Thursday, 4 March 2010

एका सस्पेन्सची अखेर...!


प्रमोद महाजन यांचा मारेकरी प्रवीण याचा अखेर अंत झाला... काही जण म्हणतात 'पापाचं प्रायश्चित्त मिळालं...,' काही जण म्हणतात 'बरं झालं गेला एकदाचा...,' पण प्रवीणच्या अकाली मृत्यूमुळे एका सस्पेन्सची अखेर झालीय, हे मात्र खरं...
प्रमोद महाजन यांच्यावर गोळ्या झाडणारा... त्यानंतर स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन होणारा... आणि त्यानंतर कोर्टात 'नॉट गिल्टी' असं सांगणारा... खालच्या कोर्टानं जन्मठेप ठोठावल्यावर वरच्या कोर्टात अपिल करणारा... प्रमोद महाजन यांच्यासोबतचे प्रसंग 'माझी डायरी'च्या रुपानं शब्दांत मांडणारा... अशी प्रवीणची अनेक रुपं. त्यानं आपल्या 'डायरी'त प्रमोदला हिरो-टर्न-व्हिलन असं रंगवलंय. प्रमोद महाजनांच्या कार्यक्षमतेबद्दल आणि संघटन कौशल्याबद्दल संपूर्ण आदर बाळगूनही 'प्रवीणनं जे लिहिलंय ते धादांत खोटं आहे...' असं म्हणवत नाही. कारण प्रमोद महाजनांचं आयुष्यही तितकंच गूढ होतं. प्रवीणनं प्रमोदजींमध्ये बदल होण्याचं खापर विवेक मैत्रा याच्या माथी फोडलंय... राहूलबद्दल प्रवीणनं प्रमानं लिहिलंय... राहूललाही विवेकनंच बहकवलं, असा काहीसा प्रवीणच्या लेखनाचा सूर आहे. स्वयंसेवक प्रमोद आणि राजकारणी प्रमोद यांच्यातला फरक प्रवीणनं मांडलाय. त्यांची घरात चालणारी दादागिरी काहीशी भडक असली तरी त्यातला १० टक्के अंश खरा मानायला हरकत नाही.
प्रमोदजींची हत्या झाल्यापासून 'प्रवीणनं हे कृत्य का केलं...?' याची चर्चा होत राहिली. कोर्टात आणि बाहेरही प्रवीण सतत म्हणत आलाय की, त्याचं कारण तुम्हाला कधीही समजणार नाही... म्हणजे दिसतं तितकं साधं कारण नाही, हे प्रवीणनं अप्रत्यक्षपणे सुचित केलंय. या हत्येमागे घरगुती कारण असेल का? की प्रवीण प्रमोदजींचा करत असलेला अत्यंतिक द्वेष, हे कारण असेल...? की यात काही राजकीय धागे गुंतले आहेत? याचं उत्तर दोनच व्यक्ती देऊ शकत होत्या. एकतर स्वतः प्रमोदजी किंवा प्रवीण... आता हे दोघंही नाहीत.
प्रमोदजींच्या अल्प पण दैदिप्यमान आयुष्याची अखेर कशामुळे झाली, या सस्पेन्सचा शेवट झालाय... 'हा सस्पेन्स तुम्हाला कधीच कळणार नाही,' असं म्हणत सस्पेन्स वाढवणारा प्रवीणच आता इतिहासजमा झालाय...

2 comments:

अमित भिडे said...

मस्तच अमोल, प्रवीण गेल्याची बातमी पाहिल्यावर ज्य़ा भावना मनात आल्या त्या बरोबर शब्दात मांडल्या आहेस. आवडलं.

Anonymous said...

sir, blog chan ahe. ka marala te saspense rahila.