सात तारखेला येणार म्हणजे येणार...!
नाही आला का? O.K. आता १२ तारखेला नक्कीच....!!
अरेच्या... अजून नाही? येईल २-३ दिवसांत.....!!!
हवामानखात्याचा कारभार म्हणजे सनी देओलच्या थाटात "तारीख पे तारीख... तारीख पे तारीख...... तारीख पे तारीख.......... तारीख पे तारीख................. " असाच आहे. अखेर तब्बल १३-१४ दिवस वाट बघायला लावून मुंबई-पुण्यात पाऊस आलाच... पाऊस आला म्हणजे का, चार शिंतोडे पडले. पण उन्हानं तापलेल्या धरणीमातेला आणि ती तापल्यानं संतापलेल्या लोकांना हे चार शिंतोडेही 'अमृताचे घनू' वाटले तर त्यात नवल ते काय? येत्या एक-दोन दिवसांमध्ये खर्राखुरा मान्सुन येईल, असं वेधशाळा (पुन्हा एकदा) सांगतेय. तसं झालं तरी मुंबईकरांनी हुरळून जाण्याचं कारण नाही. कारण बॅडन्यूज लगेचच आहे. मुंबईत रस्त्यांच्या दुरुस्तीची कामं अद्याप अपूर्ण आहेत... रेन-ड्रेनेजची सफाई झालेली नाही.... मिठी नदी कशी वागेल महापालिकेला माहित नाही... म्हणजे आता "पाऊस आला...." असं म्हणत भिजत नाचायचं... की "आला एकदाचा.." असं म्हणत शिव्या घालायच्या, अशी मुंबईकरांची द्विधा झाली, तर त्यात नवल नाही. २६ जुलै २००५ची आठवण आजही आपल्याला येते. मुंबईत पाणी हे साठणारच... (किमान मिलन-सब वेमध्ये तर नक्की...) पण २६ जुलैसारखा नक्को रे बाबा, इतकंच मुंबईकरांचं म्हणणं असतं...
ही झाली मुंबईकरांची बाजू... पण पाऊस लेट झाल्यानं शेतीची कामं खोळंबली आहेत, त्याचं काय? पेरणीसाठी शेतकरी सरसावून बसलेत. हल्ली शेतकरी खाली बघतच नसणार... डोळे सतत आकाशाकडे. पाऊस सरासरीइतकाच पडेल, असा विश्वास हवामानखातं देतंय. पण सरासरी आकडेवारी गाठणं आणि वेळेवर पाहिजे तितकाच पाऊस पडणं, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आता १५ दिवस उशीरा आलेला पाऊस तितकाच पडणार असेल, तर आता तो भरगच्च पडणार, असं म्हणावं लागेल. त्यामुळेच दुष्काळापाठोपाठ अतिवृष्टीची भिती बळीराजाला सतावू लागलीय. म्हणजे पाऊस आल्यानंतर पेरणी केली आणि नंतर इतका पडला की बियाणं वाहून गेलं, तर या अन्नदात्यानं कोणाच्या तोंडाकडे पहायचं... नाहीतर पुढल्या वर्षीही पुन्हा बातम्या आहेतच, पॅकेजच्या फासाला लटकून-यांनी आत्महत्या केल्याच्या....
सरकार तर जाऊच दे (ते तसंही पाषाणहृदयी असतं...), पण सामाम्य माणसालाही शेतक-यांच्या आत्महत्येच्या बातम्या वाचून कंटाळा आलाय. कितीदा तेच-तेच वाचणार? म्हणजे शेतक-याचं नाव-गाव आणि मरण्याची पद्धत बदलली तर बाकीचा तपशील तोच असतो. हेडींग वाचलं तरी पुरतं... सगळी बातमी कशाला वाचायला पाहिजे... (त्यापेक्षा शायनी आहूजाची बातमी वाचूयात सग्गळीच्या सग्गळी...) "रोज शेतकरी मरे... त्याला कोण रडे.... " अशी आपली धारणा झालीय. म्हणूनच आता या बळीराजाला कोणाकडून कसलीच आशा नाही... (दोन अश्रुंचीही...?) त्याचा तारणहार आता एकच आहे... तो उशीरा आलाय पण आलाय... (पंतप्रधानांच्या पॅकेजसारखं त्याचं नाही...) त्यानं आता यावं... नीट रहावं... इतकीच त्याची इच्छा.... म्हणजे कुसूमाग्रजांच्या शब्दांत सांगायचं, तर त्यानं 'माहेरवाशीण पोरीसारखं यावं... चार दिवस नांदून, आई-बापाला सुखी करून जावं....' पण 'कणा' या कवितेच्या हिरोसारखी अवस्था करून जाऊ नये, इतकीच इच्छा...!
No comments:
Post a Comment