Thursday 17 February 2011

दोन बातमीदार... टीम एकच की वेगवेगळी?

लेट अस भंकस, डोक्याची मंडई, बातमीदार-सहयोगी बातमीदार हे वृत्तपत्रसृष्टीची काही गुपिते जगजाहीर करणारे जाम प्रसिद्ध झालेले ब्लॉग बंद पडले. पडले की कोणी बंद पाडले, या प्रश्नाची चर्चा पत्रकारांच्या वर्तुळात होतच राहील. यातला डोक्याची मंडई तर कोणी आणि का बंद पाडला, हे जगजाहीर आहे. लेट्स भंकस आणि बातमीदारबाबत मात्र ठोस वृत्त नसलं, तरी काहीतरी मालफंक्शन असल्याचं बोललं जातंय. त्याच वेळी आणखी दोन असेच नवे ब्लॉग पुन्हा एकदा सुरू झालेत.
ब्रेकिंग न्यूज  आणि बातमीदार The Reporter हे दोन ब्लॉग पुन्हा एकदा वृत्तसृष्टीतील गमतीजमती घेऊन सादर झाले आहेत.
यातला दुसरा ब्लॉग हा अधिक काळजीपूर्वक तयार करण्यात आल्याचं दिसतंय. आशिष चांदोरकर या माझ्या मित्रानं या ब्लॉगची सखोल माहिती दिल्यामुळे ते पुन्हा देण्याचं टाळतोय. इच्छुकांनी इथं क्लिक करावं, म्हणजे त्याची माहितीपूर्ण पोस्ट वाचता येईल.
ब्रेकिंग न्यूज हा ब्लॉग मात्र मुंबईतल्याच कोणीतरी, मुंबईतच सुरू केल्याचं त्याच्या रुपावरून दिसतंय. प्रामुख्यानं वाहिन्यांमधील ब्रेकिंगन्यूज इथं असल्यामुळे एखाद्या मराठी वाहिनीत काम करणा-या कोणीतरी हा ब्लॉग सुरू केला असावा, अशीही शक्यता आहे.
माझ्या डोक्यात आलेली आणखी एक शक्यता म्हणजे हे दोन्ही ब्लॉग एकाच व्यक्तीनं (किंवा एकाच गटानं म्हणूयात हवं तर) सुरू केलेले असण्याची शक्यता आहे. एखाद्याबद्दल फारच अवमानकारक लिहायचं असेल आणि कायदेशीर कारवाईचा धोका असेल, तर बातमीदारवर बिनधास्त लिहायचं आणि एखादा हलकाफुलका प्रसंग लिहायचा असेल, तर ब्रेकिंग न्यूजवर जायचं. दोन ब्लॉग एकाच वेळी सुरू असतील, तर बॅकअपही कायम राहातो. काही कारणानं एखादा बंद पडलाच, तर दुसरा आधीपासून अस्तित्वात असलेला आणि वाचला जाणारा ब्लॉग हाती असणं केव्हाही चांगलंय... दोन्ही ब्लॉग बारकाईने पाहिल्यास त्यात काही ठिकाणी साम्य दिसतं तर काही ठिकाणी मुद्दाम घडवून आणलेलं वेगळेपण... मनात शंका येण्याचं हे प्रमुख कारण. आणि दुसरं म्हणजे आजवर एकाच वेळी दोन ब्लॉग्ज सुरू आहेत, असं कधीही घडलेलं नाही. दोन्ही ब्लॉग शैलीदार आणि कोणाचाही मुलाहिजा न ठेवता लिहिले जात आहेत. अशी अनेक कारणं आहेत मनात ही शंका यायला...
ब्लॉग दोन असले तरी टीम एकच आहे की वेगवेगळी?
ते काही असो... दोन्ही ब्लॉग चांगले आहेत आणि बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणा-यांच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या दोन्ही ब्लॉग्जनी पुढे सुरू ठेवलं आहे. त्यामुळे त्यांचं स्वागतच करायला हवं...

2 comments:

Anonymous said...

तुमच्या या लिखाणातली भाषा आणि त्या ब्लोगमधली भाषा एकाच व्यक्तीची वाटते. मला तर वाटते, ज्या सावधगिरीने तुम्ही हे लिहिले आहे, त्यावरुन ते दोन्ही ब्लोग आपले नाहीत हे पटवण्याचा प्रयत्न असावा. वाचले तर जावेत, पण आपण त्यातले नाही, अशा खुबीने तुम्ही दिलेल्या या माहितीबदल धन्यवाद. बातमीदार आणि ब्रेकिन्ग न्युजसाठी तुम्हाला शुभेच्चा. कधीतरी चांगल लिहा.

mala-watala-te said...

हा या शतकातील सर्वात मोठा जोक असू शकेल... कारण माझ्या 'मला वाटलं ते' या ब्लॉगपेक्षा त्या दोन्ही ब्लॉगना जास्त हिट आहेत. माझा ब्लॉग सुरू होऊन वर्ष-दीड वर्ष झालंय आणि ते ब्लॉ़ग तुलनेनं नवीन आहेत. तरीही त्या ब्लॉगच्या हिट्सनी माझा ब्लॉग केव्हाच ओव्हरटेक केलाय. त्यामुळे मला वाटलं तेच्या माध्यमातून त्या दोन ब्लॉग्जची जाहिरात करणं म्हणजे झी मराठीनं साम मराठीवर आपले प्रोमो चालविण्यासारखं आहे... तुम्हाला माझी आणि त्या ब्लॉग्जवरील शैलीत काय साम्य वाटलं ते देव जाणे... तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या दाव्यानुसार ते दोन ब्लॉग्ज माझे असते तर मी मुद्दाम या ब्लॉगवर लिहिण्याचे कारण नव्हते. कारण तुमच्यासारखे पापशंकी लोक जगात कमी नाहीत, हे मी जाणतो. चौथी गोष्ट... या दोन ब्लॉग्जवर आशिष चांदोरकर यानंही लिहिलं आहे. मग हे ब्लॉग त्याचे आहेत, असा दावाही तुम्ही करणार आहात का? आता तुम्ही दिलेल्या शुभेच्छांचं म्हणाल, तर त्या दोन ब्लॉग्जच्या निर्मात्यांनी तुमची प्रतिक्रीया वाचली असेल (तशी शक्यता कमी असली तरी) तर त्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या असतील. त्यांच्या वतीनं धन्यवाद देऊन टाकतो... कळावे.
ता.क. - अनामिक राहून प्रतिक्रीया लिहिण्याची गरज नाही. त्यामुळे तुम्ही मांडलेल्या मतातील विश्वासार्हता नाहीशी होते. शक्यतो नावानिशी प्रतिक्रीया टाकल्यास बरं होईल...