Saturday, 25 July 2009

वेल डन... 'TV9'

शुक्रवारी रात्री 'टी.व्ही.९' या वाहिनीनं थोडासा गोंधळ केला... खरंतर हा गोंधळ कोणा राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय वाहिनीनं केला असता तर तो मोठा ठरला असता. पण टीव्ही९ ही तूलनेनं नवी आणि स्थानिक स्वरुप असलेली वाहिनी असल्यानं फारसा गाजावाजा झाला नसावा... पण या वाहिनीनं खरोखर एक ब्रेकिंग न्यूज दिली ती म्हणजे मोहम्मद अजमल कसाबची सगळ्यात पहिली उलटतपासणी टीव्हीवर दाखवली...
आजवर झालेल्या सगळ्यात मोठ्या हल्ल्यात पकडला गेलेला एकमेव अतिरेकी... कदाचित अशा फिदायीन हल्ल्यात जिवंत पकडला जाण्याची जगातली बहुदा पहिलीच केस... अशा या कसाबची पकडला गेल्या-गेल्या पोलिसांनी घेतलेली उलटतपासणी या वाहिनीनं दाखवली... इथं पुन्हा पुरातन वाद उत्पन्न होऊ शकतो, की पत्रकारितेच्या सुचितेत हे बसतं का? एका जागतिक आरोपीची उलटतपासणी अशी चव्हाट्यावर(?) मांडणं कितपत योग्य आहे... इत्यादी... (तहल्काच्या वेळी असाच वाद झाला होता...) पोलिसांनी ही टेप मिडियाकडे देणं बरोबर आहे का...?
माझ्या मते यात असलीच तर पोलिसांमधल्या कोणाचीतरी चुक आहे. एकदा टेप हातात पडली की ती एखाद्या चॅनलनं दाखवली म्हणून आरडोओरडा करण्यात काही अर्थ नाही. कारण स्पर्धेच्या काळात अशा गोष्टी हातात लागल्या तर त्या सोडून देणं मूर्खपणाचंच ठरेल... टीव्ही९ची चुक एकच झाली... ती म्हणजे इतकी मोठी स्फोटक गोष्ट हाती लागल्यानंतर त्याची पुरेशी जाहिरात न करता त्यांनी ही बातमी एअर केली... त्यांनी कदाचित जाहिरात केलीही असेल, पण ती पुरेशी पडली नाही. कारण ब-याच जणांना दुस-या-तिस-या दिवशी याबद्दल विचारल्यावर समजलं, की त्यांना हा विषयच माहित नव्हता... याचा अर्थ टीव्ही९ योग्य जाहिरात करण्यात कमी पडली, असं म्हणायला हवं.
आता थोडंसं या फुटेजविषयी... यात कसाब हा किती मुरलेला गुन्हेगार आहे, हे स्पष्ट दिसत होतं. चौकशीला सामोरं जाण्याचं व्यवस्थित ट्रेनिंग त्याला देण्यात आलं होतं. जखमी अवस्थेत पोलिसांच्या ताब्यात असतानाही तो अतीशय शांतपणे उत्तरं देत होता. यात त्यानं आपण पाकिस्तानातून आल्याचंच स्पष्ट म्हंटलंय. आपल्याला ट्रेनिंग कसं दिलं गेलं... एक कोणीतरी 'आका' त्याला कसा भेटत होता. तो कसा रहात होता... कसा वागत होता... आपण भारतात कसे आलो... बोट कशी बदलली... सगळं-सगळं त्यानं सांगितलंय.
आता प्रश्न हा येतो, की जी टेप मिडियाला मिळू शकते, ती टेप भारत सरकारनं पुरावा म्हणून पाकिस्तानला दिली नाही, हे कसं मानता येईल. ती दिली नसेल, तर यात दिल्लीतल्या कोणीतरी 'बाबूगिरी' केली असावी आणि दिली असेल तर हा पुरावा नाकारण्यासारखा आजिबात नाही. भारतानं दिलेले पुरावे मराठीत असल्यानं भाषा कळत नसल्याची बोंब पाकिस्ताननं मारली होती. या टेपमधली कसाबची उत्तरं 'इन्शाल्ला' ऊर्दूत आहेत. मग यात भाषा कळायचा प्रश्न कुठे येतो?
एकतर विरोधी पक्षांचा मिडिया सेल झोपलेला असावा किंवा त्यांना टीव्ही९नं दिलेल्या या बातमीचा अर्थ कळला नसावा. 'ही टेप पाकिस्तानला दिली गेली नाहिये का?' असं देशप्रेमाची जाहिरात करणा-या या विरोधी पक्षांनी सरकारला खडसावून विचारायला हवं... पण गेल्या दोन दिवसांत तशी काही हाचचाल झालेली नाही... झाली असेलच तर दिसलेली नाही...
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून 'टीव्ही९'नं त्यांचं काम चोख बजावलंय... एक पत्रकार या नात्यानं त्यांचं अभिनंदन करायला हवं... आता यातून उपस्थित होणा-या प्रश्नांची उत्तरं सरकारकडे मागणं विरोधी पक्षांचं काम आहे. ते हे काम कधी करणार हा प्रश्न आहे.

3 comments:

Kanchan Karai said...

टेप भारत सरकारनं पुरावा म्हणून पाकिस्तानला देणं ही अंतिम गोष्ट झाली. कसाबची जबानी हा २६/११ घटनेचा एक भाग झाला पण कितीतरी आक्षेपार्ह गोष्टी ह्या हल्ल्याआधी, हल्ल्यादरम्यान आणि नंतर घडल्या आहेत. त्या सगळ्याची उत्तरं अजून कुठे मिळाली आहेत?

Mahendra said...

"लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून 'टीव्ही९'नं त्यांचं काम चोख बजावलंय... एक पत्रकार या नात्यानं त्यांचं अभिनंदन करायला हवं."

I dont agree with this. Just in the name of investigative journalism you are well aware that minute to minute information was shown on TV during this attack.
This is ridiculus to congratulate TV9 or any other chanel who can not understand the thin line between country's safety and Breaking news.

mala-watala-te said...

Mr. Mahendra,
I think you are right about min-to-min reporting when attack was going on... It is not fair to show it as terrorists could get hint of our plans by it. (Again, this is a controvercial issue. Mr. Rajiv Khandekar from STAR MAZA wrote an article in LOKSATTA on this issue.) But showing this perticular cliping of Interogation is OK... It has more adventages than disadventages. It shows how Kasab is trained for interogation, how they came in India, from where they came etc. I hardly found some demerit in showing this clip at this juncture. I didn't prised or even didn't mention the reporting on 26-27-28-29 Nov. 2008.