Monday, 31 August 2009
नगारा वाजला...
Sunday, 30 August 2009
भाजप 'दक्ष...' संघ 'आरम...'
Wednesday, 26 August 2009
सरकारी लगीनघाई...!
Saturday, 22 August 2009
बाबूगिरीला चाप...
मुख्य न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार आणि न्या. धर्माधिकारी यांच्या खंडपीठानं या अहवाल-प्रतिज्ञापत्राचे वाभाडे काढलेत. राज्याच्या गृहसचिव ऍना दाणी यांनी असले अहवाल देण्यापेक्षा स्वतः फिरून परिस्थिती बघावी, असे आदेशच न्यायालयानं दिले. एड्सग्रस्त रुग्णांची सगळ्यात वाईट स्थिती असलेल्या १५ तुरूंगांना स्वतः भेटी द्या... असं न्यायालयानं बजावलंय. त्यात १० तुरुंगांना दाणी यांनी तर ५ तुरूंगांना त्यांच्या खात्याच्या उपसचिवानं भेट दिली पाहिजे, अशी वाटणीही कोर्टानं करून दिलीय. याचा अर्थ दाणींनी सगळी जबाबदारी उपसचिवांवर ढकलू नये, याची खबरदारीही कोर्टानं घेतलीय. कोर्टाची सगळ्यात मोठी पंचलाईन म्हणजे, या भेटी दिल्यावर अहवाल द्यायचा नाही, असं सांगण्यात आलंय. दाणी आणि त्यांचे सहकारी यांनी स्वतः कोर्टात येऊन 'या तुरूंगांमध्ये काय पाहिलं...?, ते पाहून काय वाटलं...? आणि ते थांबवण्यासाठी आपण काय करणार आहोत?' हे प्रत्यक्ष सांगायचं आहे... हा आदेश म्हणजे 'आयसिंग ऑन केक...' म्हंटलं पाहिजे.
कोर्टानं इतकं चिडायचं कारण म्हणजे राज्याचं गृहखातं आणि आरोग्यखात्याला एकूण परिस्थिती बघण्याचे आदेश यापूर्वी कोर्टानं दिले होते. त्यावर नेहमीची बाबूगिरी करत 'आपण एड्सचा प्रसार रोखण्यासाठी काय करणार आहोत...' असली बच्चनगिरी अहवालात होती. त्यामुळे कोर्ट संतापलं... ज्यांना आगोदरच एड्सची बाधा झाली आहे, अशा कैद्यांचं काय, असा खडा सवाल न्यायालयानं केला. त्यात कोर्टानं मदतीसाठी नेमलेले ऍमिकस क्युरी युग चौधरी यांच्या अहवालानं भर घातली. कैद्यांमधल्या आजारानं गंभीर स्वरूप धारण केल्याशिवाय त्यांच्यावर ट्रिटमेंटच दिली जात नाही, असं या धक्कादायक अहवालातून स्पष्ट झालंय.
कोर्टाच्या या आदेशांचं सामान्य माणसानं मोकळ्या मनानं स्वागतच करायला हवं... एक तर हा विषय कैद्यांपुरता मर्यादित असला तरी एकूणच असल्या बाबूगिरीचा फटका आपल्याला कायमच बसत असतो... मग ते मंत्रायलयात आपलं एखादं काम अडलं असेल... किंवा मुंबई हल्ल्यांबाबत पाकिस्तानला पुरावे देणं असेल... किंवा अगदी साधं रेशन कार्डावरचा पत्ता बदलणं असो... हा बाबूगिरीचा व्हायरस आपल्या नसानसांमध्ये भिनलाय... त्याचा उपद्रव एचआयव्हीप्रमाणेच थेट दिसत नाही... पण त्याची लागण झाली की आपली प्रतिकारशक्ती कमी होते... आणि आपल्या बाकीच्या सगळ्या यंत्रणा हळूहळू निकामी होतात... कोर्टानं दिलेले हे आदेश म्हणजे या बाबूगिरीच्या व्हायरसवर जालीम इलाज म्हणायला हवा... हा निकाल एका केसपुरता मर्यादित असला, तरी त्याचा एकूण टोन सगळ्या बाबू लोकांवर आसूड ओढणारा आहे... यावरून नोकरशहांनी धडा घेतला तर बरं... नाहीतर कोर्टाला असेच आदेश देऊन या लोकांना खुर्चीवरून हलवावं लागेल... ते आपल्या व्यवस्थेला फारसं हितावह नाही...
Friday, 21 August 2009
बाप्पाशी गप्पा... इतकंच!
म्हणाला... काय राव? मला विसरूनच गेलास
मी म्हंटलं त्याला, विसरीन कसा बाप्पा...
रोजच्या कामाच्या रगाड्यात थोडा विस्मृतित गेलास... इतकंच!
पण स्फोट-बिट झाले की आठवतोस तू आम्हाला...
आत्ता नुकताच 'ताप' आल्यावरही लागलेलो तुझं नाव घ्यायला...
तसा मी मुळातच भित्रा आहे रे...
चार ओळखीचे भेटले की बरं वाटतं भाव खायला... इतकंच!
तू आलास घरी की मोदक-बिदक करणार आहे मी...
तू खात नाहीस माहित्ये रे मला... तुझ्या नावानं मी तर खातो...
तुझी आरती म्हणीन मी तेव्हा हुरळून जाऊ नकोस,
ज्याचा सण असेल त्या देवाचीच गाणी आम्ही नेहमी गातो... इतकंच!
दिड दिवस रहा... पाच दिवस रहा किंवा आख्खे दहा दिवस रहा...
पूजा-अर्चा-भजनं करण्याचा माझा वस्तुपाठ आहे...
कारण त्याला माझाही इलाज नाहिये रे...
'देखल्या देवा दंडवत' करण्याचा माझा ठरलेला परिपाठ आहे... इतकंच!
लालबागचा राजा... दगडूशेट हलवाई... आणि
कुठकुठल्या मंडळांमध्ये पाहतो मी तुला... आणि तुझ्यासमोरची लांब रांग...
खरंच यातले भक्त किती आणि लड्डूभक्त किती...
हे तुला तरी कळतं का रे...? पण रिद्धि-सिद्धीची शप्पथ घेऊन सांग... इतकंच!
तुला निरोप देत सांगितलं पुढल्या वर्षी लवकर यायला...
की मग कोण-तू आणि कुठला तू, असं म्हणायला मी मोकळा होणार...
नाही... नाही... मी तूला विसरलो असं समजू नकोस रे...
फक्त माझ्यावर संकटं आली की मगच तू मला आठवणार... इतकंच!
माझं इतकं ऐकून घेतल्यावर बाप्पानं गप्प बसावं ना?
पण म्हणाला... फक्त चतुर्थी टू चतुर्दशी मी तुला आठवतो...
वाटतंय खरं असं मित्रा तूला...
पण तू सुखात असतानाही आठवण काढतोस माझी...
कारण ती सगळी सुख मीच तुझा पत्ता लिहून पाठवतो...
ते तुला समजत नाही... इतकंच!
Wednesday, 19 August 2009
प्याटर्नचा प्याटर्न... म्हंजी 'पुने प्याटर्न'
तुमाला वाटलं, ह्यो गडी आता का ह्ये सांगतुया.. आता कुटं आला ह्यो प्याटर्नचा फ्याटर्न... पण त्याचं कारन असं गड्यांनो का आजच्या पेपरात वाचलं का कोणचातरी 'पुने प्याटर्न' व्हता म्हणं... त्यो मोडला! बातमी वाचली का... तर कायबी कळंना... कन्चा प्याटर्न मोडला ता... (छबीला नापास करनारा प्याटर्न मोडला असता, तर लय् बरं वाटलं असतं...) कायच कळत नव्हतं... त्यात पुनं म्हापालिकेचा कायतरी लिवलेला... आनी ते उद्धव ठाकरे.. त्या कायतरी बोलला व्हता... म्हनल् ही कायतरी राजकारणाची भानगड दिसतिया... मग म्हनलं आमच्या आळीतल्या गणूला इचारू काय ते... त्यो कायतरी सभा-बिभांना जातो....
