Saturday 25 September 2010

चक दे...

कॉमनवेल्थ गेम्सवरून देशाची पुरती आब्रु गेल्यानंतर एकदाचं घोडं गंगेत न्हालं आहे. स्पर्धा होणार की नाही होणार हा घोळ संपला आहे आणि ३ तारखेला एकेकाळच्या सूर्य न मावळणा-या राष्ट्राचे विभागलेले कुळ आपली मशाल दिल्लीत पेटवणारच, हे निश्चित झालं आहे.
सुरूवातीला मणिशंकर अय्यर यांनी या स्पर्धांच्या आयोजनावर आक्षेप घेतल्यानंतर त्यांना देशद्रोही म्हणण्यापर्यंत काहींची मजल गेली होती. मात्र त्यानंतर बाहेर आलेल्या एकेक प्रकरणांमुळे या लोकांचेच दात घशात गेल्याचं चित्र निर्माण झालं आहे. टॉयलेट पेपरपासून ते क्वीन्स बॅटन रिलेच्या लंडनमधील कार्यक्रमापर्यंत प्रत्येक गोष्टीत आपल्या राष्ट्रीय धर्माला जागून पैसे खाल्ल्याचे आरोप केले जात आहे. इतकंच नाही, तर या स्पर्धेचे यजमानपद मिळविण्यासाठीही म्हणे सर्व ७१ देशांना लाच देऊ केली गेली आहे. देशाचं नाक कापलं गेल्यानंतर आता किमान स्पर्धेच्या काळात तरी चांगल्या सोयी ठेवून किमान देशाची मान खाली घातली जाणार नाही, याची काळजी घेतली जाईल अशी अपेक्षा आहे.
आजच कॉमनवेल्थ फेरडेशनचे अध्यक्ष मायकेल फेनेल यांनी आयोजनातील ढिसाळपणाला सगळेच जबाबदार असल्याचं म्हंटलं आहे. या 'सगळे'मध्ये त्यांची समिती आणि ते स्वतःदेखील त्यांना अभिप्रेत आहेत. दोन दिवसांपूर्वीचा त्यांचा सूर अचानक बदलण्यास काही कारणं असू शकतात. एकतर त्यांनी कॅबिनेट सचिव चंद्रशेखर यांना लिहिलेल्या पत्रानंतर खरंच सरकार दणकून कामाला लागलं आणि खरोखरच ४८ तासांत अशक्य ते शक्य करून दाखवलं आणि आता क्रीडाग्राम अत्यंत देखणं, स्वच्छ आणि नीटनेटकं झालेलं आहे... असं मानायला जागा आहे. पण त्यासाठी हॅरी पॉटरच प्रत्यक्षात यायला हवा...
यापेक्षा स्पर्धा सुरू होण्याच्या तोंडावर कटुता नको, असा विचार करून फेनेल यांनी हे वक्तव्य करणं पटण्यासारखं आहे. कारण अवघ्या आठवड्यावर स्पर्धा आल्यामुळे आता ऑलिम्पिक समिती, राष्ट्रकुल समिती, आयोजन समिती हे सगळेच 'पॉइंट ऑफ नो रिटर्न'वर आले आहेत. आता स्पर्धा रद्द होऊ शकत नाहीत, ही काळ्या दगडावरची रेष आहे. त्यामुळे स्पर्धेच्या काळात कोणाच्या मनात किल्मिष राहायला नको आणि सर्वांना ही स्पर्धा एन्जॉय करता यावी, या उद्देशाने फेनेल बॅकफूटवर आलेले असू शकतात. (आरोप होतो आहे, त्याप्रमाणे जर खरंच आंतरराष्ट्रीय लाचखोरी करून यजमानपद मिळवलं असेल, तर या ७१ देशांना हे कथित पैसे परत करावे लागणार नाहीत ना, ही भीतीदेखील फेनल यांच्या मनात असावी का?)  कारण काहीही असलं, तरी आता राष्ट्रकुलावरचं मळभ दूर झालं आहे आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसह सर्व संघ दिल्लीत डेरेदाखल होत असल्याचं आश्वासन फेनेल यांनी देऊ केलंय.
तात्पर्य, स्पर्धांचे गेट.... सेट...(?) झाले आहे आणि फक्त बंदुकीचा बार उडण्याची वाट सगळे बघतायत (रेफरीच्या बंदुकीचा बार... अतिरेक्यांच्या नव्हे!!!) त्यामुळे आता पुढले २-३ आठवडे कलमाडी-शीला दीक्षित यांना विसरूयात... सायना, तेजस्वीनी, विजयेंद्र यांच्यासह तिरंगा खांद्यावर लावून खेळणा-या प्रत्येकाला शुभेच्छा देण्यासाठी १०० कोटी कंठांमधून एकच आवाज देऊयात....

चक दे इंडिया...!!!

Friday 24 September 2010

तारीख पुढे... टेन्शन वाढणार की घटणार?

सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या निकालाच्या सुनावणीला स्थगिती दिली. २४ तारखेला निकाल लागेल असं गृहित धरून आधीची पोस्ट लिहिली होती... तारीख पुढे ढकलली तरी निकाल अटळ आहे.
६० वर्षं भिजत पडलेलं हो घोंगडं 'वॉशिंगमशिन'च्या बाहेर सुकवायचा हा शेवटचाच प्रयत्न ठरावा...  पण इतक्या वर्षांत जे घडलं नाही, ते चार दिवसांत घडायची शक्यता कमीच आहे. किंबहुना लखनौ उच्च न्यायालयाच्या अलाहाबाद खंडपीठात दोन्ही बाजूंनी तसं स्पष्ट केल्यानंतरच निकालाची तारीख जाहीर करण्यात आली होती. यामुळे आजचं मरण उद्यावर गेलंय, इतकंच म्हणता येईल...
मात्र आता तारीख आणखी पुढे ढकलली गेल्याने एक वेगळीच समस्या उभी राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रकुल स्पर्धा ३ तारखेला आहेत. आता हा निकाल या स्पर्धांच्या तोंडावर लागण्याची शक्यता आहे. तसं झालं आणि आपल्या सर्वाच्या दुर्दैवाने आपण या 'वार्षिक परीक्षे'त नापास झालोच, तर आधीच अनेक अपघातांनी जर्जर झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांसाठी तो शेवटचा आघात ठरावा... अर्थात तारीख जाहीर करताना मायबाप सुप्रिम कोर्ट या सगळ्याचा विचार नक्की करेल, अशी आशा आहे.
आता स्पर्धा संपल्यानंतरची तारीख मुक्रर झाली, तर मात्र काही काळ स्पर्धांच्या निमित्ताने आसेतूहिमाचल पसरलेला कृत्रिम तणाव नाहीसा होण्यास मदत होणार आहे...
असो... परीक्षा पुढे ढकलली की हुशार विद्यार्थी ती इष्टापत्ती मानतात आणि नियोजित वेळेत वाचायचे राहून गेलेल्या विषयांची उजळणी करतात... पण एखादा ढ कार्टा असेल, तर परीक्षा पुढे गेल्याच्या आनंदात एकतर सिनेमाला जाऊन बसतो किंवा नाक्यावर टंगळ-मंगळ तरी करतो... आपली कॅटेगरी कोणती ते काळच ठरवेल!!!

Wednesday 22 September 2010

मॅच्युरिटीची लिटमस टेस्ट...

