Wednesday 28 March 2012

होली काऊ... होली शिट्...

आपल्याकडे लष्कराला होली काऊ म्हटलं जातं... म्हणजे पवित्र गाय. त्याच्याबद्दल वाईट बोलायचं नाही, ऐकायचं नाही आणि बघायचं नाही... पण आपलं लष्कर खरोखर तितकं होली आहे का? गेल्या काही वर्षांमध्ये अशी अनेक प्रकरणं बाहेर आली. त्यावर दबक्या आवाजात चर्चाही झाली... पण आता खुद्द लष्करप्रमुखांनीच आपल्याला लाच देण्याचा प्रयत्न झाला आणि तो बाहेरच्यानं नव्हे, तर एका निवृत्त वरिष्ठ लष्करी अधिका-यानंच केला, असं जाहीर केलंय...
लष्करप्रमुख व्ही.के. सिंग यांचा सरकारवर विशेष राग आहे. त्यांना १ वर्ष आधी घरी पाठवण्याची घाई सरकारला का झाली आहे, हे स्पष्ट नाही आणि ते कधी होणारही नाही... पण मुद्दाम त्यांची जन्मतारीख बदलून देण्यामागे काहीतरी राजकीय स्वार्थ दडलाच नसेल, असं कसं म्हणणार! त्यामुळे मग सिंग यांनी जाता-जाता सरकारला जोर का झटका देण्याचं ठरवलेलं दिसतंय. त्यातूनच हे १४ कोटींचं प्रकरण त्यांनी पुढे रेटलंय... पण यामुळे काही प्रश्न उपस्थित होतात. त्याची उत्तरं स्वतः सिंग यांनाही द्यावी लागतील.
पहिली गोष्ट म्हणजे ही लाच देण्याचा प्रयत्न झाला, त्याच वेळी त्यांनी निवृ्त्त लेफ्टनंट जनरल तेजिंदर सिंग यांच्या हातात बेड्या का ठोकल्या नाहीत... उलट अँटोनींनी राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार जनरल सिंग यांनी हे प्रकरण आपल्याला वाढवायचं नसल्याचं त्यांना सांगितलं होतं. हे खरं असेल, तर नेमका आत्ताच हा विषय छेडायचं कारण काय? यामुळे त्यांना सरकारची बदनामी करायची आहे की लष्कराची...
सिंग आणि अँटोनी यांच्या विधानांमध्ये सत्यता असेल, तर आपल्या लष्कराला भ्रष्टाचाराची कीड किती प्रमाणात पोखरते आहे, हे स्पष्ट होतं. पण सर्वाधिक दुःखाची बाब अशी, की ज्यांच्या हातात देशाच्या रक्षणाची खरी जबाबदारी असते, त्या सर्वसामान्य जवानांना यातून काहीच मिळत नसणार. सगळा मलिदा लाटला जात असणार तो वरच्या पदांवर... पोलिस खातं भ्रष्ट आहे, असं हे ओपन सिक्रेट आहे... पण त्यात निदान ताळातल्या हवालदारापासून ते कमिशनर, गृहमंत्र्यांपर्यंत सगळ्यांनाच काही ना काही मिळतं. (आता पोस्टनुसार त्यात फरक असेल, पण मोजके प्रामाणिक अधिकारी-जवान सोडले, तर सगळे या वाहत्या गंगेत हात धुतातच). म्हणजे मला भ्रष्टाचाराचं समर्थन करायचं नाही, पण निदान पोलिस खातं लष्कराच्या मानानं या बाबतीत सुदैवीच म्हणावं लागेल... लष्करात मात्र तसं नाही. या सात पुज्य असलेल्या आकड्यांच्या मलईमध्ये सीमेवर बर्फात किंवा वाळवंटात किंवा खोल समुद्रातल्या एखाद्या बोटीत डोळ्यात तेल घालून आपलं रक्षण करणा-या जवानांच्या नशिबी मात्र घरच्यांचा विरह, मिळेल ते कच्चं खाणं आणि आपलं नाव लिहिलेल्या गोळीची वाट बघणं यापलिकडे काहीच नसतं... बरं. लष्करात कडक शिस्त असते (म्हणे) त्यामुळे आपल्या वरच्या अधिका-यांनी किती खाल्लं, काय खाल्लं, का खाल्लं याचं उत्तर मागायचं नसतं. मागितलं आणि आपलंच कोर्ट मार्शल झालं तर काय घ्या?
सिंग यांच्या आरोपाची आता म्हणे सीबीआय चौकशी होणार आहे. म्हणजे आणखी किमान ५-१० वर्षं (सहा महिन्यातून एका बातमीचा अपवाद वगळता) हा विषय फाईलबंद झाल्यात जमा आहे. जेव्हा केव्हा सीबीआयचा अहवाल येईल आणि याचा निकाल लागेल, तोपर्यंत देशात एक पिढी पुढे गेली असेल. त्यामुळे त्यात कोणाला रस असणार नाही... आता बोफोर्स तोफा खरेदी प्रकरण, क्वात्रोचीची सुटका यात कोणाला इंटरेस्ट आहे सांगा... ही नावं आता केवळ राजकीय फायदा उचलण्यासाठी काही राजकीय पक्ष अधेमधे उच्चारत असतात इतकंच... आणखी १०-१२ वर्षांनी या प्रकरणाचं महत्त्वही तितकंच उरणार आहे. आपल्या 'होली काऊ' ची ही 'होली शिट्' आहे, इतकंच...

*****************
ताजा कलम  : विचारार्थ एक चौकट...


टू-जी स्कॅम 
१.७६ लाख कोटी 
राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळा 
७० हजार कोटी 
सत्यम घोटाळा
१४ हजार कोटी 
चारा घोटाळा 
९०० कोटी 
आयपीएल घोटाळा 
काही शे कोटी...


सिंग यांना देऊ केलेली कथित लाच - (फक्त) १४ कोटी ? पटतंय का?