गण्याला गाटला अन् इचारलं की, ह्यो पुने प्याटर्न काय भानगड हाय ते सांग गड्या... त्यानं सांगितलं, त्ये मला काय जास्त समजलं नाय... समजलं इतकंच...
******************
एका शाळेत चार पोरं असतात... 'रा' आनी 'का' ह्ये दोघं मित्र आनी 'शि' आनी 'भा' ह्ये दोघं मित्र... यकदा गणिताच्या पेप्राला 'रा', 'शि' आनी 'भा' यांनी एकत्र येऊन कापी केली आनी तिघेबी पास झाले. मग 'का' आपल्या ख-या दोस्ताला, म्हंजे 'रा'ला लय चिडवायचा त्या पेप्रानंतर... आता परत परिक्षा आली तर तू कोनासंगट कापी करनार, असं इचारायचा सारका-सारका... पन ती वेळच आली नाय... कारन 'शि' आनी 'भा' या दोगांनी 'रा'ला कापीतून कटापच करून टाकला... मंग 'का' ला आपोआप साथी मिळाला कापी करायला... अनी फुडल्या जास्त अवगड पेप्रात त्यांनी आपापल्या जोडीदारासंग कापी करायचं ठरिवलं...
************************
ह्ये अस्स हाय होय पुने प्याटर्न... आमच्या छबीच्या येळी ह्यो "पुने कापी प्याटर्न" गावला असता तर ती बी पयला वक्ताला पास झाली नसती का?
आशिष चांदोरकर यांची ताजी पोस्ट... As it is...
कार्यकर्त्यांमुळे साकारतेय "साम राज्य"...
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि भारत... क्रिकेटमध्ये सध्याच्या युगातली ही दादा मंडळी. पण न्यूझीलंडचा संघ या दादा मंडळींमध्ये कधीच मोडला जात नाही. तरीही कायम तो संघ विजेतेपदाच्या स्पर्धेत असतो. चॅंपियन्स करंडक स्पर्धा जिंकण्याची कामगिरीही त्यांनी एकदा करुन दाखवलीय. त्यांच्याकडे सचिन तेंडुलकरसारखा "स्टार प्लेअर' नाही, वॉर्न-मुरलीप्रमाणे फिरकी गोलंदाज नाही, पॉटिंग-कॅलिस सारखे फलंदाज नाही. पण न्यूझीलंडच्या संघाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे अष्टपैलू खेळाडू, त्यांचं क्षेत्ररक्षण, खेळातलं सातत्य आणि संघासाठी प्रत्येकाचं काही ना काही योगदान. हा संघ ऑस्ट्रेलियासारखा जगज्जेता नसेल पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करुनही चालत नाही. असंच काहीसं "साम मराठी' वाहिनीचं आहे. विशेषतः बातम्यांचं!
पण गेल्या वर्षी जेव्हा वाहिनीची सुरवात झाली तेव्हा परिस्थिती अशी नव्हती. "साम जन्मला गं सखी साम जन्मला...' अशा प्रतिक्रियांनी गेल्या वर्षी 15 ऑगस्टच्या आसपास "साम मराठी' या वाहिनीचं स्वागत झालं होतं. अर्थातच, माध्यमातल्या बऱ्याच जणांनी स्वागत करताना नाकं मुरडली होती किंवा त्यांची या बाळाबद्दल फारशी चांगली प्रतिक्रिया नव्हती. "सकाळ'सारख्या ग्रुपकडनं त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या, त्या पूर्ण झाल्या नव्हत्या. ही गोष्ट बरेच जणांनी बोलून दाखविली होती. कारणही तसंच होतं. काहीच महिन्यांपूर्वी म्हणजेच गुढीपाडव्याला "आयबीएन लोकमत' या वृत्तवाहिनीचं आगमन झालं होतं. त्यामुळं सकाळची "साम' आणि "आयबीएन लोकमत' यांच्यात तुलना होणं साहजिकच होतं. अशा परिस्थितीत "साम'वरचे कार्यक्रम आणि इतर घडामोडी यामुळं ""...उचललेस तू मीठ मूठभर, "साम्राज्या'चा खचला पाया...'' असं म्हणण्यापर्यंत लोकांची मजल गेली होती. अर्थातच, सुरवातीच्या काही महिन्यातच!
आमच्याकडे राजदीप सरदेसाई किंवा निखील वागळे यांच्यासारखा चेहरा नसेल, "आयबीएन', "स्टार' किंवा "झी'सारखं नेटवर्क नसेल, "टाइम्स नाऊ' किंवा "नेटवर्क 18' इतक्या "ओबी व्हॅन' नसतील. पण तरीही आमची बातमी चुकत नाही. बातमीचा क्रम चुकलाय असं कधी झालं नाही. सोयी-सुविधांची फारशी रेलचेल नसतानाही आम्हाला कशाचीच उणीव भासली नाही. ना राज ठाकरे यांच्या मराठीच्या आंदोलनावेळी, ना 26 डिसेंबरच्या हल्ल्यावेळी, ना लोकसभा निवडणुकीच्या संपूर्ण टप्प्यात. काठोड्याचं बलात्कार प्रकरण असो किंवा हासेगावच्या एड्सग्रस्त विद्यार्थ्यांची ससेहोलपट साम मराठीनं प्रथम प्रकरणाला वाचा फोडली आणि नंतरही वेगवेगळ्या स्तरावर हे मुद्दे लावून धरले. निरनिराळ्या वृत्तमालिका झाल्या. "सकाळ'च्या संस्कृतीपेक्षा थोडीशी हटके भूमिका घेत "साम'नं कायम आक्रमकपणे बातम्या दिल्या. मग पद्मसिंह पाटील यांच्या अटकेची बातमीही "राष्ट्रवादी'वर आसूड ओढणारी होती. "राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दहाव्या वर्धापनदिनी पद्मसिंह पाटलांच्या हकालपट्टीची पक्षावर नामुष्की...' अशा मथळ्याची बातमी "सकाळ'मध्ये आली असती का? पण हीच हेडलाईन आणि बातमीचा हाच टोन "साम'वर होता. त्यामुळं आम्हीही आता आमचा टक्का निश्चित केला असून तो वाढवत नेण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.
कोणी काहीही म्हणत असलं तरी आता "साम मराठी' बऱ्यापैकी स्थिरावलीय. राज ठाकरे यांचं मराठीच्या मुद्द्यावरचं आंदोलन असो, "एन्ट्री पोल', "मी महाराष्ट्र बोलतोय...' किंवा "लोकसभा ट्वेंटी-20' सारखे निवडणूक विषयक कार्यक्रम असो, "साम'च्या वृत्तविभागानं बऱ्यापैकी मायलेज मिळवलं आहे. अगदी सुरवातीच्या काळात तर राजू परुळेकर यांनी घेतलेल्या "महाराष्ट्र कोणाचा' या कार्यक्रमामुळं "साम'ची बऱ्यापैकी प्रसिद्धी झाली होती. तसंच टोकदार, आक्रमक पण इतर वृत्तवाहिन्यांप्रमाणे उथळपणा न करता बातम्या देण्याचं काम "साम मराठी'चा वृत्तविभाग करतोय. त्यालाही हळूहळू प्रतिसाद मिळतोय. ""तुमच्या बातम्या वेगळ्या असतात. इतरांकडे त्याच त्याच बातम्या दाखवितात. तुमच्याकडे मात्र, तोच तोच पणा येत नाही,'' अशा प्रतिक्रिया प्रेरणादायीच म्हटल्या पाहिजेत. बाकी "टाटा स्काय' किंवा "डिश'वर साम दिसत नाही. ही खंत आहेच. पण हे जेव्हा घडेल तेव्हा "साम'ची घोडदौड खऱ्या अर्थानं सुरु होईल.
"झी 24 तास', "स्टार माझा' आणि "आयबीएन लोकमत' यांच्याकडचं मनुष्यबळ, वार्ताहरांची संख्या, उपलब्ध तंत्रज्ञान, सुविधा आणि हिंदी किंवा इंग्रजी वाहिन्यांकडून मिळणारा "सपोर्ट' या सर्वच गोष्टी लक्षणीय आहेत. म्हणजेच या गोष्टींमध्ये "साम'ची तुलना इतर मराठी वाहिन्यांशी करता येत नाही. पण तरीही "साम'च्या बातम्यांचा स्वतंत्र प्रेक्षक वर्ग तयार झाला आहे. ही गोष्ट वारंवार स्पष्ट झालीय. "आयबीएन' वाहिनी दोन्ही "डीटीएच'वर जाण्यापूर्वी "आयबीएन' वाहिनीपेक्षा "साम'चा "जीआरपी' (ग्रॅंड रेटिंग पॉईंट) प्रत्येक आठवड्याला अधिक असायचा. इतकंच काय तर लोकसभा निवडणुकीच्या दिवशी "एनडीटीव्ही' आणि "साम' वाहिनीच्या प्रेक्षकांची टक्केवारी जवळपास सारखीच होती. "एन्ट्री पोल'च्या प्रश्नमंजुषेच्या उत्तरासाठी रोज जवळपास हजारहून अधिक "एसएमएस' यायचे. थोडक्यातच सांगायचं झालं तर "साम'ची लढाई अस्तित्वासाठी सुरु नसून अधिकाधिक वरच्या क्रमांकावर जाण्यासाठी सुरु आहे. "मी मराठी'च्या बातम्यांशी तुलना करण्याची माझी इच्छा नाही. पण अनेकदा आमच्या बातम्या, आमचा लुक "झी 24 तास'पेक्षाही चांगला असतो. असो.
वैयक्तिकदृष्ट्या विचार करायचा झाला तर "इनपुट हेड' किंवा "प्रोड्युसर' म्हणून काम करताना खूप मजा आली. कामातला आनंद इतका होता की त्याचा कधी कंटाळा आलाच नाही. स्वतंत्र विचार करण्याची आणि त्याची अंमलबजावणी करण्याचं स्वातंत्र्य इथं आहे. त्यामुळं काम करताना मिळणारा आनंद खरोखरच अवर्णनीय आहे. इतरांना हेवा वाटावा, असा मराठी वृत्तवाहिन्यांमधला क्रमांक एकचा "डेस्क' आज "साम मराठी'कडे आहे. अनुभवी आणि धडपड्या रिपोटर्सची "टीम' आमच्याकडे आहे. "बॉसिंग' न करणारे "साहेब' आमच्याकडे आहेत. नवं काहीतरी शिकण्याची जिद्द असणारे "कार्यकर्ते' आमच्याकडे आहेत. त्यामुळंच "डेस्क'चं काम सांभाळून रिपोर्टिंग करणारे, गरज पडली तर पॅनेल प्रोड्युसिंग करणारे "कॉपी एडिटर' किंवा "बीपी' साममध्ये आहेत. एखाद्या "एपिसोड'साठी दोन-दोन दिवस ऑफिसमध्ये तळ ठोकून बसणारी मंडळी आहेत. या सर्वांच्या जोरावर हा "साम'चा गाडा ओढला जातोय. रिपोर्टिंग, कॉपी एडिटिंग, स्पेशल प्रोग्रॅमचं प्लॅनिंग, व्हिडिओ एडिटिंग किंवा "व्हीओ' असं काहीही असलं तरी "कार्यकर्ते' सदैव तयार असतात.
शिवरायांचं स्वराज्य जसं मावळ्यांच्या जोरावर घडलं तसंच हे "साम राज्य' कार्यकर्त्यांच्या जोरावर घडतं आहे. अडचणी आहेत. संकटं येणार आहेत, हे देखील माहिती आहे. पण त्याचबरोबर एक सुंदर "एसएमएस'ही आम्हाला माहिती आहे. तो "एसएमएस' असा...
As we sail through life, don't avoid storms and rough waters. Just let it pass. Sail On and Sail On. Just because calm seas never make skillful sailors...
Tuesday, 18 August 2009
पुन्हा क्रिझवर भिंत...?
Monday, 17 August 2009
Who is this "KHAN?"
फोनवर महाराजांचा चिडलेला-पिचलेला आवाज प्रधानजींच्या चाणाक्ष कानांमधून सुटला नाही... पण त्यांनी तसं दाखवलं नाही... ते सहजच चौकशी करत असल्यासारखं म्हणाले, "काय म्हणतोय महाराज तुमचा परदेश दौरा? सगळं आलबेल आहे ना?"
या प्रश्नानं महाराज अधिकच भडकलेल्याचं प्रधानजींना जाणवलं. पण महाराजांच्या पुढल्या वाक्यानं त्यावर शिक्कामोर्तबच केलं... महाराजांचा भडकलेला आवाज म्हणाला, "डोकं फिरल्यासारखं वागू नका... आमच्यावर इथं काय प्रसंग ओढवलाय माहित्ये का... मी आपल्या देशाचा 'किंग...' पण इथं परदेशात आम्हाला कोणी विचारत नाही... आमची तपासणी करतात... सामान चेक करतात, म्हणजे काय? आपल्या देशात आम्ही इतके प्रसिद्ध... लोक आम्हाला डोक्यावर घेऊन नाचतात. पण इथं आम्हाला कोणीच विचारत नाही... म्हणजे काय?"
महाराजांच्या निर्बुद्धपणाचं प्रधानजींना हसायला आलं... पण ते फक्त चेह-यावर. आवाजात त्यांनी तसं जाणवूही दिलं नाही... (म्हणुनच तर इतकी वर्षं ते प्रधानजी होते) आवाज गंभीर ठेवत प्रधानजी विचारते झाले, "नेमकं काय झालंय ते सांगाल का? तुमच्या आवाजावरून नक्कीच खूप चिडलेले दिसता तुम्ही..."
प्रधानजींचा काळजीचा स्वर ऐकून महाराजांना थोडं बरं वाटलं... मग ते डिटेल सांगते झाले, "आम्ही या देशातल्या नेवार्क विमानतळी उतरलो... आमचं आगत स्वागत करायला कोणी नव्हतंच, पण इथल्या सुरक्षारक्षकांनी आम्हाला चक्क दोन तास डांबून ठेवलं... आमचं सगळं सामान तपासलं, कोणाला फोनही करू दिला नाही... आम्ही येणार असल्याची खबर तुम्ही दिली नव्हतीत का? तसं असेल तर परत आल्यावर तुम्हाला सुळावर चढवीन मी समजलं ना..."
प्रधानजींना असल्या गोष्टींची सवय होती. महाराज येत असल्याचं लेखी कळवल्याची ऍक्नोलेजमेंट त्यांच्या खिशात होती. त्यामुळे ते निर्धास्त होते. पण महाराजांची 'खेचण्याची' ऐती चालत आलेली संधी ते कशाला सोडतायत... प्रधानजी म्हणाले, "हो महाराज... कळवलं होतं मी तिथल्या महाराजांना आपण जात असल्याचं. त्यावर त्यांचं उत्तरही आलंय... त्यांचं म्हणणं आहे, की आमच्या विनंतीवरून तुम्ही तिथं आलात, तर प्रोटोकॉल-बिटोकॉल ठिक आहे. पण तुम्ही एका खासगी कार्यक्रमासाठी तिथं गेलात. त्यामुळे सामान्य पर्यटकाला ज्या सुरक्षाकवचातून जावं लागतं, तेच तुम्हालाही लागू आहे... म्हणजे असं ते म्हणतात. मला वाटतं त्यांची चुकच झाली..." प्रधानजींनी बॅकफूटवर येत एक फटका लगावला... महाराज विचारात पडल्याचं त्यांना जाणवलंच... "त्यांचा अजून एक मुद्दा आहे. त्यांच्या मते तुम्ही काही आपल्या देशातले खर्रे-खुर्रे किंग नाही... तुम्ही केवळ चलचित्रांच्या क्षेत्रात किंग आहात. मग तुमच्यासाठी प्रोटोकॉल का पाळायचा... त्यांच्या देशाच्या नियमांमध्ये बसत नाही म्हणे ते... ते ख-या किंगला पण सोडत नाहीत... तुम्ही तर 'कठपुतली किंग' आहात, असं लिहिलंय त्यांनी दिलेल्या उत्तरात..."
थोडा वेळ गेल्यावर महाराज म्हणाले, "हं...... ते पण खरंच आहे म्हणा... आता असं करा... तुम्ही एक प्रेस कॉन्फरन्स घ्या... त्यात डिक्लेअर करा, की आमच्या महाराजांचं आडनाव 'खान' असल्यामुळेच त्यांना अडवलं... म्हणजे दोन गोष्टी होतील. एक तर आपल्या आडनावाचे लोक खुष होतील आणि आपल्या पुढल्या चलचित्राची पब्लिसिटी होईल... कशी वाटली आयडिया..."
"झक्कास आयडिया महाराज... काय डोकं लढवलंयत... झक्कासच! म्हणजे आम के आम... गुठलियोंके दाम! एकदम भारी... कसं काय सुचतं तुम्हाला हे.. व्वा.. व्वा..."
"पुरे आता... आम्हाला उगीच हरभ-याच्या झाडावर चढवू नका... फोन ठेवा आणि प्रेस कॉन्फरन्स बोलवा... मी परत येण्यापूर्वी या गोष्टीची पुरेशी चर्चा झाली असली पाहिजे...."
फोन ठेऊन प्रधानजी शांतपणे 'मधुशाले'कडे चालते झाले...
Friday, 14 August 2009
स्वाइन फ्लू आणि पुणे
तशी एक कॉमेंट पडली आहेच, पण माझ्या अनेक 'पुणेकर' मित्रांनी फोन करून किंवा एसएमएस पाठवून मला झापलंय.... कारण एकच... हा इतका 'सिरियस' विषय आहे आणि मी त्याची चेष्टा करतो, म्हणजे काय!!
एक तर मी मुंबईत राहतो... इथं कुठल्या क्षणी काय होईल आणि तुम्हाला घेऊन जायला दूत येतील, याचा भरवसा नसतो... त्यामुळे एकूणच मुंबईकरांची मानसिकता ही 'रेडी फॉर एनिथींग' अशी असते. "स्वाइन फ्लू आलाय का? बरं... बरं... चला कामाला लागा..." असा मुंबईकरांचा ऍटिट्यूड... पुण्यात मात्र परिस्थिती नेमकी या उलट... "पळा... पळा... स्वाइन फ्लू आला... स्वाइन फ्लू आला..." असं म्हणत तमाम पुणेकरांनी रिदा शेखच्या मृत्यूनंतर नायडू रुग्णालयाबाहेर गर्दी केली...
आता माझा जन्मच मुंबईच्या उपनगरातला... दिल्लीचे ४ महिने आणि हैदराबादची ३ वर्ष वगळता उरलेली ३० वर्षं मुंबईत गेली. त्यामुळे मी ठरवलं तरी स्वाइन फ्लूकडे पुणेकरांइतका 'सिरियसली' नाही पाहू शकत... सॉरी बॉस! पण मला या विषयाचं गांभिर्य नाही, असा याचा अर्थ काढायचं कारण नाही... मी मिडियात काम करत असल्यामुळे हा विषय कायमच गांभिर्यानं हाताळतो. त्यात थोडासा बदल म्हणून थोडा कल्पनाविलास केला, तर बिघडलं कुठं?
