किल्ला राखायचा कुणी... किल्ल्याच्या मालकाला प्रश्न. ज्या कष्टानं 'कमळगड' उभारला, जोपासला, तब्बल ६ वर्षं राजधानी म्हणून जो किल्ला देशभर मिरवला... त्याचे बुरूज बेढब झाले होते... त्यांची डागडुजी आवश्यक होती. इतकी वर्षं किल्लेदार असलेल्यांना ते काही जमलं नाही... करायचं काय? मालकाला चिंता... शेवटी पांढ-या मिशीत हसून मालकानं काही निर्णय घेतला आणि तो अमलात आणला...
किल्ल्यात अनेक वर्षं काढलेल्या एका भरभक्कम मानक-याची नेमणूक 'किल्लेदार' म्हणून केली आणि किल्ल्याची डागडुजी करण्याची, त्याला चांगलं रूप देण्याची अशक्यप्राय जबाबदारी सोपवली... या किल्लेदाराला यापुढे आपण सोयीसाठी 'गडकरी' म्हणूयात...
तर... या 'गडकरीं'पुढचं आव्हान कठीण... किल्ल्याची डागडुजी करायची, रंगरंगोटी करायची हे काम वाचून वाटतं तितकं सोपं नाहीये... कारण या 'गडकरीं'च्या बरोबरचे जे लढवय्ये आहेत, त्यांना ए.सी. छावण्यांमध्ये झोपायची सवय लागलीये... प्रत्येक जण आपला आपापला बुरूज सांभाळण्यात व्यस्त... एकानं आपल्या बुरूजाला भगवा रंग दिलेला... दुस-यानं निळा... तिस-यानं लाल.... त्यामुळे एकूण किल्ल्याचं रुप विदुषकासारखं झालेलं... 'गडकरी'चं पहिलं काम होतं या सगळ्यांची तोंड एकमेकांकडे फिरवण्याचं... मालकांनी दिलेली असाईनमेंटच होती ती... झालं 'गडकरी' कामाला लागले...
किल्ल्यावरचे सगळे मानकरी-कामगार-सैनिक वर्षातून एकदा किल्ल्यावरच्या जत्रेसाठी एकत्र येत... 'गडकरी'नं ही संधी साधायचं ठरवलं... जत्रेच्या ठिकाणी त्यांनी सगळे एकाच रंगात रंगवलेले, एकसारखे दिसणारे तंबू उभारले... दरबारातले सगळे मानकरी एकाच पातळीचे आहेत, हे दाखवण्यासाठी... हा पहिला प्रयत्न... पण तो फसला! कारण दिवसभर दुस-या किल्ल्यावर आणि किल्लेदारांवर तोंडसूख घेऊन झालं की आपापल्या ए.सी. छावणीत झोपायला जायचं, हे प्रत्येकानंच ठरवलेलं. (ए.सी.ची सवय झाली होती. काय करणार?)
प्रयोग दुसरा. आपल्या भाषणात गडकरीनी सगळ्या मानक-यांना फैलावर घेतलं... बुरूजांच्या वेगवेगळ्या रंगांवर टीका केली... ए.सी.ला चटावलेल्या मानक-यांचे वाभाडे काढले... लोक किल्ल्याबद्दल जे बोलतात, ते मालकाला आवडत नाही, हे सांगितलं... सामान्य सैनिक आणि कर्मचा-यांशी संबंध वाढवायला सांगितलं... कायम घोडागाड्यांमध्ये फिरणा-यांना पायी जायला सांगितलं... एक ना अनेक...
'गडकरी'चं भाषण झालं... सगळ्या मानक-यांनी ऐकून घेतलं... सैनिकांनी-कामगारांनी टाळ्या वाजवल्या...
एकीच्या आणाभाका झाल्या... दुस-या किल्ल्यातल्या लोकांना नावं ठेऊन झाली... जत्रा संपली... सगळे मानकरी आपल्या ए.सी. बुरूजांकडे परतले... जाताना सगळे जण गालातल्या गालात हसत होते...!!!