Thursday 16 July 2009

मुंबई हल्ल्यातल्या मृतांना 'श्रद्धांजली!'

इजिप्तमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांना भेटल्यावर नेहमीचाच कडकपणा दाखवणंही पंतप्रधान मनमोहन सिंगांना आवश्यक वाटलं नसावं... म्हणूनच अतिरेक्यांवरची कारवाई दोन्ही देशांच्या चर्चेआड येऊ द्यायची नाही, यावर गिलानी यांच्या सुरात सूर मिळवत सिंग यांनी 'भारत-पाक भाई भाई'चा राग आळवलाय. 'अतिरेक्यांवर कारवाई दोन्ही देशांच्या चर्चेआड येऊ द्यायची नाही...' याचा अर्थ 'पाकिस्ताननं मुंबई हल्ल्यांतल्या दोषींवर कारवाई नाही केली तरी चालेल.... पुढल्या काळात पाकिस्तानात प्रशिक्षण घेतलेले (त्यांच्याच लष्कराकडून) अतिरेकी भारतात शिरले आणि इथली निरपराध माणसं मारली तरी चालेल.... काश्मीरमध्ये दहशतवाद रोज थैमान घालत असेल तरी चालेल.... भारत आणि पाकिस्तानची चर्चा सुरूच राहील...' असा घ्यायचा का?
विकास आणि गरीबी निर्मुलन हे मुद्दे दहशतवादापेक्षा महत्त्वाचे आहेत की नाही, हा वादाचा विषय असू शकतो. पण पाकिस्तानचा विकास आणि तिथलं गरीबी निर्मुलन हे भारतातल्या दहशतवादापेक्षा महत्त्वाचे विषय नाहीत, हे मान्य करायलाच हवं, नाही का? आता विकास आणि गरीबी हटवण्यासाठी कोणाला कोणाची गरज आहे, याचा थोडा जरी विचार केला, तरी भारतानं या मुद्द्यावर पाऊलच काय, बोटभरही मागे यायची गरज नाही, हे स्पष्ट आहे. उलट पाकिस्तानला विकासासाठी भारताची मदत हवी असेल तर आधी दाऊद, हाफीज सईद यांच्यासह यादीतल्या सगळ्या अतिरेक्यांना भारताच्या हवाली करायला हवं, असं ठणकाऊन सांगितलं पाहिजे. ते राहिलं दूरच... पण 'अरे... हो... हो... हो... तुम्ही नाही केलात अतिरेक्यांचा बंदोबस्त तरी चालेल हं पाकिस्तान.... आपण की नाही विकासाच्या मुद्द्यावर बोलतच करतच राहू हं...' असं लाडिकपणे सांगण्याचा हा प्रकार झाला. मनमोहन सिंगांना याची काय गरज होती?
चर्चा थांबवून अतिरेकी पकडले जात नाहीत, हे देखील खरं... पण उभयपक्षी संपर्क थांबवला की त्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा होते आणि मग अमेरिकेसह सगळेच 'दादा'लोक पाकिस्तानवर दबाव आणू शकतात... ते आणत नाहीत तो भाग निराळा पण किमान तशी शक्यता तरी असते. आता काही झालं तरी चर्चेची गु-हाळं चालूच ठेवायची, असं ठरवल्यावर या देशांवर दबाव टाकण्याचा एकमेव मार्ग आपण बं करून टाकतोय, याचा विचार मनमोहन सिंगांनी केलाच नसेल काय? की आपण कसे सहिष्णू आहोत, हे जगाला दाखवण्याचा हा आणखी एक प्रयत्न समजायचा...
खरंतर ज्याला जी भाषा कळते त्याच भाषेत त्याच्याशी बोलायला हवं... पाकिस्तानला ही सामोपचाराची भाषा म्हणजे भारताचा कमकुवतपणा नाही, तर मोठेपणा आहे, हे समजणार का? का तरीही पाकिस्तानात राजसोस फिरणारे पुन्हा एकदा मुंबईत अतिरेकी पाठवून थैमान घालायला मोकळे आणि आपण मात्र चर्चा करत राहणार विकासाची... पंतप्रधानांनी उचललेलं हे पाऊल म्हणजे मुंबई हल्ल्यातल्या मृतांना वाहिलेली 'आगळी श्रद्धांजली' ठरू नये, इतकंच वाटतंय. मुंबईतल्या निरपराध १६० जणांच्या रक्तात हात माखलेल्या हाफीज सईदसह सगळ्यांना भारतात आणून शिक्षा दिली गेली, तरच ती श्रद्धांजली खरी मानता येईल. पाकिस्तानात नुसतं शिक्षेचं नाटक करून काय उपयोग?

No comments: