Saturday 28 November 2009

भरत्या-पक्या-अम्या-चिनूची गोष्ट...

आमच्या सोसायटीत तशी पोरं फार... पण त्यातले चार नग म्हणजे भरत्या, पक्या हे दोन शेजारी, त्यांच्या वरच्या मजल्यावर राहणारा चिनू आणि दुसऱ्या विंगमध्ये राहणारा अम्या... या चौघांची एक छोटी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. आधी त्यांची ओळख करून देतो...
अम्या... आमच्या सोसायटीतल्या पोरांचा दादा. त्याला सगळे टरकून असतात. वयानं मोठा आणि श्रीमंत बापाचा पोरगा असल्यानं सगळ्या सोसायटीत त्याचा वचक आहे. त्याचं घरही इतरांपेक्षा मोठं...
चिनू... हा चिनू म्हणजे त्यातल्या त्यात अम्याशी पंगा घेणारा... त्याचं घरही मोठं पण घरात त्याच्या बाबांची सत्ता चालते... एका अर्थी घरात हुकूमशाहीच आहे म्हणा ना! सोसायटीत घर असून घराभोवती मोठ्ठी भिंत, असा त्यांचा घरचा थाट... याचं आणि भरत्याचं पटत नाही... पक्याची आणि चिनूची मात्र घट्ट मैत्री.
पक्या सोसायटीतलं सगळ्यात लहान कार्टं... पण अतिशय वाह्यात... भरत्याच्या खोड्या काढण्यात त्याला सगळ्यात जास्त इंटरेस्ट... त्याला चिनूची जोरदार फूस... घरची गरिबी असूनही चिनूच्या पैशांवर माज करण्यात पक्याचा हातखंडाच...
आपल्या गोष्टीतलं शेवटचं पात्र म्हणजे भरत्या... याचं घर पण मोठ... पैसाही बऱ्यापैकी, म्हणजे मध्यमवर्गातलं कुटुंब आहे म्हणा! सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुसंस्कृत घरातला असल्यानं सगळ्यांशी जमवून घेण्याचा याचा स्वभाव... आता याच्या या स्वभावाचा पक्या आणि चिनू गैरफायदा घेतात... पण हा आपला शांत असतो... पक्या तर याच्या घरात आपटीबार फोडतो दिवाळी-बिवाळी नसताना... तरीही भरत्या फक्त त्याला दम देतो, आणि सोडून देतो... भरत्याचं चिन्याशी एकदा आणि पक्याशी तीन वेळा जोरदार भांडण पण झालं होतं... अगदी मारामारीही झाली होती... पण शेवटी घरचे मधे पडल्यावर ते मिटलं... पुन्हा सगळ्यांशी मैत्री करायला भरत्या तयार... असा हा साधा-भोळा!
तशा या चौघांच्या किंवा यातल्या दोघा-तिघांचे किस्से खूप आहेत सोसायटीतले.. पण मी गेल्या दोन-तिन दिवसांत झालेल्याच गोष्टी सांगणार आहे...
******************
दोन-तिन दिवसांपूर्वी अम्या चिनूकडे खेळायला गेलेला... अम्या सगळ्यांमध्ये मोठा असला तरी नाही म्हंटलं तरी थोडासा चिनूला टरकतोच... त्यामुळे त्याच्याकडे गेल्यावर अम्या शहाण्यासारखा वागतो... तिथं गेल्यावर अम्यानं चिनूचं जोरदार कौतुक केलं... चिनूचे हुकूमशहा बाबा समोर होतेच... त्यामुळे तर अम्याला आणखीनच कंठ फुटलेला 'चिनू स्तुती' करायला... कौतुक करून अम्या कुठला थांबतोय..! त्यानं चिनूला सल्ला देऊन टाकला की भरत्या आणि पक्यातलं भांडणं सोडवण्याचा प्रयत्न कर... आता चिनू प्रयत्न करणार म्हणजे पक्याला मदत करून भरत्याला गप्प करण्याचा प्रयत्न करणार... त्यामुळे भरत्याला हे समजल्यावर तो जाम खवळला...! आता शांत असला तरी राग येणारच ना?
********************************
हे घडलं त्याच्या दुसऱ्याच दिवशी अम्यानं भरत्याला घरी जेवायला बोलावलेलं... अम्या राजकारणात पक्का मुरलेला होता... चिनूच्या घरी झालेल्या गोष्टीमुळे भरत्या दुखावलाय, हे अम्याला पक्कं ठाऊक होतं... त्याला खुष करणं गरजेचं होतं... म्हणून घरी नेहमी सगळे इंग्रजी बोलत असूनही अम्यानं भरत्याला चक्क मराठीत 'ये... ये... ये... तुझं स्वागत आहे...' असं म्हंटलं. भरत्या खुष... त्यानंतर भरत्याच्या बाबांचा आपल्या पाकिटात ठेवलेला फोटोपण अम्यानं दाखवला आणि 'तुझे बाबा कस्सले सॉलिड आहेत... आपण जाम मानतो त्यांना' असंही सांगून टाकलं... झालं भरत्या विरघळला... त्याला वाटलं की अम्या आपलाच खरा मित्र आहे... चिनूच्या घरी तो जे बोलला ते चुकून होतं... पक्याला अद्दल घडवायचा अम्याचा 'इरादा पक्का' आहे, याचीही भरत्याला खात्री पटली... अम्याच्या घरी पोटभर जेऊन भरत्या आपल्या घरी आला... आणि कोल्हापूरी चादर घेऊन गाssssढ झोपी गेला...!!
*****************************************************************

Wednesday 4 November 2009

'वन्दे मातरम्'चं राजकारण!

'जमियत उलेमा ए हिं' या मुस्लिम उलेमांच्या संघटनेनं देवबंदच्या परिषदेत फतवा काढला की म्हणे मुस्लिमांनी 'वन्दे मातरम्' म्हणू नये... काचं कारण देण्यात आलंय की मातृभूमीला वन्दन केल्यानं मुस्लिमांचा एकेश्वरवाद शिल्लक रहात नाही... कारण अल्लाशिवाय कोणासमोरही नतमस्तक व्हायचं नाही, असं या फतव्यात म्हंटलंय. दुसरीकडे वन्दे मातरम् न म्हंटल्यामुळे मुस्लिमांना देशाबद्दल प्रेम नाही, असं मानण्याचं कारण नसल्याचंही उलेमा ए हिंदनं स्पष्ट केलंय. मुळात प्रश्न वन्दे मातरम् म्हंटल्यामुळे कोणी देशभक्त ठरतो, असं मानणंच मूर्खपणाचं आहे. देशभक्ती ही एखादं गीत म्हणणं-न म्हणण्यावर ठरवणं हे मूर्खपणाचंच ठरेल... नाहीतर पाकिस्तानात जाऊन प्रशिक्षण घेतलेल्या अतिरेक्यांनी कधीतरी पंजाब-काश्मीरातल्या शाळेत वन्दे मातरम्, जण गण मन... म्हंटलं असेलच की...! त्यामुळे जामियत उलेमा ए हिंदनं हे कोणाला बजावलंय माहित नाही... ते असो...
इथं प्रश्न असा आहे, की वन्दे मातरम् मुस्लिमांनी का नाही म्हणायचं... मुस्लिम धर्मात एकच देव असला तरी निरनिराळ्या दर्ग्यांवर मुस्लिम भाविक नतमस्तक होतातच की... ज्यांचे हे दर्गे असतात, त्यांना कोणी निश्चितच 'देव' मानत नसणार... पण तिथं माथं टेकलं जातंच ना..? मग तुमच्या मातृभूमीसमोर 'व्हर्चुअल नतमस्तक' झालं, तर तुमचा धर्म भ्रष्ट होईल, असं का मानता? जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला मुस्लिम धर्म एक साधं बंगाली गीत म्हंटल्यामुळे भ्रष्ट होईल, असं मानण्यात काय अर्थ आहे.
आता विषय असा आहे, की वन्दे मातरम् का म्हणायचं...? मुळात १८५७च्या स्वातंत्र्यासंग्रामाचं वन्दे मातरम हे स्फुरणगीत ठरलं... देशात स्वातंत्र्यासाठी झालेला हा पहिला-वहिला नियोजित उठाव... हा उठाव फसला असता तरी त्यानंतर थेट १९४७ला देश स्वतंत्र होईपर्यंत हजारो क्रांतीकारकांना वन्दे मातरम् या गीतानं तेज दिलंय... १८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामात देशभरातले अनेक संस्थानिक-राजे आणि अन्य स्वातंत्र्यसैनिक सहभागी होते... मात्र या सगळ्यांनी या उठावाचं नेतृत्व दिलं होतं दिल्लीचे ज्येष्ठ राज्यकर्ते बहाद्दुरशहा जफर यांच्याकडे... याचा अर्थच असा की 'वन्दे मातरम्' या गीतानं भारलेले लढवय्ये एका मुस्लिम राजाच्या नेतृत्वात लढले होते... मग आता दारूल उलूम किंवा मुस्लिम उलेमांचा अचानक विरोध असायचं कारण काय?
यामागे एकेश्वरवादाचा पाठपुरावा करण्यापेक्षा राजकारणाचाच भाग अधिक दिसतोय... काहीतरी विचित्र फतवे काढून वाद निर्माण करण्यात लोकांना जास्त इंटरेस्ट असतो... त्यातून मिडीयाचं लक्ष वेधून घेण्याचाच हेतू अधिक असतो. असं काही केल्याशिवाय माध्यमं दखल घेत नाहीत, त्याला कोण काय करणार? आता शिवसेना-भाजप आणि मुख्य म्हणजे विश्व हिंदू परिषदेच्या हातात कोलित मिळणार... आता आंदोलनं होतील... देशभर रस्ते अडवून सामुदायिक वन्दे मातरम् पठणाचे कार्यक्रमही (उदा. महाआरती) होऊ शकतात... किंवा यावरून कोर्टबाजी होण्याचीही शक्यता आहे... एकूणच वन्दे मातरम् हे आता निव्वळ स्फुरणगीत न रहाता एक राजकीय हत्यार होणार आहे...
मुळात दारूल उलूम, जामियत उलेमा ए हिंद किंवा विश्व हिंदू परिषद यापैकी कोणीच 'वन्दे मातरम्'बद्दल बोलणं योग्य नाही. आपण जेव्हा संपूर्ण वन्दे मातरम् म्हणतो किंवा कोणाच्या सुंदर आवाजात ऐकतो, त्यावेळी आपल्या शरीरावर रोमांच उठल्यावाचून राहात नाही... अशा या अतिशय तेजस्वी गीताचं राजकारण व्हावं, हेच दुर्दैवी आहे... ज्यांना हे म्हणायचंय त्यांनी म्हणावं... त्याला आडवण्यासाठी कोणी फतवे काढू नयेत आणि ज्यांना म्हणायचं नाही, त्यांनी म्हणू नये... त्यासाठी कोणी जबरदस्ती करू नये... इतकीच इच्छा! अन्यथा उगीचच या गीताचं पावित्र्य नष्ट होईल की काय, अशी भिती वाटते....
***************
जाताजाता एकच प्रश्न... 'वेदमंत्रांहून आम्हा वन्द्य वन्दे मातरम्... ' असं गदिमांनी म्हंटलं तेव्हा हिंदूंच्या भावना अशाच दुखावल्या होत्या काय...? शंकराचार्यांनी गदिमांच्या या गीतावर बंदी घालण्याची मागणी केली होती काय...? किंवा हिंदूंनी हे गीत म्हणू नये, असं कोणी सांगितलं होतं काय...?
वन्दे मातरम्!!!

Monday 2 November 2009

कहीं आग लगे....

घटना तशी आपल्यापासून दूर घडलेली... आपल्यापासून म्हणजे महाराष्ट्रात राहणाऱ्यांपासून. जयपूरच्या आयओसीच्या डेपोला लागलेली आग पाचव्या दिवशीही धुमसतेच आहे. अधिकाऱ्यांचं म्हणणं असं की, ही तेलाला लागलेली आग असल्यामुळे आपल्याला करण्यासारखं काहीच नाही... ती आग तिला वाटेल तेव्हा विझेल... मग आपण कोण-कोण आत होरपळलंय, त्याचा पंचनामा करायला मोकळे होऊ.. ज्यांनी या आगीची दृष्यं पाहिली असतील, त्यांना अधिकाऱ्यांच्या या असहाय्यतेचं कारण समजेल. हजारो मीटर उंचावर उसळणाऱ्या धडकी भरवतील अशा ज्वाळा आजही या अग्नीकांडात दिसतायत. आणखी १२-१५ तासांनी एकदा सगळं तेल संपलं की आग शमेल, असं सांगितलं जातंय.
ही आग एकदा विझली की मग नेमकं नुकसान किती... मृत्यू किती... याची चर्चा सुरू होईल. राज्य सरकारच्या 'डिझास्टर मॅनेजमेंट'चा पंचनामा करणारी जनहित याचिका दाखल झालीपण आहे. त्याचंही काय होईल ते होवो... प्रश्न वेगळाच आहे... थोडा घाबरवणाराही.... भारतातल्या तेल कंपन्यांचे असे अनेक डेपो ठिकठिकाणी आहेत. शिवाय ट्रॉम्बेसह अनेक ठिकाणी अणूभट्ट्याही आहेत. जयपूरची पुनरावृती अशी कुठे झाली, तर परिस्थिती आहे.
आधी या दुर्घटनेला 'अतिरेकी कारवाई' असं नाव दिलं गेलं. मात्र आता एका कर्मचाऱ्यानं चुकीच्या क्रमानं वॉल्व सोडल्यामुळे प्रेशर बिघडलं आणि आग लागल्याचं कारण आता पुढे येतंय. हे जास्त भयानक आहे... अतिरेकी कारवाईपेक्षा भयानक आहे. कारण थोडीशी सावधगिरी बाळगली तर अतिरेकी कारवाई थांबवता येते... मानवी चूक नाही...
आणखी एक धोका म्हणजे शहरांच्या मध्यभागी असलेल्या पेट्रोलपंपांचा... जयपूरइतका नसेल, तरी मोठं नुकसान करण्याइतका इंधनसाठा यात असतोच असतो... मग असल्या मानवी चुका तिथं झाल्या तर आसपासच्या वस्तीचं काय? हा विचारच भयानक आहे. घटना आणखी भयानक असतील.
जयपूरच्या आगीत सुमारे ५०० कोटींची मालमत्ता... अनेक बॅरल इंधन... किमान १०-१२ जीव जळून खाक झाल्येत... याच आगीत आपला निष्काळजीपणाही जळून खाक झाला तर बरं... नाहीतर काही खरं नाही...! खरंच खरं नाही...!!