राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे 'संघ परिवार' या अध्यरुत संकल्पनेचा कुटुंबप्रमुख... विश्व हिंदू परिषद, विद्यार्थी परिषद, वनवासी कल्याण आश्रम यासारख्या अनेक संघटनांचं जाळं संघाच्या या कुटूंबात आहे. त्यातलाच एक 'कानामागून येऊन तिखट झालेला' सदस्य म्हणजे भारतीय जनता पार्टी... एक तर राजकीय पक्ष असल्यामुळे अनिर्बंध अधिकार... सत्ता गाजवण्याची लागलेली सवय यामुळे भाजपमधले काही नेते हे पक्षाला 'ऑटोनॉमस' किंवा स्वायत्त मानतात... त्यांना मनातून असं वाटत असतं की "कोण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ? त्यांनी आम्हाला शहाणपणा का शिकवावा? आम्ही स्वतंत्र आहोत आमचे निर्णय घ्यायला... इ.इ.इ."
पण हे केवळ मनात... त्याच मनाच्या दुस-या एका कोप-यात त्यांना हेदेखील पक्क ठाऊक आहे की आपल्या पक्षाचा डोलारा हा संघाच्या भक्कम पायावर उभा आहे. जर घराच्या भिंतींनी पायापासून फारकत घ्यायची ठरवली, तर काय होईल, हे त्यांना माहिती आहे. म्हणूनच संघाला उघड-उघड दुखवायची कोणाची हिम्मत नाही... भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते संघाच्याच मुशीत घडलेत... आणि ही उदाहरणं हाताच्या बोटावर मोजण्याइतकी नाहीत... काही अपवाद वगळता सगळ्या ज्येष्ठ नेत्यांनी एकतर संघ किंवा विद्यार्थी परिषदेत सामाजिक जीवनाचा श्रीगणेशा केलाय. अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वात जे सरकार साडेचार वर्षं आलं होतं, ते देखील संघामुळेच... आयोध्येतल्या राम मंदिर आंदोलनाची पार्श्वभूमी या विजयाला होती. त्यामुळे संघानं टेकू काढून घ्यायचा ठरवला, तर भाजपचा तंबू मातीत मिसळायला वेळ लागणार नाही, हे नेते पक्क जाणून आहेत...
सध्या भाजपमध्ये रणकंदन सुरू आहे... होय! मी रणकंदन हा शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरलाय... स्वतःला 'पार्टी विथ डिफरन्स' म्हणणा-या भाजपनं आपले पायही मातीचेच आहेत, हे दाखवून दिलंय... जसवंत सिंग यांचं पुस्तक... राजस्थानातला सत्तासंघर्ष (खरंतर विरोधी सत्तासंघर्ष)... यशवंत सिन्हा-अरूण शौरी प्रभूतींची टोमणेबाजी... या सगळ्या एका मोठ्या युद्धातल्या छोट्या लढाया आहेत... मुख्यतः हे युद्ध जुंपलंय ते 'संघीय भाजप नेते' विरुद्ध 'बिगरसंघीय भाजप नेते' यांच्यात... अडवाणी-राजनाथ सिंग यांना भविष्यात नरेंद्र मोदींना राष्ट्रीय राजकारणात मोठं करायचंय... त्याच वेळी बिगरसंघीय नेत्यांनी अरूण जेटलींचं नाव रेटलंय... नेतृत्वबदलाची चर्चा ही याच 'उत्तरदायी' ठरवण्यातून पुढे आलीय...
शेवटी पोरं भांडायला लागली की आई-वडील जे करतात तेच मोहनजी भागवतांनी केलं... ते म्हणाले की, 'भाजपची इच्छा असेल तर मध्यस्ती करायला संघ तयार आहे...' आता यात काय वावगं आहे. दोन्ही संघटना वेगळ्या आहेत आणि एका संघटनेनं दुसरीचा आदर केलाय... असंच हे विधान वाचल्यावर वाटणार... पण ज्यांना संघ आणि भाजपमधले संबंध (ऐकून का होईना) माहित आहेत, त्यांना यातली 'बिटवीन दि लाईन्स' वाचता येईल... 'जर भाजपची इच्छा असेल तर...!' म्हणजे जर 'तुम्ही आम्हाला अजून कुटुंबप्रमुख मानत असाल तर...!' म्हणजेच... 'जर तुम्हाला आमची मध्यस्ती मान्य नसेल, तर पुढल्या निवडणुकीत तुमचं काय करायचं ते आम्ही बघून घेऊ...!' इतका सगळा अर्थ दडलाय या 'जर'मध्ये...!!!
आता सगळ्यांना जरी ही 'बिटविन दि लाईन्स' समजली नाही, तरी भाजपच्या नेत्यांना बरोब्बर समजली... म्हणूनच भागवत यांच्या पत्रकार परिषदेला २४ तास व्हायच्या आत सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडू, अरूण जेटली, अनंत कुमार, मुरली मनोहर जोशी आणि सगळ्यात महत्त्वाचं राजनाथ सिंग आणि लालकृष्ण अडवाणी यांनी मोहनजींची भेट घेतली... याचा अर्थ मोहनजींचा हा 'जर' वर्मी लागलाय... सध्या केशवकुंज कार्यालयात भाजप नेत्यांच्या मोहनजींसोबत बैठकांवर बैठका सुरू आहेत... त्याचा काय निर्णय लागतोय, ते थोड्या दिवसांमध्ये स्पष्ट होईलच...
