सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या निकालाच्या सुनावणीला स्थगिती दिली. २४ तारखेला निकाल लागेल असं गृहित धरून आधीची पोस्ट लिहिली होती... तारीख पुढे ढकलली तरी निकाल अटळ आहे.
६० वर्षं भिजत पडलेलं हो घोंगडं 'वॉशिंगमशिन'च्या बाहेर सुकवायचा हा शेवटचाच प्रयत्न ठरावा... पण इतक्या वर्षांत जे घडलं नाही, ते चार दिवसांत घडायची शक्यता कमीच आहे. किंबहुना लखनौ उच्च न्यायालयाच्या अलाहाबाद खंडपीठात दोन्ही बाजूंनी तसं स्पष्ट केल्यानंतरच निकालाची तारीख जाहीर करण्यात आली होती. यामुळे आजचं मरण उद्यावर गेलंय, इतकंच म्हणता येईल...
मात्र आता तारीख आणखी पुढे ढकलली गेल्याने एक वेगळीच समस्या उभी राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रकुल स्पर्धा ३ तारखेला आहेत. आता हा निकाल या स्पर्धांच्या तोंडावर लागण्याची शक्यता आहे. तसं झालं आणि आपल्या सर्वाच्या दुर्दैवाने आपण या 'वार्षिक परीक्षे'त नापास झालोच, तर आधीच अनेक अपघातांनी जर्जर झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांसाठी तो शेवटचा आघात ठरावा... अर्थात तारीख जाहीर करताना मायबाप सुप्रिम कोर्ट या सगळ्याचा विचार नक्की करेल, अशी आशा आहे.
आता स्पर्धा संपल्यानंतरची तारीख मुक्रर झाली, तर मात्र काही काळ स्पर्धांच्या निमित्ताने आसेतूहिमाचल पसरलेला कृत्रिम तणाव नाहीसा होण्यास मदत होणार आहे...
असो... परीक्षा पुढे ढकलली की हुशार विद्यार्थी ती इष्टापत्ती मानतात आणि नियोजित वेळेत वाचायचे राहून गेलेल्या विषयांची उजळणी करतात... पण एखादा ढ कार्टा असेल, तर परीक्षा पुढे गेल्याच्या आनंदात एकतर सिनेमाला जाऊन बसतो किंवा नाक्यावर टंगळ-मंगळ तरी करतो... आपली कॅटेगरी कोणती ते काळच ठरवेल!!!
1 comment:
Talwar Nikali Hein Myaan Se Mandir Banega Shaan Se...
Post a Comment