Saturday 28 November 2009

भरत्या-पक्या-अम्या-चिनूची गोष्ट...

आमच्या सोसायटीत तशी पोरं फार... पण त्यातले चार नग म्हणजे भरत्या, पक्या हे दोन शेजारी, त्यांच्या वरच्या मजल्यावर राहणारा चिनू आणि दुसऱ्या विंगमध्ये राहणारा अम्या... या चौघांची एक छोटी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. आधी त्यांची ओळख करून देतो...
अम्या... आमच्या सोसायटीतल्या पोरांचा दादा. त्याला सगळे टरकून असतात. वयानं मोठा आणि श्रीमंत बापाचा पोरगा असल्यानं सगळ्या सोसायटीत त्याचा वचक आहे. त्याचं घरही इतरांपेक्षा मोठं...
चिनू... हा चिनू म्हणजे त्यातल्या त्यात अम्याशी पंगा घेणारा... त्याचं घरही मोठं पण घरात त्याच्या बाबांची सत्ता चालते... एका अर्थी घरात हुकूमशाहीच आहे म्हणा ना! सोसायटीत घर असून घराभोवती मोठ्ठी भिंत, असा त्यांचा घरचा थाट... याचं आणि भरत्याचं पटत नाही... पक्याची आणि चिनूची मात्र घट्ट मैत्री.
पक्या सोसायटीतलं सगळ्यात लहान कार्टं... पण अतिशय वाह्यात... भरत्याच्या खोड्या काढण्यात त्याला सगळ्यात जास्त इंटरेस्ट... त्याला चिनूची जोरदार फूस... घरची गरिबी असूनही चिनूच्या पैशांवर माज करण्यात पक्याचा हातखंडाच...
आपल्या गोष्टीतलं शेवटचं पात्र म्हणजे भरत्या... याचं घर पण मोठ... पैसाही बऱ्यापैकी, म्हणजे मध्यमवर्गातलं कुटुंब आहे म्हणा! सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुसंस्कृत घरातला असल्यानं सगळ्यांशी जमवून घेण्याचा याचा स्वभाव... आता याच्या या स्वभावाचा पक्या आणि चिनू गैरफायदा घेतात... पण हा आपला शांत असतो... पक्या तर याच्या घरात आपटीबार फोडतो दिवाळी-बिवाळी नसताना... तरीही भरत्या फक्त त्याला दम देतो, आणि सोडून देतो... भरत्याचं चिन्याशी एकदा आणि पक्याशी तीन वेळा जोरदार भांडण पण झालं होतं... अगदी मारामारीही झाली होती... पण शेवटी घरचे मधे पडल्यावर ते मिटलं... पुन्हा सगळ्यांशी मैत्री करायला भरत्या तयार... असा हा साधा-भोळा!
तशा या चौघांच्या किंवा यातल्या दोघा-तिघांचे किस्से खूप आहेत सोसायटीतले.. पण मी गेल्या दोन-तिन दिवसांत झालेल्याच गोष्टी सांगणार आहे...
******************
दोन-तिन दिवसांपूर्वी अम्या चिनूकडे खेळायला गेलेला... अम्या सगळ्यांमध्ये मोठा असला तरी नाही म्हंटलं तरी थोडासा चिनूला टरकतोच... त्यामुळे त्याच्याकडे गेल्यावर अम्या शहाण्यासारखा वागतो... तिथं गेल्यावर अम्यानं चिनूचं जोरदार कौतुक केलं... चिनूचे हुकूमशहा बाबा समोर होतेच... त्यामुळे तर अम्याला आणखीनच कंठ फुटलेला 'चिनू स्तुती' करायला... कौतुक करून अम्या कुठला थांबतोय..! त्यानं चिनूला सल्ला देऊन टाकला की भरत्या आणि पक्यातलं भांडणं सोडवण्याचा प्रयत्न कर... आता चिनू प्रयत्न करणार म्हणजे पक्याला मदत करून भरत्याला गप्प करण्याचा प्रयत्न करणार... त्यामुळे भरत्याला हे समजल्यावर तो जाम खवळला...! आता शांत असला तरी राग येणारच ना?
********************************
हे घडलं त्याच्या दुसऱ्याच दिवशी अम्यानं भरत्याला घरी जेवायला बोलावलेलं... अम्या राजकारणात पक्का मुरलेला होता... चिनूच्या घरी झालेल्या गोष्टीमुळे भरत्या दुखावलाय, हे अम्याला पक्कं ठाऊक होतं... त्याला खुष करणं गरजेचं होतं... म्हणून घरी नेहमी सगळे इंग्रजी बोलत असूनही अम्यानं भरत्याला चक्क मराठीत 'ये... ये... ये... तुझं स्वागत आहे...' असं म्हंटलं. भरत्या खुष... त्यानंतर भरत्याच्या बाबांचा आपल्या पाकिटात ठेवलेला फोटोपण अम्यानं दाखवला आणि 'तुझे बाबा कस्सले सॉलिड आहेत... आपण जाम मानतो त्यांना' असंही सांगून टाकलं... झालं भरत्या विरघळला... त्याला वाटलं की अम्या आपलाच खरा मित्र आहे... चिनूच्या घरी तो जे बोलला ते चुकून होतं... पक्याला अद्दल घडवायचा अम्याचा 'इरादा पक्का' आहे, याचीही भरत्याला खात्री पटली... अम्याच्या घरी पोटभर जेऊन भरत्या आपल्या घरी आला... आणि कोल्हापूरी चादर घेऊन गाssssढ झोपी गेला...!!
*****************************************************************

No comments: