आत्ता रात्रीचे २ वाजतायत. मोदींची चौकशी संपून तासभरच झालाय. पण त्याबद्दल प्रकार्षानं काही गोष्टी वाटल्या, म्हणून लगेच लिहायला बसलो...
नरेंद्र मोदींची चौकशी होणार... दंगल प्रकरणी चौकशी होणार... ही बोंबाबोंब गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. खरंतर या एसआयटीनं मोदींना २१ तारखेला चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र त्यावेळी ते तिथे गेलेच नाहीत. उलट त्यांनी जाहीर पत्र लिहिण्याचा घाट घातला... त्यामुळे मोदी चौकशीला घाबरतात, अशी आरोळी दिली गेली. बरं त्यांनी लिहिलेलं पत्रही खास होतं, वैगरे नाही. साधंच... म्हणजे कायदा सगळ्यांना सारखा आहे... कायद्याचा मी मान राखतो इत्यादी...
काल मात्र त्यांनी तब्बल नऊ-साडेनऊ तास चौकशीत विचारलेल्या ६०-७० प्रश्नांची उत्तरं अधिका-यांना दिलीच. याचा अर्थ ते चौकशीला घाबरतात ही भिती अनाठायी होती, असा घ्यायचा का? पण या कृतीने त्यांनी एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत...
पहिला पक्षी : २१ तारखेची चौकशी टाळून त्यांनी आपणहूनच घाबरत असल्याचा देखावा उभा केला. जेणेकरून जेव्हा चौकशी होईल, त्यावेळी तिला वलय प्राप्त व्हावं आणि त्यांच्याबद्दल कुतूहल निर्माण व्हावं.
दुसरा पक्षी : एका मुख्यमंत्र्याला तुम्हाला हवं त्यावेळी चौकशीला बोलावू शकत नाही, हे त्यांनी एसआयटीला दाखवून दिलं. एसआयटी जरी सुप्रिम कोर्टानं नेमली असली तरी तिने दिलेली तारीख पाळायला ते कोर्ट नाही, हे त्यांनी जाताजाता अधोरेखित करून टाकलं.
पक्षी तिसरा : त्यांना व्हिलन बनवण्याच्या तयारीत असलेल्या अनेकांना त्यांनी तशी पार्श्वभूमी तयार करू दिली. कारण त्यांना त्या काळ्या रंगावर स्वतःचा (म्हणजे त्यांच्या मते.... ते स्वच्छ आहेत, असं मला म्हणायचं नाही.) पांढरा रंग लख्ख उठून दिसावा...
पक्षी चौथा : इतकी मिडीया-हाईप झाल्यावर आजच चौकशी संपवायची आहे, असं सांगून तमाम हिंदी-इंग्रजी चॅनलवाल्यांना रात्री १ वाजताचं बुलेटीन लाईव्ह करायला लावलं...
स्वतःबद्दल कुतूहल निर्माण केल्यानंतर काल दोन्ही वेळा उत्तरे देऊन बाहेर पडताना ते हसतमुखाने मिडियाला सामोरे गेले... पुन्हा त्यांनी मिडियाला काही माहिती पुरवली का.... तर नाहीच! हे सुप्रिम कोर्टाचं पथक असल्यामुळे ते त्यांची माहिती कोर्टाला देतील, मला ती देण्याचा अधिकार नाही, असं सांगत त्यांनी अन्यच मुद्द्यांवर भाषणबाजी केली.
गुजरात दंगली सरकार पुरस्कृत आहेत किंवा नाही, हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. पण त्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल पुरस्कृत (किंवा गोघ्राकांडामुळे ते भडकून उठले, असं म्हणा हवं तर) होत्या, हे मानायला जागा आहेच. संघाच्या मुशित तयार झालेले नरेंद्र मोदी प्रत्यक्षात जरी दंगलीत दगड मारत नसतील, तरी त्यांना या काळात काय घडतंय, ते माहितीच नव्हतं, असं म्हणणं भोळसटपणाचंच ठरेल. कारण एकतर मुख्यमंत्री आणि जे दंगली करत होते, त्यांना अधिक जवळ... त्यामुळे माहितीचे स्त्रोत अधिक असणारच! पण या चौकशीतून काय निष्पन्न होणार? मोदींइतका मुरलेला राजकारणी स्वतःलाच अडचणीत आणणा-या गोष्टी एसआयटीला सांगेलच, याची शाश्वती कोणी द्यायची? त्यामुळे मोदींनी स्वतःहून स्वतःभोवती वलय निर्माण करून कालच्या चौकशीचा आणखी मोठा फार्स घडवून आणला (कर्टसी - मिडिया) हेच यातील सत्य असावं, असं वाटतंय...
स्वतःविरुद्ध पडलेला एखादा फासा डाव जिंकण्यासाठी कसा वापरावा, याचं उत्तम उदाहरण मोदींनी या निमित्तानं देशातील मी-मी म्हणणा-या तमाम नेत्यांना घालून दिलं आहे, हे मात्र खरं... स्वतःच्या विरोधात मोठ्ठी हवा निर्माण करायची आणि हवा एकदा पुरेशी वाहू लागली की त्यात पतंग उडवून मौज लुटायची... ही मोदींची खेळी 'चोक्कस'च म्हणाली लागेल...
'तमे वड्डा शाणा छे.... नरेनभाई!'
'तमे वड्डा शाणा छे.... नरेनभाई!'