Monday 13 July 2009

घरच्या मैदानात करूण लढत...

ऍशेस... ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन सगळ्यात जुन्या 'मैदान-शत्रुं'ची लढत! १८८२ साली इंग्लंड ऑस्ट्रेलियासोबत घरच्या मैदानात पहिल्यांदाच कसोटी मालिका हारली आणि त्यानंतर 'स्पोर्टींग टाईम्स' या वृत्तपत्रानं बातमी चालवली की, "काल ओव्हलला इंग्लंडच्या क्रिकेटवर अंत्यसंस्कार झाले आणि त्याची राख ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात आलीय..." या खेळाचं माहेरघर असलेल्या इंग्लंडमधल्या क्रिकेटची राख अशा पद्धतीनं कांगारूंना 'अर्पण' केल्यानंतर या दोन संघांमधल्या कसोटी मालिकेच्या चषकाचं नावच या राखेवरून पडलं... ऍशेस...
***************
सध्या पुन्हा एकदा इंग्लंडच्या मातीत हीच ऍशेस मालिका खेळवली जातेय. काल ऑस्ट्रेलियाच्या हातून घास निसटला. पाचव्या दिवसात शेवटच्या ११.३ ओव्हर्स शिल्लक असताना इंग्लंडचे ९ फलंदाज तंबूत परतले होते आणि त्यावेळी इंग्लंडची दोन्ही डावांमधली बेरीज ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डाव्यातल्या रन्सपेक्षा सहानं कमी होती. इंग्लंडच्या शेपटाकडचे फलंदाज जेम्स अँडरसन आणि मॉंटी पनेसर हे दोघं क्रिझवर होते. त्यांनी तब्बल साडेअकरा ओव्हर्स कांगारूंचा मारा सहन केला आणि ऑस्ट्रेलियाच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला. अँडरसननं २१ आणि पनेसरनं ७ धावा केल्या असल्या तरी त्यांच्या धावांपेक्षा त्यांनी खेळून काढलेल्या चेंडूंचा आकडाच अधिक महत्त्वाचा ठरला आणि सामना अनिर्णित राहिला.
***************
आजच्या सगळ्या ऑस्ट्रेलियन वर्तमानपत्रांनी ब्रिटिश कॅप्टन अँड्रू स्ट्रॉस यानं 'रडीचा डाव' खेळल्याची बोंबाबोंब केली. एका अर्थी ते खरंही आहे. प्रत्येक ओव्हरनंतर इंग्लंडचा १२वा खेळाडू काही ना काही निमित्तानं मैदानात येत होता... एकदा त्यांचा फिजियोथेरपिस्ट (कोणाला काही झालेलं नसताना) मैदानात ला आणि परत गेला... यामागे ६.५० वाजेपर्यंत कमीत कमी षटकं टाकली जावीत, असा स्ट्रॉसचा प्रयत्न होता, हे उघड नाही काय? कारण जास्तीत जास्त षटकं टाकता यावीत, यासाठी रिकी पाँटींगनं सगळी षटकं स्पिनर्सकडे सोपवली होती. पाँटिंगनं स्ट्रॉसच्या या प्रयत्नांची खिल्ली उडवली असली तरी त्यात हातून सामना निसटल्याचा कडवटपणा काठोकाठ भरलेला होताच आणि तो असणारच....
***************
एकेकाळी क्रिकेट जगतावर राज्य करणा-या 'क्रिकेट ऑस्ट्रेलिया'नं आपला मुकूट उतरवून ठेवण्याची वेळ आली आहे, हे या निमित्तानं सिद्ध झालं. भले स्ट्रॉसनं वेळकाढूपणा केला असेल, पण सामन्याच्या शेवटच्या साडेअकरा ओव्हर्समध्ये दहावा फलंदाज बाद करता आला नाही, हे कांगारू गोलंदाजांचं अपयश नाही का? भरवश्याच्या ऑस्ट्रेलियन फास्टर्सवर अविश्वास दाखवत जास्तीत जास्त ओव्हर्स पदरात पाडून घेण्याच्या मिशानं पाँटिंगनं अगदी नॉर्थलाही बॉलिंग दिली. हा देखील एका अर्थी रडीचा डावच नाही काय?
***************
भले सामना वाचवल्याच्या आनंदात ब्रिटिश खेळाडू, मिडिया आणि लोक असतील, पण त्यांनी फार हुरळून जाण्यासारखं काय घडलंय, ते समजत नाही. एक तर घरच्या मैदानात सामना वाचवण्यासाठी (जिंकण्यासाठी नव्हे... अनिर्णित ठेवण्यासाठी) इतकी जिवापाड मेहनत करावी लागणं काही चांगलं नाही! अँडरसन आणि पनेसर हे दोघे सोडले तर इंग्लंड संघातलं कोणीही कौतुकाला पात्र नाही. गर्दीनंही शेवटचा प्रत्येक डॉट-बॉलही चिअर केलाच की.... (या दोघांचं कौतुकही शेवटच्या ११.३ षटकांसाठी.... आधी गोलंदाजी करताना त्यांनी लावलेले दिवेच ऑस्ट्रेलियाला साडेसातशेवर घेऊन गेले होते. ) स्ट्रॉसनं खेळलेला तथाकथित 'रडीचा डाव' हा सामना वाचवण्याचा शेवटचा (यशस्वी) प्रयत्न होता. तो त्याच्या जागी कोणीही केला असता. [इतिहास - १९८१ साली झालेला न्युझिलंड-ऑस्ट्रेलिया वन-डे मालिकेतला निर्णयाक सामना आणि न्युझिलंडला सामना टाय करण्यासाठी शेवटच्या चेंडूवर एक सिक्स हवी होती. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ग्रॅग चॅपलनं गोलंदाजी करत असलेला आपला भाऊ ट्रिव्हर याला चक्क अंडरआर्म बॉल टाकायला सांगितला आणि त्यानं तो टाकलाही... हा रडीचा डाव नाही का मिस्टर ऑस्ट्रेलियन मिडिया?] तरीही सामना वाचवल्याबद्दल इंग्लंडचं कौतुक कशाला करायचं. हेच जर ऑस्ट्रेलियाच्या मातीत घडलं असतं तर ठिक होतं... पण होम ग्राऊंडवर इतक्या करूणपणे सामना वाचवणं म्हणजे इंग्लंड 'ऍशेस'मधून अद्याप बाहेर पडलेला नाही, हे खरं...! आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटनंही त्याच ऍशेसमध्ये जाण्याची वेळ जवळ आलीय, हे ही खरं...!! या निमित्तानं कार्डिफच्या स्टेडियममध्ये बसलेल्या १६,००० ब्रिटिश प्रेक्षकांना 'एका करूण सामन्याचा करूण शेवट' बघायला मिळाला...

No comments: