Monday 6 July 2009

थ्री चिअर्स फॉर फेडी-रॉडी...

विम्बल्डनचं सेंटरकोर्ट... विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या इतिहासात आजवर सगळ्यात जास्त लांबलेली आणि सगळ्यात जास्त अटीतटीची झालेली मेन्स सिंगल्स फायनल.... आणि "आयसिंग ऑन दि केक" म्हणून रॉजर फेडररनं केलेला विश्वविक्रम... सगळंच मस्त.... ख-या अर्थानं रविवारची सुट्टी सत्कारणी लावणारी ही मॅच.
पहिला सेट गमावल्यावरही फेडरर हरेल असं चुकूनपण वाटणं शक्य नसतं. तसंच ते यावेळीही वाटलं नाही. (तो हरावा असं वाटतही नाही म्हणा...) दुसरा आणि तिसरा सेट टायब्रेकरवर का होईना, त्यानं जिंकल्यामुळे तर असं वाटायला लागलेलं की चौथ्या सेटमध्ये बहुदा तो रॉडिकचा फडशा पाडणार आणि एखाद्या बादशहाच्या थाटात विश्वविक्रमी विजय साजरा करणार... पण चौथा सेट तो ६-३ असा हरला. तेव्हा थोडी रुखरुख आणि बरीचशी उत्सुकता लागली. रॉडिकचा गेम भन्नाट होता, यात वादच नाही...
पाचवा सेट मात्र डोळ्यांचं पारणं फेडून गेला... दोन तुल्यबळ हत्तींची लढत व्हावी आणि कोणीच हार मानू नये असं वाटत होतं... मॅच बघताना खूपदा असंही वाटत होतं की हा सामना संपूच नये... असाच तो चालू रहावा... इतकी मजा येत होती! पाचव्या सेटमध्ये ६-६, ७-७, ८-८... इथपर्यंत स्कोअरबोर्ड बघायची सवय असते... पण बोर्ड ११-११ दाखवायला लागल्यावर... हुश्श... आता इतकी फाईट दिल्यानंतर रॉडिक जिंकायला हवा, असं वाटायला लागलेलं मनाच्या कुठल्यातरी कोप-यात! दोघंही हटत नव्हते. एकमेकांवर भरपूर ACE (बिनतोड) सर्व्हिसेसचा पाऊस पाडणं सुरू होतं. स्कोअर १४-१४ झाला तेव्हा "ज्याचा स्टॅमिना जास्त टिकेल तो जिंकणार किंवा जो पहिली चूक करेल तो हारणार", हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ झालं... पहिली चूक रॉडिकनं ३०व्या सेटमध्ये केली आणि तो सामना हरला... पण रॉडिकनं फेडररला जी फाईट दिली ती पाहिल्यावर "थ्री चिअर्स फॉर फेडी-रॉडी...." असंही म्हणायलाच हवं...
अतिशय रंगतदार झालेल्या या सामन्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा सामना जिंकून फेडरर वर्ल्ड रेकॉर्ड करणार होता.... तो ज्याचा रेकॉर्ड मोडायला निघालेला तो पीट सॅम्प्रस कोट-बिट घालून सेंटर कोर्टवर हजर होता आणि सगळ्यावर कळस म्हणजे तब्बल ३० गेम्स खेळाले गेलेला पाचवा सेट... सगळंच आनंद देणारं... सुनील गावस्कर म्हणाला होता की, "आपला रेकॉर्ड मोडणारा सचिनसारखा टॅलेंटेड खेळाडू असेल, तर रेकॉर्ड मोडला गेल्याचं दुःख आसपासही फिरकत नाही..." सॅम्प्रसची भावना नेमकी हिच झाली असेल...
शेवटी या खेळात कोण जिंकतंय, याला फारसं महत्त्व नव्हतंच... फेडरर जिंकला असता तरी त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड झाल्याचा आनंद आणि रॉडिक जिंकला असता तरी त्यानं जगातल्या अव्वल खेळाडूला दिलेली फाईट सार्थकी लागल्याचा आनंद... एकूणच ५ जुलैचा विम्बल्डनमधला सगळा सामनाच अवर्णनीय आनंद देऊन गेला, हेच खरं... बाकी सगळं झूट....!

3 comments:

Unknown said...

Andy Roddick is not German. He is American. Thats why he apologised to Pete for not being able to stop Roger from breaking his record.

रोहन... said...

मैच सुरु झाली तेंव्हा कामावर होतो ... बातम्या मिळत होत्या आणि मी ऑनलाइन सुद्धा स्कोर बघत होतो... पण पाचवा सेट ८ गेम वर पोचल्यावर मात्र मी काम टाकले हातातले आणि मैच बघायला पळालो... :D
विम्बल्डनमधला अंतिम सामना अवर्णनीय आनंद देऊन गेला, हेच खरं ... :)

mala-watala-te said...

Thanks Anubhav... My mistake or u can say mis-conseption... The correction is made in post. Thanks.