Monday 22 June 2009

पाकिस्तान क्रिकेटवर केमोथेरपी...

शरिराला एकदा कॅन्सर लागला, की तो एक-एक अवयव ग्रासत जातो. पाकिस्तानातल्या दहशतवादाच्या कॅन्सरनं पाकिस्तान क्रिकेटला तसंच ग्रासलंय. (अर्थात भारताला त्रास देण्याच्या पाकिस्तानी व्यसनाचाच हा परिणाम आहे, हे खरंच) ट्वेण्टी-ट्वेण्टी वर्ल्डकप जिंकणं ही त्या कॅन्सरवर झालेली केमोथेरपी आहे, असं म्हणायला हरकत नाही.

पूर्वी पाकिस्तानी अतिरेकाचा फटका फक्त भारताला बसत होता. अगदी खलिस्तानी दहशतवाद्यांपासून ते काश्मीर, बांग्लादेशी घुसखोर, नेपाळमार्गे चालणारी अमली पदार्थांची तस्करी... या सगळ्याचे धागे शेवटी आयएसआयच्या रिळालाच गुंडाळले होते. पाकिस्तान सरकार, अमेरिका-रशिया-चीन यांच्या पाठिंब्यानं आयएसआयनं जन्माला घातलेल्या या भस्मासूरानं या लोकांच्याच डोक्यावर हात ठेवला. मग सगळे खडबडून जागे झाले आणि या भस्मासुराला मारण्याचा कार्यक्रमाला लागले. पण तोपर्यंत व्हायचं ते नुकसान होऊन गेलं होतं. आणि हा भस्मासूर केवळ राजकारणी किंवा सैनिकांचाच बळी घेतोय, असं नाही. तो समोर येईल त्याच्या डोक्यावर हात ठेवतो आणि भस्म करून सोडतो. असाच त्यानं पाकिस्तान क्रिकेटच्या डोक्यावरही हात ठेवलाय. तिथल्या हिंसाचारानं इतकं ऊग्र रूप धारण केलंय, की तिथं खेळायला कोणीच तयार नसतं. ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड तर वर्ल्डकपमधले सामनेही सोडून देतात, दौरा करणं तर लांबच राहिलं. गेल्या एक वर्षात पाकिस्तानचा संघ एकही कसोटी सामना खेळलेला नाही. गेल्या २-३ वर्षांत घरच्या मैदानावर एकही आंतरराष्ट्रीय सामना त्यांना खेळता आलेला नाही. परिस्थिती फारशी आश्वासक नाही, हे माहित असतानाही श्रीलंकेनं खेळावरच्या प्रेमापोटी आपला संघ तिथं पाठवला. पण भस्मासुराकडे स्पोर्टमन स्पिरीट असावं, अशी आशा करणंच मूर्खपणाचं आहे. त्यानं थेट श्रीलंका संघाच्या डोक्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला. काही खेळाडूंना किरकोळ ईजा होण्यावर हे प्रकरण निभावलं, म्हणून ठीक.... (खरंतर आयसीसी वेळापत्रकारप्रमाणे तो भारताचा नियोजित दौरा होता. मुंबईवर झालेल्या हल्ल्यांमुळे आपण तो रद्द केला. अन्यथा या अतिरेक्यांचं टार्गेट टीम इंडियाच होती, हे सूर्यप्रकाशाइतकं खरं आहे.) पण आता येत्या दोन-तीन वर्षांत नेदरलँड, केनिया, आयर्लंड, स्कॉटलंड, बांग्लादेश यांच्यासारखे लिंबू-टिंबूही पाकिस्तानात खेळायला जाणार नाहीत. त्यामुळे येत्या एक-दोन वर्षांमध्ये पाकिस्तान क्रिकेटची अवस्था आणखी वाईट होणार आहे. पीसीबी (पाकिस्तान क्रिकेट बोर्ड) अक्षरशः दिवाळखोरीत निघायच्या बेतात आहे. खेळाडूंचं मानधन द्यायलाही पीसीबीकडे पैसे नाहीत. सामनेच होत नसल्यानं जाहिरातींमधून उत्पन्न नाही. पाकिस्तानी अतिरेक्यांचा सगळ्यात जास्त त्रास सहन केलेल्या (करत असलेल्या) भारतातल्या बीसीसीआयमध्ये लक्ष्मी पाणी भरत असताना शेजारच्या पाकिस्तानात ही अवस्था आहे, हे उल्लेखनीय. ट्वेण्टी-ट्वेण्टी विश्वचषकातला विजय हा पीसीबी आणि पाकिस्तान क्रिकेटला म्हणूनच दिलासा देणारा आहे.
आपल्याकडे एक फार मोठा गट आहे, जो कालच्या सामन्यात पाकिस्तान हारण्याची वाट पहात होता. तिथले अतिरेकी आणि सरड्याची कातडी असलेले राज्यकर्ते यांचा राग हिरवे ट्रॅक-सूट घातलेल्या ११ लोकांवर काढण्याचा हा प्रकार झाला. (अगदी आमच्या घरातही असा गट आहे... बहुमतात आहे....!) पण जे झालं ते क्रिकेटसाठी चांगलं झालं, असं मला वाटतं. कोणत्याही कारणानी खेळाचं नुकसान व्हावं, असं खेळांवर प्रेम करणा-या कोणालाच वाटणार नाही... (किमान वाटू नये...) याचा अर्थ "देशावर प्रेम नाही" असा कोणीच काढू नये. अर्थातच खेळापेक्षा देशावर जास्त प्रेम होतं, आहे आणि असणार. पण म्हणून "वड्याचं तेल वांग्यावर" काढण्यात काय अर्थ आहे. पाकिस्तानी संघ वर्ल्डकप जिंकला त्यानं अतिरेक्यांचा काही फायदा होईल, असं आपल्याकडचे अट्टल पाक-द्वेष्टेही म्हणू शकणार नाहीत. त्यामुळे या अंतिम सामन्याचा निकाल 'श्रीलंका हरली आणि पाकिस्तान जिंकलं' असा सांगण्यापेक्षा 'क्रिकेटचा विजय झाला' असाच सांगावा लागेल.

No comments: