न्यायदंडाधिकारी एस.पी. तमांग यांनी दिलेल्या अहवालात हे एन्काऊंटर 'फेक' असल्याचं म्हंटलंय... मुळात फेक एन्काऊंटर ही संकल्पना फारशी नवी नाही. अनेकदा अनेक गुंडांना संपवण्यासाठी अशी एन्काऊंटर्स केली जातात. मुंबई पोलिसांमध्ये तर अशा 'एन्काऊंटर स्पेशालिस्ट' पोलिस अधिका-यांची मोठी मांदियाळी आहे. या फेक एन्काऊंटर्सला लोकांचा छुपा पाठिंबाही असतो, असं म्हंटलं तर फारसं वावगं ठरू नये... आपली एकूण न्यायालयीन प्रक्रिया ही '१०० गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एकाही निरपराध्याला शिक्षा होता कामा नये,' यावर बेतलेली असल्यानं स्वाभाविकपणे वेळखाऊ आहे. त्यामुळे अनेक अट्टल गुन्हेगार शिक्षेशिवाय एकतर कोठडीत असतात किंवा जामीनावर बाहेर बागडत असतात. अशा वेळी एखाद्या अट्टल आणि समाजाला त्रासदायक ठरणा-या इसमाचा परस्पर न्याय केला, तर बिघडलं कुठे, असा एक छुपा सूर ऐकायला येतो. काही 'मानवतावादी संघटना' याला "कायदा हातात घेणं" असं म्हणत असले तरी एकूण सर्वसामान्यांचं मत "बरं झालं संपवला..." असंच असतं. त्यामुळे इशरत आणि तिच्या तीन मित्रांचं झालेलं एन्काऊंटर हे फेक असू शकतं, नव्हे इतर ९९ टक्के एन्काऊंटर्सप्रमाणे ते बनावटच असणार, यात शंका बाळगायचं कारण नाही....
पण या 'एन्काऊंटर खरं की खोटं?' या वादात मुळ मुद्दा मात्र बाजुला पडलाय, असं वाटतंय. 'इशरत आणि तिचे मित्र खरोखर अतिरेकी होते की नाही...' या प्रश्नाकडून पद्धतशीरपणे लक्ष विचलित करण्यात आलंय. (यात केंद्र सरकार आणि बहुतांश मिडियाचा पुढाकार आहे.) मुळात गोध्राकांड आणि त्यानंतरच्या दंगली यामुळे अतिशय संवेदनशील बनलेल्या गुजरातेत हे लोक का चालले होते, हे बाहेर आलेलं नाही. त्यांच्या गाडीत शस्त्रास्त्र सापडल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये आहे. (पण हादेखील एक बनाव असू शकतो, कारण टाईम्सच्या बातमीनुसार पंचनाम्यात हा उल्लेख नाही.) पण हा एफआयआर खरा मानला तर रायफली घेऊन हे चौघेजण कोणत्या पिकनिकला चालले होते? त्यांचं टार्गेट खरोखर नरेंद्र मोदी तर नव्हते...? यासारखे बरेच प्रश्न उपस्थित होतायत.
इशरत जहाँ ही मुंब्र्याची राहणारी... तिच्या घरच्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे एन्काऊंटर होण्यापूर्वी 'लष्कर ए तैय्यबा' हे नावच त्यांनी ऐकलं नव्हतं... अरेच्चा... असं कसं होऊ शकतं? गेली अनेक वर्ष देशभरात धुमाकूळ घालणा-या एका अतिरेकी संघटनेचं नाव ठाण्यासारख्या शहरात राहणा-या लोकांनी ऐकलंच नाही... शंका आहे!!!
बरं... क्षणभर गृहित धरुयात की तिच्या घरच्यांनी 'लष्कर'चं नाव ऐकलंच नव्हतं पूर्वी... पण मुलगी एखाद्या अतिरेकी संघटनेसाठी काम करत असेल, तर ती काय घरी बोंबा मारत फिरणार आहे की 'मी अतिरेकी झालीय' म्हणून... घरच्यांना कसं कळणार की मुलगी कॉलेजमध्ये कोणाच्या संपर्कात आलीय आणि काय करतेय ते...
आणखी एक शक्यता अशी की इशरत अजाणतेपणी या घटनेत मारली गेली असेल. तिला खरंच माहित नसेल की आपण ज्यांच्याशी मैत्री केली आहे आणि ज्यांच्यासोबत गुजरातेत 'फिरायला' जातोय, ते कुठल्यातरी कुकर्मात गुंतले आहेत... तिला विचारीला असं वाटत असेल की आपले चांगले मित्र आहेत, जाऊयात पिकनिकला... आपण कुठल्यातरी कथित 'जिहादी' मोहिमेवर जातोय, ते तिला ठाऊकच नसेल... असंही असू शकतं...!
या सगळ्या शक्यता मांडण्याचं कारण असं की मुंब्र्यात राहणारी इशरत जहाँ आणि तिचे तीन मित्र (यातला एक जण पाकिस्तानी आहे, असं वृत्त काही वाहिन्या देतायत) यांच्याशी गुजरात पोलिसांचं वैयक्तिक वैर होतं का? त्यांनी नेमकं या चौघांनाच का मारलं असेल... त्या पहाटे तिथून हजारो वाहनं गेली असतील... मग नेमकी यांचीच गाडी अडवून त्यांना ठार करायचं काय कारण? भले फेक असेल, पण या चौघांचंच एन्काऊंटर करण्याची गुजरात पोलिसांना काय गरज पडली असेल? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.
क्षणभर गृहित धरुयात की, हे चौघे निरपराध आहेत.... गुजरात पोलिसांना काही टीप मिळाली होती... पण ख-या अतिरेक्यांना मारायचं सोडून त्यांनी सापडलेल्या चार लोकांना गोळ्या घातल्या आणि मोकळे झाले... आता प्रश्न असा उरतो की, पोलिसांना टीप मिळालेले खरे अतिरेकी कुठे आहेत. (पुन्हा एकदा स्पष्ट करावसं वाटतंय की टीप मिळाल्याशिवाय उगीच चौघांना पकडून मारायला पोलिसांची या चौघांशी वैयक्तिक दुश्मनी असण्याचं कारण नाही...!) याचा अर्थ खरे अतिरेकी त्यावेळी (किंवा अन्य कोणत्यातरी वेळी) गुजरातेत गेले असणार आणि आपलं 'कार्य' सिद्धीला नेण्याचा प्रयत्न केला असणार... मग ते अतिरेकी कुठायत... अतिरेकी म्हणून मारून चुकीच्या लोकांना जगासमोर आणायचं आणि निश्चिंत रहायचं, हे गुजरात सरकार आणि पोलिसांना परवडणारं होतं का?
असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात... पण दुर्दैवानं आपल्याला हे पैलू दिसत नाहित... दिसले तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.... मिडिया त्यांना हवी तीच बाजू लोकांसमोर मांडतात...
इशरतच्या निमित्तानं 'फेक एन्काऊंटर'ची चर्चा करण्याऐवजी 'आपल्या लहानलहान शहरांमध्ये पसरलेले अतिरेक्यांचे हातपाय' यावर चर्चा झाली आणि उपाय झाले तर जास्त बरं होईल...
2 comments:
अमोल अगदी खरं लिहीलं आहेस. इशरत जहाँ प्रकरण गुंतागुंतीचं आहे. पण या निमित्तानं तू मांडलेले मुद्दे खरोखर तार्कीक आहेत.
अमोल, लिहिताना तू एक बाब गृहित धरली आहेस, की गुजरात पोलिस वैयक्तिक दुश्मनी असल्याशिवाय कोणाला मारत नाहीत, that's a joke. ज्या टाईम्सच्या बातमीचा तू हवाला दिला आहेस, त्यात वंझारा आणि कंपनीला मुख्यमंत्र्यांना खुश करुन प्रमोशन मिळवायचं होतं हे हजारदा लिहून झालंय. मोदींचं मुस्लिम प्रेम तर सर्वश्रुतच आहे. त्याबद्दल अधिक काही बोलायची गरजच नाही.
Post a Comment