Tuesday, 7 July 2009

भारलेले दिवस...

आपल्याला कोणीतरी भारून टाकतं आणि मग आपण त्या कोणालातरी हवं तसं वागतो... असे दिवस होते विद्यार्थी परिषदेतले... पण या भारून टाकण्याला कुठेही "नकारात्मक"तेचा स्पर्शही नव्हता. केवळ देशासाठी काहीतरी करण्यासाठी उद्युक्त करणारं हे 'भारणं' होतं... या कसोटीवर किती उतरलो माहित नाही... खरंतर नाहीच उतरलेलो! पण मी देशाला जाऊ दे, विद्यार्थी परिषदेला काय दिलं, हे सांगण्याची माझी योग्यता नाही, हे मला माहित्ये. म्हणूनच विद्यार्थी परिषदेनं मला काय दिलं, हे सांगण्याचा प्रयत्न करतोय विद्यार्थी परिषदेच्या स्थापनादिनानिमित्त.... अखिल भारतीय विद्यार्थी परिषद... कॉलेजमध्ये असताना भारून टाकलेलं एक नाव. खरंतर मी परिषदेच्या संपर्कात आलो शाळेत असल्यापासून. बदलापूरात माझ्या आजीच्या घरासमोरच परिषदेचं कार्यालय. मी पाचवीपासून आजीकडेच शिकायला असल्यानं तेव्हापासूनच कार्यालयात जाणं-येणं... कॉलेजमध्ये गेल्यावर प्रत्यक्षात परिषदेच्या "कामा"त कधी आलो, मलाही समजलं नाही. पण सहली, शिबिरं हे म्हणजेच विद्यार्थी परिषदेचं काम असं वाटायचं. त्यानंतर परिषदेच्या कामाचे एक-एक पैलू हळूहळू समजत गेले. कॉलेजात असताना गोव्याचे कुमार वझे बदलापूर भागात पूर्णवेळ आले होते. ही संकल्पना तेव्हाच समजली आणि पहिलंच 'कडक' उदाहरण डोळ्यासमोर दिसलं ते कुमार वासूदेव वझे, नागेशी, बांदिवडे, फोंडा, गोवा... त्यानंतर घरातून शिव्या पडत असतानाही वेळोवेळी वेगवेगळे कार्यक्रम-आंदोलनं-मोर्चे इत्यादी सुरू झालं. दहावीनंतर सायन्सला गेल्यानं आभ्यास करण्याचा घरचा आणि स्वतःचा मानसिक दबाव होताच. पण परिषदेनं "भारलं" होतं ना? मग काय... १२वीत असतानाही 'फी वाढ विरोधी' निदर्शनं करण्यासाठी मंत्रालयावर गेलो होतो. (घरी माहित नव्हतं अर्थातच... आल्यावर कळलं मी कुठे होतो ते. त्या वेळी २ तास पोलिस स्टेशनला बसवलं होतं, हे अजून सांगितलेलं नाही... आत्ता कळेल कदाचित!) थर्ड इयरला असताना बदलापूर शाखेची जबाबदारी होती. (खरंतर कागदोपत्री नव्हती, कारण पुन्हा थर्ड इयर... पण सक्रीय होतोच...) त्यानंतर जर्मालिझमच्या डिप्लोमाला गेलो, ते परिषदेला वेळ मिळावा म्हणून. (थॅक्स टू एबीव्हीपी... नाहीतर आत्ता कुठेतरी कारकुनी करत असतो... नाहीतर परिक्षानळ्या फिरवत बसलो असतो... नाहीतर औषधं विकत असतो....) त्या वेळी बदलापूर भागाची जबाबदारी होती. (बदलापूर ते कर्जत) त्याच्या पुढलं वर्ष माझ्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं होतं.
विद्यार्थी परिषदेचं सुवर्ण महोत्सवी वर्ष... त्यामुळे राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर विस्तारक काढायचे, असं ठरलं होतं. त्यात माझाही नंबर लागला. (म्हणजे माझी इच्छा होतीच...) मी जव्हारला गेलो आणि तीन तालुक्यांची जबाबदारी माझ्याकडे होती. जव्हार, वाडा आणि मोखाडा.... तीन्ही वनवासी तालुके. खरंतर आता मागे वळून बघताना वाटतंय की, तेव्हा आपण तिथं खूप चांगलं काम करू शकलो असतो. पण काहीच केलं नाही... असो!
या काळात मनानं खूप जवळ आलेली आणखी एक व्यक्ती म्हणजे नितीन (त्याच्या स्टाईलमध्ये नि३) नागनाथअप्पा तोंडारे... लातूरहून आलेला. आधी बदलापूर भाग संघटनमंत्री... त्यानंतर कल्याण आणि बदलापूर भाग संघटनमंत्री... त्यानंतर ठाणे जिल्हा संघटनमंत्री... त्यानंतर ठाणे विभाग संघटनमंत्री असा कायम चढणीचा प्रवास... आदर्श संघटनमंत्री कसा असावा, त्याचं उदाहरण. सगळ्यांशी कायम गोड बोलणं... आणि अक्षर त्याहून गोड... वर्षभर काम(?) केल्यावर पुन्हा घरी आलो... नोकरीला लागलो... आता स्थिरावलोही आहे. पण या पाच-सहा वर्षांमध्ये परिषदेनं पाठीला बांधलेली शिदोरी अजूनही पुरते...
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शिकलो ती म्हणजे माणसं जोडण्याची कला... त्याही आधी माणसं वाचण्याची कला... माणसं वाचता आली की जोडायची की टॅण्जंट मारून सोडून द्यायची, हे मुद्दाम न करता आपोआप ठरतं, विद्यार्थी परिषदेच्या "माणसांचं काम" असलेल्या संस्कारांची देणगी. दुसरी आणखी एक तितकीच महत्त्वाची गोष्ट शिकलो ती म्हणजे "ADJUSTMENT." अर्थात ती देखील पॉझिटीव्ह अर्थानंच. चार प्रकारचे चार लोकं एकत्र आले की प्रत्येकालाच थोडंफार सांभाळून घ्यावं लागतं, याचा प्रॅक्टिकल धडा विद्यार्थी परिषदेनं दिला... परिषदेनं दिलेली आणखी एक गोष्ट म्हणजे व्हिजन... तिचा दृष्य उपयोग होतं नाही, हे मान्य. पण कोणतंही काम करताना ती मनाच्या एका कोप-यात बसून लक्ष ठेऊन असते, किंवा एका अर्थानं सुपरवायझिंग करते, हे देखील तितकंच खरं...
खरंतर ही यादी न संपणारी आहे. परिषदेनं इतक्या गोष्टी अजाणतेपणी दिल्यात की आपलं आपल्यालाही लक्षात येत नाही, की आपण एखादी गोष्ट करतोय ती परिषदेची देणगी आहे असं... इतकी परिषद रक्तात आहे.
आता परिषदेपासून थोडा लांब गेलोय. सगळ्या जुन्या कार्यकर्त्यांचं जे झालं, तेच माझंही झालंय. कधीकधी काही गोष्टी पटत नाहीत... काहीतरी चुकतंय असं वाटतं... पण लक्षात येतं की ही चूक परिषदेची नाही, तर परिषदेकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टीकोनाची आहे. परिषदेची धोरणं आपल्याला एकेकाळी पटली होतीच ना... त्यासाठी आपण ७ सप्टेंबरच्या सव्वा लाखांच्या मोर्चात हातात "ज्ञान, शील, एकते"ची पताका घेऊन गेलो होतोच ना? मग आता काय झालंय... नक्कीच दृष्टीकोन बदलला किंवा आपल्याला शिंगं फुटली... पण त्याला इलाज नाही... शेवटी आता मी ही "जुना कार्यकर्ता"च झालोय... पण जुना असलो तरी आयुष्यभर "परिषदेचा कार्यकर्ता" राहीन आणि मला त्याचा अभिमान असेल याची खात्री आहे. शेवटी एकदा ब-याच वर्षांनी...
"झिंदाबाद... झिंदाबाद... विद्यार्थी परिषद झिंदाबाद!"
"long live... long live... ABVP long live..."

1 comment:

ashishchandorkar said...

अभाविप ही इतर विद्यार्थी संघटनांपेक्षा खूप वेगळी आहे, ही माझी खूप आधीपासूनच धारणा होती आणि अजूनही आहे. अॅडमिशन्सची मलई खाणाऱ्या आणि प्राध्यापक किंवा प्राचार्यांच्या केबिनमध्ये घुसून तोडफोड करणं, त्यांना काळं फासणं इत्यादी गोष्टींपुरतंच विद्यार्थी संघटनांचं काम सिमीत असतं. पण अभाविप त्यापैकी नाही, हे मला मनोमन पटलेलं आहे.

वास्तविक पाहता संघाचं काम करत असतानाही अभाविपशी फारसा संबंध आला नाही. (येऊ दिला नाही, असं मी म्हटलेलं नाही, गैरसमज नको) पण अभाविपचं भागेश्वर हे पुण्यातलं कार्यालय माझ्या शाखेच्या परिसरात असल्यानं या ना त्या निमित्तानं अभाविपचे कार्यकर्ते, पूर्णवेळ कार्यकर्ते, अधिकारी यांच्या गाठीभेटी व्हायच्या. कॉलेजमध्ये असतानाही अभाविपची सदस्य नोंदणी किंवा इतर किरकोळ अभियानांमध्ये मी सहभागी झालो होतो. पण त्यामध्ये झोकून दिलं नव्हतं. कॉलेजमधले आणि इतरही अनेक मित्र अभाविपचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यामुळं कार्यपद्धतीची माहिती होती.

पत्रकारितेचा अभ्यास करताना मुंबईत मटामध्ये इंटर्नशिप करण्यासाठी आलो होतो. तेव्हा माटुंगा रोडच्या परिषदेच्या मार्बल आर्च या कार्यालयात जवळपास दीड महिना डेरा टाकला होता. शरद चव्हाण हे तेव्हाचे कार्यालय मंत्री होते आणि त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं होतं. तेव्हा अभाविपची अधिक जवळून ओळख झाली.

अभाविपचा एक वेगळी विद्यार्थी संघटना म्हणून माझ्यावर प्रभाव पडला तो साधारण १९९० नंतर. तेव्हा अभाविपच्या काही कार्यकर्त्यांनी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकाविण्याची प्रतिज्ञा केली होती. सरकारनं त्याला परवानगी नाकारली होती. तरी काही कार्यकर्त्यांनी तो फडकाविण्याचा प्रयत्न केला होता.

थोडक्यात म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक आणि समाजाच्या इतर क्षेत्रांमध्ये काम करणारी चांगली विद्यार्थी संघटना अशी परिषदेची ओळख आहे. कदाचित ती अजूनही कायम आहे आणि यापुढेही कायम राहिल. कारण एखाद्या ध्येयासाठी किंवा संघटनेसाठी आयुष्यातली बहुमोल वर्ष देण्याची तयारी असलेले कार्यकर्ते जोपर्यंत निघत आहेत, तोपर्यंत ही ओळख पुसली जाणार नाही. ही ओळख अशीच रहावी आणि पुसली जाऊ नये, असं मलाही मनोमन वाटतं आहे. त्यामुळंच मलाही वाटतं... झिंदाबाद झिंदाबाद... अभाविप झिंदाबाद...