Thursday 31 December 2009

नववर्षाच्या शुभेच्छा...

'मला वाटलं ते...!' ब्लॉगच्या सर्व नियमित-अनियमित वाचकांना नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!!!
Happy New Year....

Tuesday 22 December 2009

तूलना करायचीच झाली तर...

गेल्या आठवड्यात उटीला गेलेलो... सहज. फिरायला. आता उटीला जाऊन आलं की त्याबद्दल किमान ब्लॉगवर लिहिलंच पाहिजे... नाहीतर मी पत्रकार कसला! नाही का? पण मला उटीतला निसर्ग... तिथले चहाचे मळे... खालपर्यंत येणारे ढग... (खरंतर ढग तिथेच असतात, आपण वर गेलेलो असतो!!!) तिथे मिळणारी ती 'होम मेड चॉकलेट्स...' इत्यादी इत्यादी असं बरंच लिहिलं जाऊ शकतं... पण मला सांगायचंय ते तिथल्या गावांबद्दल... स्वतःला प्रगत म्हणवणाऱ्या महाराष्ट्राची तामिळनाडूमधल्या निलगिरी जिल्ह्याशी तूलना करण्याचा मोह आवरत नाहीये...
*****************
कोयंबतूर स्टेशनवर पहाटे(?) ६च्या सुमारास उतरल्यावर आधीच इथून ठरवलेली टॅक्सी तयार होती... टॅक्सीत बसल्यावर ड्रायव्हर अंकलनं आपल्या मोडक्या-तोडक्या इंग्रजीत (अंकलचं नाव जोसेफ) माहिती द्यायला सुरूवात केली... उटी इथून ९० किलोमीटर आहे... नेहमीचा रस्ता गेल्यावर्षी पुरात वाहून गेल्यामुळे लांबून जायला लागतं... इत्यादी. नंतर अंकल म्हणाले की, 'रस्ता खराब असल्यामुळे जायला वेळ लागतो...!!'
एकदा घाट सुरू झाल्यावर खड्ड्या-खुड्ड्यातून जायची मनाची तयारी करू लागलो... शप्पथ सांगतो! थेट हॉटेलच्या दारात उतरेपर्यंत रस्त्यावर एकही खड्डा लागला नाही... पॅचेस अगदी तुरळक... लालूंच्या भाषेत सांगायचं तर 'हेमा मालिनीच्या गालासारखा गुळगुळीत रस्ता...' हा रस्ता जोसेफ अंकलच्या म्हणण्याप्रमाणे 'खराब?' त्यांना एकदा बेलापूर ते बदलापूर असा प्रवास घडवावा (बाजूच्या सीटवर बसवून नेलं तरी चालेल...) अशी तीव्र इच्छा होत होती... म्हणजे प्रगत(?) महाराष्ट्रातून आलेल्या कोणाला 'कोयंबतूर-उटी रस्ता खराब आहे...' असं सांगण्याची अंकलची हिम्मतच झाली नसती...
*******************
दुसऱ्या दिवशी एका टुरिस्ट बसबरोबर 'साईट सिइंग' करायला गेलो... त्यावेळी आमचा ड्रायव्हर अण्णा कम गाईड अण्णा उर्फ रमेश अण्णा (पुन्हा मोडक्या हिंदीत) माहिती देत होता. या उटीच्या व्हॅलीत (तिथूनच आमची बस जात होती) ३६ (चु.भू.द्या.घ्या.) आदिवासी गावं आहेत. एकूण ७ जमातींचे आदिवासी तिथं राहतात...
आता आदिवासी गाव म्हंटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? झोपड्या... किंवा केवळ विटांची बांधलेली घरं... घरापुढे अंगण... एखादं ढोर... अंगणात नागडी-शेंबडी पोरं... इत्यादी... उटीमधल्या व्हॅलीच्या आदिवासी घरांमध्ये चारचाकी गाड्या होत्या... ज्याला 'बंगला' म्हणू शकतो, अशी बरीचशी घरं या 'आदिवासी पाड्यां'मध्ये होती. तिथं असलेल्या अफाट चहाच्या मळ्यांमुळे तिथले आदिवासी सधन असणं शक्य आहे. पण सरकारच्या 'पॉझिटीव्ह एनर्जी'ची जोड त्यांना तिथं मिळाली असणार... अन्यथा आपल्या राज्यातल्या हिल स्टेशन्सची अवस्था आठवते... माथेरानचा मार्ग असलेलं नेरळ... महाबळेश्वरच्या आसपासची गावं... जव्हार... या ठिकाणी असलेल्या आदिवासींना या नैसर्गिक संपत्तीचा वापरच करू दिला जात नाही... तामिळनाडू सरकार प्रत्येक आदिवासी कुटुंबाला प्रत्येकी ५ एकर जमीन कसायला देतं... (आपल्याकडे आदिवासींच्या ताब्यात असलेल्या जमिनी कशा बळकावता येतील, याची चिंता वाहिली जाते...) तिथल्या सरकारच्या धोरणांमुळे निसर्गानं दोन्ही हातांनी उधळलेली संपत्ती तिथल्या शेवटच्या माणसापर्यंत पोचते, असंच दिसतंय... तामिळनाडूच्या अन्य भागांमध्ये स्थिती कशी आहे, माहित नाही... तिथं फिरायची संधी मिळाली की पाहता येईल. पण जो भाग पाहिला, त्यात मात्र निसर्ग आणि सरकार या दोघांमुळे तिथल्या आदिवासींच्या दारात विकासाची गंगा पोहोचलीय... अर्थात उटीतल्या आंतरराष्ट्रीय पर्यटनाचाही याला हातभार लागला असण्याची शक्यताही आहे. पण काहीही झालं तरी राजकीय इच्छाशक्ती असल्याशिवाय हे होणं नाही...
तिथे जाऊन परतल्यानंतर पुन्हा एकदा जव्हारला जाऊन यावं, असं वाटायला लागलंय... सगळ्यांनी एकत्र येऊन आपलं झोपलेलं सरकार.... आदिवासी खात्याचे स्वतः वनवासी असलेले मंत्री... या सगळ्यांना 'उटी उटी गोपाळा...'चा गजर करून जागं करण्याची गरज आहे...

Tuesday 1 December 2009

बादशहाचं 'कॉस्ट कटिंग...'

बेगमला कितीतरी दिवसांपासून बिरबलाच्या जागी आपल्या भावाला घुसवायचं होतं... पण दर वेळी बिरबल आपल्या चातुर्यानं बेगमचा 'प्लॅन' हाणून पाडायचा... एकदा आपल्या महालात पेपर वाचत बसली असताना बेगमनं 'कॉस्ट कटिंग'ची बातमी वाचली... ती वाचल्यावर बेगमच्या डोक्यात एक मस्त शक्कल आली... तिचा 'मक्सद' होता अर्थातच बिरबलाला बादशहाच्या मर्जीतून उतरवण्याचा... मग तिनं आपल्या भावाला बोलावणं पाठवलं आणि त्याच्यासोबत चर्चा करून सगळा प्लॅन फायनल केला...
**************
शनिवारी रात्री जेवणाच्या वेळी बादशहा कोंबडीची तंगडी तोडत असतानाच बेगम म्हणाली, 'काय महागाई वाढले सगळीकडे... सगळ्या जगात सगळे राजे-महाराजे पैसे वाचवण्याच्या उद्योगात आहेत... आपल्या राज्यात मात्र उधळपट्टी ऐन भरात आलीय...'
झालं... एकतर चविष्ट कोंबडी रस्सा आणि बेगमचं लाडिक बोलणं... बादशहा पाघळला नाही, तरच नवल... पण बिरबलाशी बोलल्याशिवाय आणि त्याचं मत घेतल्याशिवाय बादशहा काही करणं अशक्यच... त्यानं दुसऱ्याच दिवशी सकाळी बिरबलाकडे दूत पाठवला... सुट्टीच्या दिवशी बादशहानं बोलावलंय, म्हणजे एकतर काही महत्त्वाचं काम असणार किंवा महाराजांच्या डोक्यात कुठलंतरी खुळ आलं असणार... हे बिरबलानं लगेच ताडलं... बिरबल हजर झाल्यावर बादशहानं रात्री जेवताना बेगमकडून ऐकलेलं वाक्य जसंच्या तसं बिरबलाच्या तोंडावर फेकलं... ते ऐकून बिरबल अवाकच झाला... चर्चा नेमकी कुठल्या दिशेनं जात्ये, त्याच्या लक्षात येईना...
इतक्यात बेगम म्हणाली, 'त्यामुळेच आता आपल्या राज्यात कॉस्ट-कटिंग करायचा निर्णय महाराजांनी घेतलाय... त्याची अमलबजावणी करण्यासाठी वजीर या नात्यानं त्यांनी तुम्हाला बोलावलंय... आपल्याकडच्या सगळ्या खात्यांमधली कोण-कोण माणसं काढून टाकता येतील, याची यादी संध्याकाळपर्यंत माझ्या भावाकडे गेली पाहिजे... महाराजांनी कॉस्ट-कटिंग खात्याचा मंत्री म्हणून त्याला नेमलंय...'
बेगमचं हे भाषण ऐकल्यावर बिरबलानं लगेच ओळखलं यामागे कोण आहे... आणि कशासाठी आहे... बेगम आणि तिच्या भावाच्या असल्या क्लुप्त्या बिरबलाला माहित होत्या... पण हे या थराला जाईल, याची त्याला अजिबात खात्री नव्हती...
बिरबलानं आपल्या परीनं बादशहाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला... पण या सगळ्या गोष्टी बेगमनं रात्रभरात बादशहाच्या डोक्यात इतक्या भरल्या होत्या... की बादशहाला बिरबलाचा मुद्दा ऐकूच येईना... राज्याच्या तिजोरीतल्या लाख्खो मोहरा वाचणार, याचीच बादशहाला भुरळ पडलेली... अखेरीस 'जशी आज्ञा खाविंद...' असं म्हणून बिरबल निघून गेला...
**************
बादशहाच्या (खरंतर बेगमच्या!) आज्ञेप्रमाणे बिरबलानं आपल्या इच्छेविरुद्ध राज्यातल्या सगळ्या खात्यातल्या कामगारांची यादी बेगमच्या भावाकडे 'पेश' केली... बेगमच्या भावानं बिरबलाला दुसऱ्या दिवशी येऊन भेटायला सांगितलं...
दुसऱ्या दिवशी बादशहासोबत झालेल्या एका मिटिंगमध्ये बेगमच्या भावानं यादी अपूर्ण असल्याचं सांगून बिरबलावर पहिला हल्ला केला... बिरबलाला असं काहीतरी होणार याची कल्पना होतीच... त्यामुळे त्यानं आपला बचाव तयार ठेवला होता... मात्र तो काही बोलण्यापूर्वी बाहशहानं बेगमच्या भावाला याचा अर्थ विचारला...
त्यावर बेगमचा भाऊ म्हणाला, 'सगळ्या खात्यांची यादी बिरबलानं दिलीय... मात्र संरक्षण खातं, अर्थात सैन्यातल्या ले-ऑफची यादी यात नाही... एकदा कॉस्ट-कटिंग करायचं म्हंटल्यावर सगळ्या खात्यांमध्ये व्हायला पाहिजे...'
हे ऐकल्यावर मात्र बिरबल थक्क झाला... बेगम आणि तिचा भाऊ वजिराच्या खुर्चीसाठी या थराला जातील, याची त्याला कल्पनाच नव्हती...
अखेरीस तो बादशहाला म्हणाला, 'सैन्यातल्या कपातीची यादी करणं आपल्याला शक्य नाही... तो आपला स्वतःचा अधिकार आहे, असं मला वाटतं...'
बिरबलानी असं म्हंटल्यावर बादशहा थोडा सावध झाला... बिरबलाला तो पुरता ओळखून होताच... शेवटी बादशहानं ही जबाबदारी बेगमच्या भावावरच सोपवली आणि मिटिंग संपली....
**************
बेगमच्या भावानं सगळ्यात आधी बिरबलाच्या 'सेनापती'ची रवानगी राजधानीत नव्यानं बांधण्यात आलेल्या मुदपाकखान्याचा सुरक्षा-रक्षक या जागी केली... त्यानंतर ५० टक्के सैनिक कमी करताना त्यानं आणि बेगमनं अक्षरशः चिठ्ठ्या टाकल्या... अर्थात हे बादशहाला माहित नव्हतं... बिरबलाला माहित असून उपयोग नव्हता... कारण बादशहाला सांगून समजणार नाही, हे त्याला स्वानुभवानं माहित होतं...
सगळ्या सैनिकांना खलिते गेले, की उद्यापासून कामावर येऊ नका... इतकं सगळं होऊनही बेगमच्या भावानं उरलेल्या सैनिकांना देण्यात येणारी रसद बंद केली... 'युद्ध सुरू नसल्यानं सैनिकांनी घरून डबे आणावेत आणि चहापण घरूनच थर्मासमध्ये भरून आणावा', असा फतवा बेगमच्या भावानं काढला... या प्रकारामुळे सैन्यामध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली... बिरबलालाही हे सगळं असह्य झालं होतं...
**************
एकदा रात्री बादशहा घोरत पडला असताना १च्या सुमारास एक सैनिक धावत-धावत महालात आला... त्यानं तातडीनं महाराजांना उठवण्यास त्यांच्या सेवकांना सांगितलं... बादशहा डोळे चोळत-चोळतच जरा गुश्श्यातच उठला आणि सैनिकाला काय झालंय ते सांगण्याची आज्ञा केली... त्यावर सैनिक म्हणाला, 'शेजारच्या राजानं आपल्यावर हल्ला केलाय... त्याचं सैन्य आपल्या सीमेवर येऊन टेकलंय...'
हे ऐकल्यावर बादशहाची झोपच उडाली... त्यानं तातडीनं बिरबलाला बोलावणं पाठवलं... पण दिड-दोन तासांनी बिरबल डोळे चोळत-चोळत आला.... हे पाहिल्यावर बादशहा आणखीनच भडकला... त्यानं बिरबलाला थेट फैलावर घेतलं आणि हल्ला कसा झाला आणि आत्ता काय स्थिती आहे, ते विचारलं...
बिरबल म्हणाला, 'आपल्या कॉस्ट-कटिंगची बातमी शेजारच्या राजाला त्याच्या गुप्तहेरांनी दिली असणार... आपण सैन्य ५० टक्के कमी केल्यामुळे आपली ताकद कमी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं असणार आणि.....'
बिरबलाचं वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच आणखी एक सैनिक धावत आत शिरला आणि त्यानं नवीच माहिती बादशहाला दिली... तो म्हणाला, 'आपण कमी केलेले सगळे सैनिक शेजारच्या राजाकडे गेल्येत... त्यानं तितक्याच पगारात सगळ्यांना घेतलं आणि आता हेच सैनिक आपल्यावर चाल करून येतायत...'
हे ऐकल्यावर तर बादशहा हादरलाच... त्यानं बिरबलाकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं... बिरबलानं खांदे उडवले आणि म्हणाला, 'आता काय करायचं याचं उत्तर बेगमच्या भावानं दिलं पाहिजे...' हे ऐकल्यावर बेगमला घामच फुटला... ही परिस्थिती हाताळायला आपला भाऊ लायक नाही, किंबहुना बिरबलाइतका कोणीच लायक नाही, हे तिला पक्क ठाऊक होतं...
शेवटी बिरबल म्हणाला, 'मी यावर मार्ग काढायला तयार आहे... आपण ही परिस्थिती हाताळू शकतो... फक्त त्याचा तिजोरीवर थोडा ताण येईल... हे मान्य असेल तर अजूनही हल्ला वाचवणं शक्य आहे...'
बादशहा णि बेगमनं मागे-पुढे न पाहता बिरबलासाठी तिजोरी मोकळी करण्याची तयारी दाखवली... त्यावर बिरबल म्हणाला, 'आपल्यावर चालून येत असलेल्या आपल्याच सैनिकांना दुप्पट पगारावर परत घेतलं जात असल्याची घोषणा तातडीनं करा... म्हणजे सगळं नीट होईल...' बादशहाला ही आयडिया एका क्षणात आवडली... त्यानं तातडीनं खलिता घेतला आणि आदेश काढला... तो घेऊन निरोप घेऊन आलेले दोन्ही सैनिक निघून गेले.... राज्यावरचं संकट टळल्यामुळे बादशहा आणि बेगमनं सुटकेचा निश्वास टाकला....
**************
सैनिक निघून गेल्यावर बादशहाला बिरबल म्हणाला, 'खाविंद... माफ करा... पण मी तुमच्याशी खोटं बोललो... राज्यावर कुठलाही हल्ला झालेला नाही... पण आपण कॉस्ट-कटिंगच्या नावाखाली आपली शक्तीस्थळं कमकुवत करत गेलो, तर काय होऊ शकतं... याची छोटी झलक तुम्हाला दाखवली...' थोडा पॉज घेऊन बिरबल म्हणाला, 'हल्ला खोटा असला तरी तुम्ही दिलेले आदेश खरे आहेत... त्या सैनिकांना आपण दुप्पट नाही, तरी पुर्वीच्या पगारात पुन्हा घेतलंच पाहिजे...'
**************
बादशहाला बिरबलाचं म्हणणं पटलं आणि आपल्या या वजिराचा आणि त्याच्या चातुर्याचा अभिमान त्याच्या मनात दाटून आला... याच आनंदात त्यानं 'कॉस्ट कटिंग'ला फाटा देत दरबारात बिरबलाला शाही मेजवानी दिली...

Saturday 28 November 2009

भरत्या-पक्या-अम्या-चिनूची गोष्ट...

आमच्या सोसायटीत तशी पोरं फार... पण त्यातले चार नग म्हणजे भरत्या, पक्या हे दोन शेजारी, त्यांच्या वरच्या मजल्यावर राहणारा चिनू आणि दुसऱ्या विंगमध्ये राहणारा अम्या... या चौघांची एक छोटी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. आधी त्यांची ओळख करून देतो...
अम्या... आमच्या सोसायटीतल्या पोरांचा दादा. त्याला सगळे टरकून असतात. वयानं मोठा आणि श्रीमंत बापाचा पोरगा असल्यानं सगळ्या सोसायटीत त्याचा वचक आहे. त्याचं घरही इतरांपेक्षा मोठं...
चिनू... हा चिनू म्हणजे त्यातल्या त्यात अम्याशी पंगा घेणारा... त्याचं घरही मोठं पण घरात त्याच्या बाबांची सत्ता चालते... एका अर्थी घरात हुकूमशाहीच आहे म्हणा ना! सोसायटीत घर असून घराभोवती मोठ्ठी भिंत, असा त्यांचा घरचा थाट... याचं आणि भरत्याचं पटत नाही... पक्याची आणि चिनूची मात्र घट्ट मैत्री.
पक्या सोसायटीतलं सगळ्यात लहान कार्टं... पण अतिशय वाह्यात... भरत्याच्या खोड्या काढण्यात त्याला सगळ्यात जास्त इंटरेस्ट... त्याला चिनूची जोरदार फूस... घरची गरिबी असूनही चिनूच्या पैशांवर माज करण्यात पक्याचा हातखंडाच...
आपल्या गोष्टीतलं शेवटचं पात्र म्हणजे भरत्या... याचं घर पण मोठ... पैसाही बऱ्यापैकी, म्हणजे मध्यमवर्गातलं कुटुंब आहे म्हणा! सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुसंस्कृत घरातला असल्यानं सगळ्यांशी जमवून घेण्याचा याचा स्वभाव... आता याच्या या स्वभावाचा पक्या आणि चिनू गैरफायदा घेतात... पण हा आपला शांत असतो... पक्या तर याच्या घरात आपटीबार फोडतो दिवाळी-बिवाळी नसताना... तरीही भरत्या फक्त त्याला दम देतो, आणि सोडून देतो... भरत्याचं चिन्याशी एकदा आणि पक्याशी तीन वेळा जोरदार भांडण पण झालं होतं... अगदी मारामारीही झाली होती... पण शेवटी घरचे मधे पडल्यावर ते मिटलं... पुन्हा सगळ्यांशी मैत्री करायला भरत्या तयार... असा हा साधा-भोळा!
तशा या चौघांच्या किंवा यातल्या दोघा-तिघांचे किस्से खूप आहेत सोसायटीतले.. पण मी गेल्या दोन-तिन दिवसांत झालेल्याच गोष्टी सांगणार आहे...
******************
दोन-तिन दिवसांपूर्वी अम्या चिनूकडे खेळायला गेलेला... अम्या सगळ्यांमध्ये मोठा असला तरी नाही म्हंटलं तरी थोडासा चिनूला टरकतोच... त्यामुळे त्याच्याकडे गेल्यावर अम्या शहाण्यासारखा वागतो... तिथं गेल्यावर अम्यानं चिनूचं जोरदार कौतुक केलं... चिनूचे हुकूमशहा बाबा समोर होतेच... त्यामुळे तर अम्याला आणखीनच कंठ फुटलेला 'चिनू स्तुती' करायला... कौतुक करून अम्या कुठला थांबतोय..! त्यानं चिनूला सल्ला देऊन टाकला की भरत्या आणि पक्यातलं भांडणं सोडवण्याचा प्रयत्न कर... आता चिनू प्रयत्न करणार म्हणजे पक्याला मदत करून भरत्याला गप्प करण्याचा प्रयत्न करणार... त्यामुळे भरत्याला हे समजल्यावर तो जाम खवळला...! आता शांत असला तरी राग येणारच ना?
********************************
हे घडलं त्याच्या दुसऱ्याच दिवशी अम्यानं भरत्याला घरी जेवायला बोलावलेलं... अम्या राजकारणात पक्का मुरलेला होता... चिनूच्या घरी झालेल्या गोष्टीमुळे भरत्या दुखावलाय, हे अम्याला पक्कं ठाऊक होतं... त्याला खुष करणं गरजेचं होतं... म्हणून घरी नेहमी सगळे इंग्रजी बोलत असूनही अम्यानं भरत्याला चक्क मराठीत 'ये... ये... ये... तुझं स्वागत आहे...' असं म्हंटलं. भरत्या खुष... त्यानंतर भरत्याच्या बाबांचा आपल्या पाकिटात ठेवलेला फोटोपण अम्यानं दाखवला आणि 'तुझे बाबा कस्सले सॉलिड आहेत... आपण जाम मानतो त्यांना' असंही सांगून टाकलं... झालं भरत्या विरघळला... त्याला वाटलं की अम्या आपलाच खरा मित्र आहे... चिनूच्या घरी तो जे बोलला ते चुकून होतं... पक्याला अद्दल घडवायचा अम्याचा 'इरादा पक्का' आहे, याचीही भरत्याला खात्री पटली... अम्याच्या घरी पोटभर जेऊन भरत्या आपल्या घरी आला... आणि कोल्हापूरी चादर घेऊन गाssssढ झोपी गेला...!!
*****************************************************************

Wednesday 4 November 2009

'वन्दे मातरम्'चं राजकारण!

'जमियत उलेमा ए हिं' या मुस्लिम उलेमांच्या संघटनेनं देवबंदच्या परिषदेत फतवा काढला की म्हणे मुस्लिमांनी 'वन्दे मातरम्' म्हणू नये... काचं कारण देण्यात आलंय की मातृभूमीला वन्दन केल्यानं मुस्लिमांचा एकेश्वरवाद शिल्लक रहात नाही... कारण अल्लाशिवाय कोणासमोरही नतमस्तक व्हायचं नाही, असं या फतव्यात म्हंटलंय. दुसरीकडे वन्दे मातरम् न म्हंटल्यामुळे मुस्लिमांना देशाबद्दल प्रेम नाही, असं मानण्याचं कारण नसल्याचंही उलेमा ए हिंदनं स्पष्ट केलंय. मुळात प्रश्न वन्दे मातरम् म्हंटल्यामुळे कोणी देशभक्त ठरतो, असं मानणंच मूर्खपणाचं आहे. देशभक्ती ही एखादं गीत म्हणणं-न म्हणण्यावर ठरवणं हे मूर्खपणाचंच ठरेल... नाहीतर पाकिस्तानात जाऊन प्रशिक्षण घेतलेल्या अतिरेक्यांनी कधीतरी पंजाब-काश्मीरातल्या शाळेत वन्दे मातरम्, जण गण मन... म्हंटलं असेलच की...! त्यामुळे जामियत उलेमा ए हिंदनं हे कोणाला बजावलंय माहित नाही... ते असो...
इथं प्रश्न असा आहे, की वन्दे मातरम् मुस्लिमांनी का नाही म्हणायचं... मुस्लिम धर्मात एकच देव असला तरी निरनिराळ्या दर्ग्यांवर मुस्लिम भाविक नतमस्तक होतातच की... ज्यांचे हे दर्गे असतात, त्यांना कोणी निश्चितच 'देव' मानत नसणार... पण तिथं माथं टेकलं जातंच ना..? मग तुमच्या मातृभूमीसमोर 'व्हर्चुअल नतमस्तक' झालं, तर तुमचा धर्म भ्रष्ट होईल, असं का मानता? जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला मुस्लिम धर्म एक साधं बंगाली गीत म्हंटल्यामुळे भ्रष्ट होईल, असं मानण्यात काय अर्थ आहे.
आता विषय असा आहे, की वन्दे मातरम् का म्हणायचं...? मुळात १८५७च्या स्वातंत्र्यासंग्रामाचं वन्दे मातरम हे स्फुरणगीत ठरलं... देशात स्वातंत्र्यासाठी झालेला हा पहिला-वहिला नियोजित उठाव... हा उठाव फसला असता तरी त्यानंतर थेट १९४७ला देश स्वतंत्र होईपर्यंत हजारो क्रांतीकारकांना वन्दे मातरम् या गीतानं तेज दिलंय... १८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामात देशभरातले अनेक संस्थानिक-राजे आणि अन्य स्वातंत्र्यसैनिक सहभागी होते... मात्र या सगळ्यांनी या उठावाचं नेतृत्व दिलं होतं दिल्लीचे ज्येष्ठ राज्यकर्ते बहाद्दुरशहा जफर यांच्याकडे... याचा अर्थच असा की 'वन्दे मातरम्' या गीतानं भारलेले लढवय्ये एका मुस्लिम राजाच्या नेतृत्वात लढले होते... मग आता दारूल उलूम किंवा मुस्लिम उलेमांचा अचानक विरोध असायचं कारण काय?
यामागे एकेश्वरवादाचा पाठपुरावा करण्यापेक्षा राजकारणाचाच भाग अधिक दिसतोय... काहीतरी विचित्र फतवे काढून वाद निर्माण करण्यात लोकांना जास्त इंटरेस्ट असतो... त्यातून मिडीयाचं लक्ष वेधून घेण्याचाच हेतू अधिक असतो. असं काही केल्याशिवाय माध्यमं दखल घेत नाहीत, त्याला कोण काय करणार? आता शिवसेना-भाजप आणि मुख्य म्हणजे विश्व हिंदू परिषदेच्या हातात कोलित मिळणार... आता आंदोलनं होतील... देशभर रस्ते अडवून सामुदायिक वन्दे मातरम् पठणाचे कार्यक्रमही (उदा. महाआरती) होऊ शकतात... किंवा यावरून कोर्टबाजी होण्याचीही शक्यता आहे... एकूणच वन्दे मातरम् हे आता निव्वळ स्फुरणगीत न रहाता एक राजकीय हत्यार होणार आहे...
मुळात दारूल उलूम, जामियत उलेमा ए हिंद किंवा विश्व हिंदू परिषद यापैकी कोणीच 'वन्दे मातरम्'बद्दल बोलणं योग्य नाही. आपण जेव्हा संपूर्ण वन्दे मातरम् म्हणतो किंवा कोणाच्या सुंदर आवाजात ऐकतो, त्यावेळी आपल्या शरीरावर रोमांच उठल्यावाचून राहात नाही... अशा या अतिशय तेजस्वी गीताचं राजकारण व्हावं, हेच दुर्दैवी आहे... ज्यांना हे म्हणायचंय त्यांनी म्हणावं... त्याला आडवण्यासाठी कोणी फतवे काढू नयेत आणि ज्यांना म्हणायचं नाही, त्यांनी म्हणू नये... त्यासाठी कोणी जबरदस्ती करू नये... इतकीच इच्छा! अन्यथा उगीचच या गीताचं पावित्र्य नष्ट होईल की काय, अशी भिती वाटते....
***************
जाताजाता एकच प्रश्न... 'वेदमंत्रांहून आम्हा वन्द्य वन्दे मातरम्... ' असं गदिमांनी म्हंटलं तेव्हा हिंदूंच्या भावना अशाच दुखावल्या होत्या काय...? शंकराचार्यांनी गदिमांच्या या गीतावर बंदी घालण्याची मागणी केली होती काय...? किंवा हिंदूंनी हे गीत म्हणू नये, असं कोणी सांगितलं होतं काय...?
वन्दे मातरम्!!!

Monday 2 November 2009

कहीं आग लगे....

घटना तशी आपल्यापासून दूर घडलेली... आपल्यापासून म्हणजे महाराष्ट्रात राहणाऱ्यांपासून. जयपूरच्या आयओसीच्या डेपोला लागलेली आग पाचव्या दिवशीही धुमसतेच आहे. अधिकाऱ्यांचं म्हणणं असं की, ही तेलाला लागलेली आग असल्यामुळे आपल्याला करण्यासारखं काहीच नाही... ती आग तिला वाटेल तेव्हा विझेल... मग आपण कोण-कोण आत होरपळलंय, त्याचा पंचनामा करायला मोकळे होऊ.. ज्यांनी या आगीची दृष्यं पाहिली असतील, त्यांना अधिकाऱ्यांच्या या असहाय्यतेचं कारण समजेल. हजारो मीटर उंचावर उसळणाऱ्या धडकी भरवतील अशा ज्वाळा आजही या अग्नीकांडात दिसतायत. आणखी १२-१५ तासांनी एकदा सगळं तेल संपलं की आग शमेल, असं सांगितलं जातंय.
ही आग एकदा विझली की मग नेमकं नुकसान किती... मृत्यू किती... याची चर्चा सुरू होईल. राज्य सरकारच्या 'डिझास्टर मॅनेजमेंट'चा पंचनामा करणारी जनहित याचिका दाखल झालीपण आहे. त्याचंही काय होईल ते होवो... प्रश्न वेगळाच आहे... थोडा घाबरवणाराही.... भारतातल्या तेल कंपन्यांचे असे अनेक डेपो ठिकठिकाणी आहेत. शिवाय ट्रॉम्बेसह अनेक ठिकाणी अणूभट्ट्याही आहेत. जयपूरची पुनरावृती अशी कुठे झाली, तर परिस्थिती आहे.
आधी या दुर्घटनेला 'अतिरेकी कारवाई' असं नाव दिलं गेलं. मात्र आता एका कर्मचाऱ्यानं चुकीच्या क्रमानं वॉल्व सोडल्यामुळे प्रेशर बिघडलं आणि आग लागल्याचं कारण आता पुढे येतंय. हे जास्त भयानक आहे... अतिरेकी कारवाईपेक्षा भयानक आहे. कारण थोडीशी सावधगिरी बाळगली तर अतिरेकी कारवाई थांबवता येते... मानवी चूक नाही...
आणखी एक धोका म्हणजे शहरांच्या मध्यभागी असलेल्या पेट्रोलपंपांचा... जयपूरइतका नसेल, तरी मोठं नुकसान करण्याइतका इंधनसाठा यात असतोच असतो... मग असल्या मानवी चुका तिथं झाल्या तर आसपासच्या वस्तीचं काय? हा विचारच भयानक आहे. घटना आणखी भयानक असतील.
जयपूरच्या आगीत सुमारे ५०० कोटींची मालमत्ता... अनेक बॅरल इंधन... किमान १०-१२ जीव जळून खाक झाल्येत... याच आगीत आपला निष्काळजीपणाही जळून खाक झाला तर बरं... नाहीतर काही खरं नाही...! खरंच खरं नाही...!!

Saturday 24 October 2009

Dan Brown turned phylosopher...

Four previous novels by Dan Brown were pure novels... No doubt that all those novels also have many factual things. CERN, The Vatican in 'Engels and Demons' or NSA in 'Digital Fortress' etc. But his new book 'The Lost Symbol' is more than just a novel. It is more philosophical than his previous novels...
The Lost Symbol is also a mistery but it has a golden edge of good thoughts, faith in our ancient books. As the story and the author are American, obviously the book Dan referred is The Bible... But the message is clear... Any ancient book has some (or same?) hidden meaning and that is faith in god. Dan even mentioned 'Geeta' and 'Vedaas' in his book while mentioning the ancient literature. As a Hindu by birth, I replaced Bible' by 'Geeta...' and to my surprise, it made perfect scenes. Even our forefathers said the same thing, even they didn't heard of Meson's at all...
So I think religion is irrelevant if you mentioning God. Even the Atheists also believe that 'God is not exists...' and still mentioning about him... So Dan became more philosopher in this book... But altogether, The Lost Symbol is again Good attempt by him, as usual...
Dan, WE ARE WAITING FOR YOUR NEW NOVEL NOW... MAY BE SOMETHING ON EGYPT....!

हेच होणार होतं...

