काल रात्री बाप्पा स्वप्नात आला...
म्हणाला... काय राव? मला विसरूनच गेलास
मी म्हंटलं त्याला, विसरीन कसा बाप्पा...
रोजच्या कामाच्या रगाड्यात थोडा विस्मृतित गेलास... इतकंच!
पण स्फोट-बिट झाले की आठवतोस तू आम्हाला...
आत्ता नुकताच 'ताप' आल्यावरही लागलेलो तुझं नाव घ्यायला...
तसा मी मुळातच भित्रा आहे रे...
चार ओळखीचे भेटले की बरं वाटतं भाव खायला... इतकंच!
तू आलास घरी की मोदक-बिदक करणार आहे मी...
तू खात नाहीस माहित्ये रे मला... तुझ्या नावानं मी तर खातो...
तुझी आरती म्हणीन मी तेव्हा हुरळून जाऊ नकोस,
ज्याचा सण असेल त्या देवाचीच गाणी आम्ही नेहमी गातो... इतकंच!
दिड दिवस रहा... पाच दिवस रहा किंवा आख्खे दहा दिवस रहा...
पूजा-अर्चा-भजनं करण्याचा माझा वस्तुपाठ आहे...
कारण त्याला माझाही इलाज नाहिये रे...
'देखल्या देवा दंडवत' करण्याचा माझा ठरलेला परिपाठ आहे... इतकंच!
लालबागचा राजा... दगडूशेट हलवाई... आणि
कुठकुठल्या मंडळांमध्ये पाहतो मी तुला... आणि तुझ्यासमोरची लांब रांग...
खरंच यातले भक्त किती आणि लड्डूभक्त किती...
हे तुला तरी कळतं का रे...? पण रिद्धि-सिद्धीची शप्पथ घेऊन सांग... इतकंच!
तुला निरोप देत सांगितलं पुढल्या वर्षी लवकर यायला...
की मग कोण-तू आणि कुठला तू, असं म्हणायला मी मोकळा होणार...
नाही... नाही... मी तूला विसरलो असं समजू नकोस रे...
फक्त माझ्यावर संकटं आली की मगच तू मला आठवणार... इतकंच!
माझं इतकं ऐकून घेतल्यावर बाप्पानं गप्प बसावं ना?
पण म्हणाला... फक्त चतुर्थी टू चतुर्दशी मी तुला आठवतो...
वाटतंय खरं असं मित्रा तूला...
पण तू सुखात असतानाही आठवण काढतोस माझी...
कारण ती सगळी सुख मीच तुझा पत्ता लिहून पाठवतो...
ते तुला समजत नाही... इतकंच!
1 comment:
हो पण काहीही झालं तरी, कधी ना कधी बाप्पा आठवतो हे काय कमी ?
Post a Comment