कार्यकर्त्यांमुळे साकारतेय "साम राज्य"...
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि भारत... क्रिकेटमध्ये सध्याच्या युगातली ही दादा मंडळी. पण न्यूझीलंडचा संघ या दादा मंडळींमध्ये कधीच मोडला जात नाही. तरीही कायम तो संघ विजेतेपदाच्या स्पर्धेत असतो. चॅंपियन्स करंडक स्पर्धा जिंकण्याची कामगिरीही त्यांनी एकदा करुन दाखवलीय. त्यांच्याकडे सचिन तेंडुलकरसारखा "स्टार प्लेअर' नाही, वॉर्न-मुरलीप्रमाणे फिरकी गोलंदाज नाही, पॉटिंग-कॅलिस सारखे फलंदाज नाही. पण न्यूझीलंडच्या संघाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे अष्टपैलू खेळाडू, त्यांचं क्षेत्ररक्षण, खेळातलं सातत्य आणि संघासाठी प्रत्येकाचं काही ना काही योगदान. हा संघ ऑस्ट्रेलियासारखा जगज्जेता नसेल पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करुनही चालत नाही. असंच काहीसं "साम मराठी' वाहिनीचं आहे. विशेषतः बातम्यांचं!
पण गेल्या वर्षी जेव्हा वाहिनीची सुरवात झाली तेव्हा परिस्थिती अशी नव्हती. "साम जन्मला गं सखी साम जन्मला...' अशा प्रतिक्रियांनी गेल्या वर्षी 15 ऑगस्टच्या आसपास "साम मराठी' या वाहिनीचं स्वागत झालं होतं. अर्थातच, माध्यमातल्या बऱ्याच जणांनी स्वागत करताना नाकं मुरडली होती किंवा त्यांची या बाळाबद्दल फारशी चांगली प्रतिक्रिया नव्हती. "सकाळ'सारख्या ग्रुपकडनं त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या, त्या पूर्ण झाल्या नव्हत्या. ही गोष्ट बरेच जणांनी बोलून दाखविली होती. कारणही तसंच होतं. काहीच महिन्यांपूर्वी म्हणजेच गुढीपाडव्याला "आयबीएन लोकमत' या वृत्तवाहिनीचं आगमन झालं होतं. त्यामुळं सकाळची "साम' आणि "आयबीएन लोकमत' यांच्यात तुलना होणं साहजिकच होतं. अशा परिस्थितीत "साम'वरचे कार्यक्रम आणि इतर घडामोडी यामुळं ""...उचललेस तू मीठ मूठभर, "साम्राज्या'चा खचला पाया...'' असं म्हणण्यापर्यंत लोकांची मजल गेली होती. अर्थातच, सुरवातीच्या काही महिन्यातच!
आमच्याकडे राजदीप सरदेसाई किंवा निखील वागळे यांच्यासारखा चेहरा नसेल, "आयबीएन', "स्टार' किंवा "झी'सारखं नेटवर्क नसेल, "टाइम्स नाऊ' किंवा "नेटवर्क 18' इतक्या "ओबी व्हॅन' नसतील. पण तरीही आमची बातमी चुकत नाही. बातमीचा क्रम चुकलाय असं कधी झालं नाही. सोयी-सुविधांची फारशी रेलचेल नसतानाही आम्हाला कशाचीच उणीव भासली नाही. ना राज ठाकरे यांच्या मराठीच्या आंदोलनावेळी, ना 26 डिसेंबरच्या हल्ल्यावेळी, ना लोकसभा निवडणुकीच्या संपूर्ण टप्प्यात. काठोड्याचं बलात्कार प्रकरण असो किंवा हासेगावच्या एड्सग्रस्त विद्यार्थ्यांची ससेहोलपट साम मराठीनं प्रथम प्रकरणाला वाचा फोडली आणि नंतरही वेगवेगळ्या स्तरावर हे मुद्दे लावून धरले. निरनिराळ्या वृत्तमालिका झाल्या. "सकाळ'च्या संस्कृतीपेक्षा थोडीशी हटके भूमिका घेत "साम'नं कायम आक्रमकपणे बातम्या दिल्या. मग पद्मसिंह पाटील यांच्या अटकेची बातमीही "राष्ट्रवादी'वर आसूड ओढणारी होती. "राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दहाव्या वर्धापनदिनी पद्मसिंह पाटलांच्या हकालपट्टीची पक्षावर नामुष्की...' अशा मथळ्याची बातमी "सकाळ'मध्ये आली असती का? पण हीच हेडलाईन आणि बातमीचा हाच टोन "साम'वर होता. त्यामुळं आम्हीही आता आमचा टक्का निश्चित केला असून तो वाढवत नेण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.
कोणी काहीही म्हणत असलं तरी आता "साम मराठी' बऱ्यापैकी स्थिरावलीय. राज ठाकरे यांचं मराठीच्या मुद्द्यावरचं आंदोलन असो, "एन्ट्री पोल', "मी महाराष्ट्र बोलतोय...' किंवा "लोकसभा ट्वेंटी-20' सारखे निवडणूक विषयक कार्यक्रम असो, "साम'च्या वृत्तविभागानं बऱ्यापैकी मायलेज मिळवलं आहे. अगदी सुरवातीच्या काळात तर राजू परुळेकर यांनी घेतलेल्या "महाराष्ट्र कोणाचा' या कार्यक्रमामुळं "साम'ची बऱ्यापैकी प्रसिद्धी झाली होती. तसंच टोकदार, आक्रमक पण इतर वृत्तवाहिन्यांप्रमाणे उथळपणा न करता बातम्या देण्याचं काम "साम मराठी'चा वृत्तविभाग करतोय. त्यालाही हळूहळू प्रतिसाद मिळतोय. ""तुमच्या बातम्या वेगळ्या असतात. इतरांकडे त्याच त्याच बातम्या दाखवितात. तुमच्याकडे मात्र, तोच तोच पणा येत नाही,'' अशा प्रतिक्रिया प्रेरणादायीच म्हटल्या पाहिजेत. बाकी "टाटा स्काय' किंवा "डिश'वर साम दिसत नाही. ही खंत आहेच. पण हे जेव्हा घडेल तेव्हा "साम'ची घोडदौड खऱ्या अर्थानं सुरु होईल.
"झी 24 तास', "स्टार माझा' आणि "आयबीएन लोकमत' यांच्याकडचं मनुष्यबळ, वार्ताहरांची संख्या, उपलब्ध तंत्रज्ञान, सुविधा आणि हिंदी किंवा इंग्रजी वाहिन्यांकडून मिळणारा "सपोर्ट' या सर्वच गोष्टी लक्षणीय आहेत. म्हणजेच या गोष्टींमध्ये "साम'ची तुलना इतर मराठी वाहिन्यांशी करता येत नाही. पण तरीही "साम'च्या बातम्यांचा स्वतंत्र प्रेक्षक वर्ग तयार झाला आहे. ही गोष्ट वारंवार स्पष्ट झालीय. "आयबीएन' वाहिनी दोन्ही "डीटीएच'वर जाण्यापूर्वी "आयबीएन' वाहिनीपेक्षा "साम'चा "जीआरपी' (ग्रॅंड रेटिंग पॉईंट) प्रत्येक आठवड्याला अधिक असायचा. इतकंच काय तर लोकसभा निवडणुकीच्या दिवशी "एनडीटीव्ही' आणि "साम' वाहिनीच्या प्रेक्षकांची टक्केवारी जवळपास सारखीच होती. "एन्ट्री पोल'च्या प्रश्नमंजुषेच्या उत्तरासाठी रोज जवळपास हजारहून अधिक "एसएमएस' यायचे. थोडक्यातच सांगायचं झालं तर "साम'ची लढाई अस्तित्वासाठी सुरु नसून अधिकाधिक वरच्या क्रमांकावर जाण्यासाठी सुरु आहे. "मी मराठी'च्या बातम्यांशी तुलना करण्याची माझी इच्छा नाही. पण अनेकदा आमच्या बातम्या, आमचा लुक "झी 24 तास'पेक्षाही चांगला असतो. असो.
वैयक्तिकदृष्ट्या विचार करायचा झाला तर "इनपुट हेड' किंवा "प्रोड्युसर' म्हणून काम करताना खूप मजा आली. कामातला आनंद इतका होता की त्याचा कधी कंटाळा आलाच नाही. स्वतंत्र विचार करण्याची आणि त्याची अंमलबजावणी करण्याचं स्वातंत्र्य इथं आहे. त्यामुळं काम करताना मिळणारा आनंद खरोखरच अवर्णनीय आहे. इतरांना हेवा वाटावा, असा मराठी वृत्तवाहिन्यांमधला क्रमांक एकचा "डेस्क' आज "साम मराठी'कडे आहे. अनुभवी आणि धडपड्या रिपोटर्सची "टीम' आमच्याकडे आहे. "बॉसिंग' न करणारे "साहेब' आमच्याकडे आहेत. नवं काहीतरी शिकण्याची जिद्द असणारे "कार्यकर्ते' आमच्याकडे आहेत. त्यामुळंच "डेस्क'चं काम सांभाळून रिपोर्टिंग करणारे, गरज पडली तर पॅनेल प्रोड्युसिंग करणारे "कॉपी एडिटर' किंवा "बीपी' साममध्ये आहेत. एखाद्या "एपिसोड'साठी दोन-दोन दिवस ऑफिसमध्ये तळ ठोकून बसणारी मंडळी आहेत. या सर्वांच्या जोरावर हा "साम'चा गाडा ओढला जातोय. रिपोर्टिंग, कॉपी एडिटिंग, स्पेशल प्रोग्रॅमचं प्लॅनिंग, व्हिडिओ एडिटिंग किंवा "व्हीओ' असं काहीही असलं तरी "कार्यकर्ते' सदैव तयार असतात.
शिवरायांचं स्वराज्य जसं मावळ्यांच्या जोरावर घडलं तसंच हे "साम राज्य' कार्यकर्त्यांच्या जोरावर घडतं आहे. अडचणी आहेत. संकटं येणार आहेत, हे देखील माहिती आहे. पण त्याचबरोबर एक सुंदर "एसएमएस'ही आम्हाला माहिती आहे. तो "एसएमएस' असा...
As we sail through life, don't avoid storms and rough waters. Just let it pass. Sail On and Sail On. Just because calm seas never make skillful sailors...
Wednesday, 19 August 2009
आशिष चांदोरकर यांची ताजी पोस्ट... As it is...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment