खरं म्हणजे हे सांगण्याची वेळ यायलाच नको... पाणी हे जपूनच वापरलं पाहिजे. पुण्याच्या महापौर म्हणाल्या, "पाऊस लांबला तर प्यायचं पाणी बांधकामांसाठी वापरण्यावर निर्बंध आणावा लागेल..." अरेच्च्या... म्हणजे पुण्यातल्या बांधकामाला अजून पिण्याचं पाणी वापरलं जातं? का? आणि महत्त्वाचं म्हणजे कसं काय? खेड्यापाड्यांमध्ये घरातली बाई पाच-पाच दहा-दहा किलोमीटरवरून दोन हंडे पाणी आणते आणि काटकसर करून ते दिवसभर पुरवते, त्याचं काहीच नाही. आता मुंबईकरांना सल्ला मिळतोय की पाणी जपून वापरा... खरं म्हणजे हे सांगायची वेळच यायला नको. अनेक पर्यावरणवाले गेली अनेक वर्ष घसा कोरडा करून सांगतायत की "गोड्या पाण्याचा साठा संपतोय. पृथ्वीच्या पोटातलं गोडं पाणी संपून जाण्यापूर्वी सावध व्हा... पाणी जपून वापरा..." पण आपल्याकडच्या गाड्यांनाही आंघोळीसाठी नळाचं कार्बनयुक्त पाणीच लागतं... त्याला कोण काय करणार? म्हणजे गावांमध्ये पाणी नाही म्हणून लोकं दोनाच्या जागी १ ग्लासच पाणी पितात आणि इथं मात्र गाड्या धुवायला 'फोर्स'मध्ये स्वच्छ-गोड-नितळ पाणी पाहिजे. 'आत्ममग्न' असण्याचं आणि 'सामाजिक जाणिवा बोथट झाल्याचं' इतकं वाईट उदाहरण जगाच्या पाठीवर कुठे असूच शकत नाही....
पावसानं थोडी हुलकावणी दिल्यावर सगळ्यांनाच जाग येते, पाणी जपून वापरायला पाहिजे... बांधकामाला गोडं पाणी वापरून उपयोग नाही... इत्यादी. मग इतके दिवस ही अक्कल का सुचली नाही. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही, ते असं. पण याचा खरंच उपयोग किती होणार आहे... पाणी जपून वापरलं आणि पाऊस आलाच नाही तर? साठवलेलं पाणी थोडीच वर्षभर पुरणार आहे... (महिनाभरही पुरणार नाही!) मग काय होईल ते देवच जाणे... ते असो... पण पाऊस आलाच, म्हणजे धो... धो... आलाच तर? मग पुन्हा तानसा, अप्पर-लोअर-मिडल असली सगळी वैतरणा, भातसा अशी ठाणे जिल्ह्यातली मुंबईची तहान भागवणारी सगळी धरणं भरणार... मग? मग काय... पाणीच पाणी चहुकडे... असं म्हणत आपण पुन्हा आपल्या गाड्या-बाईक-स्कुटर्स-सायकली नळाच्या पाण्याखाली धरणार... बांधकामांवर सिमेंट पक्कं करण्यासाठी आपण गोडं पाणी वापरणार... फुल्ल नळ सोडून ठेऊन भांडी घासणार... वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुताना चार-चार वेळा पाणी बदलणार... नळ अर्धा सुरू ठेऊन सिनेमाला जाणार... सोसायटीतली पाण्याची टाकी धों-धों वाहात असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणार......
मग पुढल्या वर्षी पुन्हा पाऊस नाही आला की "पाणी जपून वापरा...," पुन्हा आला की "पाणीच पाणी चहूकडे...!"
जाऊ दे, लहानपणी ऐकलेल्या "कापुस कोंड्याच्या गोष्टी"ची ही आधुनिक आवृत्ती आहे. हम नहीं सुधरेंगे, हे आपलं ब्रिदवाक्य झालंय.
2 comments:
your niband is very nice thank you to post this compostion on internet
Great article..
Check mine
http://ronakrshah.blogspot.in
Post a Comment