Saturday 24 October 2009

हेच होणार होतं...

विधानसभेचे निकाल लागले... भाजप-शिवसेना युतीला पुन्हा एकदा दारूण पराभव पत्करावा लागलाय आणि आघाडीची हॅटट्रीक झाली... हे होणारच होतं! गेल्या १० वर्षांमध्ये सक्षम विरोधी पक्ष वाटावा असं युतीनं काय केलंय? लोकांनी त्यांच्यावर काय विश्वास दाखवायचा? हे लोक सत्तेत आले तर आपलं भलं करतील, असे लोकांना वाटावं, असं यांनी काय केलंय...?
युतीच्या नेत्यांपैकी हाताच्या बोटावर मोजण्याइतके नेते विधानसभेत आणि बाहेर अभ्यासपूर्ण बोलतात... अन्यथा एकमेकांची उणीदुणी काढण्यातच यांनी धन्यता वाटते. शिवसेनेत तर आनंदी-आनंदच आहे. हा आनंद निवडणूक प्रचारात प्रकर्षानं दिसला. उद्धव ठाकरेंना सरकारची उणीदुणी काढण्यापेक्षा राज ठाकरेंना नावं ठेवण्यातच जास्त रस होता... सरकारचं अपयश जनतेपुढे मांडण्यात शिवसेना कमी पडली, याचंच हे फळ आहे.
दुसरीकडे भाजपही सगळं आलबेल नाहीये... गेल्या वर्षीच गोपीनाथ मुंडेंनी भाजपतून फूटण्याचा घाट घातला होता. त्यांची आणि गडकरींची 'मैत्री' जगजाहीर आहे. केंद्रातही लाथाळ्या सुरू आहेत. वसुंधरा राजे कधीही भाजपातून बाहेर पडतील, अशी शक्यता आहे. मग असल्या भांडकुदळ लोकांना निवडून स्वतःची माती करण्यापेक्षा लोडशेडींग-तर-लोडशेडींग..., आत्महत्या-तर-आत्महत्या..., महागाई-तर-महागाई.... पण आघाडीलाच मतं देणं लोकांनी पसंत केलंय...!
लोकसभा निवडणूकीत युतीनं केलेला 'राज'नामाचा गजर आताही सुरूच आहे. म्हणे मनसेमुळे युतीची मतं फुटली.... अरे फुटली असतील ना! नाही कोण म्हणतंय? पण हे एकच तुणतुणं किती वेळा वाजवणार? लोकसभेनंतर तुम्हाला राज ठाकरेंची ताकद लक्षात आली होती ना? मग त्यावर इलाज करायचा सोडून नुसतं मनसेच्या नावानं खडे फोडण्याचं कारण काय? हे राजकारण आहे... नवे पक्ष येणार... नवे नेते तयार होणार... पण तुमची धोरणं आणि काम चोख असेल, तर कुण्या राज ठाकरेंना घाबरायचं कारण काय? पण खरी मेख इथेच आहे... युतीचं नाणं खणखणीत नव्हतं, हेच खरं आहे. 'नाचता येईना अंगण वाकडं...' या म्हणीचा प्रत्यय त्यांनी लोकसभेवेळी दिला आणि आता विधानसभेलाही! केवळ राज ठाकरेंना शिव्या-शाप देऊन काही उपयोग नाही.
भाजप-सेनेनं गाजावाजा करून सुरू केलेली शॅडो-कॅबिनेटची केवळ एक बैठक झाली... म्हणजे सरकारच्या कामावर वचक ठेवणारा कणाच रबराचा असल्याचं दिसलं. जो पक्ष विरोधी पक्ष म्हणून आपलं काम नीट करू शकत नाही, तो पक्ष सरकारात आला तर चांगलं काम करेल, असा विश्वास लोकांना कसा वाटणार? त्यामुळे स्वाभाविकपणे जे व्हायचं तेच झालंय...
या निकालाचा सर्वाधिक फटका शिवसेनेला बसणार आहे. विधानसभेवर भगवा फडकावण्याचं स्वप्न पाहणारी शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली गेलीय. आधीच मनसेच्या लाटेत गटांगळ्या खाणाऱ्या शिवसेनेची होडी आता पार तिरकी झालीय. भाजपपेक्षा कितीतरी जास्त जागा लढवूनही त्यांचे आमदार कमी निवडून आल्येत. त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपदही शिवसेनेच्या हातून जवळजवळ गेलंय. शिवसेनेचा उताराकडे प्रवास राणे-राज बाहेर पडल्यावरच सुरू झाला होता. आता शिवसेना अधिक वेगानं रसातळाला जातेय... यातून वेळीच सावरण्याची शिवसेनेला गरज आहे. अन्यथा त्यांची जागा घ्यायला 'मनसे' सज्ज आहे... राज ठाकरेंचं 'मराठी कार्ड' फार काळ चालेल, असं नाही. शेवटी आता लोकांना विकासाची भाषा बोलणारे जास्त आवडतात, हे वारंवार सिद्ध होतंय. पण शिवसेना सावध झाली नाही, तर राज कुठल्याही क्षणी 'मराठी'वरून 'विकासा'वर येऊ शकतात आणि शिवसेनेच्या बोटीला शेवटचा धक्का देऊ शकतात...
'आता पुढली पाच वर्षं करण्यासारखं काही नाही...' या भ्रमात युतीचे नेते नसतील तर बरं... निराशेचा काळ लोटल्यानंतर आता तरी जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका युतीनं बजाजावी... जबाबदार आणि अभ्यासू विरोधी पक्ष ही लोकशाहीतली सगळ्यात मोठी गरज आहे. त्याखेरीज लोकशाही आणि लालफितशाही यांच्यात फार फरक उरणार नाही. येती पाच वर्षं युतीनं आपली दैवदत्त भूमिका नीट पार पाडावी... कारण निवडून कोणीही आला, तरी जनतेचे हाल संपणार नाहीयेत... त्यामुळे विरोधी पक्षात कोणीही असलं तरी लोकांचे हाल कमी करण्यासाठी आवाज उठवणं ही त्यांची जबाबदारी आहे.
बाकी, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला 'वेल-डन' असं म्हंटलंच पाहीजे...! आणि भाजप-सेना युतीला बोंबा मारण्याची कमीत कमी संधी द्यावी, यासाठी 'ऑल दि बेस्ट'ही दिलं पाहीजे...!!
********************
माझा 'स्टार माझा'मध्ये असलेला मित्र मंदार पुरकर याचं वाचन अफाट... त्यानं भाजपच्या नेत्यांना उल्लेखून सांगितलेला एक किस्सा...
--------------
एकदा एका आठवड्याच्या बाजारात एक शेतकरी दोन म्हशी विकायला येतो...
गिऱ्हाईक (एका म्हशीकडे बोट दाखवून) : ही म्हैस कशी दिली रे?
शेतकरी : ५० हजार... ही दोन वेळा व्यायलीय... दररोज ५ ते ७ लिटर दूध देते...
गिऱ्हाईक : आणि ही दुसरी म्हैस... ही कशी दिली?
शेतकरी : एक लाख... ही रेड्याला जवळ पण येऊ देत नाही!
गिऱ्हाईक : मग... दूध वैगरे???
शेतकरी : कसं येणार?
गिऱ्हाईक : मं... तरीही इतकी किंमत कशी हिची?
शेतकरी : काय राव... कॅरेक्टर नावाची काही चीज आहे की नाही?
--------------
भाजपचे नेते आणि पक्षाचे असं आहे... नुसतं कॅरेक्टर असून त्याचा लोकांना उपयोग '0' आहे... नाही का?

1 comment:

Mahendra said...

युतीने काहिही केलं नाही हे अगदी सर्व मान्य आहे. नुसती स्वतःची मालमत्ता वाढवणे हेच काम इमाने इतबारे युतीच्या लोकांनी पण केलंय. कॉंग्रेस, युती, शिवसेना सगळ्यांचं या बाबतित एक मत आहे...
मनसेला पण जर राजकिय महत्वाकांक्षेने ग्रासले, आणि जर शिवसेने प्रमाणे मराठी मुद्दा सोडुन भैय्या लोकांच्या मताच्या मागे लागले, तर मात्र मनसेचे पण तेच होईल , जे शिवसेनेचे झाले आहे... पानिपत!!!