Thursday, 23 July 2009

अमेरिकेची मग्रुरी आणि बोटचेपं सरकार....

अमेरिकेच्या कॉण्टिनेन्टल एअरलाईन्सच्या कर्मचा-यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या खास 'अमेरिकन मग्रुरी'चं प्रदर्शन घडवलं... भारतातलं सगळ्या आदरणीय व्यक्तिमत्व असं ज्यांना आपण म्हणू शकतो अशा डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची एखाद्या सर्वसामान्य प्रवाशासारखी तपासणी केली. हे करताना कंपनीनं भारतीयांचा अपमान तर केलाच पण सगळे प्रोटोकॉल्स खुंटीला टांगून एका माजी राष्ट्रपतींना आमच्या लेखी किंमत नाही, हे दाखवून दिलंय. हा प्रकार जितका लाजीरवाणा तितकाच आपल्या सरकारच्या 'म्याऊं....'पणाचं प्रदर्शन घडवणारा आहे. (माफ करा... पण 'म्याऊं'पणाला पर्यायी शब्द सुचत नाहीये....! म्हणजे दिल्लीच्या गल्लीत शेर... पण बाहेरच्यांसमोर मांजर... असं आहे.)
कॉण्टिनेन्टल एअरवेज ही अमेरिकन कंपनी... 9/11चा हल्ला झाल्यानंतर या देशाला अतिरेक्यांचा धोका आणि सुरक्षेचं महत्त्व समजलं. त्याआधी कितीतरी वर्ष भारतात पाक-पुरस्कृत अतिरेकी तांडव घालतायत... पण पाकिस्तानला सतत पाठीशी घालणा-या अंकल सॅमला ते कधी दिसलं नाही. 9/11नंतर मात्र त्यांच्यातला 'ग्लोबल पोलिस' अचानक जागा झाला आणि जगात सगळीकडे त्यांनी आपला 'पोलिसी खाक्या' दाखवायला सुरूवात केली... इराक, अफगाणिस्तानावर युद्ध लादलं... पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द प्रांतात सैन्य घुसवलं...
याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की अमेरिका आणि अमेरिकन नागरिक स्वतःला सगळ्यात असुक्षित समजतात... ही एक प्रकारची विकृती आहे. सगळं जग आपल्याला नेस्तनाबूत करायला टपलेलं आहे, असंच कायम त्यांना वाटत असतं. या विकृतीला 9/11च्या हल्ल्यांनी प्रचंड खतपाणी घातलं आणि त्यातूनच ताकदीच्या जोरावर जगाला नाचवायला अमेरिकेनं सुरुवात केली. डॉ. कलाम यांची तपासणी करणारे कॉण्टिनेन्टल अधिकारीही याच विकृतीचे बळी आहेत. अन्यथा एक माजी राष्ट्रपती... जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ असलेले कलाम 'अतिरेकी'ही असू शकतात... त्यांची नखशिखांत तपासणी केलीच पाहिजे... असं या अधिका-यांना वाटायचा संभव नाही... ही विकृती इतकी विकोपाला गेल्ये की, याची बोंबाबोंब झाल्यानंतर कंपनीनं 'हा रुटीन चेकअप आहे... त्यात वाईट वाण्यासारखं काही नाही...' असा शहाजोगपणा दाखवला. शेवटी प्रकरण फारच पेटणार असं लक्षात आल्यावर डॉ. कलाम यांना माफीपत्र पाठवल्याचं सांगून वेळ मारून नेली. पण डॉ. कलाम यांनी आपल्याला असं कुठलंही पत्र मिळालं नसल्याचं स्पष्ट करून कंपनीची लक्तरं काढली... आता चेंडू पुन्हा कंपनीच्या कोर्टात आहे...
पण माझ्या मते खरंतर हे प्रकरण फार वाढवू नये... मुळात अमेरिकन सरकार आणि अमेरिकन कंपन्या यांची मानसिकताच बदलण्याची गरज आहे. 'ईस्ट इंडिया कंपनी'ची वागणूक आणि या अमेरिकन कंपन्यांच्या वागणूकीत कमालीचं साम्य आहे. "डॉग्ज अँड इंडियन्स नॉट अलाऊड...." अशा पाट्या स्वातंत्र्यापूर्वी लावल्या जायच्या... हे थोडं सौम्य झालं असलं तरी एकूण भावना तीच आहे... मानसिकता तिच आहे...
जॉर्ज फर्नांडिस संरक्षणमंत्री असताना अधिकृत दौ-यावर अमेरिकेत गेले होते. तिथंही त्यांची अशीच (किंबहुना अधिक मानहानीकारक) तपासणी अमेरिकेच्या अधिका-यांनी केली होती. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन नुकत्याच भारतात येऊन गेल्या. जर त्यांना इथल्या यंत्रणांनी अशीच वागणूक दिली असती, तर अमेरिकेनं ते प्रकरण इतकंच लाईटली घेतलं असतं का? पाचवीतला मुलगाही सांगेल की, अमेरिकेनं असं काही झालं असतं तर आंतरराष्ट्रीय बोंबाबोंब केली असती. भारत सरकारनं मात्र कॉण्टिनेन्टलला 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यापलिकडे काहीच केलेलं नाही. त्यामुळेच 'अमेरिकेनं डॉ. कलाम आणि भारतीयांची जाहीर माफी मागावी,' ही फर्नांडिस यांनी केलेली मागणी अतिशय रास्त आहे. अमेरिकेच्या मग्रुरीला कोणीतरी चाप लावायलाच हवाय... आणि ते काम सध्या भारत आणि चीन सोडून कोणीच करू शकत नाही, याचीही मला वैयक्तिकरित्या खात्री आहे.... पण त्यासाठी बोटचेपं धोरण सोडून सरकारनं आपला कणा ताठ करण्याची गरज आहे....

No comments: