हा ब्लॉग लिहायला थोडा उशीर झालेला वाटू शकतो... कारण तसा गेल्या एक-दोन आठवड्यांत चर्चिला गेलेला हा विषय आहे. मात्र काल एका मित्राशी बोलत असताना हा विषय निघाला आणि आज सुदैवानं थोडा वेळ होता... त्यामुळे हिंदुत्ववादी पंतप्रधान हवा की नको, या विषयावर लिहावं असं वाटलं...
-------------------
मुळात हा मुद्दा
पंतप्रधानाच्या धर्माचा नाही, तर पंतप्रधान होण्यास इच्छुक असलेल्या दोन नेत्यांमधल्या स्पर्धेचा आहे. यातले एक आहेत गुजरातचे मुख्यमंत्री
नरेंद्र मोदी आणि दुसरे आहेत बिहारचे मुख्यमंत्री
नितीश कुमार. हा वाद हिंदुत्वाच्या रिंगणात जाण्याचं मुख्य कारण म्हणजे या दोघांनीही आपण पंतप्रधान होण्यास लायक असल्याचं सिद्ध केलंय. दोघांचीही प्रतिमा विकासाभिमुख, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा अशी आहे. नरेंद्र मोदींच्या कारकीर्दीला असलेली काळी किनार म्हणजे गुजरात दंगली... या दंगलींमध्ये केलेली प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पापं मोदींना आमरण भोवणार आहेत. नितीश कुमारांचा मुद्दा हा याचाच पहिला अध्याय म्हटला पाहिजे. कारण दोन वर्षांनी (कदाचित आधीही) होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये एनडीएला बहुमत मिळण्याची दाट शक्यता सर्वांनाच दिसते आहे. अशा वेळी पंतप्रधान कोण असणार, हा प्रश्न निश्चितच निर्माण होणार आहे आणि कुमारांनी निर्माण केलेला हा वाद या प्रश्नाला पार्श्वभूमी देणारा आहे...
उद्या एनडीएची सत्ता आलीच, तर मोदींचा अडसर दूर करण्याची तयारी आतापासून केलेली बरी, असं त्यांना वाटत असण्याची शक्यता आहे. खरंतर नितीश कुमारांनी घाई केली, असं मला वाटतं... कारण मोदी पंतप्रधान झालेले त्यांच्याच पक्षातल्या अनेकांना नको आहेत... उद्या एनडीएची सत्ता आली, तर त्यात भाजपा हा सर्वात मोठा पक्ष असणार हे उघड आहे. अशा वेळी भाजपामध्ये अनेक नेते गुढग्याला बाशिंग बांधून सजले असल्यास नवल नाही...
मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज, अरूण जेटली, व्यंकय्या नायडू, आता नितीन गडकरी आणि 'आजन्म भावी पंतप्रधान' लालकृष्ण आडवाणी या सगळ्यांना पार करून मोदींना जावं लागणार आहे आणि हे नेते त्यांच्या वाटेवर फुलांच्या पायघड्या घालण्याची शक्यता अजिबात नाही... पण धर्मनिरपेक्ष चाळणी लावली, तर हे सगळेच नेते बाद होऊ शकतात, कारण बाबरी मशिदीचे दगड यांच्याही भिंतींसाठी वापरलेले आहेतच... त्यामुळे एनडीएमध्ये नितीशबाबू किंवा शरदबाबू यादव हे आपण एकमेव धर्मनिरपेक्ष असल्याचा दावा करू शकतात... त्यामुळे हिंदुत्ववादी पंतप्रधान नको, असं कुमारांना वाटू लागल्यास नवल नाही...
मात्र इथं नितीश कुमार एक महत्त्वाचा इतिहास विसरलेले दिसतात. 'हिंदू तन मन.. हिंदू जीवन... रग रग हिंदू मेरा परिचय...' असं म्हणणा-या अटलबिहारी वाजपेयींच्या मंत्रीमंडळात शरदबाबू आणि नितीशबाबू हे दोघंही मंत्री राहिलेले आहेत... अटलबिहारी वाजपेयी हे केवळ कवितेतून हिंदू नव्हेत, तर संपूर्ण हिंदुत्त्ववादी नेता आहेत, हे या दोघांना माहिती नसेल, असं कसं म्हणणार...
-------------------
पंतप्रधान होण्यासाठी नितीशकुमार एकटेच मोर्चेबांधणी करतायत, असं मानायचं कारण नाही... मोदींनाही आपल्याला भविष्यात मिळू शकणा-या या संधीची कल्पना निश्चितच आलेली आहे आणि त्यांची पावलं नेमकी त्याच दिशेनं पडत आहेत. संजय जोशींना इतका टोकाचा विरोध करण्याचं तेच कारण आहे... याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, ती मोदी पहिल्यांदा मु्ख्यमंत्री होण्यापूर्वीची... प्रचारक असलेल्या माणसानं मुख्यमंत्री होऊ नये, असं म्हणून जोशींनी त्यावेळी आपला जुना मित्र नरेनभाईच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता. तेव्हापासून मोदींचा संजय जोशींवर रोष आहे. नंतर बनावट असल्याचं सिद्ध झालेली जोशींच्सेया सेक्सस्कॅंडलची सीडी ही गुजरातमध्येच जन्माला आल्याचं बोललं जातं. (अर्थात ही वदंता आहे, पण आग असल्याशिवाय धूर निघत नाही म्हणतात...) बिहार निवडणुकांची जबाबदारी संजय जोशींवर दिल्यानंतर मोदी तिथं प्रचाराला गेले नाहीत, संजय जोशी भाजपात राहिले असते तर त्यांनी थेट मुंबईत झालेल्या कार्यकारिणीला टांग देण्याची तयारी केली होती... अखेरीस त्यांनी जोशींची सरचिटणीस पदावरून उचलबांगडी करायलाच लावली... इतक्या वर्षांनीही मोदींनी खुन्नस कायम ठेवल्याचं कारण काय असू शकतं? ही जुनी खुन्नस नाही, तर इतिहासाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मोदींनी लावलेली फिल्डिंग आहे, असं मला वाटतं. कदाचित २०१४ साली भाजपाची सत्ता आलीच, तर मोदींच्या नावाला पहिला विरोध हा संजय जोशींचा असू शकतो आणि ते पक्षाचे सरचिटणीस असतील, तर त्यांच्या विरोधाला ब-यापैकी वजन प्राप्त होणार, हे उघड आहे. जोशींची ढाल करून आडवाणी ते गडकरी असे सर्व स्वपक्षीय इच्छुक मोदींवर वार करू शकतात. त्यामुळे मोदींनी या ढालीला भोक पाडण्यासाठी आपलं सगळं वजन वापरलं... इतकं, की दस्तुरखुद्द सरसंघचालक
मोहन भागवत यांनाही त्यांनी या अकाली वादात ओढलं... भागवतांनी हिंदुत्त्ववादी पंतप्रधान का नको, असा सवाल करत नितिश कुमारांना आव्हान देऊन टाकलं... खरंतर भागवतांच्या या अस्थानी विधानाची खरोखरच काही गरज नव्हती. हिंदुत्व आणि हिंदुत्त्ववाद याबाबत संघाची मतं काय आहेत, हे जगजाहीर आहे. पण भागवतांच्या या विधानानं पटावरला मोदींचा वजीर पुढे सरकवलाय. हे मात्र निश्चित...
खरंतर 'बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी' यातला हा प्रकार आहे... निवडणुका अद्याप लांब आहेत. त्यातही भारतीय घटनेनुसार पंतप्रधान कोण होणार, हे आधी जाहीर करण्याची सक्ती कोणत्याच पक्षावर नाही. निवडणुका झाल्यानंतर बहुमतात निवडून आलेला पक्ष आपला संसदीय नेता कोण असणार, ते निवडतो व तो पंतप्रधान असतो. विरोधी पक्षांमधल्या सर्वात मोठ्या पक्षाचे खासदार आपला संसदीय नेता निवडतात व तो विरोधी पक्षनेता होतो... मात्र नितीश कुमारांनी उगीचच नेता जाहीर करा, असा सूर लावला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर पक्षीय बलाबलाचं चित्र स्पष्ट झाल्यानंतरच याचा निवाडा होऊ शकेल. कारण अनेक शक्यता आहेत. त्या अशा...
१. भाजपा संपू्र्ण बहुमतात - एकट्या भाजपाला (किंवा भाजपा आणि त्याच्या हिंदुत्त्ववादी सहका-यांना मिळून) अर्ध्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या, तर नितिश कुमारांचा मुद्दा आपोआपच बाद होईल आणि पंतप्रधान कोण होणार, याचा निर्णय एकटा भाजपा घेऊ शकेल. अर्थात, या पक्षातच अनेक इच्छुक असल्यामुळे ते काम सोपं होणार नसलं, तरी किमान नितिश कुमारांचा संयुक्त जनता दलाला त्यात मोजण्याचं कारण राहणार नाही...
२. एनडीए बहुमतात, भाजपा सर्वात मोठा पक्ष - ही नितिश कुमारांसाठी मोठी संधी असेल. सत्ता काँग्रेसकडे जाऊ नये, असं भाजपाला वाटत असेल तर त्यांना एखाद्या छोट्या पक्षाचा पंतप्रधान करावा लागेल आणि नितिश कुमार या स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर असतील. या स्थितीत त्यांना मुख्य आव्हान असेल ते शिरोमणी अकाली दलाचं... पण विकासाच्या मुद्द्यावर कुमारांचं पारडं जड ठरू शकतं.
३. काँग्रेस किंवा भाजपाच्या पाठिंब्यावर तिसरी आघाडी - हीदेखील नितिश कुमार पंतप्रधान होऊ शकण्यासाठी आदर्श स्थिती असेल. उलट ते शरद पवार, चंद्राबाबू नायडू, जयललिता, मायावती, ममता बॅनर्जी अशा अनेक छोट्या पक्षांची धर्मनिरपेक्ष मोट बांधू शकतील. नितिश कुमारांच्या पक्षानं प्रणवदांना पाठिंबा दिल्यामुळे ते काँग्रेसच्या नको तितके जवळ आल्याचं दिसतंय आणि ही भाजपासाठी धोक्याची सूचना असू शकते. अर्थात, या कथित धर्मनिरपेक्ष तिस-या आघाडीला भाजपाही पाठिंबा देऊ शकेल...
४. पुन्हा काँग्रेस - पुन्हा काँग्रेस किंवा युपीए बहुमतात आल्यास पंतप्रधान कोण, हा प्रश्न फक्त १० जनपथपुरता मर्यादित होईल. अगदी बिगरकाँग्रेसी पंतप्रधान करण्याची वेळ काँग्रेसजनांवर आलीच, तरीही नितिश कुमारांना ही संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. कारण सध्या ते काँग्रेसजवळ सरकले असले, तरी गेली अनेक वर्षं ते भाजपासोबत आहेत आणि बिहारमध्ये युतीत सत्तेत आहेत. त्यामुळे झालं गेलं विसरून काँग्रेस त्यांना राजमुकुट देईल, अशी अजिबात शक्यता नाही.
पंतप्रधानपद ही 'बाजारातली तुरी' आहे. मात्र असं असताना नितिश कुमार आणि नरेंद्र मोदी (व्हाया सरसंघचालक) यांनी हा अकारण वाद घालून स्वतःची किंमत कमी करून घेतली आहे, असं मला वाटतं. मतदार शाहणा असतो... जो खुर्चीसाठी टपून बसलेला असतो, त्याच्या गळ्यात विजयाची माळ कधीच घालायची नाही, असं गेल्या काही वर्षांत सिद्ध झालंय. (आठवा... वाजपेयींनी ६ महिने आधीच घेतलेल्या इंडिया शायनिंग निवडणुका, आडवाणींच्या स्वप्नरंजनात सरलेल्या २००९च्या निवडणुका इत्यादी) त्यामुळे बोलघेवडेपणा आणि अंतर्गत राजकारण न खेळता या दोघा विकासाभिमुख मुख्यमंत्र्यांनी आपलं काम करावं आणि नियतीला आपलं करू द्यावं, हेच इष्ट नाही का?