Tuesday 30 June 2009

एन.एस.जी.@मुंबई


२६ नोव्हेंबरला मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर एन.एस.जी.ची पथकं देशाच्या चारही दिशांना ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला. त्यातलं पहिलं केंद्र अर्थातच देशाची आर्थिक राजधानी, मुंबईत आजपासून ऑफिशियली सुरू होतंय. मरोळमधल्या २३ एकरांच्या जागेत हे केंद्र ऊभं राहिलंय. खरंतर एन.एस.जी.नं दिडशे एकरांची मागणी केली होती... पण मुंबईत जागेची कोण अडचण???? त्यामुळे मग २३ एकरांवर समाधान मानून घेत आज चिदंबरम या केंद्राचं उद्घाटन करतायत.
सध्या एन.एस.जी.चा एकमेव तळ हरियाणामध्ये आहे. तिथून देशाच्या कुठल्याही कोप-यात पोहोचणं सोयीचं नाही, असा साक्षात्कार २६ नोव्हेंबरला झाला आणि मग देशाच्या चारही कोप-यांमध्ये एन.एस.जी.चे तळ असावेत, असा तोडगा निघाला. म्हणजे आता मुंबई, महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये एन.एस.जी.ची गरज भासल्यास मुंबईतले कमांडो त्वरित कारवाईला जाऊ शकतील म्हणे... १ जुलैला हैदराबाद, कोलकाता आणि चेन्नई इथंही असेच तळ सुरू होणार आहेत. म्हणजे अतिरेकी हल्ले किंवा विमान अपहरण यापासून आपला आसेतूहिमाचल देश सुरक्षित झालाय, असं मानायला हरकत नाही, नाही का?
पण प्रश्न असा आहे, की हरियाणातल्या कुठल्यातरी जंगलाच्या कोप-यात जरी एन.एस.जी.चा एकमेव तळ असला, तरी या ब्लॅक कॅट कमांडोंना मुंबईत यायला किती तास लागावेत... चार-पाच-फार फार तर सहा... पण २६ जुलैच्या रात्री अतिरेकी हल्लाच असल्याची खात्री पटल्यावर एन.एस.जी.चे जवान नरिमन हाऊसवर उतरायला २८ची सकाळ उजाडली... म्हणजे हल्ला झाल्यानंतर हे जवान बाईक घेऊन निघाले असते, तरी आधी पोहोचले असते. पण मग उशीर का झाला? हे जवान आळशी आहेत म्हणून... की ते तळावर न थांबता आपापल्या घरी विश्रांती घेत होते म्हणून... की त्यांच्याकडच्या शस्त्रांना गंज चढला होता म्हणून... नक्की काय झालं होतं हे आता सगळ्यांनाच कळलंय. इंडियन एक्सप्रेसनं तर एक वृत्तमालिकाच चालवली याबाबत... एन.एस.जी. पोहोचायला उशीर झाला त्याला कारण होती आपल्या रक्तात भिनलेली बाबूगिरी...
कोणी कोणाला विचारायचं... राज्य सरकारनं की केंद्रानं... विनंती कोणी करायची... नेमके किती सैनिक लागणार... त्यांच्याकडे कोणती शस्त्र असतील तर सोयीचं... हे सगळं दळण दोन रात्री आणि एक दिवस सुरू होतं... त्यानंतर कमांडोंना बसच मिळाल्या नाहीत... हे सगळं कशामुळे, तर आपल्या रक्तात भिनलेली बाबूगिरी... मराठीत ब्युरोक्रसी...
मुंबई-चेन्नई-हैदराबाद-कोलकाता इथं एन.एस.जी.चे तळ उभारले जातायत, हे चांगलंच आहे. पण त्याच बरोबर किमान सुरक्षेच्या बाबतीत आपण बाबूगिरीचा त्याग करायला हवा, असं वाटतं. नाहीतर मुंबईत मरोळला तळ असला काय किंवा हरियाणातल्या कुठल्यातरी जंगलाच्या कोप-यात असला काय, फरक काय पडणार आहे त्यानं??

Friday 26 June 2009

'कपिल' दा जव्वाब नही...!

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा कार्यभार स्विकारून दोन महिने होण्याआधीच कपिल सिब्बल यांनी खुश केलंय. शैक्षणिक धोरणात अमूलाग्र बदल केले पाहिजेत, असं मत मांडत त्यांनी देशात एक मोठं वैचारिक वादळ निर्माण केलंय. खरंतर अनेक शिक्षणतज्ज्ञ गेली अनेक वर्ष अक्षरशः कर्णे घेऊन हेच ओरडतायत. पण कानात कापसाचे बोळे घातल्याप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष करणा-या सरकारांचाच अनुभव आजवर त्यांना आला. आता स्वतः सरकारनंच हा मुद्दा मांडल्यानं त्या दिशेनं किमान १ पाऊल आपण पुढे टाकलंय.
आपल्या शाळा-कॉलेजं म्हणजे कारकून तयार करण्याचे कारखाने आहेत, असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. आपल्याकडे विद्यार्थी नसतात तर परिक्षार्थी असतात... केवळ १०वी, १२वीच्या मार्कांवर बुद्धिमत्ता मोजण्याची आपल्याला सवय लागलीय... त्यामुळे कपिल सिब्बल यांनी मांडलेले मुद्दे आपल्या पचनी पडणार नाहीत... सिब्बल यांना दहावीसाठी एकच बोर्ड करायचंय... त्यात वावगं काय आहे? एसएससी, सीबीएसई हे प्रश्नच निकालात निघतील.... त्यांना १०वीची परिक्षा ऐच्छिक करायचीय... मग त्यात वाईट काय? एखाद्या विद्यार्थ्याला पुढे आर्ट्स, सायन्स, कॉमर्स नसेल करायचं... त्याला चित्रकलेत इंटरेस्ट आहे, त्याला चांगलं गाता येतं... ती छान नाच करते... मग त्याला किंवा तिला १०वी पास होण्याची काय गरज... म्हणजे १०वी, १२वी झाला तरच त्यातली कला विकास पावणार आहे, असं आहे का? उलटपक्षी शाळेतल्या चक्कीत एकदा तो किंवा ती गेले की त्यांच्यातल्या कलेचं कसं पीठ होतं, ते समजतही नाही...
सिब्बल यांनी मांडलेले मुद्दे लगेच-जसेच्या तसे स्विकारले जातील, असं नाही... पण किमान त्यांच्या या वक्तव्यानं त्या दिशेनं विचार तर सुरू झाला... हे कधीतरी व्हायला हवंच होतं. विरोधी पक्षांनी सिब्बल यांच्या विधानाला ठराविक विरोध केलाय. पण सरसकट विरोध करण्यापेक्षा त्यांच्या सूचनांमधल्या त्रुटी दूर करण्यासाठी त्यांना मदत करणं (आणि सिब्बल यांनीही ती मदत घेणं...) खरंतर गरजेचं आहे. कारण सध्याची शिक्षण पद्धत "आयडियल" आहे, असं म्हणणा-या कोणाचीही गणना मूर्खांमध्येच करावी लागेल. विरोधी पक्षांनी "विरोध करायचा म्हणून करायचा", हे धोरण किमान या नाजूक आणि अत्यावश्यक विषयात बाजूला ठेवावं आणि आपल्या शाळा-कॉलेजांचं आणि पर्यायानं भावी पिढीचं चित्र बदलण्याच्या दिशेनं सरकारला योग्य मार्गदर्शन करावं, ही माफक अपेक्षा बाळगायला हरकत नसावी...
बाकी सध्या इतकंच म्हणावसं वाटतंय की....
"कपिल दा जव्वाब नही...."

Wednesday 24 June 2009

एक दिवस आधी...!

उद्या दहावीचा निकाल... दहावी पास झालो त्याची आदली रात्र आजही आठवते. खरंतर पास होईन की नाही ही चिंता नव्हती (ती ११वीनंतर सुरू झालेली काळजी आहे.) पण मार्क किती पडतात, याची काळजी होती. सायन्सला जाता येतंय की नाही, ही दुसरी काळजी... (म्हणजे सायन्स-मॅथ्सची आवड होती म्हणून सायन्सला... आणि त्यावेळी फॅड होतं सायन्सला जाण्याचं म्हणूनही...) अर्थातच रात्रभर झोप लागणं अशक्यच. तेव्हा काही निवडक पत्रकारांना आदल्या दिवशी निकाल कळायचा... (आत्ताचे पत्रकार गरीब बिच्चारे... तेव्हा माझ्या एका मित्राचे पत्रकार वडील निकाल आदल्या दिवशी आणून २-२ रुपयांना तो 'विकायचे.' म्हणजे तिकीटाच्या खिडकीसारखी एक छोटी खिडकी त्यांच्या चाळीतल्या घरात होती. त्याच्या बाहेर रांगच लागायची पालक-मुलांची... एका छोट्या चिठ्ठीवर नंबर लिहून तो आत सरकवायचा आणि रितसर लेखी रिझल्ट घ्यायचा. म्हणजे पेपर काढण्यापेक्षा हा धंदा केव्हाही चांगला, नाही का?) तसाच मलाही निकाल कळला. (मित्राचे वडीलच पत्रकार असल्यानं मला २ रुपये द्यावे लागले नाहीत, हे कळावे.) पण मी यंदा दहावीला बसलो असतो तर माझं काय झालं असतं माहित नाही... आता कॉम्पिटिशन किमान १०० पटींनी वाढली असेल. बहुदा आजच्या रात्री माझा हार्टफेलच झाला असता... म्हणजे एका-एका मार्कानं प्रवेश हुकत असले, तर काय करायचं. (आणि त्यात पुन्हा ९०:१०, ऑनलाईनचा जांगडगुत्ता... देवा रे देवा!!!!) म्हणजे आता मी बहुदा आर्ट्सला जाण्याच्या तयारीतच झोपलो असतो.
तर सांगायचा मुद्दा हा, की उद्या दहावीचा निकाल आहे. काही जणं पास होतील... काही जणं फेल... ज्यांना पास होण्याची अपेक्षा आहे, ते फेल होणं शक्य आहे. ज्यांना पहिलं येण्याची अपेक्षा आहे, ते दुसरे-तिसरे येणंही शक्य आहे. ज्यांना नापास व्हायची खात्री आहे, त्यांना सुखद धक्काही बसू शकतो... म्हणून उद्याच्या निकालाकडे डोळे लागलेले विद्यार्थी आणि त्यांचे आई-बाबा-ताई-दादा-आजी-आजोबा यांना सांगावसं वाटतंय की दहावीचं वळण हे महत्त्वाचं असलं तरी हे शेवटचं वळण आहे. यापुढे आयुष्यच नाही, असं मानण्यात अर्थ नाही. (आणखी दोन वर्षांनी बारावीलाही तसंच वाटणार आहे.) त्यामुळे अपयशानं हुरळून किंवा पराभवानं खचून जाण्याचं कारण काय? इच्छा एकच की किमान यंदा तरी परवाच्या पेपरमध्ये आत्महत्यांच्या बातम्या वाचायला लागू नयेत. (ही आशा भाबडी आहे, हे ही खरंच...!)
निकालाच्या प्रतिक्षेत असलेल्या-नसलेल्या सगळ्यांना मनापासून "ऑल दि बेस्ट!"

Tuesday 23 June 2009

नवलाख तळपती दीप विजेचे जेथ...!

