घटना तशी आपल्यापासून दूर घडलेली... आपल्यापासून म्हणजे महाराष्ट्रात राहणाऱ्यांपासून. जयपूरच्या आयओसीच्या डेपोला लागलेली आग पाचव्या दिवशीही धुमसतेच आहे. अधिकाऱ्यांचं म्हणणं असं की, ही तेलाला लागलेली आग असल्यामुळे आपल्याला करण्यासारखं काहीच नाही... ती आग तिला वाटेल तेव्हा विझेल... मग आपण कोण-कोण आत होरपळलंय, त्याचा पंचनामा करायला मोकळे होऊ.. ज्यांनी या आगीची दृष्यं पाहिली असतील, त्यांना अधिकाऱ्यांच्या या असहाय्यतेचं कारण समजेल. हजारो मीटर उंचावर उसळणाऱ्या धडकी भरवतील अशा ज्वाळा आजही या अग्नीकांडात दिसतायत. आणखी १२-१५ तासांनी एकदा सगळं तेल संपलं की आग शमेल, असं सांगितलं जातंय.
ही आग एकदा विझली की मग नेमकं नुकसान किती... मृत्यू किती... याची चर्चा सुरू होईल. राज्य सरकारच्या 'डिझास्टर मॅनेजमेंट'चा पंचनामा करणारी जनहित याचिका दाखल झालीपण आहे. त्याचंही काय होईल ते होवो... प्रश्न वेगळाच आहे... थोडा घाबरवणाराही.... भारतातल्या तेल कंपन्यांचे असे अनेक डेपो ठिकठिकाणी आहेत. शिवाय ट्रॉम्बेसह अनेक ठिकाणी अणूभट्ट्याही आहेत. जयपूरची पुनरावृती अशी कुठे झाली, तर परिस्थिती आहे.
आधी या दुर्घटनेला 'अतिरेकी कारवाई' असं नाव दिलं गेलं. मात्र आता एका कर्मचाऱ्यानं चुकीच्या क्रमानं वॉल्व सोडल्यामुळे प्रेशर बिघडलं आणि आग लागल्याचं कारण आता पुढे येतंय. हे जास्त भयानक आहे... अतिरेकी कारवाईपेक्षा भयानक आहे. कारण थोडीशी सावधगिरी बाळगली तर अतिरेकी कारवाई थांबवता येते... मानवी चूक नाही...
आणखी एक धोका म्हणजे शहरांच्या मध्यभागी असलेल्या पेट्रोलपंपांचा... जयपूरइतका नसेल, तरी मोठं नुकसान करण्याइतका इंधनसाठा यात असतोच असतो... मग असल्या मानवी चुका तिथं झाल्या तर आसपासच्या वस्तीचं काय? हा विचारच भयानक आहे. घटना आणखी भयानक असतील.
जयपूरच्या आगीत सुमारे ५०० कोटींची मालमत्ता... अनेक बॅरल इंधन... किमान १०-१२ जीव जळून खाक झाल्येत... याच आगीत आपला निष्काळजीपणाही जळून खाक झाला तर बरं... नाहीतर काही खरं नाही...! खरंच खरं नाही...!!
1 comment:
इथे इतकी लहानशी चुक झाल्याने आग लागणे शक्य नाही. कांही तरी लपवले जात आहे. एकदा सगळं बेचिराख झाल्यावर मग काय सापडणार आहे? तेंव्हा मेंटेनन्स फ्लॉज लपवुन कुठल्यातरी त्या ऍक्सिडेंट मधे वारलेल्या एखाद्या कर्मचाऱ्यावर जवाबदारी थोपायची जुनी टॅक्ट आहे ही सरकारी कंपन्यांची, कारण तो काही येणार नाही एक्स्प्लेनेशन द्यायला.. तुम्ही पत्रकारांनी प्रॉपरली कव्हरेज केलं , आणि थोडं इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नॅलिझम केलं तर खरं काय ते बाहेर येणं सहज शक्य आहे.. मला पण बऱ्याच गोष्टी ठाउक आहेत, पण बोलता येत नाहीत. असो..
Post a Comment