सुरूवातीला मणिशंकर अय्यर यांनी या स्पर्धांच्या आयोजनावर आक्षेप घेतल्यानंतर त्यांना देशद्रोही म्हणण्यापर्यंत काहींची मजल गेली होती. मात्र त्यानंतर बाहेर आलेल्या एकेक प्रकरणांमुळे या लोकांचेच दात घशात गेल्याचं चित्र निर्माण झालं आहे. टॉयलेट पेपरपासून ते क्वीन्स बॅटन रिलेच्या लंडनमधील कार्यक्रमापर्यंत प्रत्येक गोष्टीत आपल्या राष्ट्रीय धर्माला जागून पैसे खाल्ल्याचे आरोप केले जात आहे. इतकंच नाही, तर या स्पर्धेचे यजमानपद मिळविण्यासाठीही म्हणे सर्व ७१ देशांना लाच देऊ केली गेली आहे. देशाचं नाक कापलं गेल्यानंतर आता किमान स्पर्धेच्या काळात तरी चांगल्या सोयी ठेवून किमान देशाची मान खाली घातली जाणार नाही, याची काळजी घेतली जाईल अशी अपेक्षा आहे.
आजच कॉमनवेल्थ फेरडेशनचे अध्यक्ष मायकेल फेनेल यांनी आयोजनातील ढिसाळपणाला सगळेच जबाबदार असल्याचं म्हंटलं आहे. या 'सगळे'मध्ये त्यांची समिती आणि ते स्वतःदेखील त्यांना अभिप्रेत आहेत. दोन दिवसांपूर्वीचा त्यांचा सूर अचानक बदलण्यास काही कारणं असू शकतात. एकतर त्यांनी कॅबिनेट सचिव चंद्रशेखर यांना लिहिलेल्या पत्रानंतर खरंच सरकार दणकून कामाला लागलं आणि खरोखरच ४८ तासांत अशक्य ते शक्य करून दाखवलं आणि आता क्रीडाग्राम अत्यंत देखणं, स्वच्छ आणि नीटनेटकं झालेलं आहे... असं मानायला जागा आहे. पण त्यासाठी हॅरी पॉटरच प्रत्यक्षात यायला हवा...
यापेक्षा स्पर्धा सुरू होण्याच्या तोंडावर कटुता नको, असा विचार करून फेनेल यांनी हे वक्तव्य करणं पटण्यासारखं आहे. कारण अवघ्या आठवड्यावर स्पर्धा आल्यामुळे आता ऑलिम्पिक समिती, राष्ट्रकुल समिती, आयोजन समिती हे सगळेच 'पॉइंट ऑफ नो रिटर्न'वर आले आहेत. आता स्पर्धा रद्द होऊ शकत नाहीत, ही काळ्या दगडावरची रेष आहे. त्यामुळे स्पर्धेच्या काळात कोणाच्या मनात किल्मिष राहायला नको आणि सर्वांना ही स्पर्धा एन्जॉय करता यावी, या उद्देशाने फेनेल बॅकफूटवर आलेले असू शकतात. (आरोप होतो आहे, त्याप्रमाणे जर खरंच आंतरराष्ट्रीय लाचखोरी करून यजमानपद मिळवलं असेल, तर या ७१ देशांना हे कथित पैसे परत करावे लागणार नाहीत ना, ही भीतीदेखील फेनल यांच्या मनात असावी का?) कारण काहीही असलं, तरी आता राष्ट्रकुलावरचं मळभ दूर झालं आहे आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसह सर्व संघ दिल्लीत डेरेदाखल होत असल्याचं आश्वासन फेनेल यांनी देऊ केलंय.
तात्पर्य, स्पर्धांचे गेट.... सेट...(?) झाले आहे आणि फक्त बंदुकीचा बार उडण्याची वाट सगळे बघतायत (रेफरीच्या बंदुकीचा बार... अतिरेक्यांच्या नव्हे!!!) त्यामुळे आता पुढले २-३ आठवडे कलमाडी-शीला दीक्षित यांना विसरूयात... सायना, तेजस्वीनी, विजयेंद्र यांच्यासह तिरंगा खांद्यावर लावून खेळणा-या प्रत्येकाला शुभेच्छा देण्यासाठी १०० कोटी कंठांमधून एकच आवाज देऊयात....
चक दे इंडिया...!!!
1 comment:
चला आशा ठेवायला हरकत नाही.
Post a Comment