देशातल्या सगळ्या राज्यांच्या ऊर्जामंत्र्यांची परिषद नवी दिल्लीत झाली. केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या बैठकीचं उद्घाटन केलं. महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री सुनील तटकरे यांनी पुन्हा एकदा तेच ते जुनं आश्वासन देऊन टाकलं. २०१२पर्यंत देश भारनियमननुक्त करण्याचा संकल्प या परिषदेत सोडण्यात आलाय आणि त्यात महाराष्ट्र अर्थातच(?) आघाडीवर असेल, असं तटकरे यांनी जाहीर करून टाकलंय. (साम मराठीकडे तसा त्यांचा बाईट आहे...) त्यांचं हे विधान ऐकल्यावर हसावं की रडावं तेच समजत नाहिये. श्वास घेण्याची जशी जन्मजात सवय होते, तशी लोडशेडींगची महाराष्ट्राला सवय झाल्ये. लोडशेडींग हे महाराष्ट्राच्या रंगपेशी (जीन्स)मध्ये प्रोग्रॅम झालंय... एखाद दिवस लाईट गेले नाहीत ठरलेल्या वेळी तर लोकं फोन करतात एमएसईबी... सॉरी 'महावितरण'च्या ऑफिसात.... असा हा महाराष्ट्र म्हणे लोडशेडींगपासून मुक्त होणार.... २०१२पर्यंत लोडशेडींग संपवण्याचं स्वप्न तटकरेंनी दाखवणं यात एक मेखही आहेच... याचाच अर्थ २०१२साली ते किंवा (राष्ट्रवादी काँग्रेसची परंपरा पाहता) त्यांच्या पक्षाचं कोणीतही ऊर्जामंत्री पाहिजे... म्हणजे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला (किंवा फक्त राष्ट्रवादीला... डिपेंड्स अपॉन 'स्वबळावर') सत्ता द्यावी, असा छुपा अर्थ आहे. हे म्हणजे 'गाढवाच्या पाठीवर बसला लुकडा... काठीला बांधला पावाचा तुकडा...' अशातली गत झाली. पण महाराष्ट्रातली जनता आता गाढव राहिलेली नाही... काठीच्या टोकाला दोरी बांधून समोर पावाचा तुकडा बांधलाय, हे तिला कळायला लागलंय. ही झाली एक बाजू... पुन्हा राष्ट्रवादी-काँग्रेसला निवडून दिलं नाही, तर भाजप-शिवसेनेच्या हातात सत्ता द्यावी लागेल, ही भिती आहेच. मनसे सत्ता सांभाळण्याइतकी (अजून) मॅच्युअर झालेली नाही, असं वाटू शकतं. त्यामुळे तीही शक्यता मावळली... आता इतका सगळा द्राविडी प्राणायाम करण्यापेक्षा लाईट गेलेले काय वाईट, असा एक प्रश्न सहज मनात येऊन जातो. लोडशेडींग नसतानाही खेड्यापाड्यांमध्ये दोन-दोन दिवस लाईट नसायचेच... शहरांमध्येही वेळी-अवेळी लाईट जायचेच... आत्ता परिस्थिती उलट थोडी चांगली आहे. आता लोडशेडींगच्या वेळा सोडून (काही टेक्निकल प्रॉब्लेम आला नाही तर) लाईट जात नाहीत. (टचवूड...) आणि आता कनिष्ठ मध्यमवर्गही आता इन्व्हर्टर नावाचा मॅजिक बॉक्स बाळगून असतो... बॅटरी डिस्चार्ज होण्यापूर्वी लाईट आले म्हणजे झालं... (परवाच कुठेतरी ए.सी. चालवणा-या इन्व्हर्टरची जाहिरात पाहिली... असो बापडी!) मग संवायचं कशाला लोडशेडींग... मिस्टर तटकरे... तुमची ही घोषणा ऐकून लोक गाजराची पुंगी वाजवत तुम्हाला मतं देतील, असं वाटत असेल, तर एकतर तुम्ही भाबडे आहात किंवा तुमच्या डोळ्यांवर कोणीतरी पट्टी बांधली आहे. असली आश्वासनं आता मतदारांना फसवण्याची शक्यताच नाही. गेल्या निवडणुकीत तुम्ही शेतक-यांना मोफत वीज देण्याचं आश्वासन दिलं होतंत. (तेव्हाचे मावळते मुख्यमंत्री आता केंद्रीय ऊर्जामंत्री आहेत आणि उगवलेले उद्योगमंत्री... याला म्हणतात काव्यात्म न्याय... मराठीत पोएटिक जस्टिस...) त्यामुळे सांगणे इतकेच की लोडशेडींग सुरूच राहू दे... निवडणुकीच्या काळात लोडशेडींग बंद करण्याचीही 'योजना' असेल कदाचित... (उदा. - ठाणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुक झाली होती तेव्हा २-३ महिने आमच्याकडे लोडशेडींग नव्हतं... तेव्हा वीज कुठून आली हे कोणी विचारू नये) पण प्लीज... प्लीज... प्लीज... तसं करू नका... आमच्या सवयी बिघडवू नका... कारण निवडणुक झाल्यावर कोणाचंही सरकार आलं तरी लोडशेडींग होणारच... मग आमची सवय कशाला मोडता उगीच चांगली... २०१२ सालचं नंतर बघू सध्या जे-जे सुरू आहे ते-ते सुरू ठेवावे, ही नम्र विनंती....
ता.क. - नवी दिल्लीत झालेली ऊर्जामंत्र्यांची बैठक ही 'ली मेरिडीयन' या पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली. "उंटावर बसून शेळ्या हाकणे..." म्हणजे काय ते समजलं ना...?

Monday 22 June 2009

पाकिस्तान क्रिकेटवर केमोथेरपी...

शरिराला एकदा कॅन्सर लागला, की तो एक-एक अवयव ग्रासत जातो. पाकिस्तानातल्या दहशतवादाच्या कॅन्सरनं पाकिस्तान क्रिकेटला तसंच ग्रासलंय. (अर्थात भारताला त्रास देण्याच्या पाकिस्तानी व्यसनाचाच हा परिणाम आहे, हे खरंच) ट्वेण्टी-ट्वेण्टी वर्ल्डकप जिंकणं ही त्या कॅन्सरवर झालेली केमोथेरपी आहे, असं म्हणायला हरकत नाही.

पूर्वी पाकिस्तानी अतिरेकाचा फटका फक्त भारताला बसत होता. अगदी खलिस्तानी दहशतवाद्यांपासून ते काश्मीर, बांग्लादेशी घुसखोर, नेपाळमार्गे चालणारी अमली पदार्थांची तस्करी... या सगळ्याचे धागे शेवटी आयएसआयच्या रिळालाच गुंडाळले होते. पाकिस्तान सरकार, अमेरिका-रशिया-चीन यांच्या पाठिंब्यानं आयएसआयनं जन्माला घातलेल्या या भस्मासूरानं या लोकांच्याच डोक्यावर हात ठेवला. मग सगळे खडबडून जागे झाले आणि या भस्मासुराला मारण्याचा कार्यक्रमाला लागले. पण तोपर्यंत व्हायचं ते नुकसान होऊन गेलं होतं. आणि हा भस्मासूर केवळ राजकारणी किंवा सैनिकांचाच बळी घेतोय, असं नाही. तो समोर येईल त्याच्या डोक्यावर हात ठेवतो आणि भस्म करून सोडतो. असाच त्यानं पाकिस्तान क्रिकेटच्या डोक्यावरही हात ठेवलाय. तिथल्या हिंसाचारानं इतकं ऊग्र रूप धारण केलंय, की तिथं खेळायला कोणीच तयार नसतं. ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड तर वर्ल्डकपमधले सामनेही सोडून देतात, दौरा करणं तर लांबच राहिलं. गेल्या एक वर्षात पाकिस्तानचा संघ एकही कसोटी सामना खेळलेला नाही. गेल्या २-३ वर्षांत घरच्या मैदानावर एकही आंतरराष्ट्रीय सामना त्यांना खेळता आलेला नाही. परिस्थिती फारशी आश्वासक नाही, हे माहित असतानाही श्रीलंकेनं खेळावरच्या प्रेमापोटी आपला संघ तिथं पाठवला. पण भस्मासुराकडे स्पोर्टमन स्पिरीट असावं, अशी आशा करणंच मूर्खपणाचं आहे. त्यानं थेट श्रीलंका संघाच्या डोक्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला. काही खेळाडूंना किरकोळ ईजा होण्यावर हे प्रकरण निभावलं, म्हणून ठीक.... (खरंतर आयसीसी वेळापत्रकारप्रमाणे तो भारताचा नियोजित दौरा होता. मुंबईवर झालेल्या हल्ल्यांमुळे आपण तो रद्द केला. अन्यथा या अतिरेक्यांचं टार्गेट टीम इंडियाच होती, हे सूर्यप्रकाशाइतकं खरं आहे.) पण आता येत्या दोन-तीन वर्षांत नेदरलँड, केनिया, आयर्लंड, स्कॉटलंड, बांग्लादेश यांच्यासारखे लिंबू-टिंबूही पाकिस्तानात खेळायला जाणार नाहीत. त्यामुळे येत्या एक-दोन वर्षांमध्ये पाकिस्तान क्रिकेटची अवस्था आणखी वाईट होणार आहे. पीसीबी (पाकिस्तान क्रिकेट बोर्ड) अक्षरशः दिवाळखोरीत निघायच्या बेतात आहे. खेळाडूंचं मानधन द्यायलाही पीसीबीकडे पैसे नाहीत. सामनेच होत नसल्यानं जाहिरातींमधून उत्पन्न नाही. पाकिस्तानी अतिरेक्यांचा सगळ्यात जास्त त्रास सहन केलेल्या (करत असलेल्या) भारतातल्या बीसीसीआयमध्ये लक्ष्मी पाणी भरत असताना शेजारच्या पाकिस्तानात ही अवस्था आहे, हे उल्लेखनीय. ट्वेण्टी-ट्वेण्टी विश्वचषकातला विजय हा पीसीबी आणि पाकिस्तान क्रिकेटला म्हणूनच दिलासा देणारा आहे.
आपल्याकडे एक फार मोठा गट आहे, जो कालच्या सामन्यात पाकिस्तान हारण्याची वाट पहात होता. तिथले अतिरेकी आणि सरड्याची कातडी असलेले राज्यकर्ते यांचा राग हिरवे ट्रॅक-सूट घातलेल्या ११ लोकांवर काढण्याचा हा प्रकार झाला. (अगदी आमच्या घरातही असा गट आहे... बहुमतात आहे....!) पण जे झालं ते क्रिकेटसाठी चांगलं झालं, असं मला वाटतं. कोणत्याही कारणानी खेळाचं नुकसान व्हावं, असं खेळांवर प्रेम करणा-या कोणालाच वाटणार नाही... (किमान वाटू नये...) याचा अर्थ "देशावर प्रेम नाही" असा कोणीच काढू नये. अर्थातच खेळापेक्षा देशावर जास्त प्रेम होतं, आहे आणि असणार. पण म्हणून "वड्याचं तेल वांग्यावर" काढण्यात काय अर्थ आहे. पाकिस्तानी संघ वर्ल्डकप जिंकला त्यानं अतिरेक्यांचा काही फायदा होईल, असं आपल्याकडचे अट्टल पाक-द्वेष्टेही म्हणू शकणार नाहीत. त्यामुळे या अंतिम सामन्याचा निकाल 'श्रीलंका हरली आणि पाकिस्तान जिंकलं' असा सांगण्यापेक्षा 'क्रिकेटचा विजय झाला' असाच सांगावा लागेल.

Saturday 20 June 2009

चला भिजूया सरसावूनी....

सात तारखेला येणार म्हणजे येणार...!
नाही आला का? O.K. आता १२ तारखेला नक्कीच....!!
अरेच्या... अजून नाही? येईल २-३ दिवसांत.....!!!
हवामानखात्याचा कारभार म्हणजे सनी देओलच्या थाटात "तारीख पे तारीख... तारीख पे तारीख...... तारीख पे तारीख.......... तारीख पे तारीख................. " असाच आहे. अखेर तब्बल १३-१४ दिवस वाट बघायला लावून मुंबई-पुण्यात पाऊस आलाच... पाऊस आला म्हणजे का, चार शिंतोडे पडले. पण उन्हानं तापलेल्या धरणीमातेला आणि ती तापल्यानं संतापलेल्या लोकांना हे चार शिंतोडेही 'अमृताचे घनू' वाटले तर त्यात नवल ते काय? येत्या एक-दोन दिवसांमध्ये खर्राखुरा मान्सुन येईल, असं वेधशाळा (पुन्हा एकदा) सांगतेय. तसं झालं तरी मुंबईकरांनी हुरळून जाण्याचं कारण नाही. कारण बॅडन्यूज लगेचच आहे. मुंबईत रस्त्यांच्या दुरुस्तीची कामं अद्याप अपूर्ण आहेत... रेन-ड्रेनेजची सफाई झालेली नाही.... मिठी नदी कशी वागेल महापालिकेला माहित नाही... म्हणजे आता "पाऊस आला...." असं म्हणत भिजत नाचायचं... की "आला एकदाचा.." असं म्हणत शिव्या घालायच्या, अशी मुंबईकरांची द्विधा झाली, तर त्यात नवल नाही. २६ जुलै २००५ची आठवण आजही आपल्याला येते. मुंबईत पाणी हे साठणारच... (किमान मिलन-सब वेमध्ये तर नक्की...) पण २६ जुलैसारखा नक्को रे बाबा, इतकंच मुंबईकरांचं म्हणणं असतं...
ही झाली मुंबईकरांची बाजू... पण पाऊस लेट झाल्यानं शेतीची कामं खोळंबली आहेत, त्याचं काय? पेरणीसाठी शेतकरी सरसावून बसलेत. हल्ली शेतकरी खाली बघतच नसणार... डोळे सतत आकाशाकडे. पाऊस सरासरीइतकाच पडेल, असा विश्वास हवामानखातं देतंय. पण सरासरी आकडेवारी गाठणं आणि वेळेवर पाहिजे तितकाच पाऊस पडणं, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आता १५ दिवस उशीरा आलेला पाऊस तितकाच पडणार असेल, तर आता तो भरगच्च पडणार, असं म्हणावं लागेल. त्यामुळेच दुष्काळापाठोपाठ अतिवृष्टीची भिती बळीराजाला सतावू लागलीय. म्हणजे पाऊस आल्यानंतर पेरणी केली आणि नंतर इतका पडला की बियाणं वाहून गेलं, तर या अन्नदात्यानं कोणाच्या तोंडाकडे पहायचं... नाहीतर पुढल्या वर्षीही पुन्हा बातम्या आहेतच, पॅकेजच्या फासाला लटकून-यांनी आत्महत्या केल्याच्या....
सरकार तर जाऊच दे (ते तसंही पाषाणहृदयी असतं...), पण सामाम्य माणसालाही शेतक-यांच्या आत्महत्येच्या बातम्या वाचून कंटाळा आलाय. कितीदा तेच-तेच वाचणार? म्हणजे शेतक-याचं नाव-गाव आणि मरण्याची पद्धत बदलली तर बाकीचा तपशील तोच असतो. हेडींग वाचलं तरी पुरतं... सगळी बातमी कशाला वाचायला पाहिजे... (त्यापेक्षा शायनी आहूजाची बातमी वाचूयात सग्गळीच्या सग्गळी...) "रोज शेतकरी मरे... त्याला कोण रडे.... " अशी आपली धारणा झालीय. म्हणूनच आता या बळीराजाला कोणाकडून कसलीच आशा नाही... (दोन अश्रुंचीही...?) त्याचा तारणहार आता एकच आहे... तो उशीरा आलाय पण आलाय... (पंतप्रधानांच्या पॅकेजसारखं त्याचं नाही...) त्यानं आता यावं... नीट रहावं... इतकीच त्याची इच्छा.... म्हणजे कुसूमाग्रजांच्या शब्दांत सांगायचं, तर त्यानं 'माहेरवाशीण पोरीसारखं यावं... चार दिवस नांदून, आई-बापाला सुखी करून जावं....' पण 'कणा' या कवितेच्या हिरोसारखी अवस्था करून जाऊ नये, इतकीच इच्छा...!

Friday 19 June 2009

गाडीत भेटलेले गुरू!

घर बदलापूरात असल्यानं हैदराबादेतून मुंबईत आल्यानंतर लोकलचा प्रवास न टाळता येणारा. त्यामुळे रोज दोन-तीन तास गाडीतच जाणं ओघानं आलंच. गाडीतला सगळ्यात मोठा उद्योग म्हणजे वाचणं... आणि पुस्तक जवळ नसेल तर गाणी ऐकणं किंवा बरोबरच्या अनोळखी लोकांशी बोलणं. या बोलण्यातूनच मग अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. काही गोष्टी तर डोळ्यात अंजन घालणा-या ठरल्या. गेल्या ६-७ वर्षांमध्ये गाडीत भेटलेल्या काही गुरूंविषयी थोडंसं...
*********
श्री. पाटणकर... पहिलं नाव आठवत नाहिये. वय पन्नासच्या आसपास. त्यांना तोंडाचा कर्करोग झाला होता. त्यावर उपचार सुरू होते आणि त्याच साठी ते परळला टाटा हॉस्पिटलमध्ये जात होते. त्यांची सौभाग्यवती बरोबर होतीच. रेल्वेमध्ये नोकरी करत असताना पाटणकरांनी स्वतःचं घर, थोडी जमीन असं सगळं जमवलं होतं. काडीचंही व्यसन नसताना त्यांना कॅन्सर झाला होता आणि खालचा सगळा जबडा काढून टाकावा लागला होता. शरिरातली ती पोकळी झाकण्यासाठी ते तोंडाला रुमाल बांधत असत. त्यांना नवा कृत्रिम जबडा बसवावा लागणार होता. हा खर्च अफाट होता. पण न डगमगता पाटणकर उभे होते ते त्यांच्या पत्नीच्या धीरामुळे... सहज बोलता बोलता त्या म्हणाल्या, "की आजवर आयुष्यात सगळं मिळालंय. सगळी सुखं-चैन झाली. मग देव म्हणतो बॅलन्स करायला पाहिजे. म्हणूनच ह्यांना हा त्रास झाला. हे केवळ बॅलन्सिंग आहे. तावडीचा दांडा एकदा सरळ झाला की सगळं नीट होईल." त्या माऊलीचा आशावाद आठवला की अजूनही अंगावर काटा येतो....
*********
प्रामुख्यानं हार्बरनं प्रवास करताना गोवंडी किंवा तत्सम कुठल्यातरी झोपडपट्टीत राहणारी मुलं गाडीतून उगीच इकडे-तिकडे करताना दिसतात. खूप दिवस डोक्यात होतं या मुलांशी बोलायचं... एकदा (धीर करून) त्यातल्या एकाला धरलाच. सुरुवातीला तो काही बोलायला तयारच होईना. शेवटी त्याला खूपदा विचारल्यावर त-त, प-प करत हिंदीतून बोलायला लागला. तो बंगली होता. (बांग्लादेशीही असू शकेल, कोणास ठाऊक) ही पोरं काय करतात उगीच चेंबूर ते मानखूर्द प्रवास करून, ही शंका होतीच. त्याला तसं विचारलं तर त्यानं सांगितलेलं की "ऐसेही... घरपे बाप दारू पी कर मारता है... तो दिनभर क्या करनेका..." हे कारण ऐकल्यावर काहीसा निराशच झालो सुरूवातीला. ही मुलं चो-या-मा-या करत असतील, अशी शंका होती. पण तसलं काहीच नव्हतं. पण मग नीट विचार केल्यावर कळलं की अरेच्या... हे तर उद्याचे भाई किंवा दादा आहेत. यातलाच एखादा डॉनही होऊ शकेल. एकीकडे एसएससी-सीबीएसई वाद सुरू असताना या मुलांकडे कोणाचच लक्ष नाही. बालमजुरीच्या प्रश्नावर कृती न करता गळा काढणा-यांनी या मुलांकडेही बघावं... ते मजुरीही करत नाहीत. सुशिक्षित बेकारांचा प्रश्न सोडवताना या भावी अशिक्षित बेकारांचं आपण काय करणार आहोत, तेही ठरवावंच लागेल.
*********
एरवी उल्हासनगरला गाडीतली गर्दी कमी होते, हा नेहमीचा अनुभव. पण सकाळच्या वेळी खोपोली लोकलनं मुंबईहून बदलापूरकडे आलं तर उल्हासनगरला गाडी पुन्हा भरते. बरेच जण आपल्याला न कळणा-या भाषेत (अर्थातच सिंधीत) खूपसं बोलत असतात. त्यांच्याकडे मोठमोठ्या निळ्या पिशव्या असतात. एकतर ही ऑफिसची वेळ असल्यानं मुंबईकडे जाण्यासाठीच जास्त गर्दी असते. मग उल्हासनगरात पुन्हा इतके लोकं कसे येतात... एकदा कधीतरी समजलं की हे लोक उल्हासनगरात बनवलेला माल पिंपरीला नेतात. (पिंपरीमध्येही सिंधी लोकसंख्या खूप मोठी आहे.) मग तिथून हा माल पुण्याच्या बाजारात जातो. मग माल पोचवण्याच खर्च वाचावा आणि तो पुण्यात अधिक स्वस्तात मिळावा म्हणून उल्हासनगरचे हे "उद्योजक" स्वतः माल घेऊन खोपोली आणि तिथून बसनं पिंपरीला जातात. आपल्याला समोरच्या डेअरीत जायचं तरी चालत जायचा कंटाळा येतो कधी-कधी... उल्हासनगरच्या मालाला 'मेड इन यु.एस.ए.' असं म्हणून चिडवतोही आपण... पण आपल्याला त्यांची या मागची मेहनत, चिकाटी, अपार कष्ट करण्यीच तयारी आणि अर्थातच कल्पकता कधीच दिसत नाही.
*********
अशी अनेक उदाहरणं आहेत. काहींचे तपशील विस्मृतीत गेल्येत. काही घटनाच विसरायला झाल्या असतील. पण ही उदाहरणं ठळकपणे लक्षात राहिली, त्यामुळे ती लगेच आठवली, इतकंच.... पण गुरू हे केवळ मठातच भेटतात, असं नाही. ते कुठेही अगदी लोकलच्या गर्दीतही भेटू शकतात, हे मात्र यावरून सिद्ध होत नाही का?

Thursday 18 June 2009

...नाही तर पुन्हा इशारा देईन...!


पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा रशिया दौरा गाजला तो त्यांनी पाकिस्तानच्या अध्यक्षांना पत्रकारांसमक्ष 'झाडल्यामुळे...' ते म्हणे फोटोसाठी पोझ देतानाच म्हणाले की मुंबई हल्ल्यांचा नीट तपास करा... अतिरेक्यांना आश्रय देऊ नका इत्यादी... इत्यादी... इत्यादी....

हे वाचल्यावर कोणत्याही भारतीय माणसाचं ऊर अभिमानानं भरून न येईल, तरच नवल. काय आमच्या पंतप्रधानांचा करारी बाणा... पाकिस्तानच्या अध्यक्षांना कम्युनिस्ट रशियात जाऊन तिथल्याच पत्रकारांसमोर चार शब्द सुनवायचे म्हणजे त्याला काय कमी डेअरिंग लागतं... आजवर कोणत्याच पंतप्रधानानं असा पराक्रम केला नसेल. म्हणजे वाजपेयींनी तेव्हाचे अध्यक्ष(?) परवेझ मुशर्रफ यांना आग्र्यात इतकं ऐकवलं होतं म्हणे की ते चिडून निघूनच गेले पाकिस्तानची बस पकडून... पण ते ताजमहालाच्या साक्षीने... साक्षात रशियातल्या एका आड-शहरात (लाल बहाद्दुर शास्त्रींची आठवण न काढता...) पाकिस्तानच्या अध्यक्षांची झाडाझडती घ्यायची म्हणजे काय धैर्य ते....!!!

