नाही... आश्चर्यचकित होऊ नका... आज सकाळी टीव्ही लावला तेव्हा टीव्हीवर अशीच.. अगदी अशीच एक बातमी सुरू होती. यात फक्त बदलापूरच्या जागी दिल्ली होतं... बेलापूरच्या जागी लुधियाना आणि अमोल परांजपेच्या जागी होते राहूल गांधी... हां... आत्ता ही झाली खरी 'ब्रेकिंग न्यूज...!!!'
काँग्रेसचे महासचिव राहूल गांधी आणि ट्रेननं... अरेच्च्या! ही खरोखर बातमीच आहे. त्यांच्या मातोश्री काल मुंबईला येताना विमानाच्या इकोनॉमी क्लासनं आल्या होत्या. (याच विमानात आमचे खासदार सुरेश टावरे हेदेखील होते म्हणे... आणि तेही बिझनेस क्लासमध्ये... मग बाईंना इकोनॉमी क्लासमध्ये बघितल्यावर त्यांनी आपली व्हीआयपी सीट एका सरदारजींना देऊ केली आणि स्वतः इको.क्लासमध्ये आले. आणि शप्पथही घेतली म्हणे की या पुढे फक्त इको.क्लासनंच प्रवास करणार... व्वा... टावरे जी... आमच्या मतांचं सोनं केलंत हो!!!) हां.. तर मुळ मुद्दा म्हणजे सोनियाबाई काल इको.क्लासनं मुंबईत आल्या. मग 'माँ से बेटा सवाई...' हे सिद्ध करण्यासाठी राहूलजींनी थेट शताब्दीचं रिझर्वेशन करून टाकलं. तेही एसी चेअर कारचं...
खरंतर राहूलजींना ही गोष्ट फुटायला नको होती... म्हणजे मिडियात बोंबाबोंब होऊ नये, असं त्यांना वाटत होतं. पण झालं भलतंय... त्यांची गाडी निघणार, नेमके त्याच वेळी तमाम हिंदी चॅनल्सचे रिपोर्टर तिथं हजर... (न्यूज २४ या वाहिनीचं नशिब बलवत्तरच... नेमकं याच गाडीत आणि याच डब्यात त्यांच्या एका रिपोर्टरचंही रिझर्वेशन होतं म्हणे...) मग काय... दे दणादण ब्रेकिंग न्यूज सुरू! सगळ्या चॅनल्सवर दाखवत होते... राहूल गांधी निकले ट्रेन मे... रेल्वे से जाएंगे लुधियाना... राहूल गांधीने आणखी काय काय...
जोक्स अपार्ट... मला एक कळत नाही... म्हणजे मला एक कळतं की, हा योगायोग नाही... म्हणजे नेमकी राहूलबाबांना झुकझुक गाडीनं जायची इच्छा व्हावी आणि त्याच वेळी तमाम वाहिन्यांचे रिपोर्टर तिथं हजर असावेत... माझ्यासारख्या सामान्य माणसाला इतकं कळतं की, याला मराठीत 'पब्लिसिटी स्टंट' असं म्हणतात... राहूल गांधींना या गोष्टी नव्या नाहीत... असली नाटकं ते अधून-मधून करतच असतात. मागे एकदा काहीतरी कुठेतरी 'पाट्या' टाकण्याचं (शब्दशः पाट्या टाकण्याचं...) काम त्यांनी केलं होतं मिडिया-बिडियाला बोलवून.... आजचं रेल्वे प्रवासाचंही नाटकच...
मुळात या नेत्यांचं छानछौकी राहणं... त्यांच्या गाड्या... त्यांच्या सिक्युरिटीचा लवाजमा पाहिला की या गरीब बिच्चा-यांना जनतेची किती काळजी आहे ते... एखाद दिवशी घमेली उचचली किंवा एखाद दिवस रेल्वेनी गेलं की तूम्ही आम जनतेच्या अधिक जवळ जाल, हे वाटणं एक तर मूर्खपणाचं आहे किंवा हे नेते समोरच्याला (म्हणजे आपल्याला) मूर्ख समजतात... मुळात राहूल गांधी जेव्हा रेल्वेनं गेले त्या डब्यात त्यांच्या आजूबाजूच्या सिट्सवर त्यांचे सुरक्षारक्षक, सेक्रेटरी इत्यादी होते. त्या कम्पार्टमेंटमधल्या उरलेल्या सीट मोकळ्या ठेवल्या होत्या. मग राहूल गांधींनी सामान्य जनतेसारखा प्रवास केला, असा दावा कुठल्या तोंडानं करायचा? या नेत्यांना असलेला धोका बघता अगदी मी बदलापूरहून बेलापूरला येतो तसं त्यांनी येणं अपेक्षितही नाही... पण मग ही 'दिखाऊगिरी' कशासाठी...?
ज्यांना विमानाच्या बिझनेस क्लासनं जाणं परवडतं त्यांनी बिझनेस क्लासनं जावं... ज्यांना इकोनॉमी क्लासच परवडतो त्यांनी इकोनॉमी क्लासनं जावं... ज्यांना रेल्वेचं एसी तिकीट परवडतं त्यांनी ते रिझर्वेशन करावं... ज्यांना थ्री-टियर नॉन एसी परवडतं त्यांनी त्या डब्यात बसावं... ज्यांना तेही परवडत नाही त्यांनी 'चालू' तिकीट काढून जावं... ज्यांना तेही परवडत नाही त्यांनी (स्वतःच्या जबाबदारीवर) विदाऊट तिकीट जावं.... माझं म्हणणं इन शॉर्ट इतकंच... की नाटकबाजी करू नये... पण आपल्या नेत्यांना नेमकं तेच करण्यात इंटरेस्ट असतो... आजचा राहूल गांधींचा 'दिल्ली टू लुधियाना' प्रवास म्हणजे या नाटकबाजीतलाच एक नवा अंक... या पलिकडे याला महत्त्व नाही... माझ्या मते मिडियानंही देऊ नये... (पण ते होणे नाही, हे ही खरंच...!)
4 comments:
नाटकी आहेत हे गांधी घराण्याचे लोक.
राजकारणी किती खरे किती खोटे हे सगळ्या जगाला माहीत आहे. हल्लीचा खरा प्रॉब्लेम म्हणजे मिडिया. निव्वळ दळभद्रि. कोणी काही करो, तुम्हाला काय गरज असल्या आलातू फालतू गोष्टी दाखवायची? राहुल गांधी ज्या सीट वर बसणार ती सीट आणि सीट नंबर दाखवून ह्यांना काय मिळाले? आपल्याकडे काय कमी प्रॉब्लेम आहेत? त्यापेक्षा तिथला प्लॅटफॉर्म किंवा ट्रेन मधले Toilet दाखवायचे होते.
अमोल, तु गांधी घराण्याचा नाटकीपणा उत्तम दाखवला आहेस. खरोखर हे सगळे नाटकी आहेत. या राहुल गांधीची आजीही अशीच होती. एखाद्या गरिबाच्या मुलाला उचलून घे.. हत्तीवर बसून शहरात जा.. असली सगळी नाटकं स्वतः इंदिरा गांधीसुद्धा करत असतं. या राहूलची आई काय कमी नाटकी आहे.. पहिल्यांदा निवडणुक लढवली तेव्हा सोनिया गांधी काय आवाहन करत होत्या आठवतंय.. तुम्हा सर्वांसमोरच मी सून म्हणून या देशात आले, आई झाले आणि विधवाही झाले.. तेच हा राहुल गांधी करत आहे. इकॉनॉमी क्लासने फिरणारी सोनिया गांधी आणि रेल्वेतून प्रवास करणारा राहुल हे याच घराण्यातले..
किंवा आपण असं म्हणून गांधी घराण्याला भारतीय समाजाची नाडी बिनचूक सापडली आहे. असं काही तरी केलं की भाबडी भारतीय जनता फसते, खरोखर फसते हे ते बरोबर जाणतात..
या ब्लॉगला काँग्रेस द्वेषाची एक किनार आहे.. मला वाटतं राहुल गांधी करतायेत तो पब्लिसिटी स्टंट नाही.. त्यांना खरोखरच देश जाणून घ्यायचा आहे.. त्यांच्या नावाभोवती असलेलं वलय पाहता, त्यांना आता प्रसिद्धी नको असताना ती मिळते, हे त्यांचं दुर्देव आहे.. मात्र आपल्या अवती भवती इतके नेते आहेत.. अगदी राज ठआकरेंसकट ते कधीतरी अशा पाट्या टाकण्याचं काम किंवा एखाद्या दलित कुटुंबात जाऊन राहण्याचं, जेवण्याचं काम करतील का.. इथेच राहुल गांधी मोठे आहेत.. एवढी अनिर्बध सत्ता असूनही, त्याचा दुरुपयोग न करता एक तरुण काहीतरी सत्कारणी वेळ घालवण्यासाठी काहीतरी करतो आहे.. त्याचं कौतुक व्हायला हवं.. पत्रकारितेन न बघता याकडे कार्यकर्त्याच्या (काँग्रेस किंवा कोणत्याच नव्हे) निरपेक्ष दृष्टीने पाहिल्यास यातलं गणित कळेलं..
क्षमस्व..
Post a Comment