Monday, 3 August 2009

स्वयंवर झाले राखीचे....!

एक स्वयंवर रामायणातलं... रामचंद्रांनी शिवधनुष्याला प्रत्यंचा लावण्याचा प्रयत्न केला... ते भंग पावलं... मग सीतामाईनं प्रभूंना वरमाला घातली... इत्यादी!
एक स्वयंवर महाभारतातलं... अर्जूनानं पाण्यात बघून माशाचा डोळा फोडला... द्रौपदीनं त्याला वरमाला घातली... घरी आली आणि... जाऊ द्या...

तसंच एक स्वयंवर आमचंही... म्हणजे आमच्या भारतातलं... आमच्या भारतातल्या महानायिकेचं... अर्थात! हे स्वयंवर आहे आपल्या राखी सावंतचं...

उगीच सटायरिकल काहीतरी लिहायचं म्हणून मी विचारणार नाही हं 'माहित्ये का कोण राखी सावंत ते?' राखी सावंतला ओळखत नाही, असा कोण 'माईका लाल' असेल, यावर माझा विश्वास नाही... त्यामुळे राखी सावंत तुम्हाला माहित्ये, हे मला माहित्ये, हे तुम्हालाही माहित्ये....

तर ते असो.... ब-याच रिऍलिटी शो मध्ये रडारड करणा-या राखीताईंना (पॉइंट टू बी नोटेड... राखी'ताई...') खर्रीखुर्री रडारड करायची संधी एनडीटीव्ही इमॅजिन या वाहिनीनं मिळवून दिली... खरं म्हणजे झालं काय, की या चॅनेलला राखी सावंतला घ्यायचंच घ्यायचं होतं एखाद्या रिऍलिटी शो-मध्ये... या चॅनेलनं एक मिटींगच घेतली राखीसाठी काय करता येईल याची... तिला प्रतिस्पर्धी असले की मग ती त्यांच्याशी भांडते-चिडते-रडते-मिडीयात बोंब ठोकते.... पण या चॅनेलला राखी सावंतला घ्यायचंच घ्यायचं होतं ना....!!!! तितक्यात कोणाच्यातरी डोक्यातून मग शक्कल निघाली की, हे सगळे व्याप करण्यापेक्षा ती एकटीच असली त्या रिऍलिटी शोमध्ये तर... सह्ही भिडू.... क्या डोक्या लढव्या... पण मग कंटेस्टंट नाहीत, तर स्पर्धा कसली आणि स्पर्धा नाही, तर शो कसला... आली का पंचाईत? "रिऍलिटी शो-मध्ये स्पर्धक तर हवेतच... बक्षिस एक-स्पर्धक अनेक... तरच तो शो!" असं कोणीतरी म्हणाला आणि त्याच वेळी दुस-या कोणालातरी नामी आयडिया सापडली... म्हणजे बक्षिस एकच असतं ना... मग राखीला 'बक्षिस' म्हणूनच शोमध्ये ठेवलं तर.... व्वा! व्वा! व्वा! काय डोकी असतात एकेक...

ठरलं तर मग... राखी हे बक्षिस(?) आणि तिला जिंकायला येणार कंटेस्टंट्स...

तर अशी कथा राखीचं स्वयंवर ठरण्याची... त्यानंतर मग बरेच दिवस या वाहिनीवर हा खेळखंडोबा सुरू होता... राखी कोणाकोणाला भेटायची काय... गप्पा काय मारायची... इत्यादी.... इत्यादी.... तिचं ते (स्युडो) लाजणं-मुरडणं... तिच्या (खोट्याखोट्या) मैत्रिणींनी तिला चिडवणं... स्वयंवरात झालेला तिचा 'मामा(?)' याच्याशी तिचे लाडीssssक संवाद... हे सगळं झाल्यावर मग हे कंटेस्टंट शॉर्टलिस्ट झाले... (बघा मि. रामचंद्र आणि मि. अर्जून... तुम्ही झाला होतात का शॉर्टलिस्टेड... वाईल्डकार्ड एन्ट्री घेतल्यावर काय, कोणीही जिंकेल स्वयंवरातला पण...) या तिघांपैकी मग एकाला तिनं लाजत-लाजत... मुरडत-मुरडत वरमाला घातली आणि.... "आकाशाशी जडले नाते... धरणी मातेचे...." असा जयघोष घूमू लागला दशदिशांना...

त्यामुळे सत्ययुगात एक... द्वापारयुगात एक आणि आता कलियुगात एक... असा स्वयंवरांचा बॅलन्स झाला... पण ती म्हणे आत्ताच लग्न करणार नाही... म्हणजे तो जो कोण एनआरआय आहे, त्याची अवस्था स्लमडॉग मिलेनियरच्या हीरोसारखी झाली असणार नक्कीच... एक कोटी तर जिंकले, पण हातात तर आले नाहीत... (त्याला दुस-या दिवशी २ कोटी मिळतात... याचं काही खरं नाही, इतकंच...!!!!)

तर असो... अशी आहे एका राखीच्या स्वयंवराची कहाणी... गदिमा असते तर या स्वयंवरावरही एखादं गीत लिहायची गळ त्यांना कोणी घातली असती काय??

1 comment:

Pravin said...

अहो थांबा, आत्ता फक्त साखरपुडा केलाय त्या कॅनडा वाल्याशी :) ही तर शुद्ध चीटिंग आहे. सांगितल होत लग्न करणार आणि केला फक्त साखरपुडा. उद्या 2 दिवसाच लग्न करेल ही राखी (ताई) आणि घटस्फोट घेऊन होईल तयार राखी का स्वन्यन्वर पार्ट 2 :)