आता थोडंसं नेतृत्वबदलाविषयी... भाजपमध्ये आत्ता नेतृत्वबदल (पक्षी अडवाणी जाऊन कोणीतरी आणि राजनाथसिंग जाऊन कोणीतरी...) व्हावा की नाही, हा प्रश्न आहे... याला दोन बाजू आहेत... एक म्हणजे हे बदल केले, तर पक्ष पॅनिक झालाय, असा समज होऊ शकतो... त्यातून राजनाथ सिंग किंवा स्वराज-जेटली-नायडू हे लोक दुखावले जाण्याची शक्यता आहे. यावर एक पर्याय म्हणजे अडवाणींच्या जागी स्वराज यांना विरोधी पक्षनेतेपदी आणलं तर हे दुःख काहीसं कमी होऊ शकतं... दुसरीकडे राजनाथ सिंग यांच्या जागेवर कोण येणार, हेही महत्त्वाचं ठरेल... तिथं अरूण जेटली आले तर पक्षातले अनेक जण पुन्हा नाकं मुरडतील, अशी शक्यता आहे. तिथं मोदींना आणलं तर गुजरातेत कोण, हा एक प्रश्न आणि मित्रपक्षांना मोदी पचणार का, हा दुसरा मोठा गहन प्रश्न... त्यामुळे तीही शक्यता नसल्यात जमा आहे.... त्यामुळे नेतृत्वबदल इतक्यात नाही... झाले तरी ते 'संघीय भाजप नेत्यां'मध्येच होतील.... जसवंत-यशवंत-शौरी यांना पदं मिळण्याची शक्यता सध्यातरी दिसत नाही...
आता दुसरी बाजू म्हणजे नेतृत्वबदल न करता अडवाणी-राजनाथ हेच आपल्या पदांवर कायम राहिले तर...! यात एक मोठ्ठा धोका आहे... आत्ताचं काँग्रेस आघाडी सरकार त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी पडण्याची शक्यता शून्य आहे... त्यामुळे भाजपला लढण्याची संधी आणखी साडेचार-पाच मिळणार नाही, हे नक्की आहे. म्हणजे २०१४ साली जेव्हा निवडणुका होतील, त्या वेळी अडवाणी आत्तापेक्षा जास्त थकलेले असणार... त्यांना 'पंतप्रधानपदाचा उमेदवार' म्हणून प्रमोट करणं, हा मूर्खपणा ठरेल... त्यामुळे तेव्हा नवा चेहरा असला पाहिजे... मग तो सुषमा स्वराज-जेटली-मोदी यापैकी कोणाचाही असू शकतो... मग त्यांना पक्षाचं (किंवा पक्षाच्या संसदीय दलाचं) नेतृत्व करायची संधी आत्तापासूनच का द्यायची नाही... त्यांच्या कामाचा अनुभव नंतर निवडणुकीत पक्षाच्या उपयोगाला येईल आणि योगायोगानं सरकार आलंच भाजपचं, तर त्या सरकारच्या आणि पर्यायानं देशाच्या उपयोगाला येईल... आणि ते विरोधी पक्षाचा सर्वोच्च नेता म्हणून कसं काम करतायत, याची लोकांनाही परिक्षा करता येईल... नाहीतर चार-पाच वर्ष विरोधी पक्षनेतेपद अडवाणींकडे... आणि नंतर दुस-याच कोणाला पुढे केलं, तर मतदारांशी 'आंधळी कोशिंबीर' खेळल्यासारखं होईल...
या आपल्या नुसत्या शक्यता.... पक्षात काय गोंधळ चाललंय याच्याशी सामान्य मतदाराला काही घेणंदेणं असायचं कारण नाही... पण देशातला सगळ्यात मोठा विरोधी पक्ष कमकुवत होणं देशाला परवडणारं नाही... (हे माझं एकट्याचं मत नाही पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही असंच वाटतंय...) त्यामुळे भाजप नेत्यांनी आपले हेवेदावे बाजुला ठेऊन (आणि ते शक्य नसेल तर लवकरात लवकर सोडवून) कामाला लागावं, असं वाटतंय.... सरकारची नावं ठेवण्यासारखी अनेक धोरणं आहेत... देश दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे... शेतकरी आत्महत्या करतायत... महागाई अवकाशाला भिडलीय... अशा वेळी सरकारला धारेवर धरायचं सोडून 'जिनांमुळे फाळणी झाली की नेहरूंमुळे....?' 'पोखरण... सक्सेस की फियास्को...?' 'कंदहारला जबाबदार कोण?' असल्या प्रश्वांवरून भांडण्यात काय अर्थ आहे....?????
'पुलं'च्या अंतू बर्व्याचं एक वाक्य आहे.... "हे म्हणजे... भाट्याच्या खाडीवर बुडणा-यास काठावर उभं राहून कुराण वाचून दाखवण्यापैकी आहे... याचा त्यास उपयोग नाही.... त्याचा ह्यास उपयोग नाही..." ते सध्याच्या भाजपला चपखल लागू होतंय... हॅट्स ऑफ टू पीएल...
No comments:
Post a Comment