परवा, २४ तारखेला दुपारी साडेतीन नंतर आपल्या देशाची वार्षिक परिक्षा आहे. अयोध्येतील वादग्रस्त वास्तूबाबत गेली ६० वर्षे सुरू असलेल्या खटल्याचे निकालवाचन सुरू होण्याची ही वेळ असेल. यावेळी आपला देश आणि अर्थातच राजकारण्यांच्या परिपक्वतेची लिटमस चाचणी होणार आहे.
- गेल्या ६० वर्षांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. खटला दाखल झाल्यानंतर बाबरी वादावरून अनेक दंगलीही झाल्या. याचा कळस गाठला १९९२ सालाने... कारसेवेच्या नावाखाली बाबरी मशिद (किंवा ढाचा!) उध्वस्त केली गेल्यानंतर देशभरात दंगली झाल्या... त्यात हजारो हिंदू आणि मुस्लिमांचे शिरकाण केले गेले. लोकांना शांत करण्याऐवजी डोकी भडकविण्याची कामं दोन्ही धर्मांच्या धुरिणांनी (आणि काही राजकीय नेत्यांनीही) केली. या दंगलींना 'उत्तर' म्हणून मुंबईत १२ मार्च रोजी दाऊद इब्राहिम पुरस्कृत स्फोटमालिका घडल्याचे मानले जाते. पहिल्या चाचणी परिक्षेत आपण नापास झालो होतो...
- २००२ साली अशीच एक कारसेवा अयोध्येत केली गेली. त्यासाठी देशभरातून विहिंपचे शेकडो कार्यकर्ते गेले होते. गुजरातमधील कारसेवकांचा डबा गोध्रा स्थानकात पेटवून देण्यात आला. यात सुमारे ६० जण (यातील बहुतांश विहिंपचे कार्यकर्ते होते) मारले गेले. त्यानंतर जातीय दंगलींमध्ये गुजरात भाजून निघाला... १ ते २ हजार लोकांचा बळी या दंगलींनी घेतला. गुजरातच्या मोदी सरकारच्या आशिर्वादानेच या दंगली घडविल्याचा आरोप आजही केला जात असून या प्रकरणातले अनेक खटले प्रलंबित आहेत... ही सहामाही परिक्षा मानली तर त्यातही आपण सपशेल आपटी खाल्ली होती... एकही विषय असा नव्हता की ज्यात आपल्याला ३५ टक्के देता यावेत...
- २००५ साली अयोध्येतील वादग्रस्त स्थळी अतिरेकी हल्ला झाला. यावेळी सुरक्षा दलांनी पाच इस्लामी दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं... यावेळी देशात कोणतीही भडक प्रतिक्रीया उमटली नाही... दुसरी चाचणी (नऊमही) परिक्षेचा गड यावेळी आपण सर केला. हिंसा भडकविण्यासाठी हा हल्ला केल्याचं मानलं जात असलं तरी अशी कोणतीही प्रतिक्रीया उमटली नाही.
- २६/११ला झालेल्या प्रिलिम परिक्षेत मात्र आपण उत्तम गुण मिळविले आहेत. मुंबईवर झालेला भयानक हल्ला... यावेळी सगळा देश एकजूट असल्याचे चित्र हायला मिळाले. हा हल्ला म्हणजे पाकिस्तानने आपल्यावर लादलेले युद्ध आहे, अशी भावना हिंदूंबरोबरच मुस्लिम धर्मियांचीही होती. कसाब वगळता मारल्या गेलेल्या ९ अतिरेक्यांवर अंत्यसंस्कार करण्यास किंवा त्यांना भारताच्या मातीत चिरनिद्रा देण्यास मुस्लिम समुदायाने कडवा विरोध केला. या घटनांमुळे आपण पूर्वीपेक्षा अधिक मॅच्युअर झाल्याची झलक बघायला मिळाली.
- २४ सप्टेंबर रोजी आपली वार्षिक परिक्षा आहे. आत्तापर्यंत आपण दाखविलेली प्रगती आपण कायम ठेवणार की पुन्हा आपली गुणांची पाटी कोरी होणार, हे या दिवशी ठरेल. वातावरणात तणाव आहे... किंबहुना हा कृत्रिम तणाव उत्पन्न केला गेला आहे. उत्तर प्रदेशात निमलष्करी दले मागविणे, विविध पक्षांच्या नेत्यांनी दोन्ही धर्मांच्या धर्मगुरूंच्या भेटी घेणे, सतत शांतता राखण्याचे आवाहन करणे या गोष्टींमुळे वातावरणनिर्मिती झाली आहे.
निकाल काहीही लागला तरी कोणीतरी आनंदी होणार आणि कोणीतरी संतापणार हे निश्चित आहे. दोन्ही बाजूंना मान्य होईल, असा निकाल येण्याची शक्यता फारच अंधुक आहे. एकवेळ दोन्ही पक्ष नाराज होतील, अशी स्थिती येऊ शकते. पण win-win situation असणं जवळजवळ अशक्यच... हा निकाल हायकोर्टाचा असल्यामुळे नाराज झालेल्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग निश्चित खुला आहे. दोन्ही बाजूंकडून तसं बोलूनही दाखवलं गेलंय... सर्वांनीच लोकांना शांत राहण्याचं आवाहन केलंय आणि केंद्र व सर्व राज्य सरकारांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी उपाययोजना केल्याचं स्पष्ट केलंय...
मात्र त्या दिवशी प्रत्यक्षात काय घडतं, यावर आपल्या परिपक्वतेची पातळी मापली जाणार आहे. ही अंतिम परिक्षा आपण पास होऊ ही अपेक्षा आहे. या महत्त्वाच्या परिक्षेसाठी देशाला आणि हिंदू-मुस्लिम धार्मिक नेत्यांना आणि सर्व राजकीय पक्ष आणि सरकारांना हार्दिक शुभेच्छा...