Wednesday 17 June 2009

मध्य रेल्वेची "शंभरी...!"


आज सकाळी पेपरच्या आतल्या पानावर एक बातमी वाचली. मध्य रेल्वेनं म्हणे काल १०० टक्के वेळेवर येऊन दाखवलं... (बातमी पहा) खरोखर या पेपरवाल्यांना काहीच कळत नाही. इतकी महत्त्वाची बातमी आतल्या पानावर कुठेतरी फेकून द्यायची, म्हणजे काय? एकीकडे म्हणायचं, 'माणूस कुत्र्याला चावला' तरच ती बातमी... आणि दुसरीकडे मध्य रेल्वे वेळेवर धावली, तर त्याला आतल्या पानात कुठेतरी जागा द्यायची... याला काय अर्थ आहे. मराठीत आता एक नवी म्हण रूढ झाल्ये. "रोज म.रे. (म्हणजे आपली मध्य रेल्वे) त्याला कोण रडे..." अशी ख्याती असलेल्या या सगळ्यात मोठ्या सार्वजनिक वाहतुक यंत्रणेचा हा विक्रमच आहे.
म्हणजे कल्पना करा की हा शंभर नंबरी विक्रम मध्य रेल्वेनं रोज-रोज (अगदी १ इंच पाऊस झाल्यावरही...) केला तर काय होईल? अनर्थ ओढवेल अनर्थ.... म्हणजे बॉसला "गाडी लेट झाली" असं सांगून मैत्रिणीबरोबर चौपाटीवर फिरायला जाणं मुश्किल.... बायकोला "ओव्हरहेड वायर तुटली" असं सांगून बारमध्ये बियरच्या बाटल्या रिचवणं महाकठीण.... सासूबाई येणार असतील तर "मोटरमनचा संप आहे, येऊ नका..." असं सांगायची चोरी... "रुळांवर पाणी साचलंय... काल चालत घरी गेलो..." असं सांगून दुस-या दिवशी दांडी मारणं अशक्यच... अराजक माजेल. मग ही बातमी महत्त्वाची नाही का, तुम्हीच सांगा??
पण हे लिहिता-लिहिता वाटलं की आतलं पान-तर-आतलं पान.... बातमी तर छापली... म्हणजे मध्य रेल्वे वेळेवर धावली एखाद् दिवस तरी, म्हणजे ही "माणूस कुत्र्याला चावला..." या कॅटेगरीतलीच बातमी वाटली असणार छापणा-या प्रतिष्ठित वर्तमानपत्राला, नाही का? आणि पुन्हा ही बातमी छापताना त्यात मध्य रेल्वे लेट येते (म्हणजे काल सोडून....!) त्याची शंभर कारणं दिली आहेत. म्हणजे लोकं चेन (गाडीतली... गैरसमज नको!) ओढतात... (उगीचच), ओव्हरहेड वायर तुटते (उगीचच), सिग्नल बंद पडतात (उगीचच), लोक रेल-रोको करतात (उगीचच) त्याला मध्य रेल्वे काय करणार? रुळांवर पाणी साचतं, मालगाडी घसरते, इंजिनं फेल होतात त्याला मध्य रेल्वे काय करणार? असा एकूण या बातमीचा सूर आहे. ((दुस-या एका प्रतिष्ठित दैनिकानं ही बातमी फारसा मुलामा न देता दिल्ये. (बातमी पहा) या दैनिकानं मध्य रेल्वेवर किती अन्याय केलाय, याची कल्पनाच नाही करवत...))

तात्पर्य काय? तर रोज "म.रे." असं नाहीये... आता उद्या-परवा केव्हाही बदलापूर-टिटवाळा-कल्याण-डोंबिवली-कळव्यात गाडीत चढता नाही आलं... गाडी लेट झाली आणि लेटमार्क लागला... किंवा आता पावसाळा आलाच आहे... तेव्हा.... (सूज्ञ मुंबईकरांना अधिक सांगणे न लगे...!) असं काहीही झालं तरी सोमवार, दि. १५ जून २००९ हा सुवर्णदिन लक्षात ठेवायचा... "हाच तो दिवस ज्या दिवशी मध्य रेल्वे १०० % वेळेवर धावली होती..." असा जप १०० वेळा 'मनातल्या मनात' करायचा (मोठ्यानं केलात तर मार खाल कोणाचातरी...) आणि मुकाट्यानं दरवाजात... माफ करा, डोअरला लटकून मुसळधार पावसात भिजत ऑफीस गाठायचं... जय महाराष्ट्र... जय मुंबई... जय म.रे...

No comments: