Friday, 7 August 2009

'वाडा' चिरेबंदी...?

भारतीय क्रिकेटर म्हणजे आमची दैवतंच... रोज सकाळी नमस्कार घालताना मित्राय नमः, सूर्याय नमः असं न म्हणता आम्ही सचिनाय नमः युवराजाय नमः, महेंद्राय नमः असं म्हणतो... सध्या ही दैवतं एका अतिशय छोट्या कारणामुळे चर्चेत आहेत.
प्रश्न आहे क्रिकेट खेळत नसताना जागतिक उत्तेजक द्रव्यविरोधी संस्थेला (वर्ल्ड अँटी डोपींग एजन्सी - वाडा ) आपला ठावठिकाणा कळवण्याची... 'वाडा'चं म्हणणं असं, की तुम्ही खेळत नसता तेव्हा अमली पदार्थांचं सेवन करत नाही कशावरून... त्यासाठी कुठल्याही क्षणी तपासणी करण्याची सोय आम्हाला असावी, यासाठी तुम्ही कुठे असाल तेवढं सांगा... पण हा मुद्दा काही आपल्या दैवतांना मान्य नाही. त्यांचं म्हणणं असं की हे आमच्या खासगी आयुष्यावर अतिक्रमण आहे. आम्ही खेळत नसताना कुठे जातो-काय करतो ते कोणालाही सांगायला आम्ही बांधिल नाही.... बीसीसीआयच्या म्हणण्याप्रमाणे खेळाडूंचा ठावठिकाणा जाहीर करणं सुरक्षेच्या दृष्टीनं गैरसोयीचं आहे. सध्या या मुद्द्यावर 'वाडा'च्या करारात डेडलॉक झालाय...
पहिली गोष्ट म्हणजे जगातलं सगळ्यात श्रीमंत क्रिकेट मंडळ असलेल्या बीसीसीआयला आपल्या म्हणण्याप्रमाणे जगानं वागावं असं वाटतं... याचा प्रत्यय अनेकदा येतो. पण 'वाडा'च्या या नव्या कराराला असलेला बीसीसीआयचा विरोध अनाठायी आहे, असं वाटतं. त्याची कारणं अशी की,
  • खेळांमधून उत्तेजक औषधांचा वापर संपूर्ण मिटावा असं वाटत असेल, तर ख-या खेळाडूंनी खिलाडूवृत्ती दाखवली पाहिजे.
  • बीसीसीआय किंवा भारतीय खेळाडू म्हणतात, तितकी ही अट जाचक नाही. एक तर 'वाडा' काय दर वेळी तुम्ही जिथे असाल, तिथं टपकेलच असं नाही... ही केवळ 'प्रिकॉशन' आहे.
  • "तुम्ही कुठे आहात?" असा 'वाडा'चा प्रश्न आहे... "तुम्ही जिथं आहात, तिथं तुम्ही काय करताय...?" हे 'वाडा'नं विचारलेलं नाही. त्यामुळे हे खाजगी आयुष्यावर आक्रमण ठरत नाही.
  • बीसीसीआयच्या मते खेळाडूंच्या सुरक्षेसाठी हे आवश्यक आहे. पण जेव्हा सामने सुरू असतात त्या वेळी खेळाडूंचे 'वेअरआबाउट्स' जगजाहीर असतात की... मग ते खेळत नसतानाची ठिकाणं समजली तर काय फरक पडणार आहे?
  • बाकीच्या बहुतांश खेळांच्या खेळाडूंनी 'वाडा'ची ही अट मान्य केलीय. भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि महेश भूपती यांनीही क्रिकेटपटूंना शहाणपणाचा सल्ला दिलाय.

बीसीसीआयची एकूण ताकद आणि क्रिकेटपटूंचं जनमानसात असलेलं स्थान बघता 'वाडा'ला हे तितकं सोपं जाणार नाही... आयसीसीची ढाल पुढे करून बीसीसीआय या 'वाड्या'ला खिंडार पाडायचा प्रयत्न करणार. आयसीसीदेखील बीसीसीआयच्या ताटाखालचं मांजर असल्याप्रमाणे वागतं... त्यामुळे बीसीसीआयला हे शक्य आहे. पण खेळांमधून चुकीच्या प्रवृत्तींचं उच्चाटन करायचं असेल (आणि ते केलंच पाहिजे...) आणि 'प्ले ट्रू' हे आपलं ब्रिदवाक्य खरं करायचं असेल तर 'वाडा'नं आपला वाडा 'चिरेबंदी' करण्याची गरज आहे...

1 comment:

Nima said...

'वाडा'बाबतीत बीसीसीआय आणि खेळाडूंचा होमवर्क कच्चा आहे, असं दिसतंय. जगातल्या सर्वच मोठ्या खेळाडूंनी वाडाच्या अटी मान्य केल्यात. आणि वाडा म्हणजे काही आपले सरकारी (किंवा बीसीसीआयचे) अधिकारी नाहीत, महत्त्वाच्या गोष्टींची वाच्यता करायला. आतापर्यंत असं कधीही घडल्याचं दिसत नाही. सचिन किंवा धोणीइतकीच फेडररची सुरक्षा महत्त्वाची आहे, पण वाडामुळे त्याच्या सुरक्षेला काहीही धोका निर्माण झालेला नाही, हे लक्षात घेतलं तरी पुरे.