Thursday 18 June 2009

...नाही तर पुन्हा इशारा देईन...!


पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा रशिया दौरा गाजला तो त्यांनी पाकिस्तानच्या अध्यक्षांना पत्रकारांसमक्ष 'झाडल्यामुळे...' ते म्हणे फोटोसाठी पोझ देतानाच म्हणाले की मुंबई हल्ल्यांचा नीट तपास करा... अतिरेक्यांना आश्रय देऊ नका इत्यादी... इत्यादी... इत्यादी....

हे वाचल्यावर कोणत्याही भारतीय माणसाचं ऊर अभिमानानं भरून न येईल, तरच नवल. काय आमच्या पंतप्रधानांचा करारी बाणा... पाकिस्तानच्या अध्यक्षांना कम्युनिस्ट रशियात जाऊन तिथल्याच पत्रकारांसमोर चार शब्द सुनवायचे म्हणजे त्याला काय कमी डेअरिंग लागतं... आजवर कोणत्याच पंतप्रधानानं असा पराक्रम केला नसेल. म्हणजे वाजपेयींनी तेव्हाचे अध्यक्ष(?) परवेझ मुशर्रफ यांना आग्र्यात इतकं ऐकवलं होतं म्हणे की ते चिडून निघूनच गेले पाकिस्तानची बस पकडून... पण ते ताजमहालाच्या साक्षीने... साक्षात रशियातल्या एका आड-शहरात (लाल बहाद्दुर शास्त्रींची आठवण न काढता...) पाकिस्तानच्या अध्यक्षांची झाडाझडती घ्यायची म्हणजे काय धैर्य ते....!!!

मुंबईत झालेल्या अनेक स्फोटमालिका..., थेट संसदेवर हल्ला..., काश्मिरातला दहशतवाद..., हैदराबाद, अहमदाबाद यासारख्या शांत शहरांमध्ये स्फोटांची साखळी... आणि या सगळ्यावर कळस करणारा २६ नोव्हेंबर २००८चा मुंबई हल्ला... भारतात झालेल्या कुठल्याही मोठ्या हल्ल्यांचे धागेदोरे (अपवाद वगळून) पाकिस्तानात पोहोचतात, हे आपल्या देशातलं शेंबडं पोरही सांगेल. "आता पाकिस्तानला सोडणार नाही... आमची सहनशक्ती संपली... " या मंत्र्यांच्या भाषणांनी आता 'आर-पार-की-लडाई' असं भाभडे लोक समजले. पाकिस्तानला आपल्याकडे अतिरेकी आहेत, हे सिद्ध करण्यासाठी भारताकडून पुरावे हवे होते. हल्ला करणारा एक अतिरेकी जिवंत सापडूनही आपल्या करंट्या सरकारनं हे पुरावे द्यायला बराच वेळ घेतला. बरं, दिले-तर-दिले पुरावे उशीरा... लागला असेल गोळा करायला वेळ... पण ते दिले मराठी आणि हिंदीत... बहुदा हे पुरावे बरेच दिवस पाकिस्तानतल्या 'हिरव्या फिती'त पडून असतील. कारण या पुराव्यांची भाषा आपल्याला समजत नाहीये, हे देखील त्यांना बरंच उशीरा कळलं. आता पाकिस्ताननं या कागदपत्रांचा इंग्रजी अनुवाद मागवलाय. (एकीकडे केवळ वकील-पोलिसांचं बोलणं ऐकून म्हणे कसाब मराठी शिकलाय... आणि पाकिस्तान सरकारला मराठी येणारा एकही अनुवादक सापडत नाही...? ते असो...) आता तो अनुवाद होणार आणि पाकिस्तानला देणार. मग ते तपास सुरू करणार. ('हिरव्या फिती'चा कारभार सांभाळून....) तोपर्यंत कथित नजरकैदेत ठेवलेल्या अतिरेक्यांना मोकळं सोडलेलं असणार... मग पुन्हा वेळखाऊपणा होणार.... हे असंच सुरू राहणार....

अमेरिकेनं शेपटीवर पाय दिल्यानंतर तिच शेपूट पायात घालून करारी परवेझ मुशर्रफ आपणच जन्माला दिलेल्या 'तालिबान बाळा'चा बळी घ्यायला तयार होतात. पण भारताला त्रास देणारे अतिरेकी मात्र 'जिहादी' असतात. (पाकिस्तानातल्या अतिरेक्यांनी आपल्याच धर्मग्रंथांचा इतका विपर्यास केलाय, ती जगात कोणी अन्यधर्मियांच्या ग्रंथांचाही केला नसेल...)

अमेरिकेतल्या पोलिस खात्याबद्दल एक गोष्ट प्रचलित आहे. एकदा एक खुनी माणूस एका पोलिस अधिका-यासमोर येतो... पोलिसाकडे पिस्तुल असतं आणि तो खुनी मात्र निःशस्त्र असतो. तो पळून जाण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिस त्याच्यावर बंदुक रोखतो आणि म्हणतो, "थांब... पळून जाऊ नकोस... नाहीतर...!!!" खुनी विचारा थांबतो. पण थोडं डेअरिंग करतो आणि त्या पोलिसाला विचारतो, "काय करशील?" त्यावर तो पोलिस अधिकारी म्हणतो, "नाही तर पुन्हा असाच इशारा देईन...."

आपल्या केंद्र सरकारचं पाकिस्तानबाबत धोरण नेमकं असंच आहे....

No comments: