Wednesday 4 November 2009

'वन्दे मातरम्'चं राजकारण!

'जमियत उलेमा ए हिं' या मुस्लिम उलेमांच्या संघटनेनं देवबंदच्या परिषदेत फतवा काढला की म्हणे मुस्लिमांनी 'वन्दे मातरम्' म्हणू नये... काचं कारण देण्यात आलंय की मातृभूमीला वन्दन केल्यानं मुस्लिमांचा एकेश्वरवाद शिल्लक रहात नाही... कारण अल्लाशिवाय कोणासमोरही नतमस्तक व्हायचं नाही, असं या फतव्यात म्हंटलंय. दुसरीकडे वन्दे मातरम् न म्हंटल्यामुळे मुस्लिमांना देशाबद्दल प्रेम नाही, असं मानण्याचं कारण नसल्याचंही उलेमा ए हिंदनं स्पष्ट केलंय. मुळात प्रश्न वन्दे मातरम् म्हंटल्यामुळे कोणी देशभक्त ठरतो, असं मानणंच मूर्खपणाचं आहे. देशभक्ती ही एखादं गीत म्हणणं-न म्हणण्यावर ठरवणं हे मूर्खपणाचंच ठरेल... नाहीतर पाकिस्तानात जाऊन प्रशिक्षण घेतलेल्या अतिरेक्यांनी कधीतरी पंजाब-काश्मीरातल्या शाळेत वन्दे मातरम्, जण गण मन... म्हंटलं असेलच की...! त्यामुळे जामियत उलेमा ए हिंदनं हे कोणाला बजावलंय माहित नाही... ते असो...
इथं प्रश्न असा आहे, की वन्दे मातरम् मुस्लिमांनी का नाही म्हणायचं... मुस्लिम धर्मात एकच देव असला तरी निरनिराळ्या दर्ग्यांवर मुस्लिम भाविक नतमस्तक होतातच की... ज्यांचे हे दर्गे असतात, त्यांना कोणी निश्चितच 'देव' मानत नसणार... पण तिथं माथं टेकलं जातंच ना..? मग तुमच्या मातृभूमीसमोर 'व्हर्चुअल नतमस्तक' झालं, तर तुमचा धर्म भ्रष्ट होईल, असं का मानता? जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला मुस्लिम धर्म एक साधं बंगाली गीत म्हंटल्यामुळे भ्रष्ट होईल, असं मानण्यात काय अर्थ आहे.
आता विषय असा आहे, की वन्दे मातरम् का म्हणायचं...? मुळात १८५७च्या स्वातंत्र्यासंग्रामाचं वन्दे मातरम हे स्फुरणगीत ठरलं... देशात स्वातंत्र्यासाठी झालेला हा पहिला-वहिला नियोजित उठाव... हा उठाव फसला असता तरी त्यानंतर थेट १९४७ला देश स्वतंत्र होईपर्यंत हजारो क्रांतीकारकांना वन्दे मातरम् या गीतानं तेज दिलंय... १८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामात देशभरातले अनेक संस्थानिक-राजे आणि अन्य स्वातंत्र्यसैनिक सहभागी होते... मात्र या सगळ्यांनी या उठावाचं नेतृत्व दिलं होतं दिल्लीचे ज्येष्ठ राज्यकर्ते बहाद्दुरशहा जफर यांच्याकडे... याचा अर्थच असा की 'वन्दे मातरम्' या गीतानं भारलेले लढवय्ये एका मुस्लिम राजाच्या नेतृत्वात लढले होते... मग आता दारूल उलूम किंवा मुस्लिम उलेमांचा अचानक विरोध असायचं कारण काय?
यामागे एकेश्वरवादाचा पाठपुरावा करण्यापेक्षा राजकारणाचाच भाग अधिक दिसतोय... काहीतरी विचित्र फतवे काढून वाद निर्माण करण्यात लोकांना जास्त इंटरेस्ट असतो... त्यातून मिडीयाचं लक्ष वेधून घेण्याचाच हेतू अधिक असतो. असं काही केल्याशिवाय माध्यमं दखल घेत नाहीत, त्याला कोण काय करणार? आता शिवसेना-भाजप आणि मुख्य म्हणजे विश्व हिंदू परिषदेच्या हातात कोलित मिळणार... आता आंदोलनं होतील... देशभर रस्ते अडवून सामुदायिक वन्दे मातरम् पठणाचे कार्यक्रमही (उदा. महाआरती) होऊ शकतात... किंवा यावरून कोर्टबाजी होण्याचीही शक्यता आहे... एकूणच वन्दे मातरम् हे आता निव्वळ स्फुरणगीत न रहाता एक राजकीय हत्यार होणार आहे...
मुळात दारूल उलूम, जामियत उलेमा ए हिंद किंवा विश्व हिंदू परिषद यापैकी कोणीच 'वन्दे मातरम्'बद्दल बोलणं योग्य नाही. आपण जेव्हा संपूर्ण वन्दे मातरम् म्हणतो किंवा कोणाच्या सुंदर आवाजात ऐकतो, त्यावेळी आपल्या शरीरावर रोमांच उठल्यावाचून राहात नाही... अशा या अतिशय तेजस्वी गीताचं राजकारण व्हावं, हेच दुर्दैवी आहे... ज्यांना हे म्हणायचंय त्यांनी म्हणावं... त्याला आडवण्यासाठी कोणी फतवे काढू नयेत आणि ज्यांना म्हणायचं नाही, त्यांनी म्हणू नये... त्यासाठी कोणी जबरदस्ती करू नये... इतकीच इच्छा! अन्यथा उगीचच या गीताचं पावित्र्य नष्ट होईल की काय, अशी भिती वाटते....
***************
जाताजाता एकच प्रश्न... 'वेदमंत्रांहून आम्हा वन्द्य वन्दे मातरम्... ' असं गदिमांनी म्हंटलं तेव्हा हिंदूंच्या भावना अशाच दुखावल्या होत्या काय...? शंकराचार्यांनी गदिमांच्या या गीतावर बंदी घालण्याची मागणी केली होती काय...? किंवा हिंदूंनी हे गीत म्हणू नये, असं कोणी सांगितलं होतं काय...?
वन्दे मातरम्!!!

6 comments:

Mahendra said...

या फतव्या मागचं बेसिकंच चुकीचे आहे. हे मुस्लिम लोकं दर्ग्यामधे जाउन चादर चढवतात. नमाज पढतात. प्रेअर करतात..... म्हणतात मेरे गरीब नवाज मुझे बचाओ .. वगैरे वगैरे... अफजल खानाच्या कबरीवर जाउन प्रेअर करतात.. त्या कबरीची ऑलमोस्ट पुजा करतात..काअपल्या घरामधे देव्हारा बनवुन तिथेहे काबा , मक्का चा फोटो लावतात, कुराणातली आयतं फ्रेम करुन लावतात आणि त्याची पुजा करतात-- हे सगळं चालतं?? हे सगळं इस्लाम ला मान्य आहे?? माझं ज्ञान कमी आहे या बाबतीत.. पण हा सगळा त्या मुल्ला लोकांचा .......असो.......

Anonymous said...

Where did you read that freedom-fighters in 1857 used the slogan 'Vande Mataram'? The song first appeared in 1882 when Bankim Chandra Chatterjee published his novel: Anand Math. It wasn't connected with the 1857 mutinee.

Anonymous said...

'वंदे मातरम्‌' मुसलमानांनी म्हणण्याविरुद्ध फ़तवा काढल्याचा तुम्ही निषेध (किंवा निदान खेद) करता, पण तसा निषेध विश्व हिंदु परिषदेनी करून त्याबद्दल 'बोलणं योग्य नाही' असाही तुमचा दावा आहे. म्हणजे तुम्हाला त्याबद्दल बोलायचा खास अधिकार आहे, अशी तुमची समजूत आहे की काय? मुस्लिम उलेमांनी या विषयावर राजकारण सुरू केल्यावर विरुद्ध पक्षाचे लोक त्याबद्दल बोलणारच.

mala-watala-te said...

To, Anonymous No. 1
The song was appeared in 'Anandmath' in 1882 is true... But that was first PRINTED APPERIANCE of this song. The song was populer in ANTI-BRITISH-GOVERNMENT before it's apperiance in ANANDMATH... It is said that Bankimchandra Chattopadhyay wtote this song in 1870... But exact timing is unknown... SO we can briefly consider that this song may be existed in 1857... May be in any other version...



प्रति, अनाम क्र. २
खरंतर आपल्या कॉमेंट नाव लिहून करायला अडचण काय आहे, हे समजू शकत नाही... मी माझ्या लेखात कोणाचाही निषेध केलेला नाही. मला खेदही वाटत नाहीये. असे फतवे काढायला माझा आक्षेप आहे... आता या तीन गोष्टींमधला फरक तुम्हाला समजत नसेल, तर मी काही करू शकत नाही. मी विश्व हिंदू परिषदेनं त्याबद्दल बोलू नये, असं म्हंटलेलं नाही. त्याबाबत टोकाचा विरोध करणं, मोर्चे-आंदोलनं करून लोकांना त्रास देणं हे अमान्य करायलाच हवं. बौद्धिक वाद घालू नये, गप्प बसावं असं मी म्हंटलेलं नाही. तसं मला वाटत असतं तर मी हा लेख लिहीण्याचा खटाटोप कशाला केला असता? शेवटी एक विनंती... कृपया नावानिशी प्रतिक्रीया दिलीत तर त्याला विश्वासआर्हता येऊ शकेल... अन्यथा 'अनाम' म्हणून लिहायला काही अर्थ नाही... तरीही तुम्ही प्रामाणिकपणे लिहील्यामुळे उत्तर देणं आवश्यक वाटलं...

Anonymous said...

Bankim Chandra was born in 1838. The chances of him having written the song by 1856 plus it becoming popular enough by 1857 to fire public imagination are almost nil. Just the two words 'vande mataram' may have inspired some freedom-fighters, and may have inspired Bankim Chandra to write a poem beginning with these words, but there are too many if's here. Please try to check again whether you read the claim about the words 'vande mataram' playing a part in 1857 in a reasonably trustworthy source. A book has been written to cover the entire history of the song. I will check with its author whether the two words (not the entire 'geet') played any part in 1857, but I doubt even that.

शेखर जोशी said...

अमोल,
मला लेख आवडला. योग्य लिहिले आहे. असो.
मी नव्याने पुन्हा एकदा जोशीपुराण हा ब्लॉग सुरु केला आहे. जोशीपुराण या ब्लॉगवर मला काही तांत्रिक अडचणीमुळे लेखन करता येत नव्हते. आता सवडीने नव्या ब्लॉगलाही भेट दे.
wwwpunhaeakadajoshipuran.blogspot.com
अशी ब्लॉगची लिंक आहे. नवीन काय सुरु आहे.
शेखर