Wednesday, 26 August 2009

सरकारी लगीनघाई...!

"तहान लागल्यावर विहीर खणणे" ही म्हण सोदाहरण स्पष्ट करा... असा प्रश्न जर यंदा कोणा विद्यार्थ्याला टाकला, तर 'महाराष्ट्र सरकारनं गेल्या महिन्याभरात घेतलेले निर्णय...' हे छान उदाहरण पूर्ण मार्क मिळवून देईल... काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारला आता मतांची तहान लागल्ये...
निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होतील... त्यानंतर 'आचारसंहिता' नावाचा राक्षस जन्म घेईल आणि मग बिच्चा-या सरकारला लोकहिताचे निर्णयच घेता येणार नाहीत... म्हणून मग एका महिन्यात तब्बल सहा वेळा मंत्रीमंडळाला एकत्र करून सरकारला अनेक निर्णय घेणं भागच पडलं... त्याला काय करणार?
४४ दिवसांपासून संपावर असलेल्या प्राध्यापकांना अचानक सहावा वेतन आयोग लागू केला... कारण... तहान!
हे सरकार सत्तेवर आलं... त्याच्या आधीपासून महापालिकांची जकात रद्द करण्याची मागणी होतेय... मग १५ ड वर्ग महापालिकांची जकात नेमकी आत्ताच रद्द का होते... कारण... तहान!
शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातल्या स्मारकाला मंजुरी आणि घाईघाईनं त्याच्या टेबल टॉप मॉडेलचं उद्घाटन करायचं कारण... तहान!
सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीचे देव पाण्यात आहेत. शिवसेना-भाजप युती जवळजवळ झाल्यात जमा आहे... लोकसभेतल्या पराभवाचं उट्टं काढण्यासाठी रामदास आठवलेंनी आधी सगळ्या रिपब्लिकन पक्षांना आणि नंतर डाव्या पक्षांना एकत्र करून आघाडीच्या पोटात गोळा आणलाय... अशा वेळी जिथून शक्य आहे, तिथून मतं जमवण्याच्या खटपटीत आघाडी असेल, तर नवल नाही...
त्यात सगळ्यात मोठी गडबड म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार की एकमेकांविरुद्ध मैत्रीपूर्ण हे अजून नक्की नाही... त्यामुळे कार्यकर्ते आणि सगळ्यात महत्त्वाचं इच्छुक उमेदवार, हे संभ्रमात आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर काहीतरी दिलासादायक दिसायला हवं, ही सरकारची खटपट आहे...
आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाचा मुद्दा असा की, सत्तेचा मतांसाठी योग्य वापर कसा करायचा, याचा काँग्रेसचा अनुभव दांडगा आहे. युतीची सत्ता येऊनही त्यांना ती टिकवून ठेवणं जमलं नाही, ते अनुभव कमी पडल्यामुळेच... ऐन निवडणुकीच्या तोंडावर नेत्रदिपक घोषणाबाजी कशी करायची, हे काँग्रेसइतकं कोणालाही समजलेलं नाही... कारण 'पब्लिकची मेमरी ही रिसेंटच असते... फार जुन्या गोष्टी तिला आठवत नाहित...,' जे उशिरात उशिरा कराल, ते जास्तीत जास्त लक्षात राहिल... हे त्यांना पक्क माहित्ये.
गेल्या निवडणुकीवेळी तत्कालिन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी शेतक-यांना वीज मोफत देण्याचं जाहीरनाम्यात म्हंटलं होतं. त्याबद्दल नंतर विचारल्यावर तेव्हाच्या प्रदेशाध्यक्षा प्रभा राव यांनी 'प्रिंटिंग मिस्टेक' सांगून मुद्दा निकाली काढला होता... आपण जनतेची सरळ-सरळ फसवणूक करतोय, असं ना शिंदेंना वाटलं ना प्रभाताईंना... आता पुन्हा तेच होणार याची काँग्रेसी-राष्ट्रवादी काँग्रेसींना खात्री आहे... लोकांनी त्यांचा भ्रमनिरास करण्याची गरज आहे...
पण शिवसेना-भाजप किंवा मनसे-भाजप किंवा शिवसेना-भाजप-मनसे असं कोणीही सत्ते आलं, तरी ते काही भव्यदिव्य काम करतील, अशी खात्री लोकांना नाही... त्यामुळेच 'अनोळखी देवदुतापेक्षा ओळखीचा सैतान बरा...' या इंग्रजी म्हणीप्रमाणे लोक पुन्हा या 'ओळखीच्या सैताना'लाच सत्तेत आणण्याची शक्यता अधिक दिसत्ये.

2 comments:

Nima said...

इथे अनोळखी देवदूत आहे कुठे?

अमित भिडे said...

अमोल जबराट.. हा ब्लॉग आघाडी सरकारनं वाचला तर तो खरोखर विचार करेल. असे ब्लॉग असतात ना ते खरोखऱ प्रत्येक मतदाराला वाचायला मिळायला हवा.. मतदानाआधी अभ्यास करून निघायचे असेल तर त्यासाठी हा लेख वाचणे हिताचे होईल. डोळे उघडे ठेवले तर या घोषणांचा अर्थ कळेल. आणि तो तू दाखवलायसं. जबरदस्त.. एकदम तुझ्या बुलेटीनसारखा...