Tuesday, 17 July 2012

वयम् पंचाधिकम् शतम्...

"सुईच्या अग्रावर मावेल इतकी जमीनही पांडवांना देणार नाही..." 
सुयोधनाची ही प्रतिज्ञा भावी महायुद्धाची नांदी ठरली... ध्रृतराष्ट्रांनी त्याचं हे वाक्य प्रमाण मानलं... भीष्ण, द्रोणाचार्य, कृपाचार्य आदी मात्तब्बर राजकारण्यांनीही सुयोधनालाच पाठिंबा देऊ केला...
अर्जुनासह पांडवांना १४ वर्षांचा वनवास आणि १ वर्षाचा अज्ञातवास भोगायला लागला. ही १५ वर्षं संपल्यानंतर युद्धाला तोंड फुटलं... अखेरीस श्रीकृष्णानं अर्जुनाचं सारथ्य केलं आणि अर्जुनासह पांडवांना मौलिक उपदेश करून एकेक करून कौरवांचे धनुर्धर पाडले आणि युद्धाची समाप्ती झाली...

हे झालं ओरिजनल महाभारत... कलियुगात अशी अनेक महाभारतं घडत असतात. मात्र त्यात दरवेळी असंच होतं, असं नाही... इथं काय झालं ते ऐका!

"सुईच्या अग्रावर मावेल इतकी जमीनही पांडवांना देणार नाही..." 
सुयोधनाची ही प्रतिज्ञा भावी महायुद्धाची नांदी ठरली... ध्रृतराष्ट्रांनी त्याचं हे वाक्य प्रमाण मानलं... भीष्ण, द्रोणाचार्य, कृपाचार्य आदी मात्तब्बर राजकारण्यांनीही सुयोधनालाच पाठिंबा देऊ केला...

दोन्ही बाजुंनी युद्धाची संपूर्ण सिद्धता झाली... ध्रुतराष्ट्रांनी जरी सुयोधनाची बाजू घेतली असली, तरी सुयोधन आणि अर्जुनादी पांडव एकत्र यावे असंच त्यांनाही वाटत होतं. किंबहुना अर्जून उघड-उघड ध्रुतराष्ट्र हेच आपला आदर्श असल्याचं सांगायचा आणि सुयोधनाच्या राजकारणाला कंटाळून आपण हस्तीनापूर सोडल्याचं म्हणायचा... अर्जुनाचं बोलणं-चालणं-वागणंही थेट ध्रुतराष्ट्रांच्या प्रमाणेच... त्यामुळे अनेकांना अर्जून हाच हस्तीनापूरचा उत्तराधिकारी आहे, असं वाटायचं. मात्र सुयोधनानं केलेली प्रतिज्ञा आणि ध्रुतराष्ट्रांचं पुत्रप्रेम यामुळे गोची झाली होती... 

दोन्ही बाजू दोन वर्षांनी होऊ घातलेल्या युद्धाच्या सिद्धतेला लागल्या होत्या... तत्पु्र्वी छोट्या-मोठ्या लढायांमध्ये दोघंही आपापलं बळ आजमावत होते. कधी अर्जुनाची सरशी व्हायची तर कधी सुयोधनाची... त्यामुळे प्रत्यक्ष महायुद्धात काय होईल, हे कोणालाच सांगता येणं कठीण होतं... ध्रुतराष्ट्रांना वेळोवेळी युद्धाचं वृत्त आणि सल्ले देणारा 'संजय'ही गोंधळात पडल्याचं दिसत होतं. (महायुद्ध झालं, तरच आपल्याला आपली अंतर्ज्ञान विद्या  वापरता येणार, असं वाटत होतं आणि युद्ध व्हावं, असंच त्याला वाटत होतं, हा तपशिलाचा भाग झाला...) 

एकदा अशीच युद्धाची तयारी सुरू असताना सुयोधनाच्या छातीत प्रचंड वेदना होऊ लागल्या... त्याला तातडीनं राजवैद्यांकडे नेलं गेलं. राजवैद्यांनी त्यावर उपाय सांगितले आणि आराम करण्याचा सल्ला दिला... सुयोधनाच्या या स्थितीचं वर्तमान दुतांकरवी अर्जुनाकडे पोहोचलं आणि तो गहिवरलाच... द्रोणाचार्यांच्या आश्रमात एकत्र घालवलेले क्षण, हस्तीनापूरात ध्रुतराष्ट्रांच्या मांडीवर एकत्र खेळलेले खेळ, असं सगळं त्याच्या डोळ्यापुढे उभं राहिलं आणि स्वतः युद्धाची तयारी सोडून अर्जुन थेट राजवैद्यांच्या आश्रमात दाखल झाला आणि अर्जुन-सुयोधनाची गळाभेट झाली... इतक्यावरच अर्जुन थांबला नाही, तर रस्त्यांवरच्या खड्यांचा सुयोधनाला त्रास होऊ नये, म्हणून त्याच्या परदेशातून आलेल्या रथाचा चाप अर्जुनानं स्वतःच्या हातात घेतला आणि त्याला सुखरूप हस्तीनापूरात पोहोचवला... खरंतर वनवासाची सात वर्षंच लोटली असताना अर्जुनानं हस्तीनापुरात येण्याचं धारिष्ट्य दाखवलं होतं... हे हस्तीनापुरातल्या संजयादी काही राजकारणी मंडळींना पसंत पडलं नसलं, तरी कौरव-पांडवांच्या सैन्यांमध्ये मात्र यामुळे जल्लोषाचं वातावरण निर्माण झालंय...

एकमेकांसोबत युद्ध करण्यापेक्षा "वयम् पंचाधिकम् शतम्" असं म्हणत सुयोधन आणि अर्जुन हस्तीनापुराच्या अन्य मोठ्या शत्रुंशी लढण्यासाठी खांद्याला-खांदा लावून उभे राहोत, अशी प्रार्थना हे सैनिक आता करू लागले आहेत म्हणे! अर्थात, रणवाद्यं छेडली जात नाहीत... रणभेरी निनादत नाहीत... पाञ्चजन्य-देवदत्त फुंकले जात नाहीत... तोपर्यंत अर्जुन-सुयोधनाचं हे प्रेम कायम टिकतं की त्यांच्यात पुन्हा कटुता येते, यावरच युद्धाचं स्वरूप अवलंबून राहणार आहे... 

Wednesday, 4 July 2012

पुन्हा ये... रे... ये.... रे...

२००९ साली पावसानं आता मारलीये तशीच दडी मारली होती. नंतर पडला चांगला. पण तेव्हाही जुलै उजाडला तरी त्याचा पत्ता नव्हता. त्यावेळी १ जुलै रोजी लिहिलेल्या पोस्टची लिंक खाली दिली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आता ३ वर्षांनंतरही परिस्थितीत काडीचा फरक पडलेला नाही. विधानसभा निवडणुका वैगरे तात्कालिन प्रसंग वगळता आताही परिस्थिती तशीच आहे. ही खरंच गमत्तशीर गोष्ट आहे आणि आपले राज्यकर्ते आणि आपणही, किती निर्ढावले आहोत, त्याचंच हे प्रतिक आहे.
आपण जुन्या गोष्टी पटकन विसरतो. पब्लिकची मेमरी शॉर्ट-टर्म असते, असं एक खास मराठी वाक्य आपल्याला माहिती असतं... त्यातंच हे प्रतिक म्हणता येईल का?


पाऊस आलाच नाही तर?

Thursday, 28 June 2012

पंतप्रधानाचा धर्म...

हा ब्लॉग लिहायला थोडा उशीर झालेला वाटू शकतो... कारण तसा गेल्या एक-दोन आठवड्यांत चर्चिला गेलेला हा विषय आहे. मात्र काल एका मित्राशी बोलत असताना हा विषय निघाला आणि आज सुदैवानं थोडा वेळ होता... त्यामुळे हिंदुत्ववादी पंतप्रधान हवा की नको, या विषयावर लिहावं असं वाटलं...

-------------------


मुळात हा मुद्दा पंतप्रधानाच्या धर्माचा नाही, तर पंतप्रधान होण्यास इच्छुक असलेल्या दोन नेत्यांमधल्या स्पर्धेचा आहे. यातले एक आहेत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि दुसरे आहेत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार. हा वाद हिंदुत्वाच्या रिंगणात जाण्याचं मुख्य कारण म्हणजे या दोघांनीही आपण पंतप्रधान होण्यास लायक असल्याचं सिद्ध केलंय. दोघांचीही प्रतिमा विकासाभिमुख, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा अशी आहे. नरेंद्र मोदींच्या कारकीर्दीला असलेली काळी किनार म्हणजे गुजरात दंगली... या दंगलींमध्ये केलेली प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पापं मोदींना आमरण भोवणार आहेत. नितीश कुमारांचा मुद्दा हा याचाच पहिला अध्याय म्हटला पाहिजे. कारण दोन वर्षांनी (कदाचित आधीही) होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये एनडीएला बहुमत मिळण्याची दाट शक्यता सर्वांनाच दिसते आहे. अशा वेळी पंतप्रधान कोण असणार, हा प्रश्न निश्चितच निर्माण होणार आहे आणि कुमारांनी निर्माण केलेला हा वाद या प्रश्नाला पार्श्वभूमी देणारा आहे...
उद्या एनडीएची सत्ता आलीच, तर मोदींचा अडसर दूर करण्याची तयारी आतापासून केलेली बरी, असं त्यांना वाटत असण्याची शक्यता आहे. खरंतर नितीश कुमारांनी घाई केली, असं मला वाटतं... कारण मोदी पंतप्रधान झालेले त्यांच्याच पक्षातल्या अनेकांना नको आहेत... उद्या एनडीएची सत्ता आली, तर त्यात भाजपा हा सर्वात मोठा पक्ष असणार हे उघड आहे. अशा वेळी भाजपामध्ये अनेक नेते गुढग्याला बाशिंग बांधून सजले असल्यास नवल नाही... मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज, अरूण जेटली, व्यंकय्या नायडू, आता नितीन गडकरी आणि 'आजन्म भावी पंतप्रधान' लालकृष्ण आडवाणी या सगळ्यांना पार करून मोदींना जावं लागणार आहे आणि हे नेते त्यांच्या वाटेवर फुलांच्या पायघड्या घालण्याची शक्यता अजिबात नाही... पण धर्मनिरपेक्ष चाळणी लावली, तर हे सगळेच नेते बाद होऊ शकतात, कारण बाबरी मशिदीचे दगड यांच्याही भिंतींसाठी वापरलेले आहेतच... त्यामुळे एनडीएमध्ये नितीशबाबू किंवा शरदबाबू यादव हे आपण एकमेव धर्मनिरपेक्ष असल्याचा दावा करू शकतात... त्यामुळे हिंदुत्ववादी पंतप्रधान नको, असं कुमारांना वाटू लागल्यास नवल नाही...

मात्र इथं नितीश कुमार एक महत्त्वाचा इतिहास विसरलेले दिसतात. 'हिंदू तन मन.. हिंदू जीवन... रग रग हिंदू मेरा परिचय...' असं म्हणणा-या अटलबिहारी वाजपेयींच्या मंत्रीमंडळात शरदबाबू आणि नितीशबाबू हे दोघंही मंत्री राहिलेले आहेत... अटलबिहारी वाजपेयी हे केवळ कवितेतून हिंदू नव्हेत, तर संपूर्ण हिंदुत्त्ववादी नेता आहेत, हे या दोघांना माहिती नसेल, असं कसं म्हणणार... 

-------------------


पंतप्रधान होण्यासाठी नितीशकुमार एकटेच मोर्चेबांधणी करतायत, असं मानायचं कारण नाही... मोदींनाही आपल्याला भविष्यात मिळू शकणा-या या संधीची कल्पना निश्चितच आलेली आहे आणि त्यांची पावलं नेमकी त्याच दिशेनं पडत आहेत. संजय जोशींना इतका टोकाचा विरोध करण्याचं तेच कारण आहे... याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, ती मोदी पहिल्यांदा मु्ख्यमंत्री होण्यापूर्वीची... प्रचारक असलेल्या माणसानं मुख्यमंत्री होऊ नये, असं म्हणून जोशींनी त्यावेळी आपला जुना मित्र नरेनभाईच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता. तेव्हापासून मोदींचा संजय जोशींवर रोष आहे. नंतर बनावट असल्याचं सिद्ध झालेली जोशींच्सेया सेक्सस्कॅंडलची सीडी ही गुजरातमध्येच जन्माला आल्याचं बोललं जातं. (अर्थात ही वदंता आहे, पण आग असल्याशिवाय धूर निघत नाही म्हणतात...) बिहार निवडणुकांची जबाबदारी संजय जोशींवर दिल्यानंतर मोदी तिथं प्रचाराला गेले नाहीत, संजय जोशी भाजपात राहिले असते तर त्यांनी थेट मुंबईत झालेल्या कार्यकारिणीला टांग देण्याची तयारी केली होती... अखेरीस त्यांनी जोशींची सरचिटणीस पदावरून उचलबांगडी करायलाच लावली... इतक्या वर्षांनीही मोदींनी खुन्नस कायम ठेवल्याचं कारण काय असू शकतं? ही जुनी खुन्नस नाही, तर इतिहासाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मोदींनी लावलेली फिल्डिंग आहे, असं मला वाटतं. कदाचित २०१४ साली भाजपाची सत्ता आलीच, तर मोदींच्या नावाला पहिला विरोध हा संजय जोशींचा असू शकतो आणि ते पक्षाचे सरचिटणीस असतील, तर त्यांच्या विरोधाला ब-यापैकी वजन प्राप्त होणार, हे उघड आहे. जोशींची ढाल करून आडवाणी ते गडकरी असे सर्व स्वपक्षीय इच्छुक मोदींवर वार करू शकतात. त्यामुळे मोदींनी या ढालीला भोक पाडण्यासाठी आपलं सगळं वजन वापरलं... इतकं, की दस्तुरखुद्द सरसंघचालक मोहन भागवत यांनाही त्यांनी या अकाली वादात ओढलं... भागवतांनी हिंदुत्त्ववादी पंतप्रधान का नको, असा सवाल करत नितिश कुमारांना आव्हान देऊन टाकलं... खरंतर भागवतांच्या या अस्थानी विधानाची खरोखरच काही गरज नव्हती. हिंदुत्व आणि हिंदुत्त्ववाद याबाबत संघाची मतं काय आहेत, हे जगजाहीर आहे. पण भागवतांच्या या विधानानं पटावरला मोदींचा वजीर पुढे सरकवलाय. हे मात्र निश्चित... 


खरंतर 'बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी' यातला हा प्रकार आहे... निवडणुका अद्याप लांब आहेत. त्यातही भारतीय घटनेनुसार पंतप्रधान कोण होणार, हे आधी जाहीर करण्याची सक्ती कोणत्याच पक्षावर नाही. निवडणुका झाल्यानंतर बहुमतात निवडून आलेला पक्ष आपला संसदीय नेता कोण असणार, ते निवडतो व तो पंतप्रधान असतो. विरोधी पक्षांमधल्या सर्वात मोठ्या पक्षाचे खासदार आपला संसदीय नेता निवडतात व तो विरोधी पक्षनेता होतो... मात्र नितीश कुमारांनी उगीचच नेता जाहीर करा, असा सूर लावला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर पक्षीय बलाबलाचं चित्र स्पष्ट झाल्यानंतरच याचा निवाडा होऊ शकेल. कारण अनेक शक्यता आहेत. त्या अशा...
१. भाजपा संपू्र्ण बहुमतात - एकट्या भाजपाला (किंवा भाजपा आणि त्याच्या हिंदुत्त्ववादी सहका-यांना मिळून) अर्ध्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या, तर नितिश कुमारांचा मुद्दा आपोआपच बाद होईल आणि पंतप्रधान कोण होणार, याचा निर्णय एकटा भाजपा घेऊ शकेल. अर्थात, या पक्षातच अनेक इच्छुक असल्यामुळे ते काम सोपं होणार नसलं, तरी किमान नितिश कुमारांचा संयुक्त जनता दलाला त्यात मोजण्याचं कारण राहणार नाही...
२. एनडीए बहुमतात, भाजपा सर्वात मोठा पक्ष - ही नितिश कुमारांसाठी मोठी संधी असेल. सत्ता काँग्रेसकडे जाऊ नये, असं भाजपाला वाटत असेल तर त्यांना एखाद्या छोट्या पक्षाचा पंतप्रधान करावा लागेल आणि नितिश कुमार या स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर असतील. या स्थितीत त्यांना मुख्य आव्हान असेल ते शिरोमणी अकाली दलाचं... पण विकासाच्या मुद्द्यावर कुमारांचं पारडं जड ठरू शकतं.
३. काँग्रेस किंवा भाजपाच्या पाठिंब्यावर तिसरी आघाडी - हीदेखील नितिश कुमार पंतप्रधान होऊ शकण्यासाठी आदर्श स्थिती असेल. उलट ते शरद पवार, चंद्राबाबू नायडू, जयललिता, मायावती, ममता बॅनर्जी अशा अनेक छोट्या पक्षांची धर्मनिरपेक्ष मोट बांधू शकतील. नितिश कुमारांच्या पक्षानं प्रणवदांना पाठिंबा दिल्यामुळे ते काँग्रेसच्या नको तितके जवळ आल्याचं दिसतंय आणि ही भाजपासाठी धोक्याची सूचना असू शकते. अर्थात, या कथित धर्मनिरपेक्ष तिस-या आघाडीला भाजपाही पाठिंबा देऊ शकेल...
४. पुन्हा काँग्रेस - पुन्हा काँग्रेस किंवा युपीए बहुमतात आल्यास पंतप्रधान कोण, हा प्रश्न फक्त १० जनपथपुरता मर्यादित होईल. अगदी बिगरकाँग्रेसी पंतप्रधान करण्याची वेळ काँग्रेसजनांवर आलीच, तरीही नितिश कुमारांना ही संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. कारण सध्या ते काँग्रेसजवळ सरकले असले, तरी गेली अनेक वर्षं ते भाजपासोबत आहेत आणि बिहारमध्ये युतीत सत्तेत आहेत. त्यामुळे झालं गेलं विसरून काँग्रेस त्यांना राजमुकुट देईल, अशी अजिबात शक्यता नाही.
पंतप्रधानपद ही 'बाजारातली तुरी' आहे. मात्र असं असताना नितिश कुमार आणि नरेंद्र मोदी (व्हाया सरसंघचालक) यांनी हा अकारण वाद घालून स्वतःची किंमत कमी करून घेतली आहे, असं मला वाटतं. मतदार शाहणा असतो... जो खुर्चीसाठी टपून बसलेला असतो, त्याच्या गळ्यात विजयाची माळ कधीच घालायची नाही, असं गेल्या काही वर्षांत सिद्ध झालंय. (आठवा... वाजपेयींनी ६ महिने आधीच घेतलेल्या इंडिया शायनिंग निवडणुका, आडवाणींच्या स्वप्नरंजनात सरलेल्या २००९च्या निवडणुका इत्यादी) त्यामुळे बोलघेवडेपणा आणि अंतर्गत राजकारण न खेळता या दोघा विकासाभिमुख मुख्यमंत्र्यांनी आपलं काम करावं आणि नियतीला आपलं करू द्यावं, हेच इष्ट नाही का?

Thursday, 14 June 2012

जुनी पोस्ट नव्याने...

आज असंच टाईमपास म्हणून माझाच ब्लॉग वाचत बसलेलो... (हल्ली ब-याच दिवसांत लिहिलेलं नाही... लिहिण्यासाठी काही इन्पिरेशन मिळतंय का, हे बघावं, म्हणून जुन्या पोस्ट बघत होतो.)  वाचताना ही पोस्ट नजरेसमोर आली आणि लक्षात आलं की अरे... १५ जून म्हणजे उद्याच की... म्हणजे या पोस्टला जवळजवळ ३ वर्ष झालीयेत आता... पण मध्य रेल्वेच्या कारभारात (नव्या गाड्या आल्यानंतरही) काडीचाही फरक पडलेला नाही... गेल्या तीन वर्षांत बहुदा एकदाही मध्य रेल्वे १०० टक्के वेळेवर धावलेली नसणार... त्यामुळेच मग त्यावेळी लोकसत्ता आणि मटा या दोन वर्तमानपत्रांनी दिलेल्या या बातम्यांचं महत्त्व किती आहे, हे लक्षात घेण्यासारखं आहे... असो! सहज गम्मत म्हणून ही जुनी पोस्ट कॉपी-पेस्ट करून टाकत आहे...



Wednesday, 17 June 2009

मध्य रेल्वेची "शंभरी...!"


आज सकाळी पेपरच्या आतल्या पानावर एक बातमी वाचली. मध्य रेल्वेनं म्हणे काल १०० टक्के वेळेवर येऊन दाखवलं... (बातमी पहा) खरोखर या पेपरवाल्यांना काहीच कळत नाही. इतकी महत्त्वाची बातमी आतल्या पानावर कुठेतरी फेकून द्यायची, म्हणजे काय? एकीकडे म्हणायचं, 'माणूस कुत्र्याला चावला' तरच ती बातमी... आणि दुसरीकडे मध्य रेल्वे वेळेवर धावली, तर त्याला आतल्या पानात कुठेतरी जागा द्यायची... याला काय अर्थ आहे. मराठीत आता एक नवी म्हण रूढ झाल्ये. "रोज म.रे. (म्हणजे आपली मध्य रेल्वे) त्याला कोण रडे..." अशी ख्याती असलेल्या या सगळ्यात मोठ्या सार्वजनिक वाहतुक यंत्रणेचा हा विक्रमच आहे.
म्हणजे कल्पना करा की हा शंभर नंबरी विक्रम मध्य रेल्वेनं रोज-रोज (अगदी १ इंच पाऊस झाल्यावरही...) केला तर काय होईल? अनर्थ ओढवेल अनर्थ.... म्हणजे बॉसला "गाडी लेट झाली" असं सांगून मैत्रिणीबरोबर चौपाटीवर फिरायला जाणं मुश्किल.... बायकोला "ओव्हरहेड वायर तुटली" असं सांगून बारमध्ये बियरच्या बाटल्या रिचवणं महाकठीण.... सासूबाई येणार असतील तर "मोटरमनचा संप आहे, येऊ नका..." असं सांगायची चोरी... "रुळांवर पाणी साचलंय... काल चालत घरी गेलो..." असं सांगून दुस-या दिवशी दांडी मारणं अशक्यच... अराजक माजेल. मग ही बातमी महत्त्वाची नाही का, तुम्हीच सांगा??
पण हे लिहिता-लिहिता वाटलं की आतलं पान-तर-आतलं पान.... बातमी तर छापली... म्हणजे मध्य रेल्वे वेळेवर धावली एखाद् दिवस तरी, म्हणजे ही "माणूस कुत्र्याला चावला..." या कॅटेगरीतलीच बातमी वाटली असणार छापणा-या प्रतिष्ठित वर्तमानपत्राला, नाही का? आणि पुन्हा ही बातमी छापताना त्यात मध्य रेल्वे लेट येते (म्हणजे काल सोडून....!) त्याची शंभर कारणं दिली आहेत. म्हणजे लोकं चेन (गाडीतली... गैरसमज नको!) ओढतात... (उगीचच), ओव्हरहेड वायर तुटते (उगीचच), सिग्नल बंद पडतात (उगीचच), लोक रेल-रोको करतात (उगीचच) त्याला मध्य रेल्वे काय करणार? रुळांवर पाणी साचतं, मालगाडी घसरते, इंजिनं फेल होतात त्याला मध्य रेल्वे काय करणार? असा एकूण या बातमीचा सूर आहे. ((दुस-या एका प्रतिष्ठित दैनिकानं ही बातमी फारसा मुलामा न देता दिल्ये. (बातमी पहा) या दैनिकानं मध्य रेल्वेवर किती अन्याय केलाय, याची कल्पनाच नाही करवत...))

तात्पर्य काय? तर रोज "म.रे." असं नाहीये... आता उद्या-परवा केव्हाही बदलापूर-टिटवाळा-कल्याण-डोंबिवली-कळव्यात गाडीत चढता नाही आलं... गाडी लेट झाली आणि लेटमार्क लागला... किंवा आता पावसाळा आलाच आहे... तेव्हा.... (सूज्ञ मुंबईकरांना अधिक सांगणे न लगे...!) असं काहीही झालं तरी सोमवार, दि. १५ जून २००९ हा सुवर्णदिन लक्षात ठेवायचा... "हाच तो दिवस ज्या दिवशी मध्य रेल्वे १०० % वेळेवर धावली होती..." असा जप १०० वेळा 'मनातल्या मनात' करायचा (मोठ्यानं केलात तर मार खाल कोणाचातरी...) आणि मुकाट्यानं दरवाजात... माफ करा, डोअरला लटकून मुसळधार पावसात भिजत ऑफीस गाठायचं... जय महाराष्ट्र... जय मुंबई... जय म.रे...

Wednesday, 4 April 2012

पंचाला हात..!

ब्लॉगची सलग दुसरी पोस्ट लष्कराबाबत येतेय, हा निव्वळ योगायोग आहे... झालं असं, की 'लिहावं' असं वाटण्याजोग्या घटना नेमक्या लष्कराशीच संबंधित आहेत, त्यामुळे इलाज नाही...
-------------------------

आजच्या पहिल्या पानभर बातमीत इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्रानं थेट केंद्र सरकारच्या पंचाला हात घातला आहे. ही बातमी अर्थातच सर्वांनी वाचली असणार. दिवसभर सगळ्या चॅनल्सवर सुरू असलेल्या चर्चा काही जणांनी ऐकल्या असणार.. या चर्चांत प्रश्न समोर येतात ते, घडलेली घटना खरंच घडली का? घडलीच असेल, तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो?
इंडियन एक्सप्रेसनं केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी ही बातमी दिली, ही एक बाजू तर लष्कराच्या दोन तुकड्यांची मुव्हमेंट झाली होती आणि त्यामुळे केंद्र सरकारची झोप उडाली होती ही दुसरी बाजू... यामध्ये सुवर्णमध्य मांडणारेही काही जण आहेत. मुव्हमेंट झाली, मात्र तो रुटीनचा भाग होता असं ते म्हणतायत. यातलं सत्य-असत्य काय, यापेक्षा खरोखर हा बंडाचा प्रयत्न असेल, तर तो गैर आहे का असा प्रश्न माझ्या मनात येतो...
लष्कराला होली काऊ मानणारे हा उठावाचा प्रयत्न नव्हता, असं ठामपणे सांगत आहेत. अर्थात लष्कराची प्रतिमा जपण्यासाठी ते असं म्हणत असतील... पण माझ्या मनात प्रश्न निर्माण होतो की खरंच असं एखादं बंड झालं असतं आणि आपल्या लष्करानं सध्याचं निष्क्रीय आणि भ्रष्ट सरकार उलथून टाकलं असतं, तर ते चांगलं झालं असतं की वाईट? कोणी म्हणेल की असलं निकम्मं सरकार लष्करानं उठाव करून बडतर्फ केलं असतं, तरी चाललं असतं... माझंही मत तसंच आहे. पण सध्याच्या स्थितीत नाही. कारण एकतर हे सरकार लोकशाही पद्धतीनं निवडून आलेलं आहे आणि अजूनतरी त्यांनी लोकशाहीला धक्का लागेल असं काहीही केलेलं नाही. दुसरी गोष्ट आहे ती सध्याच्या लष्करप्रमुखांच्या विश्वासार्हतेची... लष्करातली सगळी कारकीर्द एका जन्मतारखेवर काढल्यानंतर (कदाचित लष्करप्रमुखपदी बढतीही याच तारखेमुळे मिळालेली असताना)  अचानक निवृत्त होताना त्यांना तारीख बदलावीशी वाटते... पूर्वी कधीतरी लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचं ते आता निवृत्त होताना सांगतात... यामागे लष्करप्रमुख व्ही.के. सिंग यांची महत्त्वाकांक्षा आणि सरकारवर असलेली उघड नाराजीच ध्वनित होते. बंड करून अशा माणसाच्या हातात सत्ता जाण्यापेक्षा ती सध्याच्या सरकारकडे काय वाईट आहे... किमान आणखी दोन वर्षांनी त्यांना फेकून देण्याचा अधिकार तरी आपल्याकडे आहे. व्ही.के. सिंगसारख्या महत्त्वाकांक्षी लष्करी अधिका-यानं लोकशाहीच्या भल्यासाठी हे घडवलं असं मानणं खुळचटपणाचं ठरेल...
आपले काही लष्करी अधिकारी कितीही भ्रष्ट असले, तरी आपली सेना ही जनसामान्यांना अतिशय प्रिय आहे. असेच पॉप्युलर आर्म फोर्सेस असलेल्या इजिप्तचं उदाहरण आपल्याकडे ताजं आहे. तिथंही लष्करानं सत्ता हाती घेतल्यानंतर लोकांनी जल्लोष केला होता. आता त्यांचा भ्रमनिरास झाला आहे आणि त्यांनी लष्करी शासनाविरुद्धही आंदोलनं करायला सुरूवात केली आहे. आपल्याकडे याचीच पुनरावृत्ती झाली नसती कशावरून?
लष्कराच्या केवळ दोन तुकड्यांनी बंड करून भागलं नसतं, हेदेखील तितकंच खरं आहे... लष्कराव्यतिरिक्त आपल्या देशात वायुदल, नौदल, निमलष्करी दल अशी अनेक सैन्यदलं आहेत... त्यांना एकत्र केल्याशिवाय किंवा किमान शांत बसण्यासाठी प्रवृत्त केल्याशिवाय असं बंड होऊ शकत नाही. दिल्लीकडे कथितरित्या निघालेल्या दोन तुकड्यांच्या कमांडरना हे माहिती नसेल, असं भाभडेपणानं मानण्याचं काहीच कारण नाही...त्यामुळे या घटनेकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून बघायची गरज आहे...
कदाचित हा रुटीनचा भाग असेलही... पण तो नसेल, तर ही सिंग यांची आणखी एक खेळी असू शकते. निवृ्त्त होण्यापूर्वी त्यांनी सरकारला जेरीस आणण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे आपल्या मर्जीतल्या एक-दोन अधिका-यांना हातीशी धरून सरकारवर केवळ दबाव आणायचा आणि 'असंही होऊ शकतं' याची जाणीव करून द्यायची, असा त्यांचा हेतू असू शकतो... अर्थात हा जर-तरचा विषय झाला. पण अशा पद्धतीनं बातमी आल्यामुळे जगात आपली प्रतिमा डागाळली गेली आहे, हे मात्र निश्चित...
प्रतिमा लष्कराची डागाळली गेली तर आहेच, पण सरकारची, लोकशाहीची आणि भारतीय नागरिकांचीही...लष्कर आणि सरकार यांच्यात आलबेल असावं, असं कोणीच म्हणत नाही. पण किमान ही पेल्यातली वादळं पेल्यातच राहिलेली चांगली... या वादळाचा साद जगभर पसरणं देशासाठी हितावह नाही... प्रसारमाध्यमं, लष्करप्रमुख, सरकारी अधिकारी आणि मुख्य म्हणजे ही बातमी फोडणा-यांनी  याचं भान ठेवणं आवश्यक आहे... 

Wednesday, 28 March 2012

होली काऊ... होली शिट्...

आपल्याकडे लष्कराला होली काऊ म्हटलं जातं... म्हणजे पवित्र गाय. त्याच्याबद्दल वाईट बोलायचं नाही, ऐकायचं नाही आणि बघायचं नाही... पण आपलं लष्कर खरोखर तितकं होली आहे का? गेल्या काही वर्षांमध्ये अशी अनेक प्रकरणं बाहेर आली. त्यावर दबक्या आवाजात चर्चाही झाली... पण आता खुद्द लष्करप्रमुखांनीच आपल्याला लाच देण्याचा प्रयत्न झाला आणि तो बाहेरच्यानं नव्हे, तर एका निवृत्त वरिष्ठ लष्करी अधिका-यानंच केला, असं जाहीर केलंय...
लष्करप्रमुख व्ही.के. सिंग यांचा सरकारवर विशेष राग आहे. त्यांना १ वर्ष आधी घरी पाठवण्याची घाई सरकारला का झाली आहे, हे स्पष्ट नाही आणि ते कधी होणारही नाही... पण मुद्दाम त्यांची जन्मतारीख बदलून देण्यामागे काहीतरी राजकीय स्वार्थ दडलाच नसेल, असं कसं म्हणणार! त्यामुळे मग सिंग यांनी जाता-जाता सरकारला जोर का झटका देण्याचं ठरवलेलं दिसतंय. त्यातूनच हे १४ कोटींचं प्रकरण त्यांनी पुढे रेटलंय... पण यामुळे काही प्रश्न उपस्थित होतात. त्याची उत्तरं स्वतः सिंग यांनाही द्यावी लागतील.
पहिली गोष्ट म्हणजे ही लाच देण्याचा प्रयत्न झाला, त्याच वेळी त्यांनी निवृ्त्त लेफ्टनंट जनरल तेजिंदर सिंग यांच्या हातात बेड्या का ठोकल्या नाहीत... उलट अँटोनींनी राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार जनरल सिंग यांनी हे प्रकरण आपल्याला वाढवायचं नसल्याचं त्यांना सांगितलं होतं. हे खरं असेल, तर नेमका आत्ताच हा विषय छेडायचं कारण काय? यामुळे त्यांना सरकारची बदनामी करायची आहे की लष्कराची...
सिंग आणि अँटोनी यांच्या विधानांमध्ये सत्यता असेल, तर आपल्या लष्कराला भ्रष्टाचाराची कीड किती प्रमाणात पोखरते आहे, हे स्पष्ट होतं. पण सर्वाधिक दुःखाची बाब अशी, की ज्यांच्या हातात देशाच्या रक्षणाची खरी जबाबदारी असते, त्या सर्वसामान्य जवानांना यातून काहीच मिळत नसणार. सगळा मलिदा लाटला जात असणार तो वरच्या पदांवर... पोलिस खातं भ्रष्ट आहे, असं हे ओपन सिक्रेट आहे... पण त्यात निदान ताळातल्या हवालदारापासून ते कमिशनर, गृहमंत्र्यांपर्यंत सगळ्यांनाच काही ना काही मिळतं. (आता पोस्टनुसार त्यात फरक असेल, पण मोजके प्रामाणिक अधिकारी-जवान सोडले, तर सगळे या वाहत्या गंगेत हात धुतातच). म्हणजे मला भ्रष्टाचाराचं समर्थन करायचं नाही, पण निदान पोलिस खातं लष्कराच्या मानानं या बाबतीत सुदैवीच म्हणावं लागेल... लष्करात मात्र तसं नाही. या सात पुज्य असलेल्या आकड्यांच्या मलईमध्ये सीमेवर बर्फात किंवा वाळवंटात किंवा खोल समुद्रातल्या एखाद्या बोटीत डोळ्यात तेल घालून आपलं रक्षण करणा-या जवानांच्या नशिबी मात्र घरच्यांचा विरह, मिळेल ते कच्चं खाणं आणि आपलं नाव लिहिलेल्या गोळीची वाट बघणं यापलिकडे काहीच नसतं... बरं. लष्करात कडक शिस्त असते (म्हणे) त्यामुळे आपल्या वरच्या अधिका-यांनी किती खाल्लं, काय खाल्लं, का खाल्लं याचं उत्तर मागायचं नसतं. मागितलं आणि आपलंच कोर्ट मार्शल झालं तर काय घ्या?
सिंग यांच्या आरोपाची आता म्हणे सीबीआय चौकशी होणार आहे. म्हणजे आणखी किमान ५-१० वर्षं (सहा महिन्यातून एका बातमीचा अपवाद वगळता) हा विषय फाईलबंद झाल्यात जमा आहे. जेव्हा केव्हा सीबीआयचा अहवाल येईल आणि याचा निकाल लागेल, तोपर्यंत देशात एक पिढी पुढे गेली असेल. त्यामुळे त्यात कोणाला रस असणार नाही... आता बोफोर्स तोफा खरेदी प्रकरण, क्वात्रोचीची सुटका यात कोणाला इंटरेस्ट आहे सांगा... ही नावं आता केवळ राजकीय फायदा उचलण्यासाठी काही राजकीय पक्ष अधेमधे उच्चारत असतात इतकंच... आणखी १०-१२ वर्षांनी या प्रकरणाचं महत्त्वही तितकंच उरणार आहे. आपल्या 'होली काऊ' ची ही 'होली शिट्' आहे, इतकंच...

*****************
ताजा कलम  : विचारार्थ एक चौकट...


टू-जी स्कॅम 
१.७६ लाख कोटी 
राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळा 
७० हजार कोटी 
सत्यम घोटाळा
१४ हजार कोटी 
चारा घोटाळा 
९०० कोटी 
आयपीएल घोटाळा 
काही शे कोटी...


सिंग यांना देऊ केलेली कथित लाच - (फक्त) १४ कोटी ? पटतंय का?