Monday 31 August 2009

नगारा वाजला...

येणार... येणार... म्हणता म्हणता निवडणुका आल्या... नवी दिल्लीत वाजलेला हा बिगुल आता पुढला दीड महिना राज्यभर निनादत राहणार आहे...! पाच पक्ष... २८८ आखाडे आणि शेकडो मल्ल... लढाई जोरदार रंगणार आहे.... तेव्हा प्रेक्षकहो सज्ज व्हा!
शिवसेना-भाजप युती जवळजवळ निश्चित आहे... काही जागांच्या अदलाबदलीवरून किरकोळ तू-तू... मै-मै... होण्याची शक्यता आहे. पण ते तितकंच राहिल. एखद-दुस-या जागेवर 'मैत्रीपूर्ण लढती' बघायला मिळतील. प्रश्न आहे आघाडी होणार की नाही हा... आघाडी झाली नाही तर सत्ताबदल होणार हे नक्की मानायला हरकत नाही. कारण आधीच तिसरी आघाडी झाल्यानं दलित मतं काँग्रेसला मिळायची शक्यता कमी आहे. रामदास आठवलेंनी लोकसभेतल्या पराभवाचा पुरेपुर बदला घ्यायचं ठरवलंय. त्यामुळे त्यांच्या जास्त जागा आल्या नाहीत तरी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक जागा ही आघाडी पाडू शकते, हे निश्चित... (आठवा... मनसे @ लोकसभा) शिवाय काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार एकमेकांची मतं खातील, ती वेगळीच... त्यामुळे अशा ब-याच काठावरच्या जागा युती खिशात टाकेल... आघाडी झाली तर यातला धोका थोडा कमी होऊ शकतो...
युतीमध्ये सध्या सगळं आलबेल दिसतंय, हे खरं आहे... पण गडकरी-मुंडे यांचे संबंध किती 'जिव्हाळ्या'चे आहेत, ते आपल्याला माहित्ये. केंद्रात भाजपमध्ये सध्या जे चाललंय त्याचं मायक्रो-व्हर्जन महाराष्ट्रातही आहेच... त्यामुळेच मुंबईतल्या काही जागांबाबत भाजपमध्येच एकवाक्यता नाही... शिवाय सामनातल्या आजच्या अग्रलेखानं भाजप नेते दुखावले असण्याची शक्यता आहे. 'हे आईचं मुलाला रागावणं आहे... आई नाही का मुलाला कारट्या-मेल्या असं म्हणते... तसंच हे आहे,' असं सांगून भाजपच्या प्रकाश जावडेकरांनी या अग्रलेखाचं टोक मऊ केलं असलं तरी आत कुठेतरी-काहीतरी दुखल्याचं जाणवलंच... हिच अवस्था राज्यातल्या केंद्रीय नेत्यांची झाली असणार... हा अग्रलेख लिहिण्याचं सामनाचं टायमिंग मात्र जोरदार आहे... हाच अग्रलेख उद्याच्या अंकात आला असता तर त्याचा आणखी वेगळा अर्थ निघू शकला असता... भाजप नेत्यांसारखंच कार्यकर्तेही या अग्रलेखानं दुखावले असतील... (अग्रलेख कितीही खरा असला तरी...!!!!) असो!
तर मुख्य मुद्दा असा, की पडघम वाजायला लागलेत... तुंबळ युद्ध सुरू झालंय... आता मल्ल सज्ज आहेतच पण पत्रकारही सरसावून सिद्ध झालेत... (तारखा जाहीर होण्याची वाट नेत्यांपेक्षा जास्त आम्हीच पहात होतो...!) यातले काही पत्रकार कोणत्यातरी मल्लाला टिप्स देणारे असतील तर काही एखादा मल्ल कसा बहाद्दर आहे, हे सांगण्यात मश्गूल होतील तर रेफ्रीच्या भूमिकेत असतील... पण गम्मत अशी की, कोण टीप्स देतंय, बढाया कोण मारतंय आणि कोण रेफ्री आहे हे शेवटपर्यंत कोणालाच समजणार नाही! पुन्हा विषयांतर झालं...
तर मुळ मुद्दा असा की, राज ठाकरेंमुळे भाजप आणि शिवसेना, केंद्रातल्या कलहामुळे भाजप, तिस-या आघाडीमुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस, राष्ट्रवादीमुळे काँग्रेस, काँग्रेसमुळे राष्ट्रवादी, तिस-या आघाडीमुळे प्रकाश आंबेडकर (यावर वाद होऊ शकतो... कारण प्रकाश आंबेडकरांची ताकद किती आहे, कोण जाणे?), प्रकाश आंबेडकर, काँग्रेस, राष्ट्रवादीमुळे तिसरी आघाडी... अशा सगळ्याच पक्षांच्या नेत्यांच्या ** कपाळात आल्यात... यात सगळ्यात कमी धोका असेल तो मनसे आणि तिस-या आघाडीला... पण या दोघांची न्युसन्स पॉवर जबरदस्त आहे, हे सगळ्यांनाच मान्य होईल... त्यांच्या सिटा कमी आल्या, तरी ते अनेक जागा पाडू शकतात. पण
युतीची मतं - मनसेनं खाल्लेली मतं = आघाडीची मतं - तिस-या आघाडीनं खाल्लेली मतं
असलं गणित जुळून आलं तर मग युती की आघाडी हे ठरवणं आणखी कठीण होईल... मनसे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुक लढत्ये... आणि तिसरी आघाडीही... त्यामुळे कोणाची न्युसन्स पॉवर जास्त आहे, हे अजून समजलेलं नाही... त्यावर वरच्या गणिताची फोड अवलंबून आहे... पण सगळ्यात जास्त धोका आघाडी-युतीच्या नेत्यांनाच आहे...
भले टीव्हीवर बाईट देताना किंवा सभेत भाषणं ठोकताना हे लोक आव आणतील... पण मनात भिती भरलेली असणारच... त्याला कारण आहे आपणच... आपण कधी कोणाला डोक्यावर बसवू आणि कधी खाली आपटू हे कोणीच सांगू शकलेलं नाही... (अगदी चंद्रास्वामीपण...) म्हणजे वाजपेयींनी सहा महिने आधी निवडणुका घेतल्या तेव्हा कोणाच्या स्वप्नात आलेलं का, की भाजप विरोधी पक्षात बसेल... किंवा त्याच वेळी आंध्रप्रदेशात 'मिस्टर आयटी' चंद्राबाबू नायडूंचं पानिपत होईल... किंवा गेल्या विधानसभेला कोणाला वाटलेलं का, की पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीचंच सरकार सत्तेत येईल (आणि सहा महिन्यांपूर्वीच खुर्ची खाली केलेले विलासराव पुन्हा मुख्यमंत्री होतील...) याची कोणीच कल्पना केली नव्हती... पण ते असं झालं कारण आपण... 'ये पब्लिक है... ये सब जानती है...'
निकाल २२ तारखेला आहे. मतदान... दिवाळी... निकाल... असा हा अजब क्रम आहे... (त्यामुळे सगळ्या नेत्यांची (आणि पत्रकारांची) दिवाळी चांगलीच 'वाजणार!' हे नक्की झालंय...) हे म्हणजे 'धुळवड...(राजकीय)', दिवाळी...(खरीखुरी) आणि मग शिमगा....(एकमेकांच्या नावानं)' अशा क्रमानं सण साजरे होणार आहेत... त्यामुळे आता सिद्ध व्हायला हरकत नाही... लढायला..., लढवायला आणि पहायलाही....!

No comments: