग न्यूज देण्याच्या भानगडीत अनेक चॅनल्स आणि खूप देण्याच्या भानगडीत वर्तमानपत्रांचा थोडा गोंधळच झाला. ओबामा आणि ओसामा यांच्या नावातील साधर्म्यामुळे काहींनी ओबामांचाच 'एन्काऊंटर' केला. एव्हाना फेसबुकवर त्याच्या अनेक क्लिप्स आणि फोटो पडले आहेत... त्यामुळे हा गोंधळ टाळण्यासाठी खास पत्रकारांकरता एखाद्या कंपनीनं कीबोर्ड तयार करावा, असं वाटतंय. डिझाईनिंगमध्ये कंपनीचा वेळ जाऊ नये, यासाठी मी फोटोशॉपवर डिझाईन तयार केलंय...  इच्छुक कंपन्यांनी कॉपिराईट मिळवण्यासाठी संपर्क साधावा...