मुंबईत झालेल्या अनेक स्फोटमालिका..., थेट संसदेवर हल्ला..., काश्मिरातला दहशतवाद..., हैदराबाद, अहमदाबाद यासारख्या शांत शहरांमध्ये स्फोटांची साखळी... आणि या सगळ्यावर कळस करणारा २६ नोव्हेंबर २००८चा मुंबई हल्ला... भारतात झालेल्या कुठल्याही मोठ्या हल्ल्यांचे धागेदोरे (अपवाद वगळून) पाकिस्तानात पोहोचतात, हे आपल्या देशातलं शेंबडं पोरही सांगेल. "आता पाकिस्तानला सोडणार नाही... आमची सहनशक्ती संपली... " या मंत्र्यांच्या भाषणांनी आता 'आर-पार-की-लडाई' असं भाभडे लोक समजले. पाकिस्तानला आपल्याकडे अतिरेकी आहेत, हे सिद्ध करण्यासाठी भारताकडून पुरावे हवे होते. हल्ला करणारा एक अतिरेकी जिवंत सापडूनही आपल्या करंट्या सरकारनं हे पुरावे द्यायला बराच वेळ घेतला. बरं, दिले-तर-दिले पुरावे उशीरा... लागला असेल गोळा करायला वेळ... पण ते दिले मराठी आणि हिंदीत... बहुदा हे पुरावे बरेच दिवस पाकिस्तानतल्या 'हिरव्या फिती'त पडून असतील. कारण या पुराव्यांची भाषा आपल्याला समजत नाहीये, हे देखील त्यांना बरंच उशीरा कळलं. आता पाकिस्ताननं या कागदपत्रांचा इंग्रजी अनुवाद मागवलाय. (एकीकडे केवळ वकील-पोलिसांचं बोलणं ऐकून म्हणे कसाब मराठी शिकलाय... आणि पाकिस्तान सरकारला मराठी येणारा एकही अनुवादक सापडत नाही...? ते असो...) आता तो अनुवाद होणार आणि पाकिस्तानला देणार. मग ते तपास सुरू करणार. ('हिरव्या फिती'चा कारभार सांभाळून....) तोपर्यंत कथित नजरकैदेत ठेवलेल्या अतिरेक्यांना मोकळं सोडलेलं असणार... मग पुन्हा वेळखाऊपणा होणार.... हे असंच सुरू राहणार....

अमेरिकेनं शेपटीवर पाय दिल्यानंतर तिच शेपूट पायात घालून करारी परवेझ मुशर्रफ आपणच जन्माला दिलेल्या 'तालिबान बाळा'चा बळी घ्यायला तयार होतात. पण भारताला त्रास देणारे अतिरेकी मात्र 'जिहादी' असतात. (पाकिस्तानातल्या अतिरेक्यांनी आपल्याच धर्मग्रंथांचा इतका विपर्यास केलाय, ती जगात कोणी अन्यधर्मियांच्या ग्रंथांचाही केला नसेल...)

अमेरिकेतल्या पोलिस खात्याबद्दल एक गोष्ट प्रचलित आहे. एकदा एक खुनी माणूस एका पोलिस अधिका-यासमोर येतो... पोलिसाकडे पिस्तुल असतं आणि तो खुनी मात्र निःशस्त्र असतो. तो पळून जाण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिस त्याच्यावर बंदुक रोखतो आणि म्हणतो, "थांब... पळून जाऊ नकोस... नाहीतर...!!!" खुनी विचारा थांबतो. पण थोडं डेअरिंग करतो आणि त्या पोलिसाला विचारतो, "काय करशील?" त्यावर तो पोलिस अधिकारी म्हणतो, "नाही तर पुन्हा असाच इशारा देईन...."

आपल्या केंद्र सरकारचं पाकिस्तानबाबत धोरण नेमकं असंच आहे....

Wednesday 17 June 2009

मध्य रेल्वेची "शंभरी...!"


आज सकाळी पेपरच्या आतल्या पानावर एक बातमी वाचली. मध्य रेल्वेनं म्हणे काल १०० टक्के वेळेवर येऊन दाखवलं... (बातमी पहा) खरोखर या पेपरवाल्यांना काहीच कळत नाही. इतकी महत्त्वाची बातमी आतल्या पानावर कुठेतरी फेकून द्यायची, म्हणजे काय? एकीकडे म्हणायचं, 'माणूस कुत्र्याला चावला' तरच ती बातमी... आणि दुसरीकडे मध्य रेल्वे वेळेवर धावली, तर त्याला आतल्या पानात कुठेतरी जागा द्यायची... याला काय अर्थ आहे. मराठीत आता एक नवी म्हण रूढ झाल्ये. "रोज म.रे. (म्हणजे आपली मध्य रेल्वे) त्याला कोण रडे..." अशी ख्याती असलेल्या या सगळ्यात मोठ्या सार्वजनिक वाहतुक यंत्रणेचा हा विक्रमच आहे.
म्हणजे कल्पना करा की हा शंभर नंबरी विक्रम मध्य रेल्वेनं रोज-रोज (अगदी १ इंच पाऊस झाल्यावरही...) केला तर काय होईल? अनर्थ ओढवेल अनर्थ.... म्हणजे बॉसला "गाडी लेट झाली" असं सांगून मैत्रिणीबरोबर चौपाटीवर फिरायला जाणं मुश्किल.... बायकोला "ओव्हरहेड वायर तुटली" असं सांगून बारमध्ये बियरच्या बाटल्या रिचवणं महाकठीण.... सासूबाई येणार असतील तर "मोटरमनचा संप आहे, येऊ नका..." असं सांगायची चोरी... "रुळांवर पाणी साचलंय... काल चालत घरी गेलो..." असं सांगून दुस-या दिवशी दांडी मारणं अशक्यच... अराजक माजेल. मग ही बातमी महत्त्वाची नाही का, तुम्हीच सांगा??
पण हे लिहिता-लिहिता वाटलं की आतलं पान-तर-आतलं पान.... बातमी तर छापली... म्हणजे मध्य रेल्वे वेळेवर धावली एखाद् दिवस तरी, म्हणजे ही "माणूस कुत्र्याला चावला..." या कॅटेगरीतलीच बातमी वाटली असणार छापणा-या प्रतिष्ठित वर्तमानपत्राला, नाही का? आणि पुन्हा ही बातमी छापताना त्यात मध्य रेल्वे लेट येते (म्हणजे काल सोडून....!) त्याची शंभर कारणं दिली आहेत. म्हणजे लोकं चेन (गाडीतली... गैरसमज नको!) ओढतात... (उगीचच), ओव्हरहेड वायर तुटते (उगीचच), सिग्नल बंद पडतात (उगीचच), लोक रेल-रोको करतात (उगीचच) त्याला मध्य रेल्वे काय करणार? रुळांवर पाणी साचतं, मालगाडी घसरते, इंजिनं फेल होतात त्याला मध्य रेल्वे काय करणार? असा एकूण या बातमीचा सूर आहे. ((दुस-या एका प्रतिष्ठित दैनिकानं ही बातमी फारसा मुलामा न देता दिल्ये. (बातमी पहा) या दैनिकानं मध्य रेल्वेवर किती अन्याय केलाय, याची कल्पनाच नाही करवत...))

