खरंतर या दोघांचंही म्हणणं बरोबर आहे... 'स्पोर्ट्समन स्पिरीट'चा हवाला दिला, तर शाहरूख बरोबर आणि 'राष्ट्रप्रेमा'ची कसोटी लावली तर शिवसेना १०० टक्के बरोबर...
शाहरूखचं म्हणणं वरवर खरं दिसत असलं तरी तो स्वतः कोलकाता नाईट रायडर्सचा मालक आहे... त्यानं लिलावानंतर पोपटपंची करण्यापेक्षा त्यावेळी पाकिस्तानी खेळाडूंना का घेतलं नाही? त्यानं एखादा खेळाडू घेतला असता आणि मग त्याला शिवसेनेनं विरोध केला असता, तर शाहरूखकडे एकतरी हुकमाचा पत्ता असता... पण त्यानं 'लोका सांगे ब्रह्मज्ञान...' या उक्तीला स्मरून नंतर बडबड करणं पसंत केलं... का? अहो, कारण सरळ आहे... त्याचा 'माय नेम ईज खान' येऊ घातलाय... 'स्पोर्ट्समन स्पिरीट'चा सोनेरी मुलामा देऊन थोडा पाकधार्जिणेपणा दाखवला तर सिनेमाच्या प्रमोशनला मदत नाही का होणार???? इतका साधा-सरळ हिशोब आहे... त्यात शिवसेना-भाजप किंवा आणखी कोणी विरोध केलाच तर उत्तमच... अन्यथा सिनेमाची इतकी फुटक पब्लिसिटी कशी होणार?
बरं... शाहरूख ज्या पाकिस्तानी क्रिकेटपटूंची बाजू घेऊन गळा काढतोय, ते 'स्पोर्ट्समन स्पिरीट'च्या कसोटीवर किती उतरतात, हे तो बघणार नाही का? शाहीद आफ्रिदी सफरचंद खावं तसा बॉल खात होता. मैदानात १७ ते २० कॅमेरे असताना त्याची चेंडू कुरतडण्याची हिम्मत झाली... आफ्रिदीही आयपीएलसाठी उपलब्ध होता आणि शाहरूखला त्याला घेण्याची इच्छा होती म्हणे... आता या आफ्रिदीसाठी त्याला कोलकाता संघात घ्यायला इच्छुक असलेल्या शाहरूखनं 'स्पोर्ट्समन स्पिरीट'चं नाव घेत बोंब मारावी? हे म्हणजे 'आपलं ठेवायचं झाकून आणि दुस-याचं पहायचं वाकून' अशातली गत नाही का?
मुंबई हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानशी क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी शाहरूखला कंठ का फुटला नाही? कारण स्पष्ट आहे... कारण त्या वेळी शाहरूख खानचा 'माय नेम ईज खान' नावाचा सिनेमा येऊ घातला नव्हता... त्या वेळी एका विशिष्ट समाजाची सहानुभूती मिळवण्याची त्याला व्यावसायिक गरज नव्हती...
अनेक बुद्धिवादी सांगत असतात की, सिनेमा ही कलाकृती आहे... त्याकडे त्याच नजरेनं पाहिलं जावं... आपले मंत्रीही हाच सल्ला देतात... पण मग अवधूत गुप्तेच्या झेंडाला राणेंच्या स्वाभिमाननं केलेला विरोध चालतो का?
सरकारचं म्हणणं असं की विरोध जरूर करा पण सनदशीर मार्गानं करा... पण शिवसेनेची कार्यपद्धती पाहता, पक्षाचा इतिहास पाहता शिवसेनेकडून आणखी कशा प्रकारचा विरोध अपेक्षित आहे? 'खान'चे प्रयोग बंद पाडा.... शाहरूखसमोर निदर्शनं करा.... त्याची पोस्टर्स जाळा.... असे आदेश शिवसैनिकांना द्यावे लागत नाहीत. पोर जन्माला येताना ज्याप्रमाणे श्वास घ्यायचं शिकूनच येतं, तसं काहीसं शिवसेनेचं आहे. 'खान'ला विरोध करा, इतकं मातोश्रीवरून सांगितलं तरी प्रत्येकाला माहित असतं नेमकं काय करायचंय ते...! आता मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांना सेनेची ही पद्धत माहित नाही, असं कसं मानायचं? आणि सनदशीर मार्गानं विरोध करायचा, म्हणजे नेमकं काय करायचं? 'सरकारनं आपला आवाज ऐकावा' यासाठी भगतसिंगांनी संसदेत स्फोट घडवला. त्यावेळी कोणाला इजा होऊ नये, साधं खरचटूही नये, याची काळजी घेत मोकळ्या जागी हातबॉम्ब फेकला... हा मार्ग सनदशीर म्हणायचा की हिंसक? आत्ता प्रसिद्धी मिळवणं ही सेनेची राजकीय गरज आहे, हे काही अंशी खरं असलं तरी अशी कुठलीही गरज नसतानाही (उदा. राज ठाकरे सेनेत असताना वैगरे...) बाळासाहेबांनी वेळोवेळी राष्ट्रवादी भूमिका घेतलीय... मग वानखेडे स्टेडियमचं पिच उखडणं असेल किंवा बाबरी मशिद पाडल्याची जबाबदारी स्विकारणं असेल....
सिनेमाच्या प्रमोशनसाठी शाहरूखला आलेला पाकिस्तानचा कड प्रामाणिक आहे, असं म्हणायला हवं... कारण बुद्धिवाद्यांनी कितीही घोषा लावला तरी 'चित्रपट बनवणे' हा एक व्यवसाय आहे... नव्हे कोट्यवधींचा व्यवसाय आहे. आता धंदा करायचा म्हंटल्यावर त्याची जाहिरात करणंही आलंच की... आमीर खान वेगवेगळी रुपं घेऊन देशभर फिरतो, ते चालतं... शाहरूखनं पाकिस्तानची बाजू घेतलेली खपत नाही... असं कसं? शाहरूखला आलेला क्रिकेटचा पुळका हा त्या धंदेवाईक विचारातून आलाय. त्यामुळे त्यानं केलं ते चूक असं कसं म्हणणार...
Everything is fare in LOVE and WAR... and this is BOX OFFICE WAR...
4 comments:
तुला असं म्हणायचंय की एका विशिष्ट, थोडक्यात मुस्लिम, समाजाच्या जोरावरच शाहरुखचे सिनेमे चालतात? हे म्हणजे अतिशय काहीहीच्या काही विधान आहे. आणि शिवसेनेचं रे कसलं आलंय राष्ट्रप्रेम? मुंबई पोलिसांची खरी गरज शहराच्या रक्षणासाठी असताना, हे तथाकथित राष्ट्रप्रेमी शहरात तणाव निर्माण करताहेत. अशा वेळेस एखादा दहशतवादी हल्ला झाला तर पुन्हा पोलिसांना जबाबदार धरुन स्वतःच्या राष्ट्रप्रेमाची बोंब ठोकायला मोकळे. वा रे राष्ट्रप्रेमी. गेल्या ४० वर्षांमध्ये मुंबईतल्या मराठी माणसाच्या मनात न्यूनगंडाची भावना तयार करणं ही राष्ट्रप्रेमाची व्याख्या कोणत्या शब्दकोषात सापडते ते सांगशील का जरा?
माय् नेम इज खानचे पाकिस्नमधील प्रदर्शन सुरळीत पार पडावे यासाठी शाहरूख खानने पाकिस्तानी खेळाडूंची तरफदारी केली होती. ते पार पडल्यावर यावर तोडगा निघेलच. महाराष्टृ सरकारने यात कारणाशिवाय लक्ष घालून हा गदारोळ उठविला आहे.
I don't agree with your views. Shivsena has done nothing to call it deshbhakt. You should see Chak De and Swadesh to understand what is patriotism. Shahrukh is fevourate star dispute he is Muslim.
ठरवून कुठलीही भूमिका न घेता आणि कोणताही अभिनिवेश न घेता हा लेख लिहिला असल्यामुळे मला तो एका अर्थानं सर्वंकष वाटला. शेवटी आपापल्या ठिकाणी प्रत्येक जणच बरोबर आहे. शिवसेना आणि शाहरुख तर आहेच. पण सरकारबाबतही तितकंच खरं. कारण शेवटी शिवसेना जर थिएटर्सची मोडतोड करणार असेल तर सरकार एकदम उदासीनता कसं दाखवू शकेल?...सागर
Post a Comment