Tuesday 21 July 2009

एक पत्र मनातलं...

अप्रिय आणि घृणास्पद असलेल्या,
मोहम्मद अजमल आमीर कसाब....
ब-याच दिवसांपासून तुला पत्र लिहावं, असं मनात होतं. पण मुहूर्त मिळत नव्हता... (तुला मुहूर्त समजणार नाही... 'अच्छा वक्त' आला नव्हता असं समज...!) पण काल तू चक्क अचानक तुझा गुन्हा कबुल केलास आणि मग ठरवलं की ही चांगली संधी आहे, पत्र लिहायची.... मग आळस झटकून पत्र लिहायला बसलोय...
कसाब, अरे तू पहिल्यांदा आमच्या देशात आणि त्यापेक्षाही आमच्या मुंबईत आलास, तो चोरून. म्हणजे पासपोर्ट-बिसपोर्ट काही न घेता... मुळात तू आलास तेव्हा शुद्धीत होतास की नाही, अशी शंका येते. कारण जरी तू शस्त्रसज्ज होऊन आला असशील आणि तथाकथित 'जिहादी' असशील आणि इथून जिवंत परत जाणं शक्य नाही हे तुला माहित असेल, तरी तू मूर्खपणा केलास. याचा अर्थ तू आमचं सैन्यदल, आमचे पोलिस आणि आम्ही सगळे.... 'किस झाड की पत्ती...' आहेत, असं मानत असला पाहिजेस. किंवा पाकिस्तानात ताठ मानेनं फिरणा-या तुझ्या गुरूंनी तुझ्या मनात तसं भरवलं असेल... तुला म्हणे त्यांनी सांगितलेलं की हल्ला करा... माणसं मारा... मग परत या! तू ते खरं मानलं असशील तर तू खरोखर मूर्खांच्या नंदनवनातून आला असला पाहिजेस... एका अर्थी ते खरंही आहे. कारण तुला असं सांगणारे गुरूही मुर्खांच्या नंदनवनाचे केअरटेकर म्हणायला पाहिजेत... म्हणजे एक तर त्यांना खरंच वाटत असेल की तुला आणि तुझ्या ९ मित्रांना परत बोलावता येईल किंवा तुम्ही सगळे मारले जाल आणि मग आपली सगळी काळी कृत्य कायमची झाकली जातील, असं वाटत असेल! तुम्ही हल्ला केल्यानंतर दोन तासात तुला बेड्या ठोकून मुंबई पोलिसांनी हा मूर्खपणा असल्याचं सिद्ध केलंच आहे...
ते असो... तर तू पकडला गेलास आणि तुझ्यावर रितसर खटला सुरू झाला... पहिल्या दिवशी तू 'नॉट गिल्टी' किंवा 'कबुल नही...' असं सांगून आम्हाला बुचकळ्यात टाकलंस... म्हणजे आम्हाला हे समजेना की ज्या माणसाचा मशीनगन चालवतानाचा स्पष्ट फोटो जगभरातल्या मिडियानं छापला, तो माणूस म्हणतो की मी काहीच केलेलं नाही... 'असं कसं होऊ शकतं' असा प्रश्न आमच्या भोळ्या मनाला पडला होता. त्यानंतर ही केस सुरू झाली. मिडियातून उज्ज्वल निकम यांनी एका सूरात दिलेली रोजच्या खटल्याची माहिती पुन्हा एकदा ऐकायला येऊ लागली. (यापूर्वी तुझ्याच पूर्वजांनी १२ मार्च १९९२ला घडवलेल्या स्फोटांच्या केसवेळी निकम रोज झळकायचे...) रोज तुझ्याबद्दल नवनव्या गोष्टी कळत होत्या. तू म्हणे तुला जिवंत पकडताना शहीद झालेल्या तुकाराम ओंबाळेंचं नाव ऐकलं की हासतोस कोर्टात... (तुला सांगतो हे वाचलं त्या क्षणी तुझ्या तोंडावर थुंकण्याची तीव्र इच्छा झाली होती.) मधेच काहीतरी कुराण वाचायचं फॅड काढलेलंस... किंवा मध्येच आपल्याला मराठी येऊ लागल्याचं सांगून कोर्टाला बुचकळ्यात पाडलेलंस.... हे असले बालिश चाळे करताना अचानक गुन्हा कबुल करायची बुद्धी तुला अल्लाहनं कशी दिली...?
खरं सांगू का कसाब... तु गुन्हा कबुल कर किंवा करू नको... आम्हाला काही फरक पडत नाही. तु तो कबुल केला नसतास तर आम्ही तो सिद्ध करत आणलाच होता. त्यामुळे तु कबुली देऊन फार महान काम केलयंस, असं मानू नकोस! तुझ्या कबुलीजबाबाशी आम्हाला काही देणंघेणं नाही... तुला फासावर लटकलेला पहायची इच्छा आम्ही कधीपासून बाळगून आहोत. आता तू गुन्हा कबुल केलास म्हंटल्यावर तथाकथित मानवाधिकार आंदोलनवाले गळा काढतील की, आता कबुल केल्यावर फाशी कशाला... किंवा तिकडे पाकिस्तानातले तुझे भाऊबंद हा धागा पकडून आंतरराष्ट्रीय गोंगाट करतील.... पण आता हे मानवाधिकारवाले आणि तुझे देशवासी यांच्या म्हणण्याला आमच्या लेखी काही किम्मत नसेल... तुला फासावर लटकलेला बघावं किंवा किमान तशी बातमी ऐकवी-वाचावी अशी आमची तीव्र इच्छा आहे आणि ती पूर्ण होणार आहे.

तुमचा हा हल्ला पूर्णपणे फसलाय... भले तुम्ही आमची बरीच माणसं मारली असाल... आमच्या मुंबईतल्या तीन इमारतींचा ताबा भले तीन दिवस स्वतःकडे ठेवला असाल... असं करून तुम्हाला वाटलं असेल की 'लढाई जिंकलो' तर तो बावळटपणाच म्हणायला हवा... कारण शेवटी 'युद्ध' आम्हीच जिंकलोय... तुझ्या ९ साथीदारांना 'जहन्नुम'मध्ये आणि तुला गजाआड पाठवून... (तुम्हाला वाटलं असेल की अशा हल्ल्यात मेलो तर 'जन्नत'मध्ये जाल म्हणून... पण निरपराध आणि निःशस्त्र बेसावध लोकांना ठार करण्याचा 'पुरूषार्थ' केल्यावर अल्लाह स्वर्गात पाठवणं शक्य नाही तुम्हाला... तुझे साथीदार नक्की नरकात गेले असतील...) आणि असे हल्ले करून आमचा देश तुटेल, हे तुमचं स्वप्नही नेहमीप्रमाणे मातीमोल ठरलंय... उलट या तुमच्या हल्ल्यानं आमचा देश कधी नव्हे इतका जवळ आलाय... देशातले सगळे... हिंदू-मुस्लिम-शिख-ख्रिश्चन-ज्यू-बौद्ध सगळे, सगळे एक झालेत.... तुझ्यासारख्या नराधमाला फासावरच लटकवायला हवं, याबद्दल कोणाचही दुमत असायचं कारण नाही...! असणारच नाही....!! नाहीच आहे!!!

त्यामुळे आता गुन्हा कबुल केलाच आहेस, तर लवकरात लवकर 'जहन्नुम'मध्ये जायला सिद्ध हो... (आता तुझ्या भाईबंदांनी आमची विमानं पळवली, तरी तुला सोडणार नाही...!) आणि जमलं तर केलेल्या पापांबद्दल अल्लाहची माफी माग... पण तुझा अपराध इतका मोठा आहे, की अल्लादेखील तुला क्षमा करणार नाही... बाकी आता इथंच थांबतो...
जय हिंद...
कधीच तुझे नसलेले...,
भारतीय नागरिक

3 comments:

mugdha said...

to phasavar chadhanar ki nahi ha hi ek prashnach aahe naahi ka?

mala-watala-te said...

खरं आहे मुग्धाजी तुमचं... मी कायद्यातला तज्ज्ञ नसलो तरी किमान कोर्टात त्याला फाशी व्हायलाच हवी, असं सामान्यज्ञान सांगतंय... अर्थात अफजल गुरूसारखीच त्याची फाशीही आपलं दरिद्री सरकार रखडवून ठेऊ शकतं, हे ही तितकंच खरं आहे. कारण अफजल गुरूच्या फाशीवर सुप्रिंम कोर्टानंही शिक्का मारलाय दोन-तीन वर्षांपूर्वी... पण त्याला अजूनही लटकवलेलं नाहिये अजून... कारण पुन्हा तेच... राजकारणी आणि स्युडो-मानवाधिकारी....

ashishchandorkar said...

वास्तविक पाहता तुकाराम ओंबाळे यांच्याबद्दल मला जास्त जिव्हाळा किंवा आपुलकी आहे. कामटे, करकरे आणि साळस्कर यांच्या बलिदानाशी मला कोणतीही तुलना करायची नाही. पण जर करायची झालीच तर तुकाराम ओंबाळे यांचं बलिदान काकणभर का होईना पण जास्त सरस आहे, असं मला वाटतं.

जगात असं प्रथमच घडलं की दहशतवाद माजविणारे आंतरराष्ट्रीय अतिरेकी पकडला गेला. हे सारं घडलं ते तुकाराम ओंबाळे यांच्यामुळंच. स्वतःच्या अंगावर चाळीसहून अधिक गोळ्या झेलणा-या तुकाराम यांना खरं तर भारतरत्न पुरस्कार देऊनच गौरविलं पाहिजे. पण भारतीय राजकारणी आणि प्रशासन तितकं उदार नाही.

पण कसाबच्या उद्दाम, छद्मी आणि निर्लज्जतेचा मलाही राग येतो. वास्तविक पाहता त्याला फाशी देऊच नये. छत्रपती संभाजी महाराजांना जसं हाल हाल करुन औरंगजेबानं मारलं तसं या नराधमाला मारलं पाहिजे. (वास्तविक पाहता आणखी वाईट शब्दात लिहायचं होतं. पण लिहिता येणार नाही.)