विधानसभेचे निकाल लागले... भाजप-शिवसेना युतीला पुन्हा एकदा दारूण पराभव पत्करावा लागलाय आणि आघाडीची हॅटट्रीक झाली... हे होणारच होतं! गेल्या १० वर्षांमध्ये सक्षम विरोधी पक्ष वाटावा असं युतीनं काय केलंय? लोकांनी त्यांच्यावर काय विश्वास दाखवायचा? हे लोक सत्तेत आले तर आपलं भलं करतील, असे लोकांना वाटावं, असं यांनी काय केलंय...?
युतीच्या नेत्यांपैकी हाताच्या बोटावर मोजण्याइतके नेते विधानसभेत आणि बाहेर अभ्यासपूर्ण बोलतात... अन्यथा एकमेकांची उणीदुणी काढण्यातच यांनी धन्यता वाटते. शिवसेनेत तर आनंदी-आनंदच आहे. हा आनंद निवडणूक प्रचारात प्रकर्षानं दिसला. उद्धव ठाकरेंना सरकारची उणीदुणी काढण्यापेक्षा राज ठाकरेंना नावं ठेवण्यातच जास्त रस होता... सरकारचं अपयश जनतेपुढे मांडण्यात शिवसेना कमी पडली, याचंच हे फळ आहे.
दुसरीकडे भाजपही सगळं आलबेल नाहीये... गेल्या वर्षीच गोपीनाथ मुंडेंनी भाजपतून फूटण्याचा घाट घातला होता. त्यांची आणि गडकरींची 'मैत्री' जगजाहीर आहे. केंद्रातही लाथाळ्या सुरू आहेत. वसुंधरा राजे कधीही भाजपातून बाहेर पडतील, अशी शक्यता आहे. मग असल्या भांडकुदळ लोकांना निवडून स्वतःची माती करण्यापेक्षा लोडशेडींग-तर-लोडशेडींग..., आत्महत्या-तर-आत्महत्या..., महागाई-तर-महागाई.... पण आघाडीलाच मतं देणं लोकांनी पसंत केलंय...!
लोकसभा निवडणूकीत युतीनं केलेला 'राज'नामाचा गजर आताही सुरूच आहे. म्हणे मनसेमुळे युतीची मतं फुटली.... अरे फुटली असतील ना! नाही कोण म्हणतंय? पण हे एकच तुणतुणं किती वेळा वाजवणार? लोकसभेनंतर तुम्हाला राज ठाकरेंची ताकद लक्षात आली होती ना? मग त्यावर इलाज करायचा सोडून नुसतं मनसेच्या नावानं खडे फोडण्याचं कारण काय? हे राजकारण आहे... नवे पक्ष येणार... नवे नेते तयार होणार... पण तुमची धोरणं आणि काम चोख असेल, तर कुण्या राज ठाकरेंना घाबरायचं कारण काय? पण खरी मेख इथेच आहे... युतीचं नाणं खणखणीत नव्हतं, हेच खरं आहे. 'नाचता येईना अंगण वाकडं...' या म्हणीचा प्रत्यय त्यांनी लोकसभेवेळी दिला आणि आता विधानसभेलाही! केवळ राज ठाकरेंना शिव्या-शाप देऊन काही उपयोग नाही.
भाजप-सेनेनं गाजावाजा करून सुरू केलेली शॅडो-कॅबिनेटची केवळ एक बैठक झाली... म्हणजे सरकारच्या कामावर वचक ठेवणारा कणाच रबराचा असल्याचं दिसलं. जो पक्ष विरोधी पक्ष म्हणून आपलं काम नीट करू शकत नाही, तो पक्ष सरकारात आला तर चांगलं काम करेल, असा विश्वास लोकांना कसा वाटणार? त्यामुळे स्वाभाविकपणे जे व्हायचं तेच झालंय...
या निकालाचा सर्वाधिक फटका शिवसेनेला बसणार आहे. विधानसभेवर भगवा फडकावण्याचं स्वप्न पाहणारी शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली गेलीय. आधीच मनसेच्या लाटेत गटांगळ्या खाणाऱ्या शिवसेनेची होडी आता पार तिरकी झालीय. भाजपपेक्षा कितीतरी जास्त जागा लढवूनही त्यांचे आमदार कमी निवडून आल्येत. त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपदही शिवसेनेच्या हातून जवळजवळ गेलंय. शिवसेनेचा उताराकडे प्रवास राणे-राज बाहेर पडल्यावरच सुरू झाला होता. आता शिवसेना अधिक वेगानं रसातळाला जातेय... यातून वेळीच सावरण्याची शिवसेनेला गरज आहे. अन्यथा त्यांची जागा घ्यायला 'मनसे' सज्ज आहे... राज ठाकरेंचं 'मराठी कार्ड' फार काळ चालेल, असं नाही. शेवटी आता लोकांना विकासाची भाषा बोलणारे जास्त आवडतात, हे वारंवार सिद्ध होतंय. पण शिवसेना सावध झाली नाही, तर राज कुठल्याही क्षणी 'मराठी'वरून 'विकासा'वर येऊ शकतात आणि शिवसेनेच्या बोटीला शेवटचा धक्का देऊ शकतात...
'आता पुढली पाच वर्षं करण्यासारखं काही नाही...' या भ्रमात युतीचे नेते नसतील तर बरं... निराशेचा काळ लोटल्यानंतर आता तरी जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका युतीनं बजाजावी... जबाबदार आणि अभ्यासू विरोधी पक्ष ही लोकशाहीतली सगळ्यात मोठी गरज आहे. त्याखेरीज लोकशाही आणि लालफितशाही यांच्यात फार फरक उरणार नाही. येती पाच वर्षं युतीनं आपली दैवदत्त भूमिका नीट पार पाडावी... कारण निवडून कोणीही आला, तरी जनतेचे हाल संपणार नाहीयेत... त्यामुळे विरोधी पक्षात कोणीही असलं तरी लोकांचे हाल कमी करण्यासाठी आवाज उठवणं ही त्यांची जबाबदारी आहे.
बाकी, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला 'वेल-डन' असं म्हंटलंच पाहीजे...! आणि भाजप-सेना युतीला बोंबा मारण्याची कमीत कमी संधी द्यावी, यासाठी 'ऑल दि बेस्ट'ही दिलं पाहीजे...!!
********************
माझा 'स्टार माझा'मध्ये असलेला मित्र मंदार पुरकर याचं वाचन अफाट... त्यानं भाजपच्या नेत्यांना उल्लेखून सांगितलेला एक किस्सा...
--------------
एकदा एका आठवड्याच्या बाजारात एक शेतकरी दोन म्हशी विकायला येतो...
गिऱ्हाईक (एका म्हशीकडे बोट दाखवून) : ही म्हैस कशी दिली रे?
शेतकरी : ५० हजार... ही दोन वेळा व्यायलीय... दररोज ५ ते ७ लिटर दूध देते...
गिऱ्हाईक : आणि ही दुसरी म्हैस... ही कशी दिली?
शेतकरी : एक लाख... ही रेड्याला जवळ पण येऊ देत नाही!
गिऱ्हाईक : मग... दूध वैगरे???
शेतकरी : कसं येणार?
गिऱ्हाईक : मं... तरीही इतकी किंमत कशी हिची?
शेतकरी : काय राव... कॅरेक्टर नावाची काही चीज आहे की नाही?
--------------
भाजपचे नेते आणि पक्षाचे असं आहे... नुसतं कॅरेक्टर असून त्याचा लोकांना उपयोग '0' आहे... नाही का?

Tuesday 15 September 2009

ब्रेकिंग न्यूज?

ब्रेकिंग न्यूज... साम मराठी के असिस्टंट प्रोड्युसर अमोल परांजपे बदलापूर से ट्रेन में निकल चुके है... वे बेलापूर जाएंगे... लोकल ट्रेन के एक तिसरे डिब्बे के एक दरवाजे में वे खडे है... हमारे संवाददात अमुक-अमुक भी उनके साथ है....

नाही... आश्चर्यचकित होऊ नका... आज सकाळी टीव्ही लावला तेव्हा टीव्हीवर अशीच.. अगदी अशीच एक बातमी सुरू होती. यात फक्त बदलापूरच्या जागी दिल्ली होतं... बेलापूरच्या जागी लुधियाना आणि अमोल परांजपेच्या जागी होते राहूल गांधी... हां... आत्ता ही झाली खरी 'ब्रेकिंग न्यूज...!!!'
काँग्रेसचे महासचिव राहूल गांधी आणि ट्रेननं... अरेच्च्या! ही खरोखर बातमीच आहे. त्यांच्या मातोश्री काल मुंबईला येताना विमानाच्या इकोनॉमी क्लासनं आल्या होत्या. (याच विमानात आमचे खासदार सुरेश टावरे हेदेखील होते म्हणे... आणि तेही बिझनेस क्लासमध्ये... मग बाईंना इकोनॉमी क्लासमध्ये बघितल्यावर त्यांनी आपली व्हीआयपी सीट एका सरदारजींना देऊ केली आणि स्वतः इको.क्लासमध्ये आले. आणि शप्पथही घेतली म्हणे की या पुढे फक्त इको.क्लासनंच प्रवास करणार... व्वा... टावरे जी... आमच्या मतांचं सोनं केलंत हो!!!) हां.. तर मुळ मुद्दा म्हणजे सोनियाबाई काल इको.क्लासनं मुंबईत आल्या. मग 'माँ से बेटा सवाई...' हे सिद्ध करण्यासाठी राहूलजींनी थेट शताब्दीचं रिझर्वेशन करून टाकलं. तेही एसी चेअर कारचं...
खरंतर राहूलजींना ही गोष्ट फुटायला नको होती... म्हणजे मिडियात बोंबाबोंब होऊ नये, असं त्यांना वाटत होतं. पण झालं भलतंय... त्यांची गाडी निघणार, नेमके त्याच वेळी तमाम हिंदी चॅनल्सचे रिपोर्टर तिथं हजर... (न्यूज २४ या वाहिनीचं नशिब बलवत्तरच... नेमकं याच गाडीत आणि याच डब्यात त्यांच्या एका रिपोर्टरचंही रिझर्वेशन होतं म्हणे...) मग काय... दे दणादण ब्रेकिंग न्यूज सुरू! सगळ्या चॅनल्सवर दाखवत होते... राहूल गांधी निकले ट्रेन मे... रेल्वे से जाएंगे लुधियाना... राहूल गांधीने आणखी काय काय...
जोक्स अपार्ट... मला एक कळत नाही... म्हणजे मला एक कळतं की, हा योगायोग नाही... म्हणजे नेमकी राहूलबाबांना झुकझुक गाडीनं जायची इच्छा व्हावी आणि त्याच वेळी तमाम वाहिन्यांचे रिपोर्टर तिथं हजर असावेत... माझ्यासारख्या सामान्य माणसाला इतकं कळतं की, याला मराठीत 'पब्लिसिटी स्टंट' असं म्हणतात... राहूल गांधींना या गोष्टी नव्या नाहीत... असली नाटकं ते अधून-मधून करतच असतात. मागे एकदा काहीतरी कुठेतरी 'पाट्या' टाकण्याचं (शब्दशः पाट्या टाकण्याचं...) काम त्यांनी केलं होतं मिडिया-बिडियाला बोलवून.... आजचं रेल्वे प्रवासाचंही नाटकच...
मुळात या नेत्यांचं छानछौकी राहणं... त्यांच्या गाड्या... त्यांच्या सिक्युरिटीचा लवाजमा पाहिला की या गरीब बिच्चा-यांना जनतेची किती काळजी आहे ते... एखाद दिवशी घमेली उचचली किंवा एखाद दिवस रेल्वेनी गेलं की तूम्ही आम जनतेच्या अधिक जव जाल, हे वाटणं एक तर मूर्खपणाचं आहे किंवा हे नेते समोरच्याला (म्हणजे आपल्याला) मूर्ख समजतात... मुळात राहूल गांधी जेव्हा रेल्वेनं गेले त्या डब्यात त्यांच्या आजूबाजूच्या सिट्सवर त्यांचे सुरक्षारक्षक, सेक्रेटरी इत्यादी होते. त्या कम्पार्टमेंटमधल्या उरलेल्या सीट मोकळ्या ठेवल्या होत्या. मग राहूल गांधींनी सामान्य जनतेसारखा प्रवास केला, असा दावा कुठल्या तोंडानं करायचा? या नेत्यांना असलेला धोका बघता अगदी मी बदलापूरहून बेलापूरला येतो तसं त्यांनी येणं अपेक्षितही नाही... पण मग ही 'दिखाऊगिरी' कशासाठी...?
ज्यांना विमानाच्या बिझनेस क्लासनं जाणं परवडतं त्यांनी बिझनेस क्लासनं जावं... ज्यांना इकोनॉमी क्लासच परवडतो त्यांनी इकोनॉमी क्लासनं जावं... ज्यांना रेल्वेचं एसी तिकीट परवडतं त्यांनी ते रिझर्वेशन करावं... ज्यांना थ्री-टियर नॉन एसी परवडतं त्यांनी त्या डब्यात बसावं... ज्यांना तेही परवडत नाही त्यांनी 'चालू' तिकीट काढून जावं... ज्यांना तेही परवडत नाही त्यांनी (स्वतःच्या जबाबदारीवर) विदाऊट तिकीट जावं.... माझं म्हणणं इन शॉर्ट इतकंच... की नाटकबाजी करू नये... पण आपल्या नेत्यांना नेमकं तेच करण्यात इंटरेस्ट असतो... आजचा राहूल गांधींचा 'दिल्ली टू लुधियाना' प्रवास म्हणजे या नाटकबाजीतलाच एक नवा अंक... या पलिकडे याला महत्त्व नाही... माझ्या मते मिडियानंही देऊ नये... (पण ते होणे नाही, हे ही खरंच...!)

Friday 11 September 2009

आघाडी... बिघाडी....

आघाडी बिघाडी लागली झळ...
कुणी बाई काढली कुणाची कळ...?
थोडी न थोडकी... जुंपली फार...
दोघांच्या तलवारीला चमचम धार...

डोक्यावर इलेक्शन बैठक फोल....
बडवून फुटला आघाडीचा ढोल...
युती बाई - अशी काई...
तो-यामध्ये खडी...
हातावर अजूनही सैलच 'घडी...'

तिस-या आघाडीचं उघडून दार...
आठवले काकांनी घातला वार...
ऐक्याच्या नावाखाली
एक झाले सोळा...
आघाडीच्या पोटात मोठ्ठा गोळा...

दिल्लीबाई म्हणते आघाडी करू...
विलासराव म्हणतात एकटे लढू...
आम्हा नको आघाडी...
घोषा सुरू...
एकटे जिंकू किंवा एकटे मरू....

Wednesday 9 September 2009

इशरतच्या निमित्तानं....

२००४ साली गुजरात पोलिसांनी पहाटेच्या वेळी चार 'अतिरेक्यां'चं एन्काऊंटर केलं. त्यात एक मुलगी होती इशरत जहाँ... मुंबईच्या अगदी जवळ, मुंब्रा या ठाण्याच्या उपनगरातली अवघ्या १९ वर्षांची इशरत लष्कर-ए-तैय्यबाची अतिरेकी आहे, असं सांगण्यात आलं. केंद्रानं नेमलेल्या न्यायालयीन समितीनं हे एन्काऊंटर बनावट असल्याचं म्हंटलंय... त्यावरून पुन्हा एकदा या जुन्या वादाला तोंड फुटलंय.
न्यायदंडाधिकारी एस.पी. तमांग यांनी दिलेल्या अहवालात हे एन्काऊंटर 'फेक' असल्याचं म्हंटलंय... मुळात फेक एन्काऊंटर ही संकल्पना फारशी नवी नाही. अनेकदा अनेक गुंडांना संपवण्यासाठी अशी एन्काऊंटर्स केली जातात. मुंबई पोलिसांमध्ये तर अशा 'एन्काऊंटर स्पेशालिस्ट' पोलिस अधिका-यांची मोठी मांदियाळी आहे. या फेक एन्काऊंटर्सला लोकांचा छुपा पाठिंबाही असतो, असं म्हंटलं तर फारसं वावगं ठरू नये... आपली एकूण न्यायालयीन प्रक्रिया ही '१०० गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एकाही निरपराध्याला शिक्षा होता कामा नये,' यावर बेतलेली असल्यानं स्वाभाविकपणे वेळखाऊ आहे. त्यामुळे अनेक अट्टल गुन्हेगार शिक्षेशिवाय एकतर कोठडीत असतात किंवा जामीनावर बाहेर बागडत असतात. अशा वेळी एखाद्या अट्टल आणि समाजाला त्रासदायक ठरणा-या इसमाचा परस्पर न्याय केला, तर बिघडलं कुठे, असा एक छुपा सूर ऐकायला येतो. काही 'मानवतावादी संघटना' याला "कायदा हातात घेणं" असं म्हणत असले तरी एकूण सर्वसामान्यांचं मत "बरं झालं संपवला..." असंच असतं. त्यामुळे इशरत आणि तिच्या तीन मित्रांचं झालेलं एन्काऊंटर हे फेक असू शकतं, नव्हे इतर ९९ टक्के एन्काऊंटर्सप्रमाणे ते बनावटच असणार, यात शंका बाळगायचं कारण नाही....
पण या 'एन्काऊंटर खरं की खोटं?' या वादात मुळ मुद्दा मात्र बाजुला पडलाय, असं वाटतंय. 'इशरत आणि तिचे मित्र खरोखर अतिरेकी होते की नाही...' या प्रश्नाकडून पद्धतशीरपणे लक्ष विचलित करण्यात आलंय. (यात केंद्र सरकार आणि बहुतांश मिडियाचा पुढाकार आहे.) मुळात गोध्राकांड आणि त्यानंतरच्या दंगली यामुळे अतिशय संवेदनशील बनलेल्या गुजरातेत हे लोक का चालले होते, हे बाहेर आलेलं नाही. त्यांच्या गाडीत शस्त्रास्त्र सापडल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये आहे. (पण हादेखील एक बनाव असू शकतो, कारण टाईम्सच्या बातमीनुसार पंचनाम्यात हा उल्लेख नाही.) पण हा एफआयआर खरा मानला तर रायफली घेऊन हे चौघेजण कोणत्या पिकनिकला चालले होते? त्यांचं टार्गेट खरोखर नरेंद्र मोदी तर नव्हते...? यासारखे बरेच प्रश्न उपस्थित होतायत.
इशरत जहाँ ही मुंब्र्याची राहणारी... तिच्या घरच्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे एन्काऊंटर होण्यापूर्वी 'लष्कर ए तैय्यबा' हे नावच त्यांनी ऐकलं नव्हतं... अरेच्चा... असं कसं होऊ शकतं? गेली अनेक वर्ष देशभरात धुमाकूळ घालणा-या एका अतिरेकी संघटनेचं नाव ठाण्यासारख्या शहरात राहणा-या लोकांनी ऐकलंच नाही... शंका आहे!!!
बरं... क्षणभर गृहित धरुयात की तिच्या घरच्यांनी 'लष्कर'चं नाव ऐकलंच नव्हतं पूर्वी... पण मुलगी एखाद्या अतिरेकी संघटनेसाठी काम करत असेल, तर ती काय घरी बोंबा मारत फिरणार आहे की 'मी अतिरेकी झालीय' म्हणून... घरच्यांना कसं कळणार की मुलगी कॉलेजमध्ये कोणाच्या संपर्कात आलीय आणि काय करतेय ते...
आणखी एक शक्यता अशी की इशरत अजाणतेपणी या घटनेत मारली गेली असेल. तिला खरंच माहित नसेल की आपण ज्यांच्याशी मैत्री केली आहे आणि ज्यांच्यासोबत गुजरातेत 'फिरायला' जातोय, ते कुठल्यातरी कुकर्मात गुंतले आहेत... तिला विचारीला असं वाटत असेल की आपले चांगले मित्र आहेत, जाऊयात पिकनिकला... आपण कुठल्यातरी कथित 'जिहादी' मोहिमेवर जातोय, ते तिला ठाऊकच नसेल... असंही असू शकतं...!
या सगळ्या शक्यता मांडण्याचं कारण असं की मुंब्र्यात राहणारी इशरत जहाँ आणि तिचे तीन मित्र (यातला एक जण पाकिस्तानी आहे, असं वृत्त काही वाहिन्या देतायत) यांच्याशी गुजरात पोलिसांचं वैयक्तिक वैर होतं का? त्यांनी नेमकं या चौघांनाच का मारलं असेल... त्या पहाटे तिथून हजारो वाहनं गेली असतील... मग नेमकी यांचीच गाडी अडवून त्यांना ठार करायचं काय कारण? भले फेक असेल, पण या चौघांचंच एन्काऊंटर करण्याची गुजरात पोलिसांना काय गरज पडली असेल? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.
क्षणभर गृहित धरुयात की, हे चौघे निरपराध आहेत.... गुजरात पोलिसांना काही टीप मिळाली होती... पण ख-या अतिरेक्यांना मारायचं सोडून त्यांनी सापडलेल्या चार लोकांना गोळ्या घातल्या आणि मोकळे झाले... आता प्रश्न असा उरतो की, पोलिसांना टीप मिळालेले खरे अतिरेकी कुठे आहेत. (पुन्हा एकदा स्पष्ट करावसं वाटतंय की टीप मिळाल्याशिवाय उगीच चौघांना पकडून मारायला पोलिसांची या चौघांशी वैयक्तिक दुश्मनी असण्याचं कारण नाही...!) याचा अर्थ खरे अतिरेकी त्यावेळी (किंवा अन्य कोणत्यातरी वेळी) गुजरातेत गेले असणार आणि आपलं 'कार्य' सिद्धीला नेण्याचा प्रयत्न केला असणार... मग ते अतिरेकी कुठायत... अतिरेकी म्हणून मारून चुकीच्या लोकांना जगासमोर आणायचं आणि निश्चिंत रहायचं, हे गुजरात सरकार आणि पोलिसांना परवडणारं होतं का?
असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात... पण दुर्दैवानं आपल्याला हे पैलू दिसत नाहित... दिसले तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.... मिडिया त्यांना हवी तीच बाजू लोकांसमोर मांडतात...
इशरतच्या निमित्तानं 'फेक एन्काऊंटर'ची चर्चा करण्याऐवजी 'आपल्या लहानलहान शहरांमध्ये पसरलेले अतिरेक्यांचे हातपाय' यावर चर्चा झाली आणि उपाय झाले तर जास्त बरं होईल...

Monday 31 August 2009

नगारा वाजला...

येणार... येणार... म्हणता म्हणता निवडणुका आल्या... नवी दिल्लीत वाजलेला हा बिगुल आता पुढला दीड महिना राज्यभर निनादत राहणार आहे...! पाच पक्ष... २८८ आखाडे आणि शेकडो मल्ल... लढाई जोरदार रंगणार आहे.... तेव्हा प्रेक्षकहो सज्ज व्हा!
शिवसेना-भाजप युती जवळजवळ निश्चित आहे... काही जागांच्या अदलाबदलीवरून किरकोळ तू-तू... मै-मै... होण्याची शक्यता आहे. पण ते तितकंच राहिल. एखद-दुस-या जागेवर 'मैत्रीपूर्ण लढती' बघायला मिळतील. प्रश्न आहे आघाडी होणार की नाही हा... आघाडी झाली नाही तर सत्ताबदल होणार हे नक्की मानायला हरकत नाही. कारण आधीच तिसरी आघाडी झाल्यानं दलित मतं काँग्रेसला मिळायची शक्यता कमी आहे. रामदास आठवलेंनी लोकसभेतल्या पराभवाचा पुरेपुर बदला घ्यायचं ठरवलंय. त्यामुळे त्यांच्या जास्त जागा आल्या नाहीत तरी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक जागा ही आघाडी पाडू शकते, हे निश्चित... (आठवा... मनसे @ लोकसभा) शिवाय काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार एकमेकांची मतं खातील, ती वेगळीच... त्यामुळे अशा ब-याच काठावरच्या जागा युती खिशात टाकेल... आघाडी झाली तर यातला धोका थोडा कमी होऊ शकतो...
युतीमध्ये सध्या सगळं आलबेल दिसतंय, हे खरं आहे... पण गडकरी-मुंडे यांचे संबंध किती 'जिव्हाळ्या'चे आहेत, ते आपल्याला माहित्ये. केंद्रात भाजपमध्ये सध्या जे चाललंय त्याचं मायक्रो-व्हर्जन महाराष्ट्रातही आहेच... त्यामुळेच मुंबईतल्या काही जागांबाबत भाजपमध्येच एकवाक्यता नाही... शिवाय सामनातल्या आजच्या अग्रलेखानं भाजप नेते दुखावले असण्याची शक्यता आहे. 'हे आईचं मुलाला रागावणं आहे... आई नाही का मुलाला कारट्या-मेल्या असं म्हणते... तसंच हे आहे,' असं सांगून भाजपच्या प्रकाश जावडेकरांनी या अग्रलेखाचं टोक मऊ केलं असलं तरी आत कुठेतरी-काहीतरी दुखल्याचं जाणवलंच... हिच अवस्था राज्यातल्या केंद्रीय नेत्यांची झाली असणार... हा अग्रलेख लिहिण्याचं सामनाचं टायमिंग मात्र जोरदार आहे... हाच अग्रलेख उद्याच्या अंकात आला असता तर त्याचा आणखी वेगळा अर्थ निघू शकला असता... भाजप नेत्यांसारखंच कार्यकर्तेही या अग्रलेखानं दुखावले असतील... (अग्रलेख कितीही खरा असला तरी...!!!!) असो!
तर मुख्य मुद्दा असा, की पडघम वाजायला लागलेत... तुंबळ युद्ध सुरू झालंय... आता मल्ल सज्ज आहेतच पण पत्रकारही सरसावून सिद्ध झालेत... (तारखा जाहीर होण्याची वाट नेत्यांपेक्षा जास्त आम्हीच पहात होतो...!) यातले काही पत्रकार कोणत्यातरी मल्लाला टिप्स देणारे असतील तर काही एखादा मल्ल कसा बहाद्दर आहे, हे सांगण्यात मश्गूल होतील तर रेफ्रीच्या भूमिकेत असतील... पण गम्मत अशी की, कोण टीप्स देतंय, बढाया कोण मारतंय आणि कोण रेफ्री आहे हे शेवटपर्यंत कोणालाच समजणार नाही! पुन्हा विषयांतर झालं...
तर मुळ मुद्दा असा की, राज ठाकरेंमुळे भाजप आणि शिवसेना, केंद्रातल्या कलहामुळे भाजप, तिस-या आघाडीमुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस, राष्ट्रवादीमुळे काँग्रेस, काँग्रेसमुळे राष्ट्रवादी, तिस-या आघाडीमुळे प्रकाश आंबेडकर (यावर वाद होऊ शकतो... कारण प्रकाश आंबेडकरांची ताकद किती आहे, कोण जाणे?), प्रकाश आंबेडकर, काँग्रेस, राष्ट्रवादीमुळे तिसरी आघाडी... अशा सगळ्याच पक्षांच्या नेत्यांच्या ** कपाळात आल्यात... यात सगळ्यात कमी धोका असेल तो मनसे आणि तिस-या आघाडीला... पण या दोघांची न्युसन्स पॉवर जबरदस्त आहे, हे सगळ्यांनाच मान्य होईल... त्यांच्या सिटा कमी आल्या, तरी ते अनेक जागा पाडू शकतात. पण
युतीची मतं - मनसेनं खाल्लेली मतं = आघाडीची मतं - तिस-या आघाडीनं खाल्लेली मतं
असलं गणित जुळून आलं तर मग युती की आघाडी हे ठरवणं आणखी कठीण होईल... मनसे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुक लढत्ये... आणि तिसरी आघाडीही... त्यामुळे कोणाची न्युसन्स पॉवर जास्त आहे, हे अजून समजलेलं नाही... त्यावर वरच्या गणिताची फोड अवलंबून आहे... पण सगळ्यात जास्त धोका आघाडी-युतीच्या नेत्यांनाच आहे...
भले टीव्हीवर बाईट देताना किंवा सभेत भाषणं ठोकताना हे लोक आव आणतील... पण मनात भिती भरलेली असणारच... त्याला कारण आहे आपणच... आपण कधी कोणाला डोक्यावर बसवू आणि कधी खाली आपटू हे कोणीच सांगू शकलेलं नाही... (अगदी चंद्रास्वामीपण...) म्हणजे वाजपेयींनी सहा महिने आधी निवडणुका घेतल्या तेव्हा कोणाच्या स्वप्नात आलेलं का, की भाजप विरोधी पक्षात बसेल... किंवा त्याच वेळी आंध्रप्रदेशात 'मिस्टर आयटी' चंद्राबाबू नायडूंचं पानिपत होईल... किंवा गेल्या विधानसभेला कोणाला वाटलेलं का, की पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीचंच सरकार सत्तेत येईल (आणि सहा महिन्यांपूर्वीच खुर्ची खाली केलेले विलासराव पुन्हा मुख्यमंत्री होतील...) याची कोणीच कल्पना केली नव्हती... पण ते असं झालं कारण आपण... 'ये पब्लिक है... ये सब जानती है...'
निकाल २२ तारखेला आहे. मतदान... दिवाळी... निकाल... असा हा अजब क्रम आहे... (त्यामुळे सगळ्या नेत्यांची (आणि पत्रकारांची) दिवाळी चांगलीच 'वाजणार!' हे नक्की झालंय...) हे म्हणजे 'धुळवड...(राजकीय)', दिवाळी...(खरीखुरी) आणि मग शिमगा....(एकमेकांच्या नावानं)' अशा क्रमानं सण साजरे होणार आहेत... त्यामुळे आता सिद्ध व्हायला हरकत नाही... लढायला..., लढवायला आणि पहायलाही....!

Sunday 30 August 2009

भाजप 'दक्ष...' संघ 'आरम...'

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे 'संघ परिवार' या अध्यरुत संकल्पनेचा कुटुंबप्रमुख... विश्व हिंदू परिषद, विद्यार्थी परिषद, वनवासी कल्याण आश्रम यासारख्या अनेक संघटनांचं जाळं संघाच्या या कुटूंबात आहे. त्यातलाच एक 'कानामागून येऊन तिखट झालेला' सदस्य म्हणजे भारतीय जनता पार्टी... एक तर राजकीय पक्ष असल्यामुळे अनिर्बंध अधिकार... सत्ता गाजवण्याची लागलेली सवय यामुळे भाजपमधले काही नेते हे पक्षाला 'ऑटोनॉमस' किंवा स्वायत्त मानतात... त्यांना मनातून असं वाटत असतं की "कोण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ? त्यांनी आम्हाला शहाणपणा का शिकवावा? आम्ही स्वतंत्र आहोत आमचे निर्णय घ्यायला... इ.इ.इ."
पण हे केवळ मनात... त्याच मनाच्या दुस-या एका कोप-यात त्यांना हेदेखील पक्क ठाऊक आहे की आपल्या पक्षाचा डोलारा हा संघाच्या भक्कम पायावर उभा आहे. जर घराच्या भिंतींनी पायापासून फारकत घ्यायची ठरवली, तर काय होईल, हे त्यांना माहिती आहे. म्हणूनच संघाला उघड-उघड दुखवायची कोणाची हिम्मत नाही... भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते संघाच्याच मुशीत घडलेत... आणि ही उदाहरणं हाताच्या बोटावर मोजण्याइतकी नाहीत... काही अपवाद वगळता सगळ्या ज्येष्ठ नेत्यांनी एकतर संघ किंवा विद्यार्थी परिषदेत सामाजिक जीवनाचा श्रीगणेशा केलाय. अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वात जे सरकार साडेचार वर्षं आलं होतं, ते देखील संघामुळेच... आयोध्येतल्या राम मंदिर आंदोलनाची पार्श्वभूमी या विजयाला होती. त्यामुळे संघानं टेकू काढून घ्यायचा ठरवला, तर भाजपचा तंबू मातीत मिसळायला वेळ लागणार नाही, हे नेते पक्क जाणून आहेत...
सध्या भाजपमध्ये रणकंदन सुरू आहे... होय! मी रणकंदन हा शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरलाय... स्वतःला 'पार्टी विथ डिफरन्स' म्हणणा-या भाजपनं आपले पायही मातीचेच आहेत, हे दाखवून दिलंय... जसवंत सिंग यांचं पुस्तक... राजस्थानातला सत्तासंघर्ष (खरंतर विरोधी सत्तासंघर्ष)... यशवंत सिन्हा-अरूण शौरी प्रभूतींची टोमणेबाजी... या सगळ्या एका मोठ्या युद्धातल्या छोट्या लढाया आहेत... मुख्यतः हे युद्ध जुंपलंय ते 'संघीय भाजप नेते' विरुद्ध 'बिगरसंघीय भाजप नेते' यांच्यात... अडवाणी-राजनाथ सिंग यांना भविष्यात नरेंद्र मोदींना राष्ट्रीय राजकारणात मोठं करायचंय... त्याच वेळी बिगरसंघीय नेत्यांनी अरूण जेटलींचं नाव रेटलंय... नेतृत्वबदलाची चर्चा ही याच 'उत्तरदायी' ठरवण्यातून पुढे आलीय...
शेवटी पोरं भांडायला लागली की आई-वडील जे करतात तेच मोहनजी भागवतांनी केलं... ते म्हणाले की, 'भाजपची इच्छा असेल तर मध्यस्ती करायला संघ तयार आहे...' आता यात काय वावगं आहे. दोन्ही संघटना वेगळ्या आहेत आणि एका संघटनेनं दुसरीचा आदर केलाय... असंच हे विधान वाचल्यावर वाटणार... पण ज्यांना संघ आणि भाजपमधले संबंध (ऐकून का होईना) माहित आहेत, त्यांना यातली 'बिटवीन दि लाईन्स' वाचता येईल... 'जर भाजपची इच्छा असेल तर...!' म्हणजे जर 'तुम्ही आम्हाला अजून कुटुंबप्रमुख मानत असाल तर...!' म्हणजेच... 'जर तुम्हाला आमची मध्यस्ती मान्य नसेल, तर पुढल्या निवडणुकीत तुमचं काय करायचं ते आम्ही बघून घेऊ...!' इतका सगळा अर्थ दडलाय या 'जर'मध्ये...!!!
आता सगळ्यांना जरी ही 'बिटविन दि लाईन्स' समजली नाही, तरी भाजपच्या नेत्यांना बरोब्बर समजली... म्हणूनच भागवत यांच्या पत्रकार परिषदेला २४ तास व्हायच्या आत सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडू, अरूण जेटली, अनंत कुमार, मुरली मनोहर जोशी आणि सगळ्यात महत्त्वाचं राजनाथ सिंग आणि लालकृष्ण अडवाणी यांनी मोहनजींची भेट घेतली... याचा अर्थ मोहनजींचा हा 'जर' वर्मी लागलाय... सध्या केशवकुंज कार्यालयात भाजप नेत्यांच्या मोहनजींसोबत बैठकांवर बैठका सुरू आहेत... त्याचा काय निर्णय लागतोय, ते थोड्या दिवसांमध्ये स्पष्ट होईलच...
आता थोडंसं नेतृत्वबदलाविषयी... भाजपमध्ये आत्ता नेतृत्वबदल (पक्षी अडवाणी जाऊन कोणीतरी आणि राजनाथसिंग जाऊन कोणीतरी...) व्हावा की नाही, हा प्रश्न आहे... याला दोन बाजू आहेत... एक म्हणजे हे बदल केले, तर पक्ष पॅनिक झालाय, असा समज होऊ शकतो... त्यातून राजनाथ सिंग किंवा स्वराज-जेटली-नायडू हे लोक दुखावले जाण्याची शक्यता आहे. यावर एक पर्याय म्हणजे अडवाणींच्या जागी स्वराज यांना विरोधी पक्षनेतेपदी आणलं तर हे दुःख काहीसं कमी होऊ शकतं... दुसरीकडे राजनाथ सिंग यांच्या जागेवर कोण येणार, हेही महत्त्वाचं ठरेल... तिथं अरूण जेटली आले तर पक्षातले अनेक जण पुन्हा नाकं मुरडतील, अशी शक्यता आहे. तिथं मोदींना आणलं तर गुजरातेत कोण, हा एक प्रश्न आणि मित्रपक्षांना मोदी पचणार का, हा दुसरा मोठा गहन प्रश्न... त्यामुळे तीही शक्यता नसल्यात जमा आहे.... त्यामुळे नेतृत्वबदल इतक्यात नाही... झाले तरी ते 'संघीय भाजप नेत्यां'मध्येच होतील.... जसवंत-यशवंत-शौरी यांना पदं मिळण्याची शक्यता सध्यातरी दिसत नाही...
आता दुसरी बाजू म्हणजे नेतृत्वबदल न करता अडवाणी-राजनाथ हेच आपल्या पदांवर कायम राहिले तर...! यात एक मोठ्ठा धोका आहे... आत्ताचं काँग्रेस आघाडी सरकार त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी पडण्याची शक्यता शून्य आहे... त्यामुळे भाजपला लढण्याची संधी आणखी साडेचार-पाच मिळणार नाही, हे नक्की आहे. म्हणजे २०१४ साली जेव्हा निवडणुका होतील, त्या वेळी अडवाणी आत्तापेक्षा जास्त थकलेले असणार... त्यांना 'पंतप्रधानपदाचा उमेदवार' म्हणून प्रमोट करणं, हा मूर्खपणा ठरेल... त्यामुळे तेव्हा नवा चेहरा असला पाहिजे... मग तो सुषमा स्वराज-जेटली-मोदी यापैकी कोणाचाही असू शकतो... मग त्यांना पक्षाचं (किंवा पक्षाच्या संसदीय दलाचं) नेतृत्व करायची संधी आत्तापासूनच का द्यायची नाही... त्यांच्या कामाचा अनुभव नंतर निवडणुकीत पक्षाच्या उपयोगाला येईल आणि योगायोगानं सरकार आलंच भाजपचं, तर त्या सरकारच्या आणि पर्यायानं देशाच्या उपयोगाला येईल... आणि ते विरोधी पक्षाचा सर्वोच्च नेता म्हणून कसं काम करतायत, याची लोकांनाही परिक्षा करता येईल... नाहीतर चार-पाच वर्ष विरोधी पक्षनेतेपद अडवाणींकडे... आणि नंतर दुस-याच कोणाला पुढे केलं, तर मतदारांशी 'आंधळी कोशिंबीर' खेळल्यासारखं होईल...
या आपल्या नुसत्या शक्यता.... पक्षात काय गोंधळ चाललंय याच्याशी सामान्य मतदाराला काही घेणंदेणं असायचं कारण नाही... पण देशातला सगळ्यात मोठा विरोधी पक्ष कमकुवत होणं देशाला परवडणारं नाही... (हे माझं एकट्याचं मत नाही पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही असंच वाटतंय...) त्यामुळे भाजप नेत्यांनी आपले हेवेदावे बाजुला ठेऊन (आणि ते शक्य नसेल तर लवकरात लवकर सोडवून) कामाला लागावं, असं वाटतंय.... सरकारची नावं ठेवण्यासारखी अनेक धोरणं आहेत... देश दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे... शेतकरी आत्महत्या करतायत... महागाई अवकाशाला भिडलीय... अशा वेळी सरकारला धारेवर धरायचं सोडून 'जिनांमुळे फाळणी झाली की नेहरूंमुळे....?' 'पोखरण... सक्सेस की फियास्को...?' 'कंदहारला जबाबदार कोण?' असल्या प्रश्वांवरून भांडण्यात काय अर्थ आहे....?????
*********************************
'पुलं'च्या अंतू बर्व्याचं एक वाक्य आहे.... "हे म्हणजे... भाट्याच्या खाडीवर बुडणा-यास काठावर उभं राहून कुराण वाचून दाखवण्यापैकी आहे... याचा त्यास उपयोग नाही.... त्याचा ह्यास उपयोग नाही..." ते सध्याच्या भाजपला चपखल लागू होतंय... हॅट्स ऑफ टू पीएल...

Wednesday 26 August 2009

सरकारी लगीनघाई...!

"तहान लागल्यावर विहीर खणणे" ही म्हण सोदाहरण स्पष्ट करा... असा प्रश्न जर यंदा कोणा विद्यार्थ्याला टाकला, तर 'महाराष्ट्र सरकारनं गेल्या महिन्याभरात घेतलेले निर्णय...' हे छान उदाहरण पूर्ण मार्क मिळवून देईल... काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारला आता मतांची तहान लागल्ये...
निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होतील... त्यानंतर 'आचारसंहिता' नावाचा राक्षस जन्म घेईल आणि मग बिच्चा-या सरकारला लोकहिताचे निर्णयच घेता येणार नाहीत... म्हणून मग एका महिन्यात तब्बल सहा वेळा मंत्रीमंडळाला एकत्र करून सरकारला अनेक निर्णय घेणं भागच पडलं... त्याला काय करणार?
४४ दिवसांपासून संपावर असलेल्या प्राध्यापकांना अचानक सहावा वेतन आयोग लागू केला... कारण... तहान!
हे सरकार सत्तेवर आलं... त्याच्या आधीपासून महापालिकांची जकात रद्द करण्याची मागणी होतेय... मग १५ ड वर्ग महापालिकांची जकात नेमकी आत्ताच रद्द का होते... कारण... तहान!
शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातल्या स्मारकाला मंजुरी आणि घाईघाईनं त्याच्या टेबल टॉप मॉडेलचं उद्घाटन करायचं कारण... तहान!
सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीचे देव पाण्यात आहेत. शिवसेना-भाजप युती जवळजवळ झाल्यात जमा आहे... लोकसभेतल्या पराभवाचं उट्टं काढण्यासाठी रामदास आठवलेंनी आधी सगळ्या रिपब्लिकन पक्षांना आणि नंतर डाव्या पक्षांना एकत्र करून आघाडीच्या पोटात गोळा आणलाय... अशा वेळी जिथून शक्य आहे, तिथून मतं जमवण्याच्या खटपटीत आघाडी असेल, तर नवल नाही...
त्यात सगळ्यात मोठी गडबड म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार की एकमेकांविरुद्ध मैत्रीपूर्ण हे अजून नक्की नाही... त्यामुळे कार्यकर्ते आणि सगळ्यात महत्त्वाचं इच्छुक उमेदवार, हे संभ्रमात आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर काहीतरी दिलासादायक दिसायला हवं, ही सरकारची खटपट आहे...
आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाचा मुद्दा असा की, सत्तेचा मतांसाठी योग्य वापर कसा करायचा, याचा काँग्रेसचा अनुभव दांडगा आहे. युतीची सत्ता येऊनही त्यांना ती टिकवून ठेवणं जमलं नाही, ते अनुभव कमी पडल्यामुळेच... ऐन निवडणुकीच्या तोंडावर नेत्रदिपक घोषणाबाजी कशी करायची, हे काँग्रेसइतकं कोणालाही समजलेलं नाही... कारण 'पब्लिकची मेमरी ही रिसेंटच असते... फार जुन्या गोष्टी तिला आठवत नाहित...,' जे उशिरात उशिरा कराल, ते जास्तीत जास्त लक्षात राहिल... हे त्यांना पक्क माहित्ये.
गेल्या निवडणुकीवेळी तत्कालिन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी शेतक-यांना वीज मोफत देण्याचं जाहीरनाम्यात म्हंटलं होतं. त्याबद्दल नंतर विचारल्यावर तेव्हाच्या प्रदेशाध्यक्षा प्रभा राव यांनी 'प्रिंटिंग मिस्टेक' सांगून मुद्दा निकाली काढला होता... आपण जनतेची सरळ-सरळ फसवणूक करतोय, असं ना शिंदेंना वाटलं ना प्रभाताईंना... आता पुन्हा तेच होणार याची काँग्रेसी-राष्ट्रवादी काँग्रेसींना खात्री आहे... लोकांनी त्यांचा भ्रमनिरास करण्याची गरज आहे...
पण शिवसेना-भाजप किंवा मनसे-भाजप किंवा शिवसेना-भाजप-मनसे असं कोणीही सत्ते आलं, तरी ते काही भव्यदिव्य काम करतील, अशी खात्री लोकांना नाही... त्यामुळेच 'अनोळखी देवदुतापेक्षा ओळखीचा सैतान बरा...' या इंग्रजी म्हणीप्रमाणे लोक पुन्हा या 'ओळखीच्या सैताना'लाच सत्तेत आणण्याची शक्यता अधिक दिसत्ये.

Saturday 22 August 2009

बाबूगिरीला चाप...

कालची बातमी... मुंबई उच्च न्यायालयानं एड्सबाधित कैद्यांच्या बाबतीत सरकारला धारेवर धरलं. एका कैद्याच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू होती. हा कैदी एचआयव्ही पॉझिटीव्ह आहे. तुरूंगात नीट उपचार मिळत नाहीत, म्हणून त्याला जामीन हवा आहे. याबाबत सरकारनं अहवाल आणि प्रतिज्ञापत्र काल सादर केलं. पण ते वाचल्यावर कोर्टानं दिलेले आदेश सरकारच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारे आहेत.
मुख्य न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार आणि न्या. धर्माधिकारी यांच्या खंडपीठानं या अहवाल-प्रतिज्ञापत्राचे वाभाडे काढलेत. राज्याच्या गृहसचिव ऍना दाणी यांनी असले अहवाल देण्यापेक्षा स्वतः फिरून परिस्थिती बघावी, असे आदेशच न्यायालयानं दिले. एड्सग्रस्त रुग्णांची सगळ्यात वाईट स्थिती असलेल्या १५ तुरूंगांना स्वतः भेटी द्या... असं न्यायालयानं बजावलंय. त्यात १० तुरुंगांना दाणी यांनी तर ५ तुरूंगांना त्यांच्या खात्याच्या उपसचिवानं भेट दिली पाहिजे, अशी वाटणीही कोर्टानं करून दिलीय. याचा अर्थ दाणींनी सगळी जबाबदारी उपसचिवांवर ढकलू नये, याची खबरदारीही कोर्टानं घेतलीय. कोर्टाची सगळ्यात मोठी पंचलाईन म्हणजे, या भेटी दिल्यावर अहवाल द्यायचा नाही, असं सांगण्यात आलंय. दाणी आणि त्यांचे सहकारी यांनी स्वतः कोर्टात येऊन 'या तुरूंगांमध्ये काय पाहिलं...?, ते पाहून काय वाटलं...? आणि ते थांबवण्यासाठी आपण काय करणार आहोत?' हे प्रत्यक्ष सांगायचं आहे... हा आदेश म्हणजे 'आयसिंग ऑन केक...' म्हंटलं पाहिजे.
कोर्टानं इतकं चिडायचं कारण म्हणजे राज्याचं गृहखातं आणि आरोग्यखात्याला एकूण परिस्थिती बघण्याचे आदेश यापूर्वी कोर्टानं दिले होते. त्यावर नेहमीची बाबूगिरी करत 'आपण एड्सचा प्रसार रोखण्यासाठी काय करणार आहोत...' असली बच्चनगिरी अहवालात होती. त्यामुळे कोर्ट संतापलं... ज्यांना आगोदरच एड्सची बाधा झाली आहे, अशा कैद्यांचं काय, असा खडा सवाल न्यायालयानं केला. त्यात कोर्टानं मदतीसाठी नेमलेले ऍमिकस क्युरी युग चौधरी यांच्या अहवालानं भर घातली. कैद्यांमधल्या आजारानं गंभीर स्वरूप धारण केल्याशिवाय त्यांच्यावर ट्रिटमेंटच दिली जात नाही, असं या धक्कादायक अहवालातून स्पष्ट झालंय.
कोर्टाच्या या आदेशांचं सामान्य माणसानं मोकळ्या मनानं स्वागतच करायला हवं... एक तर हा विषय कैद्यांपुरता मर्यादित असला तरी एकूणच असल्या बाबूगिरीचा फटका आपल्याला कायमच बसत असतो... मग ते मंत्रायलयात आपलं एखादं काम अडलं असेल... किंवा मुंबई हल्ल्यांबाबत पाकिस्तानला पुरावे देणं असेल... किंवा अगदी साधं रेशन कार्डावरचा पत्ता बदलणं असो... हा बाबूगिरीचा व्हायरस आपल्या नसानसांमध्ये भिनलाय... त्याचा उपद्रव एचआयव्हीप्रमाणेच थेट दिसत नाही... पण त्याची लागण झाली की आपली प्रतिकारशक्ती कमी होते... आणि आपल्या बाकीच्या सगळ्या यंत्रणा हळूहळू निकामी होतात... कोर्टानं दिलेले हे आदेश म्हणजे या बाबूगिरीच्या व्हायरसवर जालीम इलाज म्हणायला हवा... हा निकाल एका केसपुरता मर्यादित असला, तरी त्याचा एकूण टोन सगळ्या बाबू लोकांवर आसूड ओढणारा आहे... यावरून नोकरशहांनी धडा घेतला तर बरं... नाहीतर कोर्टाला असेच आदेश देऊन या लोकांना खुर्चीवरून हलवावं लागेल... ते आपल्या व्यवस्थेला फारसं हितावह नाही...

Friday 21 August 2009

बाप्पाशी गप्पा... इतकंच!

काल रात्री बाप्पा स्वप्नात आला...
म्हणाला... काय राव? मला विसरूनच गेलास
मी म्हंटलं त्याला, विसरीन कसा बाप्पा...
रोजच्या कामाच्या रगाड्यात थोडा विस्मृतित गेलास... इतकंच!

पण स्फोट-बिट झाले की आठवतोस तू आम्हाला...
आत्ता नुकताच 'ताप' आल्यावरही लागलेलो तुझं नाव घ्यायला...
तसा मी मुळातच भित्रा आहे रे...
चार ओळखीचे भेटले की बरं वाटतं भाव खायला... इतकंच!

तू आलास घरी की मोदक-बिदक करणार आहे मी...
तू खात नाहीस माहित्ये रे मला... तुझ्या नावानं मी तर खातो...
तुझी आरती म्हणीन मी तेव्हा हुरळून जाऊ नकोस,
ज्याचा सण असेल त्या देवाचीच गाणी आम्ही नेहमी गातो... इतकंच!

दिड दिवस रहा... पाच दिवस रहा किंवा आख्खे दहा दिवस रहा...
पूजा-अर्चा-भजनं करण्याचा माझा वस्तुपाठ आहे...
कारण त्याला माझाही इलाज नाहिये रे...
'देखल्या देवा दंडवत' करण्याचा माझा ठरलेला परिपाठ आहे... इतकंच!

लालबागचा राजा... दगडूशेट हलवाई... आणि
कुठकुठल्या मंडळांमध्ये पाहतो मी तुला... आणि तुझ्यासमोरची लांब रांग...
खरंच यातले भक्त किती आणि लड्डूभक्त किती...
हे तुला तरी कळतं का रे...? पण रिद्धि-सिद्धीची शप्पथ घेऊन सांग... इतकंच!

तुला निरोप देत सांगितलं पुढल्या वर्षी लवकर यायला...
की मग कोण-तू आणि कुठला तू, असं म्हणायला मी मोकळा होणार...
नाही... नाही... मी तूला विसरलो असं समजू नकोस रे...
फक्त माझ्यावर संकटं आली की मगच तू मला आठवणार... इतकंच!

माझं इतकं ऐकून घेतल्यावर बाप्पानं गप्प बसावं ना?
पण म्हणाला... फक्त चतुर्थी टू चतुर्दशी मी तुला आठवतो...
वाटतंय खरं असं मित्रा तूला...
पण तू सुखात असतानाही आठवण काढतोस माझी...
कारण ती सगळी सुख मीच तुझा पत्ता लिहून पाठवतो...
ते तुला समजत नाही... इतकंच!

Wednesday 19 August 2009

प्याटर्नचा प्याटर्न... म्हंजी 'पुने प्याटर्न'

प्याटर्न हा शब्द तसा लय भारी... म्हणजे काये म्हायत्ये का भाव, आमची छबी १०वीला व्हती तवा तिला आमी एक प्याटर्न आनलेला... तेच्या जायरातीत म्हनलेलं का ह्यो वाचला की पास व्हायला व्हतं... पन आमची छबी तीन इषयात गचाकली. तवापास्न या प्याटर्नवर काय भरवसा नाय आपला... नंतर २ टर्मा भरल्यावर छबी कशीबशी पुढं ढकलली... बारावीत गेल्यावर पुन्ना म्हन्ली, प्याटर्न पायजे... म्या म्हनल... भो**त जा... आता एक पैसा देनाय न्हाय... प्याटर्न-बिटर्न सगळं बकवास असतंय... हवा कशाला त्यो प्याटर्न न् फ्याटर्न... आनि काय सांगू भाव... प्याटर्न घेतला नाय तर छबी पहिल्या वक्ताला पास... अश्शी मज्जा...
तुमाला वाटलं, ह्यो गडी आता का ह्ये सांगतुया.. आता कुटं आला ह्यो प्याटर्नचा फ्याटर्न... पण त्याचं कारन असं गड्यांनो का आजच्या पेपरात वाचलं का कोणचातरी 'पुने प्याटर्न' व्हता म्हणं... त्यो मोडला! बातमी वाचली का... तर कायबी कळंना... कन्चा प्याटर्न मोडला ता... (छबीला नापास करनारा प्याटर्न मोडला असता, तर लय् बरं वाटलं असतं...) कायच कळत नव्हतं... त्यात पुनं म्हापालिकेचा कायतरी लिवलेला... आनी ते उद्धव ठाकरे.. त्या कायतरी बोलला व्हता... म्हनल् ही कायतरी राजकारणाची भानगड दिसतिया... मग म्हनलं आमच्या आळीतल्या गणूला इचारू काय ते... त्यो कायतरी सभा-बिभांना जातो....
गण्याला गाटला अन् इचारलं की, ह्यो पुने प्याटर्न काय भानगड हाय ते सांग गड्या... त्यानं सांगितलं, त्ये मला काय जास्त समजलं नाय... समजलं इतकंच...
******************
एका शाळेत चार पोरं असतात... 'रा' आनी 'का' ह्ये दोघं मित्र आनी 'शि' आनी 'भा' ह्ये दोघं मित्र... यकदा गणिताच्या पेप्राला 'रा', 'शि' आनी 'भा' यांनी एकत्र येऊन कापी केली आनी तिघेबी पास झाले. मग 'का' आपल्या ख-या दोस्ताला, म्हंजे 'रा'ला लय चिडवायचा त्या पेप्रानंतर... आता परत परिक्षा आली तर तू कोनासंगट कापी करनार, असं इचारायचा सारका-सारका... पन ती वेळच आली नाय... कारन 'शि' आनी 'भा' या दोगांनी 'रा'ला कापीतून कटापच करून टाकला... मंग 'का' ला आपोआप साथी मिळाला कापी करायला... अनी फुडल्या जास्त अवगड पेप्रात त्यांनी आपापल्या जोडीदारासंग कापी करायचं ठरिवलं...
************************
ह्ये अस्स हाय होय पुने प्याटर्न... आमच्या छबीच्या येळी ह्यो "पुने कापी प्याटर्न" गावला असता तर ती बी पयला वक्ताला पास झाली नसती का?

आशिष चांदोरकर यांची ताजी पोस्ट... As it is...

"साम मराठी"ची वर्षपूर्ती...

कार्यकर्त्यांमुळे साकारतेय "साम राज्य"...
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि भारत... क्रिकेटमध्ये सध्याच्या युगातली ही दादा मंडळी. पण न्यूझीलंडचा संघ या दादा मंडळींमध्ये कधीच मोडला जात नाही. तरीही कायम तो संघ विजेतेपदाच्या स्पर्धेत असतो. चॅंपियन्स करंडक स्पर्धा जिंकण्याची कामगिरीही त्यांनी एकदा करुन दाखवलीय. त्यांच्याकडे सचिन तेंडुलकरसारखा "स्टार प्लेअर' नाही, वॉर्न-मुरलीप्रमाणे फिरकी गोलंदाज नाही, पॉटिंग-कॅलिस सारखे फलंदाज नाही. पण न्यूझीलंडच्या संघाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे अष्टपैलू खेळाडू, त्यांचं क्षेत्ररक्षण, खेळातलं सातत्य आणि संघासाठी प्रत्येकाचं काही ना काही योगदान. हा संघ ऑस्ट्रेलियासारखा जगज्जेता नसेल पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करुनही चालत नाही. असंच काहीसं "साम मराठी' वाहिनीचं आहे. विशेषतः बातम्यांचं!
पण गेल्या वर्षी जेव्हा वाहिनीची सुरवात झाली तेव्हा परिस्थिती अशी नव्हती. "साम जन्मला गं सखी साम जन्मला...' अशा प्रतिक्रियांनी गेल्या वर्षी 15 ऑगस्टच्या आसपास "साम मराठी' या वाहिनीचं स्वागत झालं होतं. अर्थातच, माध्यमातल्या बऱ्याच जणांनी स्वागत करताना नाकं मुरडली होती किंवा त्यांची या बाळाबद्दल फारशी चांगली प्रतिक्रिया नव्हती. "सकाळ'सारख्या ग्रुपकडनं त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या, त्या पूर्ण झाल्या नव्हत्या. ही गोष्ट बरेच जणांनी बोलून दाखविली होती. कारणही तसंच होतं. काहीच महिन्यांपूर्वी म्हणजेच गुढीपाडव्याला "आयबीएन लोकमत' या वृत्तवाहिनीचं आगमन झालं होतं. त्यामुळं सकाळची "साम' आणि "आयबीएन लोकमत' यांच्यात तुलना होणं साहजिकच होतं. अशा परिस्थितीत "साम'वरचे कार्यक्रम आणि इतर घडामोडी यामुळं ""...उचललेस तू मीठ मूठभर, "साम्राज्या'चा खचला पाया...'' असं म्हणण्यापर्यंत लोकांची मजल गेली होती. अर्थातच, सुरवातीच्या काही महिन्यातच!
आमच्याकडे राजदीप सरदेसाई किंवा निखील वागळे यांच्यासारखा चेहरा नसेल, "आयबीएन', "स्टार' किंवा "झी'सारखं नेटवर्क नसेल, "टाइम्स नाऊ' किंवा "नेटवर्क 18' इतक्‍या "ओबी व्हॅन' नसतील. पण तरीही आमची बातमी चुकत नाही. बातमीचा क्रम चुकलाय असं कधी झालं नाही. सोयी-सुविधांची फारशी रेलचेल नसतानाही आम्हाला कशाचीच उणीव भासली नाही. ना राज ठाकरे यांच्या मराठीच्या आंदोलनावेळी, ना 26 डिसेंबरच्या हल्ल्यावेळी, ना लोकसभा निवडणुकीच्या संपूर्ण टप्प्यात. काठोड्याचं बलात्कार प्रकरण असो किंवा हासेगावच्या एड्‌सग्रस्त विद्यार्थ्यांची ससेहोलपट साम मराठीनं प्रथम प्रकरणाला वाचा फोडली आणि नंतरही वेगवेगळ्या स्तरावर हे मुद्दे लावून धरले. निरनिराळ्या वृत्तमालिका झाल्या. "सकाळ'च्या संस्कृतीपेक्षा थोडीशी हटके भूमिका घेत "साम'नं कायम आक्रमकपणे बातम्या दिल्या. मग पद्मसिंह पाटील यांच्या अटकेची बातमीही "राष्ट्रवादी'वर आसूड ओढणारी होती. "राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दहाव्या वर्धापनदिनी पद्मसिंह पाटलांच्या हकालपट्टीची पक्षावर नामुष्की...' अशा मथळ्याची बातमी "सकाळ'मध्ये आली असती का? पण हीच हेडलाईन आणि बातमीचा हाच टोन "साम'वर होता. त्यामुळं आम्हीही आता आमचा टक्का निश्‍चित केला असून तो वाढवत नेण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.
कोणी काहीही म्हणत असलं तरी आता "साम मराठी' बऱ्यापैकी स्थिरावलीय. राज ठाकरे यांचं मराठीच्या मुद्‌द्‌यावरचं आंदोलन असो, "एन्ट्री पोल', "मी महाराष्ट्र बोलतोय...' किंवा "लोकसभा ट्‌वेंटी-20' सारखे निवडणूक विषयक कार्यक्रम असो, "साम'च्या वृत्तविभागानं बऱ्यापैकी मायलेज मिळवलं आहे. अगदी सुरवातीच्या काळात तर राजू परुळेकर यांनी घेतलेल्या "महाराष्ट्र कोणाचा' या कार्यक्रमामुळं "साम'ची बऱ्यापैकी प्रसिद्धी झाली होती. तसंच टोकदार, आक्रमक पण इतर वृत्तवाहिन्यांप्रमाणे उथळपणा न करता बातम्या देण्याचं काम "साम मराठी'चा वृत्तविभाग करतोय. त्यालाही हळूहळू प्रतिसाद मिळतोय. ""तुमच्या बातम्या वेगळ्या असतात. इतरांकडे त्याच त्याच बातम्या दाखवितात. तुमच्याकडे मात्र, तोच तोच पणा येत नाही,'' अशा प्रतिक्रिया प्रेरणादायीच म्हटल्या पाहिजेत. बाकी "टाटा स्काय' किंवा "डिश'वर साम दिसत नाही. ही खंत आहेच. पण हे जेव्हा घडेल तेव्हा "साम'ची घोडदौड खऱ्या अर्थानं सुरु होईल.
"झी 24 तास', "स्टार माझा' आणि "आयबीएन लोकमत' यांच्याकडचं मनुष्यबळ, वार्ताहरांची संख्या, उपलब्ध तंत्रज्ञान, सुविधा आणि हिंदी किंवा इंग्रजी वाहिन्यांकडून मिळणारा "सपोर्ट' या सर्वच गोष्टी लक्षणीय आहेत. म्हणजेच या गोष्टींमध्ये "साम'ची तुलना इतर मराठी वाहिन्यांशी करता येत नाही. पण तरीही "साम'च्या बातम्यांचा स्वतंत्र प्रेक्षक वर्ग तयार झाला आहे. ही गोष्ट वारंवार स्पष्ट झालीय. "आयबीएन' वाहिनी दोन्ही "डीटीएच'वर जाण्यापूर्वी "आयबीएन' वाहिनीपेक्षा "साम'चा "जीआरपी' (ग्रॅंड रेटिंग पॉईंट) प्रत्येक आठवड्याला अधिक असायचा. इतकंच काय तर लोकसभा निवडणुकीच्या दिवशी "एनडीटीव्ही' आणि "साम' वाहिनीच्या प्रेक्षकांची टक्केवारी जवळपास सारखीच होती. "एन्ट्री पोल'च्या प्रश्‍नमंजुषेच्या उत्तरासाठी रोज जवळपास हजारहून अधिक "एसएमएस' यायचे. थोडक्‍यातच सांगायचं झालं तर "साम'ची लढाई अस्तित्वासाठी सुरु नसून अधिकाधिक वरच्या क्रमांकावर जाण्यासाठी सुरु आहे. "मी मराठी'च्या बातम्यांशी तुलना करण्याची माझी इच्छा नाही. पण अनेकदा आमच्या बातम्या, आमचा लुक "झी 24 तास'पेक्षाही चांगला असतो. असो.
वैयक्तिकदृष्ट्या विचार करायचा झाला तर "इनपुट हेड' किंवा "प्रोड्युसर' म्हणून काम करताना खूप मजा आली. कामातला आनंद इतका होता की त्याचा कधी कंटाळा आलाच नाही. स्वतंत्र विचार करण्याची आणि त्याची अंमलबजावणी करण्याचं स्वातंत्र्य इथं आहे. त्यामुळं काम करताना मिळणारा आनंद खरोखरच अवर्णनीय आहे. इतरांना हेवा वाटावा, असा मराठी वृत्तवाहिन्यांमधला क्रमांक एकचा "डेस्क' आज "साम मराठी'कडे आहे. अनुभवी आणि धडपड्या रिपोटर्सची "टीम' आमच्याकडे आहे. "बॉसिंग' न करणारे "साहेब' आमच्याकडे आहेत. नवं काहीतरी शिकण्याची जिद्द असणारे "कार्यकर्ते' आमच्याकडे आहेत. त्यामुळंच "डेस्क'चं काम सांभाळून रिपोर्टिंग करणारे, गरज पडली तर पॅनेल प्रोड्युसिंग करणारे "कॉपी एडिटर' किंवा "बीपी' साममध्ये आहेत. एखाद्या "एपिसोड'साठी दोन-दोन दिवस ऑफिसमध्ये तळ ठोकून बसणारी मंडळी आहेत. या सर्वांच्या जोरावर हा "साम'चा गाडा ओढला जातोय. रिपोर्टिंग, कॉपी एडिटिंग, स्पेशल प्रोग्रॅमचं प्लॅनिंग, व्हिडिओ एडिटिंग किंवा "व्हीओ' असं काहीही असलं तरी "कार्यकर्ते' सदैव तयार असतात.
शिवरायांचं स्वराज्य जसं मावळ्यांच्या जोरावर घडलं तसंच हे "साम राज्य' कार्यकर्त्यांच्या जोरावर घडतं आहे. अडचणी आहेत. संकटं येणार आहेत, हे देखील माहिती आहे. पण त्याचबरोबर एक सुंदर "एसएमएस'ही आम्हाला माहिती आहे. तो "एसएमएस' असा...
As we sail through life, don't avoid storms and rough waters. Just let it pass. Sail On and Sail On. Just because calm seas never make skillful sailors...

Tuesday 18 August 2009

पुन्हा क्रिझवर भिंत...?

भारतीय संघाचा माजी कर्णधार राहूल द्रवीड वन-डे टीममध्ये परतलाय... सगळ्या मिडीयानं त्याला डोक्यावर घेतलं कारण त्यानं कमबॅक केलंय म्हणून... अन्यथा त्याचा वाईट फॉर्म सुरू असताना त्याला शिव्यांची लाखोली याच मिडीयानं वाहिली ना? पण 'देखल्या देवा दंडवत' अशी आपली नितीच आहे, त्याला कोण काय करणार? राहूल परत आला, हे चांगलं झालं का वाईट, हे आत्ताच कसं सांगता येईल?
आयपीएलमध्ये द्रवीड चांगला खेळलाय, हे कबूल... त्याचा संघ थेट फायनलला पोहोचला, हे ही खरं... पण आयपीएलमध्ये खेळणं वेगळं आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळणं वेगळं... (मग त्या हिशेबानं शेन वॉर्नला पुन्हा कॅप्टन करायला पाहिजे ऑस्ट्रेलियानं) मुळात द्रवीडची ख्याती आहे, 'दि ग्रेट इंडियन वॉल...' अशी. वन-डे खेळताना त्याच्या या वॉलचा उपयोग नाही. तिथं विरेंद्र सेहवाग, युवराज सिंगच पाहिजेत. म्हणजे आधीच द्रवीड हळूबाई... त्यात पहिली विकेट लवकर गेली आणि तो वन-डाऊन आला तर बघायलाच नको... मग क्रीझवरची ती 'वॉल' इतकी भक्कम होते, की भारतीय संघही ती पार करू शकत नाही. टेस्ट मॅचमध्ये द्रवीडला पर्याय नाही... (मांजरेकर होता... तो लवकर गेला विचारा कॉमेंट्री करायला.) पण वन-डेमध्ये त्याला घेण्याऐवजी आयपीएलमधून पुढे आलेल्या एखाद्या नव्या खेळाडूला संधी दिली असती, तर त्याचा जास्त फायदा झाला असता. खरंतर २०११ चा वर्ल्डकप डोळ्यासमोर ठेऊन चॅम्पियन ट्रॉफी आणि श्रीलंका दौ-यासाठी टीम निवडायला हवी होती. तोपर्यंत द्रवीड संघात राहील की नाही, शंका आहे. विराट कोहली, स्वप्नील असनोडकर, रविंद्र जडेजा, सिद्धार्थ चिटणीस, विल्किन मोता, श्रीवस्त गोस्वामी, धवल कुलकर्णी, मनप्रितसिंग गोनी असे चांगला खेळ असलेले अनेक जण आहेत. त्यातले कोहली-असनोडकर यांची नावं सगळ्यात अग्रणी... पण त्यांना संधी द्यायची सोडून द्रवीडवर पुन्हा प्रयोग का केला जातोय, हे समजू शकत नाही...
असे प्रयोग कधीकधी यशस्वी होतातही... उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर सौरव गांगूलीचं देता येईल... पण २०११पर्यंत द्रवीड असण्याची शक्यता कमी असताना असनोडकर, कोहली, धवल कुलकर्णी यांना मॅचप्रॅक्टिस कधी देणार? की त्यांना डायरेक्ट वर्ल्डकपलाच उभं करायची श्रीकांतचा विचार आहे..? मग तेव्हा त्यांची कामगिरी खराब झाली तर त्याचा दोष नव्या खेळाडूंचा की श्रीकांतचा...? शिवाय द्रवीड फेल जायची शक्यता आहेच, अशा वेळी काय? मग त्याला काही विचार न करता परत कच-यात टाकतील, हे लोकच...
भारतीय निवड समितीचं हे धरसोड धोरण नवं नाही... याच प्रकारामुळे विनोद कांबळी, नरेंद्र हिरवाणी, खा. नवज्योतसिंग सिद्धु यांच्यासारख्या अनेकांमधल्या टॅलेंटचा बळी घेतलाय. कधीतरी हा प्रकार थांबावा, असं एक कट्टर क्रिकेटधर्मी या नात्यानं वाटणं चुकीचं आहे का?

Monday 17 August 2009

Who is this "KHAN?"

"प्रधानजी..."
फोनवर महाराजांचा चिडलेला-पिचलेला आवाज प्रधानजींच्या चाणाक्ष कानांमधून सुटला नाही... पण त्यांनी तसं दाखवलं नाही... ते सहजच चौकशी करत असल्यासारखं म्हणाले, "काय म्हणतोय महाराज तुमचा परदेश दौरा? सगळं आलबेल आहे ना?"
या प्रश्नानं महाराज अधिकच भडकलेल्याचं प्रधानजींना जाणवलं. पण महाराजांच्या पुढल्या वाक्यानं त्यावर शिक्कामोर्तबच केलं... महाराजांचा भडकलेला आवाज म्हणाला, "डोकं फिरल्यासारखं वागू नका... आमच्यावर इथं काय प्रसंग ओढवलाय माहित्ये का... मी आपल्या देशाचा 'किंग...' पण इथं परदेशात आम्हाला कोणी विचारत नाही... आमची तपासणी करतात... सामान चेक करतात, म्हणजे काय? आपल्या देशात आम्ही इतके प्रसिद्ध... लोक आम्हाला डोक्यावर घेऊन नाचतात. पण इथं आम्हाला कोणीच विचारत नाही... म्हणजे काय?"
महाराजांच्या निर्बुद्धपणाचं प्रधानजींना हसायला आलं... पण ते फक्त चेह-यावर. आवाजात त्यांनी तसं जाणवूही दिलं नाही... (म्हणुनच तर इतकी वर्षं ते प्रधानजी होते) आवाज गंभीर ठेवत प्रधानजी विचारते झाले, "नेमकं काय झालंय ते सांगाल का? तुमच्या आवाजावरून नक्कीच खूप चिडलेले दिसता तुम्ही..."
प्रधानजींचा काळजीचा स्वर ऐकून महाराजांना थोडं बरं वाटलं... मग ते डिटेल सांगते झाले, "आम्ही या देशातल्या नेवार्क विमानतळी उतरलो... आमचं आगत स्वागत करायला कोणी नव्हतंच, पण इथल्या सुरक्षारक्षकांनी आम्हाला चक्क दोन तास डांबून ठेवलं... आमचं सगळं सामान तपासलं, कोणाला फोनही करू दिला नाही... आम्ही येणार असल्याची खबर तुम्ही दिली नव्हतीत का? तसं असेल तर परत आल्यावर तुम्हाला सुळावर चढवीन मी समजलं ना..."
प्रधानजींना असल्या गोष्टींची सवय होती. महाराज येत असल्याचं लेखी कळवल्याची ऍक्नोलेजमेंट त्यांच्या खिशात होती. त्यामुळे ते निर्धास्त होते. पण महाराजांची 'खेचण्याची' ऐती चालत आलेली संधी ते कशाला सोडतायत... प्रधानजी म्हणाले, "हो महाराज... कळवलं होतं मी तिथल्या महाराजांना आपण जात असल्याचं. त्यावर त्यांचं उत्तरही आलंय... त्यांचं म्हणणं आहे, की आमच्या विनंतीवरून तुम्ही तिथं आलात, तर प्रोटोकॉल-बिटोकॉल ठिक आहे. पण तुम्ही एका खासगी कार्यक्रमासाठी तिथं गेलात. त्यामुळे सामान्य पर्यटकाला ज्या सुरक्षाकवचातून जावं लागतं, तेच तुम्हालाही लागू आहे... म्हणजे असं ते म्हणतात. मला वाटतं त्यांची चुकच झाली..." प्रधानजींनी बॅकफूटवर येत एक फटका लगावला... महाराज विचारात पडल्याचं त्यांना जाणवलंच... "त्यांचा अजून एक मुद्दा आहे. त्यांच्या मते तुम्ही काही आपल्या देशातले खर्रे-खुर्रे किंग नाही... तुम्ही केवळ चलचित्रांच्या क्षेत्रात किंग आहात. मग तुमच्यासाठी प्रोटोकॉल का पाळायचा... त्यांच्या देशाच्या नियमांमध्ये बसत नाही म्हणे ते... ते ख-या किंगला पण सोडत नाहीत... तुम्ही तर 'कठपुतली किंग' आहात, असं लिहिलंय त्यांनी दिलेल्या उत्तरात..."
थोडा वेळ गेल्यावर महाराज म्हणाले, "हं...... ते पण खरंच आहे म्हणा... आता असं करा... तुम्ही एक प्रेस कॉन्फरन्स घ्या... त्यात डिक्लेअर करा, की आमच्या महाराजांचं आडनाव 'खान' असल्यामुळेच त्यांना अडवलं... म्हणजे दोन गोष्टी होतील. एक तर आपल्या आडनावाचे लोक खुष होतील आणि आपल्या पुढल्या चलचित्राची पब्लिसिटी होईल... कशी वाटली आयडिया..."
"झक्कास आयडिया महाराज... काय डोकं लढवलंयत... झक्कासच! म्हणजे आम के आम... गुठलियोंके दाम! एकदम भारी... कसं काय सुचतं तुम्हाला हे.. व्वा.. व्वा..."
"पुरे आता... आम्हाला उगीच हरभ-याच्या झाडावर चढवू नका... फोन ठेवा आणि प्रेस कॉन्फरन्स बोलवा... मी परत येण्यापूर्वी या गोष्टीची पुरेशी चर्चा झाली असली पाहिजे...."
*********************
प्रधानजींनी फोन ठेवला... अशी कुठलीच पत्रकार परिषद बोलवायची गरज नाही, हे प्रधानजींना माहित होतं. त्यांचे सगळ्याच मोठ्या पेपर्स आणि चॅनल्समध्ये 'सोर्सेस' होते. त्यांनी दोन-तीन जणांना फोन केले... जास्त जवळच्या तीन-चार जणांना फक्त 'मिसकॉल' दिले....
*********************
हे फोन झाल्यावर प्रधानजींनी इंटरनॅशनल कॉल लावला... अमेरिकेतल्या नेवार्क विमानतळावरच्या सुरक्षा प्रमुखाचा मोबाईल... आणि इतकंच म्हणाले, "असिस्टंट ऑफ किंग खान हियर... थँक्यू व्हेरी मच... डोण्ट टेल महाराज दॅट वॉज माय प्लॅन...!"
फोन ठेऊन प्रधानजी शांतपणे 'मधुशाले'कडे चालते झाले...

Friday 14 August 2009

स्वाइन फ्लू आणि पुणे

माझ्या मागच्या पोस्टमध्ये 'स्वाइन फ्लू'चा विषय थोडा सटायरिकल किंवा सरकॅस्टिक म्हणा हवंतर, पद्धतीनं लिहिलाय. म्हणजे जेम्स बॉण्ड खरंच असता तर त्यानं स्वाइन फ्लूशी लढण्याकरता काय-काय केलं असतं, असा एक कल्पनाविलास केलाय. पण त्यामुळे पुणेकर दुखावले गेलेत, असं दिसतंय.
तशी एक कॉमेंट पडली आहेच, पण माझ्या अनेक 'पुणेकर' मित्रांनी फोन करून किंवा एसएमएस पाठवून मला झापलंय.... कारण एकच... हा इतका 'सिरियस' विषय आहे आणि मी त्याची चेष्टा करतो, म्हणजे काय!!
एक तर मी मुंबईत राहतो... इथं कुठल्या क्षणी काय होईल आणि तुम्हाला घेऊन जायला दूत येतील, याचा भरवसा नसतो... त्यामुळे एकूणच मुंबईकरांची मानसिकता ही 'रेडी फॉर एनिथींग' अशी असते. "स्वाइन फ्लू आलाय का? बरं... बरं... चला कामाला लागा..." असा मुंबईकरांचा ऍटिट्यूड... पुण्यात मात्र परिस्थिती नेमकी या उलट... "पळा... पळा... स्वाइन फ्लू आला... स्वाइन फ्लू आला..." असं म्हणत तमाम पुणेकरांनी रिदा शेखच्या मृत्यूनंतर नायडू रुग्णालयाबाहेर गर्दी केली...
आता माझा जन्मच मुंबईच्या उपनगरातला... दिल्लीचे ४ महिने आणि हैदराबादची ३ वर्ष वगळता उरलेली ३० वर्षं मुंबईत गेली. त्यामुळे मी ठरवलं तरी स्वाइन फ्लूकडे पुणेकरांइतका 'सिरियसली' नाही पाहू शकत... सॉरी बॉस! पण मला या विषयाचं गांभिर्य नाही, असा याचा अर्थ काढायचं कारण नाही... मी मिडियात काम करत असल्यामुळे हा विषय कायमच गांभिर्यानं हाताळतो. त्यात थोडासा बदल म्हणून थोडा कल्पनाविलास केला, तर बिघडलं कुठं?
पुण्यात स्वाइन फ्लू सगळ्यात जास्त पसरलाय हे मान्य... त्याची कारणं काय, हे समजणं कठीण आहे. एक कारण म्हणजे रिदाच्या मृत्यूनंतर नायडू हॉस्पिटलबाहेर लोकांनी केलेली गर्दी आणि त्यातून विषाणूंचा झालेला प्रसार हे असू शकेल (माझ्या एका 'ओरिजनली पुणेकर आता मुंबईकर' मित्राला हा मुद्दा मान्य नाही... तो मित्र प्रतिक्रीया टाकेलच तशी) किंवा पुण्यातलं प्रदुषण हा असू शकेल... किंवा तिथली धड ना थंड-धड ना ऊष्ण अशी हवा हे कारणही असू शकेल. पण पॅनिक होऊन स्वाईन फ्लू कमी होईल असं नाही.... आणि मी किंवा माझ्यासारख्या कोणा सामान्य माणसानं कायम या विषयाकडे गांभिर्यानं पाहिल्यानं तो अटोक्यात येईल, असंही नाही... इतकंच ही पोस्ट टाकण्याचा उद्देश....

Tuesday 11 August 2009

'स्वाईन फ्लू'चा सामना : जेम्स बॉण्ड स्टाईल...

जेम्स बॉण्डला ब-याच दिवसांत काम नव्हतं... पण महाराष्ट्रात स्वाईन फ्लूचा मोठाच उद्रेक झाला आणि जेम्सला काम मिळालं... पण यावेळी कोणा व्हिलन-बिलनचा काटा काढायचा नव्हता त्याला त्याच्याच कंपूत जाऊन. यावेळी गाठ होती H1N1 या व्हारयसशी... म्हणून त्यानं स्वतः नेहमीप्रमाणे फिल्डवर न जाता आपली पोडती उघडली आणि आधीपासूनच त्याच्याकडे असलेली वेगवेगळी गॅझेट्स लोकांना वाटायचं ठरवलं. पण ही गॅझेट्स अशी होती की बघितल्यावर काहीच समजायला नको... बाकीच्यांचं जाऊ दे, साक्षात "क्यू"ला पण समजत नव्हतं काय आहे ते... म्हणून मग जेम्सनं तिला एक्सप्लेन केलं. त्याचा हा सारांश....
*********************************************************
१. मास्क विथ ऑक्सिजन जनरेटर -
स्वाई फ्लूसाठी वापरण्यात येणारा मास हा केवळ ९५ टक्केच विषाणू आडवतो म्हणे... म्हणून मग जेम्सनं हा ऑक्सिजन जनरेटर मास्क लोकांना द्यायचं ठरवलंय. यात बाजुला असलेल्या टाकीत अर्धा लिटर पाणी भरायचं. त्यातला ऑक्सिजन वेगळा करून त्याचा पुरवठा हा मास्क करतो. बाहेरची हवा आजिबात येत नसल्यानं व्हायरस यायचा प्रश्नच नाही. एकदा टाकी फूल केली ती तेवढा ऑक्सिजन २ तास पुरतो. नंतर पुन्हा त्यात बाटलीतलं मिनरल वॉटर भरायचं, की झालं...
२. अलार्मिंग मास्क -
हा दिसायला साध्या मास्कसारखाच आहे. पण हवेत H1N1चं प्रमाण थोडं जरी असेल तरी हा मास्क अलार्म वाजवतो. तसंच त्याच्या पुढल्या टोकावर लावलेला दिवाही ब्लिंक होतो. त्यामुळे याचा उपयोग मास्क वापरणा-यांबरोबरच आजुबाजुच्यांनाही होऊ शकतो. त्यांच्याकडे मास्क नसेल, तरी त्यांना किमान समजू शकेल, की इथं व्हायरस आहेत.
३. व्हायरस डिटेक्टिव्ह गॉगल्स -
हा गॉगल लावला की हवेत किंवा कुठल्याही वस्तुवर H1N1 हा व्हायरस असेल, तर तिथली हवा गडद दिसते. त्यामुळे व्हायरसचा मोठा साठा असलेली हवा ओळखायला सोपं जातं. तिथं जाणं टाळलं की स्वाईन फ्लू व्हायची शक्यता कमी... या गॉगलमध्ये एक अपग्रेडेड व्हर्जनही आहे. त्यात समोरच्या हवेत व्हायरस किती टक्के आहे, ते गॉगलच्या काचेवर कोप-यात दिसू शकतं. त्यामुळे बाकीच्यांनाही सावध करता येऊ शकतं.
४. मास्क विथ ब्लू-टूथ ईपी-माईक -
मास्क लावल्यामुळे सतत फोनवर बोलणा-यांची मोठीच गैरसोय होतेय. अशा लोकांना हा मास्क फार उपयोगाचा ठरू शकेल. याला इनबिल्ट माईक आणि इयरफोन आहेत. तसंच ब्लू-टुथ कनेक्टिव्हिटी असल्यामुळे वायर जोडायची गरजच नाही.
५. फ्लू-प्रोटेक्शन कव्हर गॅझेट -
घड्याळासारखं दिसणारं हे एक उपकरण आहे. त्यात एक बटन दाबलं की तुमच्या शरिराभोवती एक अदृष्य चुंबकीय वलय तयार होतं. ते दिसत नाही, पण असतं. व्हायरसला हे वलय तुमच्या आजुबाजुलाही फिरकू देत नाही. तुम्ही सामान्य वेगानं चालत असाल तर तुमच्या शरीरापासून १ फूट, एका जागी स्थीर असाल तर सुमारे सव्वा फूट आणि वाहनातून जात असाल, तर अर्धा फूट हे वलय असतं. त्यामुळे हे सगळ्यात जास्त सुरक्षित मानलं जातं.
६. व्हायरस किलींग गन -
हे सगळ्यात शेवटचं आणि वरच्या गॅझेटपेक्षाही जास्त उपयोगी असलेलं उपकरण. समजा सगळी काळजी घेऊनही स्वाईन फ्लू झालाच, तर या बंदुकीतून लागण झालेल्या व्यक्तीला गोळी मारायची. गोळी नेम धरून छातीत घालायची... ती गोळी आत शिरते आणि शरिरातले सगळेच्या सगळे H1N1 व्हायरस ठार मारते. त्या माणसाला काही होत नाही. छातीत छोटीशी जखम होते फक्त. अण्टीबायोटिक घेतल्यावर ती २ दिवसांत बरी होते. पण एकदा ही 'गोळी' खाल्ली की, नंतर पुढली ३० वर्षं स्वाईन फ्लूचा धोका अजिबात नसतो...
******************************************************
तर... जेम्स बॉण्ड दि ग्रेटचे उपाय कसे आहेत...? ही गॅझेट्स हवी असतील (विकत... विनामूल्य नाही!) तर या पोस्टला रिप्लाय करावा लागेल... पुरेसे रिप्लाय आले, तरच या ब्लॉगवर नंतर ही गॅझेट्स कुठे मिळतील, त्याचा पत्ता आणि या गॅझेट्सच्या किमती दिल्या जातील... त्यामुळे जास्तीत जास्त रिप्लाय टाकावे लागतील...

Monday 10 August 2009

स्वाईन व्हेकेशन...!

आपल्याला गणपती-दिवाळी-नाताळ आणि मे महिना, असे चार व्हेकेशन पिरियड माहिती आहेत. पण सध्या राज्यात, विशेषतः पुण्यात 'स्वाईन व्हेकेशन' सुरू आहे. जगभरात स्वाईन फ्लूचा उद्रेक झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेपासून सगळे तज्ज्ञ आपल्याला सावध करत होते. पण आपलं सरकारच ज्या गोष्टी सिरियसली घेत नाही, तिथं सामान्यांची काय कथा... आपल्याला जाग येण्यासाठी कुंभकर्णाप्रमाणे रणवाद्द्यांचा गजर करावा लागतो... असंच रणवाद्य वाजलं रिदा शेख या मुलीच्या मृत्यूमुळे... मग आपलं शासन-प्रशासन आणि लोक थोडे जागे झाले... त्यानंतर स्वाईन फ्लूनं मुंबईतही आपला पहिला बळी घेतला... पाचगणीत स्वाईन फ्लूग्रस्त झालेल्यांची संख्या पाव शतकावर पोचली होती. मग नागपूर, नाशिक, नांदेड, रत्नागिरी अशा सगळीकडून रुग्ण सापडल्याच्या बातम्या यायला लागल्या... हा मात्र सगळ्या राज्यासाठीच 'गजर' (इंग्रजित ALARM) ठरला... आणि आताचं चित्रं काय आहे...
पुण्यातल्या नायडू रुग्णालयाबाहेर लांबच लांब रांगा... प्रत्येक पुणेकराच्या तोंडाला मास्क... मुंबईतही लोकल गाड्यांमध्ये रुमाल तोंडाला बांधलेले लोक... (मुंबईत ही संख्या कमी आहे... कारणं दोन. एक तर मुंबईत पुण्याइतक्या वेगानं कोणतंच 'फॅड' पसरत नाही... आणि मुंबईकरांना स्वाईन फ्लू-बीबाबत विचार करायला वेळच नसतो... गाडी-बसमध्ये बसायला मिळेल का, हे महत्त्वाचं...!) शाळांना सुट्टी... हो... दिवाळी-गणपती-नाताळ-मे महिना यातलं काहीही नसताना शाळांना आठ दिवस सुट्टी...
पण ही सुट्टी किती आवश्यक आहे, हे रिदा शेखच्या आईवडिलांना विचारा... केवळ दुर्लक्ष्य झाल्यामुळे त्यांना आपली पोटची पोर गमवावी लागली आहे... विशेषतः लहान मुलं ही h1n1 या विषाणूची जास्त आवडती असल्यानं अशी सुट्टी आवश्यक आहेच... पण शाळेतला अभ्यास बुडू नये, यासाठी गणपती-दिवाळीच्या सुट्टीला कात्री लागणार, हे ही ओघानंच आलं. बरं... आत्ता ही व्हेकेशन एन्जॉय करता येणार का? शक्यच नाही... आत्ता मुळातच पुण्यातलं वातावरण अनेक वर्षांनी इतकं टेन्स आहे... (प्लेगची साथ किंवा खडकवासला यानंतर बहुदा आत्ताच...) अशा स्थितीत पालक आपल्या मुलांना गर्दीच्या ठिकाणी पाठवण्याची शक्यताच नाही. म्हणजे मॉल, थिएटर, पार्क, स्पोर्ट्स क्लब अशा कुठेच या मुलांना जाता येणार नाहीये. सक्तीनं घरात बसावंच लागणार... स्वाईन फ्लूनं पुण्यातल्या एका शाळकरी मुलीचा बळी तर घेतलाच... पण लाखो पुणेकर विद्यार्थ्यांच्या आठ दिवसांचाही बळी घेतलाय... पण त्याला इलाजच नाही! हा बळी घेतलाय अखेरच्या क्षणापर्यंत घोरत पडणारं आपलं प्रशासन आणि या झोपाळू प्रशासनाची झोपमोड न करणारे आपण सगळे यांनी... त्याला इलाजच नाही!!

Saturday 8 August 2009

झालो आम्ही एक पुन्हा...

झालो आम्ही एक पुन्हा...
मिळून आले निळे बावटे...
'विधाना'तही झाली एकी...
पाडून टाकू तिरंगी-भगवे...

सूर हाच उमटला बैठकित
सत्ता नकोच आम्हा तरीही
आम्ही सारी भावंडे हो...
भांडत असलो जरी कितीही...

'भीम'गर्जना करू आता हो...
फिरुनी एकदा उच्च स्वराने...
परतुनी आले सगळे बांधव....
राखी बांधतो याच कराने...

निळानिळा हा देश करूया...
या या रंगा घेऊनि या हो...
तिरंगी वसने उतरून ठेवा...
भले ही अंगे उघडी राहो...

'गवई' म्हणती 'आठवले' का..?
मैत्रीची उघडली 'कवाडे...'
'प्रकाश' नाही आला तरीही
कोण करेल आपुले वाकडे...?

'माये'ला त्या आणा इकडे...
आपल्यामध्ये ओढून घेऊ...
तिचा 'हत्ती'ही आपल्या रंगी...
निळा-निळा हो रंगून देऊ...

दुरूनी काही हसुन ऐकती...
ही सगळ्यांची भाषणबाजी...
आणि म्हणती नवे काय ते...
ही तर यांची जुनीच गोची...

भीमरायाचे नाव घेऊनी...
नाटक करती हे मैत्रीने...
शाहू-फुल्यांची आण भाकूनी...
जना फसविती हे खात्रीने...

हातामध्ये हात घालुनी...
जरी हे घेती आणा-भाका...
स्वार्थ सरता होतील यांच्या...
कपाळी आठ्या... वरती खाका...

Friday 7 August 2009

'वाडा' चिरेबंदी...?

भारतीय क्रिकेटर म्हणजे आमची दैवतंच... रोज सकाळी नमस्कार घालताना मित्राय नमः, सूर्याय नमः असं न म्हणता आम्ही सचिनाय नमः युवराजाय नमः, महेंद्राय नमः असं म्हणतो... सध्या ही दैवतं एका अतिशय छोट्या कारणामुळे चर्चेत आहेत.
प्रश्न आहे क्रिकेट खेळत नसताना जागतिक उत्तेजक द्रव्यविरोधी संस्थेला (वर्ल्ड अँटी डोपींग एजन्सी - वाडा ) आपला ठावठिकाणा कळवण्याची... 'वाडा'चं म्हणणं असं, की तुम्ही खेळत नसता तेव्हा अमली पदार्थांचं सेवन करत नाही कशावरून... त्यासाठी कुठल्याही क्षणी तपासणी करण्याची सोय आम्हाला असावी, यासाठी तुम्ही कुठे असाल तेवढं सांगा... पण हा मुद्दा काही आपल्या दैवतांना मान्य नाही. त्यांचं म्हणणं असं की हे आमच्या खासगी आयुष्यावर अतिक्रमण आहे. आम्ही खेळत नसताना कुठे जातो-काय करतो ते कोणालाही सांगायला आम्ही बांधिल नाही.... बीसीसीआयच्या म्हणण्याप्रमाणे खेळाडूंचा ठावठिकाणा जाहीर करणं सुरक्षेच्या दृष्टीनं गैरसोयीचं आहे. सध्या या मुद्द्यावर 'वाडा'च्या करारात डेडलॉक झालाय...
पहिली गोष्ट म्हणजे जगातलं सगळ्यात श्रीमंत क्रिकेट मंडळ असलेल्या बीसीसीआयला आपल्या म्हणण्याप्रमाणे जगानं वागावं असं वाटतं... याचा प्रत्यय अनेकदा येतो. पण 'वाडा'च्या या नव्या कराराला असलेला बीसीसीआयचा विरोध अनाठायी आहे, असं वाटतं. त्याची कारणं अशी की,
  • खेळांमधून उत्तेजक औषधांचा वापर संपूर्ण मिटावा असं वाटत असेल, तर ख-या खेळाडूंनी खिलाडूवृत्ती दाखवली पाहिजे.
  • बीसीसीआय किंवा भारतीय खेळाडू म्हणतात, तितकी ही अट जाचक नाही. एक तर 'वाडा' काय दर वेळी तुम्ही जिथे असाल, तिथं टपकेलच असं नाही... ही केवळ 'प्रिकॉशन' आहे.
  • "तुम्ही कुठे आहात?" असा 'वाडा'चा प्रश्न आहे... "तुम्ही जिथं आहात, तिथं तुम्ही काय करताय...?" हे 'वाडा'नं विचारलेलं नाही. त्यामुळे हे खाजगी आयुष्यावर आक्रमण ठरत नाही.
  • बीसीसीआयच्या मते खेळाडूंच्या सुरक्षेसाठी हे आवश्यक आहे. पण जेव्हा सामने सुरू असतात त्या वेळी खेळाडूंचे 'वेअरआबाउट्स' जगजाहीर असतात की... मग ते खेळत नसतानाची ठिकाणं समजली तर काय फरक पडणार आहे?
  • बाकीच्या बहुतांश खेळांच्या खेळाडूंनी 'वाडा'ची ही अट मान्य केलीय. भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि महेश भूपती यांनीही क्रिकेटपटूंना शहाणपणाचा सल्ला दिलाय.

बीसीसीआयची एकूण ताकद आणि क्रिकेटपटूंचं जनमानसात असलेलं स्थान बघता 'वाडा'ला हे तितकं सोपं जाणार नाही... आयसीसीची ढाल पुढे करून बीसीसीआय या 'वाड्या'ला खिंडार पाडायचा प्रयत्न करणार. आयसीसीदेखील बीसीसीआयच्या ताटाखालचं मांजर असल्याप्रमाणे वागतं... त्यामुळे बीसीसीआयला हे शक्य आहे. पण खेळांमधून चुकीच्या प्रवृत्तींचं उच्चाटन करायचं असेल (आणि ते केलंच पाहिजे...) आणि 'प्ले ट्रू' हे आपलं ब्रिदवाक्य खरं करायचं असेल तर 'वाडा'नं आपला वाडा 'चिरेबंदी' करण्याची गरज आहे...

Monday 3 August 2009

स्वयंवर झाले राखीचे....!

एक स्वयंवर रामायणातलं... रामचंद्रांनी शिवधनुष्याला प्रत्यंचा लावण्याचा प्रयत्न केला... ते भंग पावलं... मग सीतामाईनं प्रभूंना वरमाला घातली... इत्यादी!
एक स्वयंवर महाभारतातलं... अर्जूनानं पाण्यात बघून माशाचा डोळा फोडला... द्रौपदीनं त्याला वरमाला घातली... घरी आली आणि... जाऊ द्या...

तसंच एक स्वयंवर आमचंही... म्हणजे आमच्या भारतातलं... आमच्या भारतातल्या महानायिकेचं... अर्थात! हे स्वयंवर आहे आपल्या राखी सावंतचं...

उगीच सटायरिकल काहीतरी लिहायचं म्हणून मी विचारणार नाही हं 'माहित्ये का कोण राखी सावंत ते?' राखी सावंतला ओळखत नाही, असा कोण 'माईका लाल' असेल, यावर माझा विश्वास नाही... त्यामुळे राखी सावंत तुम्हाला माहित्ये, हे मला माहित्ये, हे तुम्हालाही माहित्ये....

तर ते असो.... ब-याच रिऍलिटी शो मध्ये रडारड करणा-या राखीताईंना (पॉइंट टू बी नोटेड... राखी'ताई...') खर्रीखुर्री रडारड करायची संधी एनडीटीव्ही इमॅजिन या वाहिनीनं मिळवून दिली... खरं म्हणजे झालं काय, की या चॅनेलला राखी सावंतला घ्यायचंच घ्यायचं होतं एखाद्या रिऍलिटी शो-मध्ये... या चॅनेलनं एक मिटींगच घेतली राखीसाठी काय करता येईल याची... तिला प्रतिस्पर्धी असले की मग ती त्यांच्याशी भांडते-चिडते-रडते-मिडीयात बोंब ठोकते.... पण या चॅनेलला राखी सावंतला घ्यायचंच घ्यायचं होतं ना....!!!! तितक्यात कोणाच्यातरी डोक्यातून मग शक्कल निघाली की, हे सगळे व्याप करण्यापेक्षा ती एकटीच असली त्या रिऍलिटी शोमध्ये तर... सह्ही भिडू.... क्या डोक्या लढव्या... पण मग कंटेस्टंट नाहीत, तर स्पर्धा कसली आणि स्पर्धा नाही, तर शो कसला... आली का पंचाईत? "रिऍलिटी शो-मध्ये स्पर्धक तर हवेतच... बक्षिस एक-स्पर्धक अनेक... तरच तो शो!" असं कोणीतरी म्हणाला आणि त्याच वेळी दुस-या कोणालातरी नामी आयडिया सापडली... म्हणजे बक्षिस एकच असतं ना... मग राखीला 'बक्षिस' म्हणूनच शोमध्ये ठेवलं तर.... व्वा! व्वा! व्वा! काय डोकी असतात एकेक...

ठरलं तर मग... राखी हे बक्षिस(?) आणि तिला जिंकायला येणार कंटेस्टंट्स...

तर अशी कथा राखीचं स्वयंवर ठरण्याची... त्यानंतर मग बरेच दिवस या वाहिनीवर हा खेळखंडोबा सुरू होता... राखी कोणाकोणाला भेटायची काय... गप्पा काय मारायची... इत्यादी.... इत्यादी.... तिचं ते (स्युडो) लाजणं-मुरडणं... तिच्या (खोट्याखोट्या) मैत्रिणींनी तिला चिडवणं... स्वयंवरात झालेला तिचा 'मामा(?)' याच्याशी तिचे लाडीssssक संवाद... हे सगळं झाल्यावर मग हे कंटेस्टंट शॉर्टलिस्ट झाले... (बघा मि. रामचंद्र आणि मि. अर्जून... तुम्ही झाला होतात का शॉर्टलिस्टेड... वाईल्डकार्ड एन्ट्री घेतल्यावर काय, कोणीही जिंकेल स्वयंवरातला पण...) या तिघांपैकी मग एकाला तिनं लाजत-लाजत... मुरडत-मुरडत वरमाला घातली आणि.... "आकाशाशी जडले नाते... धरणी मातेचे...." असा जयघोष घूमू लागला दशदिशांना...

त्यामुळे सत्ययुगात एक... द्वापारयुगात एक आणि आता कलियुगात एक... असा स्वयंवरांचा बॅलन्स झाला... पण ती म्हणे आत्ताच लग्न करणार नाही... म्हणजे तो जो कोण एनआरआय आहे, त्याची अवस्था स्लमडॉग मिलेनियरच्या हीरोसारखी झाली असणार नक्कीच... एक कोटी तर जिंकले, पण हातात तर आले नाहीत... (त्याला दुस-या दिवशी २ कोटी मिळतात... याचं काही खरं नाही, इतकंच...!!!!)

तर असो... अशी आहे एका राखीच्या स्वयंवराची कहाणी... गदिमा असते तर या स्वयंवरावरही एखादं गीत लिहायची गळ त्यांना कोणी घातली असती काय??

Thursday 30 July 2009

काईच्या काई...!!!!

ए... छगन... अजित... तूम्ही कशाला भांडताय आत्तापासून... आपलं काय ठरलं होतं? थरात ज्या मंडळाचे गोविंदा जास्त असतील, त्यांचाच गोविंदा हंडी फोडायला जाणार... मग... भांडण कशाला करताय आत्तापासूनच?
जास्त शाणपणा नको करू अशोक, समजलं ना... यावेळी आमच्याच मंडळाचे गोविंदा जास्त असणार... म्हणून आम्ही ठरवतोय आमच्यापैकी कोण हंडी फोडायला जाणार ते... भांडत नाय काय...!

ह्यॅं... ठरवायचंय काय त्यात... त्या अजितचे काकाच आहेत ना मंडळाचे अध्यक्ष. ते त्यालाच वर पाठवतील हंडी फोडायला...

असं काय नाय... हे तुला कोणी सांगितलं साल्या... तुमच्यासारखं नाई आमचं. तुमच्यात त्या राहूलची आई सांगेल, तसंच करायला लागतं... मागच्या वेळी नाई हंडी फोडायला निघालेल्या विलासला काकूंनी परत बोलावलं आणि तुला सांगितलं की हंडी फोड म्हणून... असं नाय आमच्यात...

हो पण आता विलासला मोठी हंडी फोडायला पाठवलंय ना काकूंनी... म!!

आहाहाहाहा.. म्हणे हंडी फोडायला...!! खालच्या थरावर उभं केलंय विलासला... आणि पाहशीलच तू... शेवटी हंडी फोडायला राहूल जाईल विलास, सुशील यांच्या खांद्यांवर पाय ठेवत...

अजितच्या काकांचं काय झालं रे आबा... त्यांना म्हणे मोठी हंडी फोडायला जायचं होतं... तुम्ही सगळे लै गोंगाट करत होतात ते हंडी फोडणार यंदा म्हणून... हॉ... हॉ... हॉ...

दात काय दाखवतो... आमचं मंडळ छोटं म्हणून... नायतर त्यांनी कधीच हंडी फोडलीपण असती...

मंडळ छोटं असणारच... आमच्याच मंडळातून फुटून गेलात ना तुम्ही...

आयला... हा नारायण जोकच करतो... याचं कुठलं मंडळ... हा दुस-याच मंडळातून तुमच्यात आला आणि आता म्हणे आमचं मंडळ... दे टाळी...

अशोक, तू काय त्याला टाळी देतो... आता आपण एका मंडळातले ना? असं नाई करायचं... आणि आता विलासचं आणि माझं भांडण पण मिटलंय ना... हो की नाई रे कृपा...

अरे नारायण... तू पण कमालच करते... तुमचा आणि विलासचा भांडण मिटला, ते मायतेय अशोकला... म्हणूनच तर त्याला फिकर लागलीय की तू तेच्याशी तंटा करेल आता अशी... विलासला खाली उतरवला ते वक्ताला नाय का तुजा आणि अशोकचा भांडण झालेला हंडी फोडायला कोण जायचा त्यावरून... विसरला काय एवड्यात?

तो कसा विसरेल... राहूलच्या आईनं तर पत्ता कापला त्याचा... किती वेळा गेलेला त्यांच्या घरी मस्का मारायला... पण शेवटी अशोकलाच दिला ना चान्स हंडी फोडायचा...

काय रे पोरान्नो... कसली वादावादी करताय... माझ्याबद्दल काय चाललेलं...

काई नाई हो काकू... हे अजित आणि छगन आहेत ना, ते यंदा मुंबईची हंडी फोडायला कोण जाणार सगळ्यात वर त्यावरून भांडतायत... मी त्यांना सांगितलं आमचं काय ठरलंय ते... पण ऐकतच नाहीत...

भांडू दे रे अशोक त्यांना... शेवटी अजितचे काका आणि मीच ठरवणार ना तुम्हा पोरांपैकी कोणाला खालच्या थरात ठेवायचं... कोणाला मधे आणि हंडी फोडायला कोणाला पाठवायचं ते... तू कशाला लक्ष देतो त्यांच्याकडे... लांब उभा राहून गम्मत बघ ना!! ते बघ... अजितचे काका आलेच इकडे... ते बघून घेतील आता.

काय राहूलच्या आई काय झालं...

अं... काही नाही... अशोक सांगतोय की अजित आणि छगन भांडतायत म्हणून, हंडी फोडायला यावेळी कोण जाणार त्यावरून... म्हणून त्याला सांगत होते, की तुम्ही आलाच आहात, तर बघून घ्याल असं...!

हा.... या कारट्यांना सवयच आहे भांडायची... त्यांना हजारदा सांगितलंय की दुस-याकडे आल्यावर भांडत जाऊ नका आपापसात. पण ऐकत नाहीत... चला रे मुलांनो... दहा-दहा झालेत आता... चला आता आपापल्या घरी... अजून खूप वेळ आहे दहीकाला यायला... नंतर ठरवता येईल की ते... चल बाळा अजित... घरी जाऊ! सुप्रियाताई वाट बघत असेल आपली...