तात्पर्य काय? तर रोज "म.रे." असं नाहीये... आता उद्या-परवा केव्हाही बदलापूर-टिटवाळा-कल्याण-डोंबिवली-कळव्यात गाडीत चढता नाही आलं... गाडी लेट झाली आणि लेटमार्क लागला... किंवा आता पावसाळा आलाच आहे... तेव्हा.... (सूज्ञ मुंबईकरांना अधिक सांगणे न लगे...!) असं काहीही झालं तरी सोमवार, दि. १५ जून २००९ हा सुवर्णदिन लक्षात ठेवायचा... "हाच तो दिवस ज्या दिवशी मध्य रेल्वे १०० % वेळेवर धावली होती..." असा जप १०० वेळा 'मनातल्या मनात' करायचा (मोठ्यानं केलात तर मार खाल कोणाचातरी...) आणि मुकाट्यानं दरवाजात... माफ करा, डोअरला लटकून मुसळधार पावसात भिजत ऑफीस गाठायचं... जय महाराष्ट्र... जय मुंबई... जय म.रे...

Tuesday 16 June 2009

महेंद्रसिंग धोनी आणि लालकृष्ण आडवाणी
या पोस्टचं टायटल वाचून आश्चर्य वाटलं असेल किंवा दोन वेगवेगळी टायटल्स चुकून एकत्र आली, असं वाटून गेलं असेल. पण मुद्दामच हे पोस्टचं नाव असं दिलंय. एक तर मी या लेखात माझ्या परीनं या दोघांची तूलना करण्याचा प्रयत्न करणा आहे. (आणि दुसरं म्हणजे असली आर्बिट टायटल वाचल्यावर बरेच जण क्युरिओसिटीपोटी पोस्ट वाचतात....) असो... महेंद्रसिंग धोनी भारतीय संघाचा कर्णधार... लालकृष्ण आडवाणी पार्टी विथ डिफरन्सचे कर्णधार... परवाच क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्स मैदानावर भारताचा दारूण (खरं तर तीन धावांचा पराभव दारूण नव्हे... पण परिणाम दारूणच झाल्येत ना?) पराभव झाला. गेल्या महिन्यात अशाच 'मेन इन सॅफ्रॉन'चा देशभर पराभव झाला होता. आता धोनीला जशा शिव्या घातल्या जातायत तशाच त्या आडवाणींनापण दिल्या जातायत... धोनी हा अधिक लाडका असल्यामुळे असेल कदाचित, पण त्याच्याप्रमाणे आडवाणींच्या प्रतिमा भाजप कार्यकर्त्यांनी अजूनतरी जाळलेल्या नाहीत. पराभवाला कोणीच वाली नसतो... त्यामुळे भारतीय संघ आणि संघाची भारतीय जनता पार्टी यांच्या पराभवाचे वाली अनुक्रमे धोनी आणि आडवाणीच आहेत... धोनीचे निर्णय चुकले असतील... त्यानं जडेजाला वर पाठवलं असेल... त्यानं टॉस जिंकून बॉलिंग घेतली असेल... त्यानं बॅटिंगल्या आल्यावर बॉलला आभावानंच बॅट लावली असेल... आडवाणींनीही स्वखुषीनं किंवा अपरिहार्यता म्हणून मोदींना वर पाठवलं असेल... किंवा वरूण गांधीच्या खांद्यावर बंदुक ठेऊन हिंदुत्त्ववादी गोळीबार केला असेल.... म्हणून काय झालं? पराभवाला हे दोघंच जबाबदार आहेत, असं कुठंय.... स्वतः जडेजा, सगळे बॉलर्स, सगळे फिल्डर, सगळे बॅट्समन, मोदी, वरूण, जेटली, स्वराज, राजनाथ यांची काहीच चुक नाही असं आहे का? मग क्रिकेट हा धर्म मानणा-या देशात केवळ १५ दिवसांपूर्वी टीम इंडियाचा तारणहार वाटणारा धोनी इतका कसा मनातून उतरतो आणि महिन्याभरापूर्वी आडवाणी हेच वाजपेयींचे उत्तराधिकारी मानणारे भाजपतले ज्येष्ठ नेते अचानक त्यांच्या माथी पराभवाचं खापर का फोडतात? अर्थात क्रिकेट आणि राजकारणात असले प्रश्न विचारायचे नसतात, हे मला कळतं. कारण टिव्हीच्या दुकानात उभं राहून जो मॅच बघतो, तो खरा कॉमेंटेटर असतो आणि मतदार मतदानयंत्रातून मूकपणे जे सांगतो, तेच खरं असतं. बाकी सब झूट... आणि मग पुन्हा एकदा पराभवाचा वाली शोधण्याचा प्रयत्न हारलेल्या संघांमधले (म्हणजे टीम या अर्थी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नव्हे....!) लोक करतात. धोनी आणि आडवाणींना टार्गेट करणं हे त्याचच उदाहरण. पण यात एक सूक्ष्म फरक आहे. निदान धोनीच्या संघातल्या कोणी अजून तरी स्पष्टपणे त्याच्यावर तोंडसूख घेतलेलं नाही. भारतीय क्रिकेट संघ हा भारतीय जनता पार्टीपेक्षा अधिक परिपक्व आहे, असं आता म्हणायचं का, ते तुम्ही ठरवा.