पुण्यात स्वाइन फ्लू सगळ्यात जास्त पसरलाय हे मान्य... त्याची कारणं काय, हे समजणं कठीण आहे. एक कारण म्हणजे रिदाच्या मृत्यूनंतर नायडू हॉस्पिटलबाहेर लोकांनी केलेली गर्दी आणि त्यातून विषाणूंचा झालेला प्रसार हे असू शकेल (माझ्या एका 'ओरिजनली पुणेकर आता मुंबईकर' मित्राला हा मुद्दा मान्य नाही... तो मित्र प्रतिक्रीया टाकेलच तशी) किंवा पुण्यातलं प्रदुषण हा असू शकेल... किंवा तिथली धड ना थंड-धड ना ऊष्ण अशी हवा हे कारणही असू शकेल. पण पॅनिक होऊन स्वाईन फ्लू कमी होईल असं नाही.... आणि मी किंवा माझ्यासारख्या कोणा सामान्य माणसानं कायम या विषयाकडे गांभिर्यानं पाहिल्यानं तो अटोक्यात येईल, असंही नाही... इतकंच ही पोस्ट टाकण्याचा उद्देश....
Tuesday, 11 August 2009
'स्वाईन फ्लू'चा सामना : जेम्स बॉण्ड स्टाईल...
Monday, 10 August 2009
स्वाईन व्हेकेशन...!
Saturday, 8 August 2009
झालो आम्ही एक पुन्हा...
मैत्रीची उघडली 'कवाडे...'
'प्रकाश' नाही आला तरीही
कोण करेल आपुले वाकडे...?
जरी हे घेती आणा-भाका...
स्वार्थ सरता होतील यांच्या...
कपाळी आठ्या... वरती खाका...
Friday, 7 August 2009
'वाडा' चिरेबंदी...?
- खेळांमधून उत्तेजक औषधांचा वापर संपूर्ण मिटावा असं वाटत असेल, तर ख-या खेळाडूंनी खिलाडूवृत्ती दाखवली पाहिजे.
- बीसीसीआय किंवा भारतीय खेळाडू म्हणतात, तितकी ही अट जाचक नाही. एक तर 'वाडा' काय दर वेळी तुम्ही जिथे असाल, तिथं टपकेलच असं नाही... ही केवळ 'प्रिकॉशन' आहे.
- "तुम्ही कुठे आहात?" असा 'वाडा'चा प्रश्न आहे... "तुम्ही जिथं आहात, तिथं तुम्ही काय करताय...?" हे 'वाडा'नं विचारलेलं नाही. त्यामुळे हे खाजगी आयुष्यावर आक्रमण ठरत नाही.
- बीसीसीआयच्या मते खेळाडूंच्या सुरक्षेसाठी हे आवश्यक आहे. पण जेव्हा सामने सुरू असतात त्या वेळी खेळाडूंचे 'वेअरआबाउट्स' जगजाहीर असतात की... मग ते खेळत नसतानाची ठिकाणं समजली तर काय फरक पडणार आहे?
- बाकीच्या बहुतांश खेळांच्या खेळाडूंनी 'वाडा'ची ही अट मान्य केलीय. भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि महेश भूपती यांनीही क्रिकेटपटूंना शहाणपणाचा सल्ला दिलाय.
बीसीसीआयची एकूण ताकद आणि क्रिकेटपटूंचं जनमानसात असलेलं स्थान बघता 'वाडा'ला हे तितकं सोपं जाणार नाही... आयसीसीची ढाल पुढे करून बीसीसीआय या 'वाड्या'ला खिंडार पाडायचा प्रयत्न करणार. आयसीसीदेखील बीसीसीआयच्या ताटाखालचं मांजर असल्याप्रमाणे वागतं... त्यामुळे बीसीसीआयला हे शक्य आहे. पण खेळांमधून चुकीच्या प्रवृत्तींचं उच्चाटन करायचं असेल (आणि ते केलंच पाहिजे...) आणि 'प्ले ट्रू' हे आपलं ब्रिदवाक्य खरं करायचं असेल तर 'वाडा'नं आपला वाडा 'चिरेबंदी' करण्याची गरज आहे...